आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेश आणि आपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपण अगदी लहान असतो, घरातली किंवा शेजारपाजारची मुलं गणवेश घालून शाळेत जाताना पाहात असतो, तेव्हाच गणवेशाबद्दलच्या आकर्षणाची ठिणगी पडत असावी. ज्या वयात आपल्याला घराबाहेर पडता येत नसतं, त्या वयात रोज ठरावीक वेळेला शाळेत जाणाऱ्या ताईदादांबद्दल कुतूहल वाटणारच. (त्या ताईदादांना रोज शाळेत जाताना काय वाटत असतं, हे मात्र आपल्याला त्यांच्या वयाचं होईपर्यंत कळत नसतं.) मग हळूहळू पोस्टमन, पोलिस, बसचे वाहकचालक, रिक्षाटॅक्सीचालक, सैन्यातले जवान अशा गणवेशधारी व्यक्ती दिसू लागतात, लक्षात येऊ लागतात. 

हे प्रेम निर्माण होण्यात त्यांच्या चकचकीत बुटांचाही हातभार असतो. या गणवेशाच्या आकर्षणामुळे आपल्यापैकी अनेकांना वर उल्लेखलेला व्यवसाय/काम करायची इच्छा लहानपणी एकदा तरी झालेली असते. गणवेशधारी व्यक्ती फक्त पुरुषच असल्याचा काळ मागे लोटला. वर उल्लेखलेले सगळे व्यवसाय/काम महिलाही करू लागल्या.
 
हवाई दलात वैमानिक असणाऱ्या तरुण मुलींचे फोटो शेकडो वेळा शेअर होतात, कारण त्यांचा गणवेश आणि अर्थात त्या करत असलेलं काम, देशसेवा वगैरे. म्हणूनच आजची कव्हर स्टोरी मेजर माधुरी कानिटकर यांच्याविषयीची. सैन्यात डाॅक्टर वा परिचारिका म्हणून काम करणाऱ्या महिला पूर्वीपासून आहेत. त्याही गणवेशातच असतात. 
 
आता गेल्या दोनेक दशकांपासून आणखीही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सैन्यात महिला सांभाळत आहेत. तरीही मे. कानिटकर यांचं कौतुक कारण पुण्यातल्या या सुप्रसिद्ध महाविद्यालयाच्या त्या पहिल्या महिला प्रमुख आहेत. महिलांनी घरीच बसावं, असं म्हणणारे अतिशहाणे अजूनही आपल्या आसपास असले तरी महिला काय करू शकतात, हे या सुहास्यवदनेकडून नक्कीच शिकायला मिळतं. 

परीक्षांचे, प्रवेश परीक्षांचे दिवस आहेत. करिअरच्या शेकडो वाटा समोर आहेत, नक्की काय करावं, काय जमेल, काय करायला आवडेल, अशा नाना शंकाकुशंका मनात असतील. मुलामुलींच्या आणि पालकांच्याही. दोघांना पसतं पडेल, आणि मुलांना झेपेल असं करिअर शोधणं हे पुढच्या काही महिन्यांतलं अनेकांचं ध्येय असणार आहे. अशा गोंधळलेल्या अवस्थेत मे. कानिटकरांसारख्या व्यक्तींविषयी वाचायला मिळालं, तर पुढचा मार्ग लख्खपणे दिसू शकतो. त्यासाठी सैन्यातच जायला हवं वा डाॅक्टरच व्हायला हवं, असं नव्हे. विचार स्पष्ट व्हायला मदत होईल नक्की.
 
(mrinmayee.r@dbcorp.in)
बातम्या आणखी आहेत...