आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrudula Article About Problems Of Giving Up A Child For Adoption, Divya Marathi

नवी सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब-याच दिवसांनी उज्ज्वला केंद्रात आली. बोलता बोलता म्हणाली, ‘अगं, मागच्या वेळी तुमच्याकडून जे बाळ घेतलं होतं ना संस्थेने, ते अ‍ॅडॉप्शनला निवडलं गेलंसुद्धा! फार चांगली फॅमिली मिळाल्येय त्याला.’ तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ८-९ महिन्यांपूर्वी बाळ संस्थेकडे सोपवतानाचा प्रसंग मला आठवला. काळ्यासावळ्या वर्णाचं ते गुटगुटीत बाळ आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी सगळीकडे टुकूटुकू बघत होतं. बाजूला त्याची आई - सावळी, उंचेली तरतरीत चेह-याची श्रद्धा निर्विकारपणे बसली होती. ती बाळावरचा ताबा सोडत असल्याचं आणि बाळ संस्थेला कायमसाठी सोपवत असल्याचं पत्र आणि इतर सर्व कायदेशीर कागदपत्रांचे सोपस्कार आधीच पार पडलेले होते. केंद्रात आणि बाळाला नेणाऱ्या संस्थेच्या समुपदेशकानेही तिच्याशी सविस्तर बोलणं केलेलं होतं. बाळाला नेण्याआधी बाळाला हातात घेऊन श्रद्धाचा संस्थेने एक फोटो काढून घेतला, जी त्यांची नेहमीची पद्धत होती. फोटोच्या वेळी जेमतेम श्रद्धाने बाळाला हातात घेतले. ती त्याच्याकडे पाहतही नव्हती, जणू ते तिचं बाळ नव्हतंच! बाळाला संस्थेकडे सोपवताना श्रद्धाची आईही काही काळासाठी हळवी झाली होती, पण श्रद्धा तशीच होती, निश्चल, तटस्थ! बाळाला घेऊन संस्थेचे लोक निघून गेल्यावर मी श्रद्धाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिला माझ्याशी बोलण्यात फारसा रस नव्हता.

ती रुग्णालयात आली तीच मुळी वेगळे नाव सांगून. एकटीच! तिच्या पोटात खूप दुखत असल्यामुळे ती आली होती. तिची सोनोग्राफी आणि इतर तपासण्या पूर्ण झाल्या अन् तत्काळ तिला आमच्या केंद्रात पाठवले! अठरा वर्षांची अविवाहित श्रद्धा नऊ महिन्यांची गरोदर होती! फुल टर्म प्रेग्नन्सी! आम्ही उडालोच! वाटलं होतं तसं तिला बोलतं करायला काहीच त्रास पडला नाही. दुसऱ्या कोणाची तरी कहाणी सांगावी तितक्या अलिप्तपणे तिने तिची कहाणी सांगितली. तीन भावंडांत ती सगळ्यात मोठी. हिने दहावीनंतर शाळा सोडली होती. तिचे वडील जास्तीत जास्त वेळ गावालाच असायचे आणि त्यामुळे आई येऊनजाऊन असायची. ही एका पार्लरमध्ये कामाला जात होती. अशातच त्याच परिसरातील एका मुलाबरोबर तिचं प्रेम जमलं. संबंध फार पुढे गेले. याचे परिणाम काय होतील हा विचार गंभीरपणे तिने कधीच केला नाही आणि त्याला तर तो करायची गरजच नव्हती. तो काही महत्त्वाच्या कामासाठी म्हणून गावाला निघून गेला आणि ही त्याची वाट बघत राहिली. तिची पाळी कधीच नियमित नव्हती, त्यामुळे सुरुवातीला तिला काहीच वाटलं नाही, परंतु पाळी आलीच नाही, शरीरातले इतरही बदल जाणवायला लागले आणि ती घाबरली. आई या दरम्यान गावाला गेलेली होती. तोही गावाला गेलेला आणि गेल्यापासून त्याने पार संपर्कच तोडलेला! आडून आडून चौकशी केल्यावर तो गावाला लग्न करायला गेल्याचे तिला कळले. भीतीपोटी तिने कुणालाच काही सांगितले नाही. नशिबाने पोट फारसे दिसतच नव्हते. आणि आत्ता पोटात दुखायला लागल्यावर ती आली होती. कोणाला काही न सांगता एकटीनेच सर्व काही निस्तरायचा तिचा प्रयत्न होता! ब-याच प्रयत्नांती तिच्या आईला कळवण्याबद्दल आम्ही तिचे मन वळवले. तिची आई आली. तिला प्रचंड धक्का बसला होता.
मुलीवर संताप आला होता. तिच्या संतापाचा निचरा झाल्यावर मात्र ती आपलं दु:ख आणि संताप बाजूला ठेवून तिच्या पाठीशी उभी राहिली. बाळ संस्थेला द्यायचा निर्णय त्यांनी घेतला आणि मग मी उज्ज्वलाच्या संस्थेशी संपर्क साधला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान श्रद्धा आम्हाला सहकार्य करत होती, पण आपल्या अलिप्तपणाचे कवच काही तिने झुगारून दिले नाही. शेवटपर्यंत आपल्या भावनांपर्यंत तिने आम्हाला कधीच पोहोचू दिले नाही. एखाद्या अशिलापर्यंत आपण पूर्णपणे पोहोचू नाही शकत आणि तिला पूर्णपणे मदत नाही करू शकत, ही भावना अस्वस्थ करणारी होती. आपण आपले काम पूर्ण करू शकलो नाही, असे मला सतत वाटत राहिले. शेवटी, ज्या प्रकारची मदत अशिलाला हवी होती ती आपण दिली, त्यापुढे आपली मदत घ्यायची की नाही हा तिचा प्रश्न आहे, अशी मी स्वत:ची समजूत घालून घेतली.

त्यानंतर श्रद्धा माझ्या मनातून हळूहळू मागे पडली. आणि अचानक तीन महिन्यांनी ती केंद्रात भेटायला आली. सर्वात प्रथम जाणवला तो तिचा बदललेला चेहरा! चक्क हसत होती छानशी. आणि मग लक्ष गेलं तर गळ्यात काळी पोत! ‘श्रद्धा, लग्न?’ मी आश्चर्याने विचारले. ‘हो ताई, आमच्या वाडीतलाच मुलगा होता. त्याला मी पहिल्यापासून आवडत होतेच. आणि मी हो म्हटलं, कारण माझा भूतकाळ समजूनसुद्धा तो माझ्याशी लग्न करायला तयार झाला.’ सिनेमातल्यासारख्या गोष्टी प्रत्यक्षातही घडतात तर! मी तिची विचारपूस केली.
मी तिच्या येण्याचे कारण विचारले. ‘ताई मला माझं बाळ परत हवंय.’ आता मात्र मला धक्काच बसला. पण ती अतिशय गंभीरपणे बोलत होती. झालं असं होतं की मुलाबद्दल जराही आस्था न दाखवणारी श्रद्धा प्रत्यक्षात त्याला खूप मिस करत होती. त्याच्यासाठी झुरत होती. लग्नानंतर तिच्या नवऱ्याला जेव्हा हे समजले तेव्हा त्यानेच मनाचा मोठेपणा दाखवून तिला ते मूल परत आणून सांभाळण्याविषयी सुचवले. त्या मुलाला स्वत:चं नाव द्यायलाही तो तयार झाला होता.
आणि त्यामुळे श्रद्धाच्या मनात परत आशेची पालवी फुटली होती. श्रद्धाच्या कहाणीचा सुखांत व्हायची वेळ आली होती आणि ती उत्सुक होती. पण दुर्दैव! तसं होणं शक्यच नव्हतं! कारण श्रद्धाने मूल संस्थेला देऊन ३ महिने होऊन गेले होते. कोणतीही माता जेव्हा आपले मूल संस्थेला दत्तक देण्यासाठी देऊन टाकते तेव्हा त्या तारखेपासून दोन महिन्यांच्या कालावधीपर्यंत तिला आपला निर्णय बदलून मुलाचा ताबा परत घेण्याची मुभा असते, परंतु एकदा हा कालावधी उलटून गेला, की मग मात्र कोणत्याही कारणास्तव तिला आपलं बाळ परत मिळू शकत नाही. हे ऐकून श्रद्धा कोलमडलीच. अखेर तिच्या नवऱ्याला बोलावून समजूत घालून तिला परत पाठवलं. हळूहळू ती स्वत:च सावरेल असं वाटत असतानाच एक दिवस तिचा नवरा भेटायला आला. श्रद्धा सावरली नव्हती. ती चक्क डिप्रेशनमध्ये गेली होती आणि तिच्यावर मानसोपचार सुरू होते. आता मात्र स्वस्थ बसून चालणार नव्हते. मी तिला पुन्हा केंद्रात घेऊन येण्यास सांगितले. तिच्याशी बोलल्यावर जाणवले, की तिच्या मनात अपराधीपणाची भावना प्रचंड प्रमाणात होती. आपण आपल्या सुखासाठी मुलावर अन्याय केला, ही टोचणी तिला सतत लागलेली होती आणि म्हणून ती स्वत:लाच दोषी ठरवत होती. स्वत:चा सुखाने जगण्याचा हक्क नाकारत होती. श्रद्धाला औषधांबरोबरच समुपदेशनाची गरज होती.

श्रद्धाच्या मनात उमटणाऱ्या भावना अत्यंत नैसर्गिक होत्या, पण वेळीच त्यांचा निचरा न झाल्यामुळे, त्या दाबून ठेवल्यामुळे आता तिला नैराश्य आले होते. आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक भावनांना योग्य रीतीने ओळखण्याचे, हाताळण्याचे अन् व्यक्त करण्याचे कौशल्य श्रद्धाला शिकवणे गरजेचे होते. त्याचबरोबर तिने तिच्या बाळाला या जगात यायची संधी दिली, त्याला उकिरड्यावर न फेकता व्यवस्थित संस्थेत देऊन त्याचे भविष्य सुरक्षित केले या गोष्टी तिच्या मनावर ठसवण्यात आल्या. हळूहळू श्रद्धा सावरू लागली. पण इतकंच पुरेसं नव्हतं. बाळाच्या जाण्यामुळे तिच्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी मी तिला एखाद्या कामात गुंतवायचे ठरवले. श्रद्धासारख्या कितीतरी मुली या चक्रात अडकतात. त्यांना समाजाच्या उपेक्षेचं आणि घरच्यांच्या रोषाचं बळी व्हावं लागतं. पण यात फक्त त्यांची चूक असते का? लैंगिक संबंधांबद्दल समाजात असलेली अळीमिळी गुपचिळी, सेक्सबद्दलचं घोर अज्ञान, प्रेमाचा स्वीकार म्हणजे लैंगिक संबंधांचा स्वीकार हा गैरसमज, या गोष्टीही तितक्याच जबाबदार असतात. पौगंडावस्थेतील मुलींसाठी वस्ती पातळीवर लैंगिक शिक्षण देणारा एक प्रकल्प महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू होणार होता, या कामात मी श्रद्धाला गुंतवायचे ठरवले. यामागचा उद्देश तिला समजावला. आज समुपदेशन, औषधं आणि आपण या समस्येच्या प्रतिबंधात्मक पातळीवर काम करतोय ही समाधानाची भावना तिला नवीन बळ देत आहे. तिच्या नवऱ्याच्या उत्तम साथीने नवीन जीवनाची सुरुवात तिने केली आहे.