आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्यातली ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्यातली ती वेगळी काढता येत नाही. कोणालाच. कधीच. ती तर आपल्याला तिच्या विचारातनंही काढू शकत नसते. तरीही आपल्या नावाशी, आपल्या ओळखीशी ती तशी जोडलेली नसते. किंबहुना आतापर्यंतचं चित्र असंच होतं. आता ते बदलतंय, हळूहळू का होईना, या चित्रात तीही डोकावू लागलीय आता. ती, आई.

हे चित्र म्हणजे आपलं नाव. म्हटलं तर क्षुल्लक तपशील, म्हटला तर आपल्याविषयी फार गहन अर्थ/पार्श्वभूमी/माहिती आदी तपशील पुरवणारा. भारतातल्या बहुतेक भागांमध्ये व्यक्तीचं नाव पहिलं आणि त्यानंतर वडिलांचं नाव व आडनाव किंवा वडिलांचं नाव आणि आडनाव लावलं जातं. शतकानुशतकं हीच पद्धत वापरली गेली. गेल्या काही वर्षांत या चित्रात वडिलांसोबत आईचाही चेहरा दिसू लागला. काही चित्रांत तर केवळ आईचा. अर्थात फक्त आईचं नाव लावणारे फारच कमी, पण ते आहेत. आणि त्यांनी हे काही निव्वळ गंमत म्हणून किंवा काहीतरी वेगळं करायचं म्हणून नाही केलेलं. त्यामागे त्यांचा विचार आहे, जाणूनबुजून केलेली ती कृती अाहे. आजच्या महिला दिन विशेषांकात अशा व्यक्तींची मनोगतं तुमच्यासाठी देतो आहोत. काही व्यक्ती अशाही आहेत की, ज्यांनी ठरवून आपल्या नावातून आडनाव गाळलं आहे. काहींनी मुलांची नावं जन्मापासून अाडनावाशिवाय लिहिली आहेत. आडनाव तुमच्या जातीधर्माची/समाजाची माहिती देतं. त्याचे फायदेही असतील, पण नवीन पिढीला त्यातले तोटे अधिक खुपतायत, असं लक्षात येतंय. त्यामुळे व्यक्तीचं नाव, मग आईचं आणि नंतर वडिलांचं अशी प्रथा रुजू लागलीय. आपल्याकडे शालांत परीक्षेच्या प्रमाणपत्रावर आईचंही नाव आता घातलेलं असतं, जरी त्यावर आडनावही असतं, आईच्या नावाची दखल तिथे घेतली जातेय, हे महत्त्वाचं.
या कृतीमागे वडिलांचं महत्त्व कमी करण्याचा, त्यांना कमी लेखण्याचा हेतू नाहीये, तर आई आणि वडील या दोन्ही जन्मदात्यांना समान सन्मान देण्याची मनापासूनची इच्छा आहे. या दोघांशिवाय व्यक्तीचा जन्मच नाही, नावाची काय कथा? परंतु इतकी वर्षं जे श्रेय आईला मिळालं नाही, ते देण्याचा हा प्रयत्न आहे. महिला दिनाच्या निमित्ताने सर्व वाचक मित्रमैत्रिणींना आणि आपल्यात सगळ्यांमध्ये दडून असलेल्या ‘ती’ला शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व महिला आनंदात राहोत, त्यांना तुमचा स्नेह मिळत राहो.
(mrinmayee.r@dbcorp.in)