आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrudula Article About HIV Positive Woman, Divya Marathi

कामाची पोचपावती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमित्रा माझ्यापुढे बसली होती. तिच्यासोबत तिची 4 वर्षांची गोड छोकरीही होती. किती तरी महिन्यांनी मी तिला भेटत होते आणि तिला बघून खरंच फार बरं वाटत होतं. तिची तब्येतही सुधारलेली दिसत होती. मात्र, ती पहिल्यांदा माझ्याकडे आली त्या वेळची तिची अवस्था आठवली. त्या वेळची डोळे खोल गेलेली, हाडं वर आलेली सुमित्रा हीच यावर विश्वासच बसला नसता.

सहा वर्षं झाली सुमित्राच्या लग्नाला! तिचा आंतरजातीय प्रेमविवाह! तिच्या सासरच्यांना तितकासा पसंत नसला तरी मुलाच्या आग्रहाखातर त्यांनी तो करून दिला. लग्नानंतर बारीकसारीक कुरबुरी आणि वादावादी होत असली तरी तिचा नवरा चांगला असल्यामुळे सुमित्रा सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत होती. तिची नोकरी सुरूच होती. त्याच्यावरूनही घरचे कटकट करत असत, पण तिचा नवराही तिला तिकडे लक्ष न देण्याबाबत सांगत असे. यथावकाश तिला एक मुलगीही झाली. आता तर सुमित्रा खूपच खुश होती. आता सासरच्या माणसांच्या कुरकुरीचाही तिला काही वाटत नसे.

सगळं व्यवस्थित चालू असतानाच अचानक सुमित्राच्या नवर्‍याची तब्येत बिघडायला लागली. सगळ्या चाचण्या झाल्यावर निदान झालं टीबीचं! लगोलग त्याची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली आणि दुर्दैवाने तीही पॉझिटिव्ह आली. सुमित्राचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्या दोघांवर आभाळच कोसळलं. सुदैवाने सुमित्राचा cd4 काउंट चांगला होता. तिच्या नवर्‍याची तब्येत मात्र झपाट्याने ढासळत होती. नोकरी, घरची कामं, नवर्‍याचे उपचार, त्याला आधार देणं, मुलीला वेळ देणं सारं काही तीच बघत होती. सासू तिच्या मुलीला ती कामावर गेल्यावर का होईना सांभाळत असे हेच त्यातल्या त्यात सुख. बाकी घरच्यांचा सहभाग सुमित्राला सल्ले देण्यापुरताच!

या सगळ्यात सुमित्राला स्वत:च्या तब्येतीबद्दल विचार करायला फुरसतच मिळत नव्हती. मात्र, कधी तरी चार शांत क्षण तिला मिळालेच तर मात्र नवर्‍याच्या फसवणुकीमुळे तिचे मन विषण्ण होत असे. ती गरोदर असताना त्याच्याकडून झालेली चूक त्याने तिच्याजवळ कबूल केली होती. इतकं प्रेम करणारा नवरा असा कसा वागला हा प्रश्न तिचं मन पोखरून टाकत असे. कधी कधी त्याचा प्रचंड राग येत असे. त्याच्या क्षणिक मोहापायी त्या सगळ्यांवर किती भयंकर वेळ आली होती. पण त्याचबरोबर त्याच्या काळजीने ती हवालदिल होत असे, त्याच्याविषयीच्या मायेने तिचे मन भरून जात असे. अखेर शक्य ते सगळे प्रयत्न करूनही सुमित्राचा नवरा वाचू शकला नाही. सुमित्रा दु:खाने बधिर झाली होती, तिच्या सासरच्यांनी हलकल्लोळ केला. रीतीप्रमाणे तिच्या माहेरचे येऊन तिला चार दिवसांसाठी माहेरी घेऊन गेले.

सुमित्रा तिथून घरी परतली आणि वास्तवाचे चटके बसायला सुरुवात झाली. आजारी का होईना नवरा असेपर्यंत सासरचे लोक दबून होते. अर्थात तेव्हा त्यांच्या मुलाची काळजी घ्यायला तिची गरजही होती. आता मात्र ती त्यांना नकोशी झाली.

आपला मुलगा नाही तर आता तिचा या घराशी काय संबंध, असं सगळे बोलायला लागले. तिच्या नवर्‍यामुळे तिला आजार झाला याची पूर्ण कल्पना असूनही, ‘तू आमचा मुलगा खाल्लास,’ असा कांगावा त्यांनी सुरू केला. कामावर जाणंही तिला मुश्कील होऊ लागलं. घरात सतत भांडणं, शिवीगाळ सुरू झालं. कामाला गेल्यावर तिच्या मुलीचेही हाल होऊ लागले. पण नोकरी सोडणं शक्यच नव्हतं कारण तोच तिचा एकमेव आधार होता. माहेरी निघून जावं असं कैक वेळा वाटूनही लहान जागा, गरिबी या सगळ्यामुळे तिला तिथेही थारा नव्हता. ती अगदीच एकटी पडली. नेमकी अशा वेळीच तिला कुणी तरी आमच्या केंद्राबद्दल माहिती दिली आणि ती तिथे पोचली.

इतक्या महिन्यांनी पहिल्यांदाच सुमित्रा मोकळेपणाने स्वत:बद्दल कोणाशी तरी बोलत होती. नवरा गेल्यापासून दु:ख व्यक्त करायलाही तिला अवकाश मिळाला नव्हता. ती ओक्साबोक्शी रडली. काही वेळ तिला तसंच रडू दिलं, बोलू दिलं. तिला खरोखरच त्याची फार गरज होती. त्यानंतर ती बरीच शांत झाली. नुसतं बोलणं, रडणं या साध्या गोष्टी पण इतक्या दुर्लभ असाव्यात! मनात विषाद दाटून आला. एका गोष्टीचं मात्र फार कौतुक वाटलं, की सुमित्रा खरोखरच फार खंबीर होती. त्या वेळी फक्त तिला एकच दिलासा दिला की इथून पुढे ती एकटी नाही, आमचं सारं केंद्र तिच्याबरोबर आहे! हा विश्वास घेऊन ती परत गेली पुन्हा भेटण्याची वेळ ठरवून!

बर्‍याचदा पाहिलेला असूनही सुमित्राचा अनुभव मला पुन्हा एकवार हलवून गेला. विधवांचे प्रश्न आपल्याकडे फार गंभीर आहेत तसेच एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांचे प्रश्नही गंभीर अहेत. सुमित्राच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी एकत्र होत्या. आज बर्‍याच प्रयत्नांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांचे हक्क अबाधित राखणे शक्य होत आहे पण त्यांचे कौटुंबिक, संपत्तीविषयक हक्क अगदी सर्रास डावलले जात आहेत. महिलांना त्याची माहिती नसल्याने आणि त्यांना कुणाचा पाठिंबा नसल्याने तर त्यांची परिस्थिती अगदीच बिकट होत असते.
नंतरच्या सत्रांमध्ये आमच्याशी बोलून तिचा एकटेपणा, मुलीची काळजी आणि डोक्यावरील छप्पर हे महत्त्वाचे प्रश्न तिने अधोरेखित केले. त्यानुसार आम्ही काम सुरूकेले. सर्वप्रथम एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठीच्या स्वमदत गटांशी तिची गाठ घालून दिली. सुमित्रा हुशार, बोलकी, सामाजिक जाण असणारी. त्यामुळे ती पटकन त्यात रुळली आणि त्याचा तिला लगेचच फायदा झाला. तिला तिच्यासारख्याच अनेकांची सोबत मिळाली आणि मी एकटी आहे ही मन कुरतडणारी जाणीव निघून गेली. तिच्या चेहर्‍यावरचे उदासवाणे भाव कमी झाले.
नंतर ती कामावर असताना मुलीची कुठे दुसरीकडे सोय होते का ते पहिले. परंतु ते शक्य नसल्यामुळे अखेर मुलीची एचआयव्ही पॉझिटिव्ह पालकांच्या मुलांसाठी असणार्‍या आश्रमात सोय केली. सुमित्राने मन घट्ट करून, पण पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला. एकदा मुलगी तिथे चांगली रमली हे बघितल्यावर मात्र सुमित्रा खरंच सुखावली.

त्यानंतर तिच्या चेहर्‍यावर हसू उमटलेले पाहिले. सासरच्या माणसांचा छळ सुरूच होता. सुमित्रा आपल्याला दबून राहत नाही आणि इथून जातही नाही या गोष्टीमुळे ते अधिकच संतापले होते. पण मुलगी त्यांच्याकडे नसल्यामुळे सुमित्रा आता निर्धास्त झाली होती. जसजशी सुमित्रा एकेक पाऊल पुढे टाकत होती तसतसा सासरच्यांचा जाच कडवट होत होता. शक्यतो सुमित्रा शांतपणे सहन करत होती. पण जेव्हा दिराने अंगावर हात टाकला आणि तिचे समान बाहेर फेकले तेव्हा ती हादरली. तडक केंद्रात हजर झाली. पोलिस तक्रार तर झालीच, पण सुमित्राला आता संरक्षण गरजेचे होते. सासरच्यांबरोबर मीटिंग घेऊनही ते ऐकायला तयार होईनात. अखेर सुमित्राच्या वतीने कोर्टात घरगुती हिंसाचाराच्या कायद्यांतर्गत केस घालण्यात आली आणि जिद्दीने, सगळ्या त्रासाला तोंड देत तिने सुरक्षा आणि निवासाचा आदेश मिळवला. आता तिला कोणी घराबाहेर काढू शकणार नव्हते. कोर्टाचा हा आदेश म्हणजे सुमित्राच्या सासरच्यांना एक मोठा दणकाच होता. सुमित्रा इथपर्यंत पोहोचेल असे त्यांना वाटलेच नव्हते. या संपूर्ण केसच्या दरम्यान कोर्टात आणि इतरत्र तिला केंद्रातून आणि तिच्या स्वमदत गटातून मिळणारा पाठिंबा बघून ती आता एकटी नाही हा अंदाज त्यांना आला होता. वेळ पडल्यास तिच्या बाजूने उभे राहणारे लोक जास्त आहेत हे त्यांना जाणवले होते. त्यात कोर्टाचा आदेश आल्यावर सुमित्राचा आत्मविश्वास वाढला. तिथेच टिकून राहायचे हे तिने नक्की केले.

नियमित नोकरी, स्वमदत गटाचे सक्रिय काम, मुलीबरोबर नियमित भेटी यामुळे सुमित्राची असुरक्षितता आणि अस्थिरता कमी झाली आणि तिच्या तब्येतीवरही याचा चांगलाच परिणाम झाला. घरच्यांनी सुरुवातीला नाइलाजाने तिला स्वीकारले आणि हळूहळू नकळत त्यांनाच तिचा आधार वाटू लागला. सुमित्रानेही फारसा कडवटपणा न दाखवता त्यांना सामावून घेतले. आज बर्‍याच दिवसांनी मुद्दाम वेळ काढून सुमित्रा तिच्यासारख्याच एका मैत्रिणीला मदतीसाठी घेऊन आली होती. तिच्या रूपाने आमच्या कामाची पोचपावती बघून मी सुखावून गेले होते!