आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरा समाज स्लो है क्या?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती. त्यांच्याविषयी वाचावं म्हणून गूगललं, तर लक्षात आलं की, त्यांचा जन्म झाला त्याला आज तब्बल १९० वर्षं झालीत. जोतिबांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, असं आपण मानतो. त्यांना आपण महात्मा ही पदवीही दिली. त्यांनी सावित्रीबाईंना सोबत घेऊन पुण्यात मुलींची शाळा काढली त्याला १६५ वर्षं झालीत. तेव्हा शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या बोटावर मोजण्याइतकी असेल. आज या मुलींची सातवी वा आठवी पिढी शाळेत जायच्या वयाची असेल, पण ती शाळेत जात असेल का याची १०० टक्के खात्री आपण देऊ शकत नाही. कारण महिलांमध्ये साक्षरतेचं प्रमाण फक्त ७५ टक्के आहे. 

जोतिबांनी समाजाचा रोष पत्करून, टीका पचवून काम सुरू ठेवलं. पण, आज इतक्या वर्षांनंतरही मुलींना शाळेत पाठवा तर दूर राहिलं, त्यांना जन्म घेऊ द्या असं विनवायची वेळ सरकारवर, सामाजिक संस्थांवर येतेय. त्या साबणाच्या जाहिरातीतल्यासारखं वाटतं, आपला ‘समाज स्लो है क्या?’

यावर आता काय करता येईल, आपण सर्वसामान्य नागरिक काय करू शकतो, याचा विचार तातडीने करायची वेळ आली आहे, कदाचित कोणी म्हणेल की, ती उलटूनही गेली आहे. आपण निराशा, हतबलता, असहायता मागे सारून प्रत्यक्ष कृती करायची नितांत आवश्यकता आहे. आपण सरकारवर फार विसंबून राहतो की काय, असं वाटतं बऱ्याचदा. सरकारने माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करायला हव्यात, यात वाद नाही. परंतु, म्हणून आपण हातावर हात टाकून गपगुमान बसून राहावं, असा त्याचा अर्थ नाही. सरकारला जे जमत नसेल ते आपण करायला हवं, कारण ते आपल्यासाठी, आपल्याच भल्यासाठी आवश्यक आहे. 

आज जोतिबांच्या जयंतीच्या नावाने अनेक कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्रं होतील. पण या निमित्ताने आपण मुलींच्याच नव्हे तर शालाबाह्य सर्वांच्याच शिक्षणासाठी एकत्र येऊन काहीतरी करू या, नाहीतर अनेक जयंत्या येत जातील, आणि अापण स्लो असल्यावर शिक्कामोर्तब होत राहील केवळ.
 
- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...