आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळं मांजर आणि बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुटलेला, ताणलेला संवाद पुन्हा जुळावा, व्यक्त-अव्यक्त कल्पना-संकल्पनांना मर्जीचा अवकाश मिळावा, दृष्टी आणि ज्ञानापलीकडच्या जगाची जान-पछान व्हावी... जे निषिद्ध मानलं गेलं त्याचा मोकळ्या मनाने स्वीकार व्हावा  या ऊर्मीतून मुंबईत ‘बैठक-काली बिल्ली’ अस्तित्वात आली... आता या बैठकीला पक्कं स्वरूप आलं आहे. तिचं असणंच अभिव्यक्तीला हवं तसं स्वातंत्र्य मिळवून देणारं ठरलं आहे...

मुंबई-पुण्यासारख्या महानगरात प्रचंड संख्येने माणसं राहतात, आयुष्याच्या धकाधकीत स्वत:ला झोकून देतात आणि घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करत दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करण्यात जुंपून घेतात. या घाईगर्दीत जवळच्या माणसांशी संवाद करण्याइतकीसुद्धा उसंत मिळत नाही. अशा वेळी महानगराच्या छोट्या-छोट्या कोपऱ्यांमध्ये ही तहान भागवणारे लहानलहान गट निर्माण होतात आणि ‘कट्टा संस्कृती’ जन्म घेते. गेल्या काही वर्षांत मुंबईत आणि इतरत्र असे अनेक कट्टे अस्तित्वात आलेले आहेत.
 
सावित्री मेधातुल आणि भूषण कोरगावकर या दोघांना मात्र या संकल्पनेला काहीसं वेगळं स्वरूप द्यावंसं वाटत होतं. सावित्री मेधातुल ही लघुचित्रपटांची निर्माती-दिग्दर्शक आणि रंगभूमीवर सक्रिय अभिनेत्री, तर भूषण कोरगावकर हा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट, परंतु ‘संगीत बारी’ या गाजलेल्या पुस्तकाचा लेखक. दोघांची वाचनाची आवड आणि भिन्न कला प्रांतांतली मुशाफिरी यामुळे दोघांतला संवाद वाढत गेला. हळूहळू त्यांना असं वाटू लागलं की हा संवाद आपल्यासारख्या इतर अनेकांबरोबर वाढवायला हवा. यासाठी काय करावं? तर एखादी अशी जागा शोधावी की तिथे सर्वांच्या सोयीने एकत्र भेटता येईल, मुख्य म्हणजे, प्रत्यक्ष संवादाचं उद्दिष्ट साध्य होईल. या कल्पनेचं मूर्त रूप म्हणजेच ‘बैठक-काली बिल्ली’ हा अभिनव उपक्रम.
 
‘बैठक-काली बिल्ली’ हेच नाव का निवडलं? सावित्री म्हणते की ‘बैठक म्हणजे छोटीशी मीटिंग किंवा सभा. नाच-गाण्याच्या छोटेखानी मैफलीससुद्धा बैठक म्हणतात. बैठकीला येणारी काही माणसं नुसतीच श्रोते, प्रेक्षक म्हणून येतात तर काही जणांना आपली मतं मांडावीशी वाटतात. आमची बैठकही अशीच असेल. ज्यांना अशा प्रकारच्या संवादात रस आहे अशांनी आमच्या बैठकीला यावं, कार्यक्रम पाहावा, वाटलं तर चर्चा करावी नाही तर नुसताच एक नवीन अनुभव घेऊन परत जावं, पण आस्वाद जरूर घ्यावा. अशांचं आम्ही सदैव स्वागत करू. आणि या बैठकीला काली बिल्लीची जोड अशासाठी की,  माझ्याकडे एक काळं मांजर आहे.  एरवी,  काळं मांजर अपशकुनी, निषिद्ध मानलं जातं, त्यालाच आपण प्रतीकात्मक का होईना, स्थान द्यावं ’
 
बैठकीसाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न सोडवला कुणाल विजयकर या त्यांच्या कलावंत मित्रानं. खारच्या १७व्या रस्त्यावर कुणालच्या घरच्या गॅरेजमध्ये ‘कला स्टुडिओ’ या नावाची छोटीशी, परंतु सर्व सोयींनी युक्त अशी जागा आहे, ती त्याने लगेच उपलब्ध करून दिली. या जागेत चाळीस एक माणसं व्यवस्थित बसू शकतात आणि निवांतपणे कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकतात. एकदा जागा नक्की झाल्यावर ‘बैठकी’च्या आयोजनाला चालना मिळाली आणि निरनिराळ्या प्रकारची जबाबदारी पेलायला इतर मित्र पुढे आले. अमरीश चंदन या कलाकार-चित्रकार मित्राने पोस्टर्स-जाहिरातींची जबाबदारी स्वीकारली. अनुपमा जोशी, मनीषा कोरडे यांनी बैठकीच्या व्यवस्थेची जबाबदारी उचलली. सावित्री आणि भूषण यांनी कार्यक्रमांची संकल्पना ठरवण्याची आणि त्यासाठी कलाकार, व्याख्याते यांच्याशी संपर्क साधण्याची महत्त्वाची भूमिका अंगावर घेतली. सर्वांच्या सहकार्यातून २०१६ च्या ऑगस्ट महिन्यात ‘बैठक’ या नावीन्यपूर्ण आगळ्यावेगळ्या उपक्रमाला सुरुवात झाली. एकमेकांच्या मित्रमंडळींना फेसबुक, ईमेल, व्हॉट्सअॅप अशा माध्यमांतून संदेश गेले की, दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान कला स्टुडिओत जमायचं आणि काही तरी वेगळं पाहायचं, एेकायचं आणि त्यावर चर्चा करायची. आणि हो, येताना आपल्यासारख्याच इतर समविचारी मित्रांना बरोबर घेऊन यायचं...
 
...‘बैठक’ हा उपक्रम सुरू झाल्याला एव्हाना दहा महिने होऊन गेले आहेत आणि इथला एक जाणकार प्रेक्षकवर्गही तयार झालेला आहे. त्यात लेखक, गायक, सिनेदिग्दर्शक, नर्तक, अभिनेते आणि उत्तम रसिक वाचक अशी सर्व प्रकारची मंडळी सामील झालेली आहेत. त्यांच्या भिन्न अभिरुचींना पोषक असं खाद्य पुरवण्यासाठी वेगवेगळे कलाकार अहमहमिकेने पुढे येत आहेत आणि त्यामुळे ‘बैठक’ ही संकल्पना अत्यंत यशस्वी झाल्याचं समाधान सावित्री-भूषण-कुणाल-मनीषा-अमरीश-अनुपमा यांना मिळत आहे.
 
वर्षभरातल्या बैठकींचा आढावा घेतला तर त्यात सादर केल्या गेलेल्या विषयांचं वैविध्य आणि आगळेवेगळेपण आधी डोळ्यात भरतं. पहिल्या बैठकीत ‘अंतर्नाद’चं सादरीकरण झालं. यात युगंधर देशपांडे, अमरीश चंदन आणि भूषण कोरगांवकर यांनी आपल्या कथांचं वाचन केलं आणि मनीषा कोरडेनं तिच्या कविता सादर केल्या. जमलेल्या रसिकांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं. पुढची बैठक खरोखरच आगळीवेगळी ठरली. शाहू पाटोळे या औरंगाबादच्या लेखकाने ‘अन्न हे अ-पूर्णब्रह्म’ या आपल्या पुस्तकाची ओळख रसिकांना करून दिली. पाटोळेंनी ओळख करून दिलेली दलित समाजातील खाद्यसंस्कृती अगदीच वेगळी आहे. शहरी, उच्चवर्णीय समाजाला ती एेकूनही माहीत असण्याची शक्यता नाही. त्यांचे अन्नपदार्थ काय असतात, कसे शिजवले जातात, उपलब्ध असलेल्या अन्न-धान्यांतून किंवा मांसांतून कमीत कमी श्रमांत आणि कमीत कमी वेळात दलित स्त्रिया जेवण कसं रांधतात, त्याचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण त्यांनी आपल्या पुस्तकातून केलं आहेच, पण त्या दिवशी त्यांनी भाषणातूनही आपली खाद्यसंस्कृती या शहरी लोकांपुढे उघड केली आणि उपस्थितांना चकित केलं. नंदिता पाटकर यांनी काही उतारे वाचून दाखवले. या बैठकीनंतर प्रश्नोत्तरांचा आणि चर्चेचा तास खूपच रंगला. त्यात अधिक रंगत आणली, ती सायली राजाध्यक्ष या फूड-ब्लॉगरनी शाहू पाटोळ्यांच्या पुस्तकात दिलेल्या कृतीनुसार बनवून आणलेल्या ‘कोतमीर वडी’ने. अशाच वड्या सुशील नरसियन यांनीही घरून बनवून आणल्या होत्या, त्यांची चव घेतच रसिक बाहेर पडले.
 
तिसरी बैठक तिच्या नावापासूनच नवीन होती. वैभव आरेकर यांनी ‘रंगनृत्य’ या अभिनव कल्पनेचा उगम, आविष्कार, त्यामागचा विचार हे सर्व मोकळेपणाने उलगडून दाखवलं. रंगनृत्य म्हणजे नृत्याद्वारे नाटकाचं सादरीकरण. पण नृत्यनाटक आणि रंगनृत्य यांत काही सूक्ष्म फरक आहेत. त्यांचं विवेचन वैभव आरेकरांनी अतिश ओघवत्या भाषेत आणि स्वत: नृत्य करून रसिकांपर्यंत पोहोचवलं. या सादरीकरणालाही प्रेक्षकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. यानंतरच्या दोन बैठकी अगदीच वेगळ्या विषयांवरच्या होत्या. एका बैठकीत पॉप्युलर प्रकाशनाचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ प्रकाशक, लेखक, विचारवंत रामदास भटकळ यांनी ‘पॉप्युलरचं अंतरंग’ उलगडून दाखवलं. पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रातला त्यांचा दीर्घ अनुभव, लेखकांबरोबर जुळलेलं नातं, पुस्तक निर्मितीमागचे कष्ट आणि टीमवर्क आणि प्रतिभावंतांचा परिचय या सर्व गोष्टी त्यांच्या निवेदनातून दुर्गा भागवत, ग्रेस, विंदा करंदीकर, प्रकाश होळकर यांच्या साहित्यातले उतारे आणि कवितांचं वाचन केलं ते रसिकांना अतिशय भावलं. रामदास भटकळ यांना प्रेक्षकांनी मार्मिक प्रश्न विचारून चर्चा अधिकच रंगतदार केली.
 
अशीच पुढची बैठक रंगली ती ‘शिकत-शिकवता’ या विषयावर. महाराष्ट्रातील आदिवासीबहुल विभागांत शिक्षणाविषयीचे निरनिराळे प्रयोग करणारे ‘क्वेस्ट’ या संस्थेचे संचालक नीलेश निमकर आणि त्यांच्याच तालमीत तयार झालेले, ‘गोष्ट गुरुजी घडण्याची’ या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे लेखक व प्रयोगशील शिक्षक प्रल्हाद काठोले यांनी आपले शैक्षणिक प्रयोगांचे अनुभव सरळ, सोप्या भाषेत मांडले आणि प्रेक्षकांची वाहवा घेतली. निमकर सरांनी तर प्रेक्षकांसोबत भुगोलाचा एक ‘पाठ’ ही घेतला, आणि त्यातून आदिवासी मुलांना त्यांच्या भाषेतून गणित, विज्ञान, भूगोलातल्या संकल्पना सोप्या करून कशा शिकवल्या जातात, हे स्पष्ट केलं. ग्रामीण भागातल्या शिक्षणाचं आजचं चित्र प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभं करण्यात ते चांगलेच यशस्वी झाले आणि म्हणूनच नंतर त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले.

बैठकीत रंगभूमीवरच्या निरनिराळ्या प्रयोगांना आस्थेने सादर केलं जातं ही गोष्ट अधोरेखित झाली, तीन बैठकांमधून झालेल्या अनवट प्रयोगांनी, ‘एकल चलो रे,’ ‘तोरा आणि ताठा’ आणि ‘आकडा’ हे ते तीन प्रयोग. पुण्याचे प्रदीप वैद्य ‘एक्स्प्रेशन लॅब’ मधून ‘एकल नाट्य’ किंवा ‘सोलो’ नाटकाची कल्पना विद्यार्थ्यांत रुजवतात. त्यातून काही विस्मयकारक एकल नाट्यांची निर्मिती झाली आहे. साईनाथ गणुवाड आणि लक्ष्मी बिराजदार यांच्या सादरीकरणांतून आणि प्रदीप वैद्य यांच्या मुलाखतीतून प्रेक्षकांना ते अनुभवता आलं. बिल मॅन हॉफ यांच्या ‘द आऊल अँड द पुसीकॅट’ या नाटकाच्या ‘तोरा आणि ताठा’ या मराठी रूपांतरांचं अभिवाचन गीतांजली कुलकर्णी आणि दीपल दोशी यांनी समर्थपणे सादर करून रसिकांना एक जबरदस्त अनुभव दिला.

‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेले नाट्यकर्मी लेखक राजकुमार तांगडे आणि संभाजी तांगडे यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी गाजलेलं पण आजही तितकंच ताजं असलेलं ‘आकडा’ हे नाटक सादर करून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. ग्रामीण विभागातल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचं वास्तव या नाटकातून ठाशीवपणे समोर आलं.
 
बैठकीचे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले ते प्राची दुबळे यांच्या ‘गोष्ट आदिम संगीताची’ या बहारदार संवादाने... आदिवासी संगीत, त्याचं शास्त्रीय संगीताशी असलेलं नातं, आदिवासी समाजातल्या प्रचलित रुढी आणि मिथ्यकथा अशा अनेक विषयांना स्पर्श करत आणि स्वत:च्या गोड आवाजात ती गाणी गाऊन दाखवत प्राची दुबळेंनी प्रेक्षकांना एका वेगळ्याच प्रदेशात नेलं. ही बैठक सर्वाधिक आकर्षक आणि यशस्वी झाली. अगदीच वेगळ्या विषयाला हात घालणारी बैठक ठरली ती म्हणजे, LGBTQI या विषयावरील गणेश मतकरी आणि रोहन कानवडे यांनी तयार केलेल्या शॉर्ट फिल्म आणि नंतर दोघांशी चर्चा व गप्पा. सर्वसामान्यपणे या विषयाला मोकळेपणाने सामोरे न जाणारे प्रेक्षक या फिल्म्स पाहून सुन्न झाले आणि नंतर या प्रश्नांचे अनेक कंगोरे तपासले गेले. आजवर झालेल्या दहा बैठकांना मी आवर्जून उपस्थित होते. या दरम्यान सावित्री-भूषणची धडपड पाहून भारावून गेले आहे. रसिक वाचकांना, प्रेक्षकांना, श्रोत्यांना वैचारिक आणि भावनिक मेजवानी देणारं एक हक्काचं प्रांगण हवं होतं आणि ते बैठकीच्या रूपानं त्यांना गवसलं आहे, ‘बैठक’ या उपक्रमाची अशीच दमदार वाटचाल यापुढेही चालू राहील, हा विश्वास स्थिर झाला आहे.
 
लेखिकेचा संपर्क : ९८१९९३९१३३
mrudulapj@gmail.com
बातम्या आणखी आहेत...