आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पिरिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्याच मंगळवारची गोष्ट. मुंबई आणि परिसर व राज्यातील इतर अनेक भागांना पावसाने झोडपून काढलं होतं, बुडवून टाकलं होतं, रांगायला लावलं होतं. दरवर्षी एकदा तरी मुंबईत रस्ते वाहतूक थांबवण्याइतका आणि ट्रेन बंद करण्याइतका पाऊस पडतोच. पण मंगळवारी जे काही झालं ते भीषणच होतं. २६ जुलैच्या पुराची आठवण सर्वांनाच आली, जरी पाऊस त्या दिवसापेक्षा बराच कमी पडला होता. अाणखी मोठा फरक होता, सोशल मीडियाचा. २००५मध्ये ट्विटरचा जन्मच नव्हता झाला. व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक होते, पण भारतात पोहोचले नव्हते. २९ आॅगस्टच्या पूरपरिस्थितीत मात्र या तीन जालीय मित्रांनी मोठीच साथ दिली लोकांची. आपण कुठे आहोत, मदत हवीय असं सांगणारे एका बाजूला होते तर अमुक ठिकाणी अडकला असाल तर घरी या, असं सांगणारे दुसऱ्या. या दाेघांची गाठ या तीन मित्रांनी एकमेकांशी घालून दिली. यातूनच नव्याने समोर आला मुंबईचा मदत करणारा, हाकेला ओ देणारा, माणूसकी निभावणारा चेहरा. यालाच एक गोंडस नाव आहे, मुंबई स्पिरिट. मुंबईचा आत्मा. या स्पिरिटचा आणखी एक भाग आहे, तो म्हणजे वाट्टेल त्या अडचणीवर मात करून कामाचं ठिकाण गाठणारा मुंबईकर. मुंबईतल्या लोकलच्या अफाट गर्दीची, घड्याळाच्या काट्याबरहुकूम धावण्याची, शेजारपाजाऱ्यांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या स्वतंत्र वृत्तीची भीती वाटणाऱ्या ‘बाहेरच्यांनाही’ या स्पिरिटचं दर्शन झालं की, मुंबई आवडू लागते, असं म्हणतात.

पण, फक्त मुंबईकरच असं वागतात का? औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, जळगाव, अकोला, अमरावती, अहमदनगर, नागपूर, नांदेड, पुणे, वगैरे ठिकाणची माणसं असं नाही वागत? अशी आणीबाणीची परिस्थिती सर्वच शहरांवर कधी ना कधी ओढवलेली असते, तेव्हा अशी मदत अनेकांनी केलेली असतेच. पण तिथल्या अशा कहाण्या प्रसिद्धी माध्यमांमधून फार वाचायला नाही मिळत. या निमित्ताने तुमच्या शहरांवर ओढवलेल्या आपत्तीच्या वेळी माणुसकीचे झरे कसे दिसले होते, जात,धर्म,भाषा,प्रांत यांचा विचार न करता माणसं एकमेकांशी कसं वागली होती, हे आम्हाला कळवाल ना? सर्वच वाचकांना वाचायला अावडतील असे अनुभव.

- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...