आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसमजाची भिंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ताई, बाहेर अजय चव्हाण आलाय,’ माझ्या सहकार्‍याने माहिती दिली. मी चमकले. आज सकाळीच आनंदीने फोन करून सांगितले होते, की तिच्या मुलाने मीटिंगसाठी यायला नकार
दिला होता आणि म्हणून तीपण कामावर सुटी करून येणार नव्हती. आणि आता अचानक अजय येऊन हजर झाला होता.
अजय आनंदीचा सख्खा मोठा मुलगा, 18 वर्षांचा! आनंदी आमच्या केंद्रात मदत घ्यायला येणार्‍या बायकांपैकी एक! तिच्या फक्त नावातच आनंद होता, बाकी देव तिच्या आयुष्यात आनंद पेरायला विसरलाच होता की काय कोण जाणे!
8-9 वर्षांपूर्वी जेव्हा तिचा नवरा तिला सोडून गेला तेव्हा अजयने स्वेच्छेने बापाबरोबर जाणं पत्करलं! बाप दुबईला नोकरीला असल्यामुळे त्याला त्याच्या काकांकडे सोडून गेला. यादरम्यान आनंदीने त्याला भेटायचा प्रयत्न केला, पण दर वेळी तिच्या दीर-जावेने तिला चांगलीच मारहाण केली आणि अजयनेही तिला भेटण्यात फारसा रस दाखवला नाही. हा मुलगा आपल्या नशिबातच नाही अशी तिने मनाची कशीबशी समजूत काढली, तोच आता बारावीनंतर मुंबईत कॉलेजला प्रवेश घेतला म्हणून तिच्या नवर्‍याने परत अजयला तिच्याकडे आणून ठेवले होते. ‘हे घर माझेच आहे, त्यामुळे माझा मुलगा इथे राहणारच, असे धमकावत, त्याचबरोबर ‘तुझा मोठा मुलगा तुझ्याकडे आला तर बरंच आहे न तुला,’ अशी लाडीगोडी लावून त्याने आपले काम साधून घेतले होते.
अजय बापाच्याच पावलावर पाऊल टाकून चालत होत. नवरा खर्चाचे पैसे आनंदीला न देता मुलाकडे पाठवत होता. तो पै न पैचा हिशोब घेत होता. तिच्या येण्याजाण्यावर, वागण्यावर हरकत घेत तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता. वेळप्रसंगी संशय घेऊन तिला जाब विचारायलाही कमी करत नव्हता. त्याच्या येण्यामुळे सुखावण्याऐवजी आनंदी पार धास्तावून गेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे ‘अजय चव्हाण’चं एक व्यक्तिचित्र माझ्याही मनात तयार झालेलं होतं. मनोमन नकळतच कुठेतरी तिच्या नवर्‍याचा प्रतिनिधी अशी त्याची प्रतिमा मनात तयार झालेली होती, त्याच विचारात मी बाहेर आले.
समोर एक काळासावळा, तरतरीत, बारीक मुलगा बसलेला होता. ‘अरे, तू येणार नव्हतास ना?’ मी विचारलं. ‘हो, आमचे प्रश्न सोडवायला आईने आम्हाला तुमच्यापर्यंत आणलं या गोष्टीचा संताप आला होता, म्हणून नाही म्हटलं. पण नंतर तुमच्या बोलण्याचा मान ठेवायचा म्हणून आलो,’ तो काहीसा ताठ्यात म्हणाला. ‘मॅडम, तुम्हाला माहीतच आहे की हल्लीच माझा अपघात झाला होता. डोक्याला मार लागला होता. डॉक्टरांनी सांगितलं की मला जास्त ताण घेता कामा नये.’ मी माहीत असल्याची मान डोलावली. ‘मग आपलं बोलणं होत असताना मला काही झालं तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्याल?’ मला गंमत वाटली. वडिलांनी बर्‍यापैकी टिप्स देऊन पाठवलं असावं बहुतेक! मी त्याला शांतपणे सांगितलं की त्याला काही झालं तर त्याला मी जबाबदार असणार नाही, कारण मुळात मी काहीच वावगं बोलणार नाहीये आणि तो स्वेच्छेने माझ्याशी बोलायला आला आहे. पण अर्थातच त्याला काही झालं तर त्याला ताबडतोब, सुयोग्य उपचार मिळतील इतकी काळजी मी नक्कीच घेईन! तो निरुत्तर होऊन बसून राहिला.
मी थोडक्यात आनंदीचे त्याच्या वागण्याबद्दलचे आक्षेप त्याला सांगितले. एक मुलगा म्हणून त्याचं हे वागणं अजिबात योग्य नसल्याचंही त्याला सांगितलं. ‘बरोबर, तुम्ही फक्त तिचंच ऐकणार,’ तो वैतागत म्हणाला. ‘मुळीच नाही, तुझं ऐकायचं नसतं तर तुला इथे कशाला बोलावलं असतं? बोल काय बोलायचे आहे ते!’ मी म्हटलं. त्याने क्षणभर डोळ्यात डोकावून पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली, ‘मॅडम, तुम्हाला माहीतच आहे की बाबा दुबईला कामावर गेले आणि मी काकांकडे राहिलो. फक्त 9 वर्षांचा होतो. कितीही चांगलं असलं तरी दुसर्‍याच्या घरी आपण उपरेच असतो. त्या वेळपर्यंत भांडततंडत का होईना पण आम्ही एकत्र होतो. भाऊ होता, आई होती. आता मी एकटाच पडलो. काकाकाकू सतत आईबद्दल वाईट बोलत असायचे. मी गोंधळून जायचो. ती आली आणि भेटावंसं वाटलं तरी हिंमत व्हायची नाही. काकांची भीती वाटायची. बाबांनाही ते आवडणार नाही हे माहीत होतं. तसाही पहिल्यापासूनच त्यांचा खूप लाडका होतो. मला सर्दी जरी झाली तरी त्यांचा आवाज भरून येत असे... मग सांगा त्यांना मी कसा दुखवू? बाबांबरोबर राहण्याचा निर्णय घेणं हा काय माझा गुन्हा होता?’
‘आता आम्ही एकत्र आलो तर वाटलं आता मी मोठा आहे. मागचं सगळं विसरून आम्ही नव्याने सुरुवात करू. पण तसं होतंच नाहीय. हे खरं आहे की मी कधीकधी तिचं ऐकत नाही, हट्टाने माझ्याच मनासारखं वागतो, पण स्वत:च्या घरी मुलं नाही वागत का असं? पण माझ्या प्रत्येक वागण्याचा, बोलण्याचा संबंध ती बाबांशीच जोडते. मी सहज म्हणून तिच्या येण्याजाण्याविषयी चौकशी केली तर लगेच ती मला बाबांचा हेर म्हणते. तुम्हाला माहीत आहे आजकाल मी रात्री उशिरापर्यंत बाहेर टाइमपास करतो आणि सकाळी ती घराबाहेर पडल्यावरच उठतो. बाबा पैसे माझ्याकडे पाठवतात. त्यातून बिलं, मेंटेनन्स, भाजी सगळं मी सांभाळतो, तर त्यालाही हिचा आक्षेप!’
अजय त्याच्या आईचा मुद्दाच समजू शकत नव्हता. मुलावर नवरा विश्वास टाकू शकतो पण आपल्यावर मात्र नाही हे तिचं खरं दु:ख होतं. बोलता बोलता अजय स्वत:चं होस्टेल, मित्र, कॉलेज, त्याच्या कविता, त्याचे भविष्यातील प्लॅन्स याविषयी बोलायला लागला. डोळे चमकायला लागले, चेहर्‍यावर निर्व्याज हसू उमटलं. हा तो स्वत:च्या कोवळ्या खांद्यांवर बाबांची जबाबदारी घेऊ पाहणारा, स्वत:चं आणि बाबांचंच कसं बरोबर आहे हे मानणारा हट्टी अजय नव्हता. घरच्यांच्या प्रेमाला पारखा झालेला, तरीही बाबांशी एकनिष्ठ राहिलेला, वयानुसार हट्टी पण संवेदनशील, विचारी मुलगा समोर येत गेला. मला जाणवलं की काही वेळा मुलांचं वागणं चुकीचं असलं तरी त्यामागची कारणमीमांसा चुकीची असतेच असं नाही. अजय आणि आनंदीत गैरसमजांची, वाहून गेलेल्या इतक्या वर्षांची भिंत उभी होती. त्याला स्वतंत्र समुपदेशनाचीही मदत होऊ शकली असती. पण त्यासाठी अर्थातच एका सुसंवादाची सुरुवात होणे गरजेचे होते. म्हणून पुन्हा आईसोबत येण्याची मी त्याला गळ घातली. आणि जरी त्याने स्पष्ट कबुली नाही दिली तरी त्याचं निर्व्याज हसणं मला सांगून गेलं की माझा मान ठेवण्यासाठी का होईना तो परत नक्की येईल.

mrudulasawant13@gmail.com