आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते दुध तुझ्या त्या घटातले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकीकडे आईचं दूध न मिळाल्याने अशक्त झालेली लेकरं. दुसरीकडे भरपूर दूध असूनही बाळाला देता येत नसल्याने ते वाया जाऊ देणाऱ्या माता. या दोघांना एकत्र आणून बालमृत्यूदर कमी करणारा एक उपक्रम म्हणजे आईच्या दुधाची बँक. ब्राझील या विकसनशील देशात दोनशेहून अधिक अशा बँका आहेत. भारतात त्या वीसही नाहीत, ही लाजिरवाणी गोष्ट. उदयपूरच्या एका बँकेला भेट दिल्यानंतर ही कमी फारच जाणवली.
दोन-अडीच तासांचा प्रवास करून भिलवाड्याहून उदयपूरच्या रवींद्रनाथ टागोर सरकारी रुग्णालयात पोहोचलेली रेखा. दोन महिन्यांच्या तिच्या मुलीला फिट येत होत्या, म्हणून इथल्या एनआयसीयूत (Neonatal Intensive Care Unit) म्हणजे तान्ह्या बाळांच्या अतिदक्षता विभागात दाखल केलं होतं. तिला आईचं दूध ओढण्याएवढी शक्ती नव्हती, पण रेखाला दूध तर येत होतं. एकीकडे मुलीच्या तब्येतीची काळजी, दुसऱ्या शहरात राहणं, त्यात हा त्रास. मग तिच्या मदतीला आली या रुग्णालयात असलेली दिव्य मदर्स मिल्क बँक. आईच्या दुधाची बँक. या बँकेने काय केलं?
या बँकेने रेखाचं दूध पंपद्वारे काढून त्यावर प्रक्रिया करून ते साठवलं आणि तिच्या मुलीसारख्या, वा ज्यांना त्यांच्या आईचं दूध मिळणं शक्य नव्हतं अशा इतर मुलांपर्यंत ते पोहोचवलं. या अवाढव्य रुग्णालयात दिव्य मदर्स मिल्क बँक साडेतीन वर्षांपूर्वी सुरू झाली. तिथल्या एनआयसीयूत दर महिन्यात दोनशेहून अधिक तान्ही बाळं उपचारासाठी असतात. त्यातल्या अनेकांना आईचं दूध ओढण्याइतकी ताकद नसते. त्याचबरोबर इथल्या मॅटर्निटी विभागात अशा अनेक माता असतात ज्यांना दूध येत असतं, आणि त्यांच्या बाळांना देऊन ते उरत असतं. अशी तान्ही बाळं एका बाजूला आणि माता दुसऱ्या बाजूला. या दोन घटकांना एकत्र आणणारी ही मदर्स मिल्क बँक.
भारतातली पहिली अशी बँक मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात १९८९मध्ये सुरू झाली. ती आजही सुरू आहे. मात्र त्यानंतर गेल्या २७ वर्षांत फार बँका उभ्या झालेल्या नाहीत. त्यांची संपूर्ण देशभरातली संख्या आजही वीसच्या आत आहे. उदयपूरमधील बँक माँ भगवती विकास संस्थान या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने, २० लाख रुपये गुंतवून, सुरू करण्यात आली असून राजस्थान सरकारने त्यांना जागा पुरवली आहे. उदयपूरनंतर राजस्थानातल्या तीनचार शहरांमध्ये अशा बँक सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात केवळ मुंबईतच अशा काही बँका आहेत. आईच्या दुधातून मिळणारे संरक्षक व वाढीसाठी आवश्यक घटक न मिळाल्याने होणारे बालमृत्यू आजही थांबलेले नाहीत, तरीही या बँकांचा पसारा वाढलेला दिसत नाही. देवकी व यशोदेची गोष्ट भारतात लोकप्रिय आहे. परंतु, तरीही दुसऱ्या बाळासाठी दूध दान करण्याचा विचार बहुतांश जनतेच्या आकलनापलीकडचा आहे. सरकार वा डाॅक्टरही ही संकल्पना जनेतपर्यंत पोहोचवण्यात कमी पडले आहेत.
ब्राझीलमध्ये वीसेक वर्षांत दोनशेहून अधिक मिल्क बँक उभ्या राहिल्या आहेत. तेथे या बँकांविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती आहे. बँका उभ्या राहिल्यानंतर बालमृत्यूदरात कमालीची घट झाली आहे, हे या उपक्रमाचं यश आहे.
उदयपूरच्या रुग्णालयातले डाॅक्टर नवीन माता झालेल्या महिलांचं समुपदेशन करतात व त्यांना या बँकेची माहिती देतात. ही कल्पना समजावून घेणंच या महिलांना कठीण जातं. आपलं दूध कसं द्यायचं दुसऱ्या मुलाला, ते काढायचं कसं, पंप लावला तर दुखेल, माझ्या मुलाच्या वाट्याचं दूध कमी होईल, लोक काय म्हणतील, वगैरे वगैरे प्रश्न त्यांना पडलेले असतात. मग या ओल्या बाळंतिणीला एखादी नर्स वा आयाबाई या बँकेत हात धरून घेऊन येते. तिला ब्रेस्ट पंप कसा वापरायचा, ते शिकवलं जातं. तिथे असलेल्या इतर मातांना पाहून, त्यांच्याशी बोलून तीही पंप वापरायला धजावते. पंप लावल्यानंतर अजिबात दुखत नाही, हे तिला कळल्यावर तिला हायसं वाटतं. मग ती जमेल तेवढे दिवस या बँकेत येऊन दूध जमा करते.
बँकेत दूध घेण्यापूर्वी प्रत्येक आईचं रक्त चाचणीसाठी घेतलं जातं. ती एचआयव्ही पाॅझिटिव्ह नाही, वा इतर कोणती संसर्गजन्य लागण तिला नाही, याची तपासणी केली जाते. दरम्यान जमा झालेलं दूधही चाचणीसाठी पाठवलं जातं, त्यात कोणते जंतू नाहीत ना, हे तपासलं जातं. तोपर्यंत जमा झालेलं दूध शीतयंत्रात ठेवलं जातं. आई व दूध दोन्ही निरोगी असल्याचा अहवाल आला की, दर दिवशी जमा होणारं सगळं दूध एकत्र करून या दुधावर पाश्चरीकरणाची प्रक्रिया केली जाते. व ते ३० मिलीच्या बाटलीत काढून, प्रत्येक बाटलीवर जमा केल्याची तारीख, दूध देणाऱ्या महिलेचा नोंदणी क्रमांक लिहून हे दूध अतिशीतयंत्रात साठवलं जातं. हे दूध सहा महिने वापरण्यायोग्य असतं. रक्त व दुधाची चाचणी वगळता सगळं काम या बँकेतच होतं.
रुग्णालयात एनआयसीयूत असलेल्या बाळांना लागेल तसं दूध या बँकेतून पुरवलं जातं. रुग्णालयात दाखल नसलेल्या बाळांनाही ते मोफत दिलं जातं. अनेक स्तनदा माता इथे येऊन दूध देऊ शकतात. हे दूध सहा महिने साठवता येतं, तरी ते कधीच तितके दिवस ठेवावं लागत नाही, त्याआधीच ते संपलेलं असतं. म्हणजेच त्याची गरज आहे, हे निश्चित. याचाही विचार या ठिकाणी करायला हवा की, बहुतांश लोकांना या उपक्रमाची माहितीच नाही. म्हणजे एका मातेचं दूध दुसऱ्या मुलाला दिलं जाऊ शकतं, त्यासाठी व्यवस्था उभारली जाऊ शकते, त्यात योग्य काळजी घेतल्यास कोणताही धोका नाही, याबद्दलच अज्ञान आहे. बाळाला गाय, म्हैस वा बकरीचं दूध, एवढंच कशाला, डब्यातल्या पावडरचं दूधही अगदी विश्वासाने देतो. मग मनुष्यजातीचंच दूध देण्यात आक्षेप कशाला, हा या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना न उलगडलेला प्रश्न आहे.
मृण्मयी रानडे, उदयपूर
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...