आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाव्य परिणामांची जाणीव आवश्‍यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाजूक चणीच्या, घा-या डोळ्यांच्या सुंदरशा अनिताकडे बघूनच कळत होते, की तिला काहीतरी बोलायचे आहे. मात्र ती बोलत नव्हती. तिच्या वतीने सगळे संभाषण तिची आईच करत होती. वडीलही येऊन विरुद्ध पक्षाला धडा शिकवायची भाषा करून गेले होते. तिच्या भोळ्याभाबड्या मुलीवर कसा अत्याचार करण्यात आलाय, तिचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झालेय, ते तिची आई कळवळून सांगत होती. ती मात्र गप्प बसून होती. तिचा चेहरा चिंतेने झाकोळून गेला होता. अनिताच्या शेजारी राहणा-या मुलाने तिला काहीतरी खोटेनाटे सांगून एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता, अशी केस दाखल झाली होती. अनिताला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. म्हणूनच डॉक्टरांनी सांगितल्यानुसार ती केंद्रात आली होती.

बराच वेळ तिच्या आईचे बोलणे ऐकून घेतल्यावर अखेर मी तिच्या आईला बाहेर बसायला सांगितलं आणि अनिताशी बोलायला सुरुवात केली. आई बाहेर गेल्यावर अनिता थोडी मोकळी झाली असली तरी अजूनही ती बोलायला जरा बिचकतच होती. तिला धीर देऊन तिला आमच्या कामाबद्दल माहिती दिली. प्रश्न विचारून तिला मी हळूहळू बोलती केली आणि मग खरी हकीगत कळली ती अशी :
17 वर्षांची अनिता घरातली मोठी मुलगी. बारावीत शिकत असलेली. तिला अजून दोन लहान बहिणी! वडील कंपनीत कामाला होते तर आई गृहिणी. वडील शिस्तीचे आणि जुन्या रीतीरिवाजांना चिकटून राहणारे होते. अनिता अशा कर्मठ वातावरणात वाढली तरी कॉलेजला गेल्यावर तिथल्या रंगीबेरंगी वातावरणाने तिच्यात बरेच बदल घडवून आणले होते. तिच्या शेजारी राहणारा विशाल तिला कधी आवडायला लागला, हे तिचे तिलाच कळले नाही. विशाल 20 वर्षांचा होता. तोही घरातला मोठा मुलगा होता. वडलांना त्यांच्या दुकानात मदत करता करता शिकत होता. हसतमुख, निर्व्यसनी विशाल कोणालाही आवडावा असाच होता. सुंदर, लाघवी अनिताच्या तोही प्रेमात पडला. गेलं जवळजवळ वर्षभर त्यांच अफेअर चालूच होतं. कितीही काळजी घेतली तरी तिच्या घरच्यांना या प्रकाराची थोडीफार कुणकुण लागलीच होती. त्यांनी अनिताला फैलावर घेतलं. विशालचा नाद सोडायला सांगितलं. अनिताने वरवर त्यांचं ऐकल्यासारखं दाखवलं, पण विशालपासून दूर होणं तिला जमणारच नव्हतं. दोन दिवसांपूर्वी ती विशालच्या वाढदिवसाला कॉलेज बुडवून भेटली. त्याच्याबरोबर फिरताना काळवेळ तर विसरलीच, पण त्या भेटीत ती विशालला आपलं सर्वस्व देऊन बसली. कॉलेजची वेळ टळून बराच वेळ झाला तरी अनिता न आल्यामुळे शोधाशोध झाली. कुणीतरी तिला विशालबरोबर पाहिल्याचं सांगितलं आणि बरोब्बर माग काढत मग तिच्या घरच्यांनी तिला रंगेहाथ पकडलं!
आपल्या मुलीने एका खालच्या जातीतल्या मुलाबरोबर हे धंदे करावेत, याचा त्यांना कमालीचा संताप आला होता. काय करावं न काय नाही, असं त्यांना झालं होतं. आणि अखेर या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांनी विशालवर तक्रार दाखल केली होती. वडलांच्या उद्रेकामुळे थरकापलेल्या अनिताने आपली बाजू मांडायचा दुबळा प्रयत्न केला होता, पण तिच्या वडलांनी तो उडवून लावला होता. त्यांना जास्त काळजी होती ती समाजाच्या टीकेची! मुलीच्या भावना किंवा मुलाच्या भविष्यावर होणारा परिणाम या गोष्टी सध्या तरी त्यांच्या खिजगणतीत नव्हत्या. दुर्दैवाने अनिताचं वय फक्त सतरा वर्षं होतं, म्हणजे कायद्याच्या दृष्टीने अनिता अद्याप अज्ञान होती. त्यामुळे साहजिकच विशाल विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. कारण आपल्या कायद्यानुसार मुलगी 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर तिची संमती ग्राह्य धरली जात नाही आणि त्यामुळे तिच्या संमतीने जरी लैंगिक संबंध घडला असेल तरीही तो बलात्कारच मानला जातो. पण लग्न झालेल्या जोडप्यांच्या बाबतीत मात्र पत्नीचे वय 15 वर्षांपेक्षा कमी असेल तर तो बलात्कार मानला जातो. म्हणजे लग्न झालेली 17 वर्षांची मुलगी लैंगिक संबंधांना संमती देऊ शकते, पण प्रेमात पडलेली मुलगी मात्र 18 वर्षांनंतरच अशी संमती देऊ शकते!
आपल्या कृतीचे इतके भयंकर परिणाम होतील, याची कल्पना नसल्यामुळे दोघेही पार भांबावून गेले होते. विशाल तर तडक आपल्या कुठच्यातरी मित्राकडे निघून गेलेला होता, त्यामुळे त्याला अद्याप अटक झाली नव्हती. अनिता गोंधळून गेली होती. अपराधीपणाच्या भावनेचं प्रचंड ओझं तिच्या मनावर आलं होतं. आपल्यामुळे विशालवर संकट आलंय, असं तिला वाटत होतं. विशालचं आता काय होईल, हा प्रश्न तिचं काळीज कुरतडत होता. बदनामी टळली नव्हतीच!
एक समुपदेशक म्हणूनही ही परिस्थिती न आवडणारीच होती. आरोपी उघडउघड वाईट असतो तेव्हा आपल्या मनात दुविधा नसते, संघर्ष नसतो. त्यामुळे आपण अत्याचाराविरोधात ठोस भूमिका घेऊ शकतो. इथे मात्र विशाल वाईट, अत्याचारी नव्हता. सर्वसामान्य सामाजिक संकेत न मानण्याची चूक त्याच्याकडून झाली होती, पण ती चूक तर अनिताकडूनही झाली होती. अल्लड वयात, परिणामांचा विचार न करता शारीरिक आकर्षणात वाहवत जाण्याचा प्रमाद दोघांचाही होता. - पान 8 पाहा
पण विशालवर मात्र कायमचा गुन्हेगार म्हणून शिक्का बसणार होता. एका 20 वर्षांच्या मुलाला बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाल्यास त्याचे त्याच्या आयुष्यावर निश्चितच दूरगामी परिणाम होणार होते. ‘आपल्या घराण्याची अब्रू धुळीला मिळाली’, या कल्पनेने बिथरलेल्या अनिताच्या वडलांच्या आततायीपणामुळे धुळीला मिळालेली अब्रू परत येणार नव्हतीच, उलट या गोष्टीचा उगाचच आजूबाजूला बभ्रा झाला होता. अशी परिस्थिती आताच्या काळात वारंवार उद्भवणार यात शंकाच नाही; कारण टीव्ही, इंटरनेट यामुळे मिळणारे प्रचंड एक्स्पोजर लक्षात घेता तरुण, किशोरवयीन मुलामुलींमध्ये लैंगिक संबंधांचं प्रमाण निश्चितच वाढतं आहे. मग अशा वेळी सरसकट सगळ्या केसेस बलात्काराच्या व्याख्येत कोंबून बसवणं योग्य आहे का? की अशा केसेससाठी काही वेगळी उपाययोजना शक्य आहे, याचा नव्याने विचार करण्याची आज
गरज आहे.
पालकांनीही घाईघाईने निर्णय न घेता आपल्या मुलांच्या बाबतीतले नाजूक प्रश्न सामोपचाराने, सामंजस्याने सोडवणे गरजेचे आहे. तसेच आजच्या किशोरवयीन तरुण-तरुणींना आपल्या कृतीचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात, याची माहिती देणे आवश्यक आहे. अनिताच्या बाबतीत तिला समुपदेशनाची नितांत आवश्यकता होती. तिला वैद्यकीय तसेच कायदेशीर प्रक्रिया समजून सांगणे आवश्यक होते. त्याचबरोबर तिच्या आईवडलांशी बोलणेही फार आवश्यक होते. अनिता आणि विशालचं कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी काय काय करता येईल, याचा विचार करतच मी अनिताच्या आईवडलांशी बोलण्यासाठी त्यांना बोलावणं पाठवलं आणि एका कठीण कामगिरीला सुरुवात केली!
mrudulasawant13@gmail.com