आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुंजणा-या माणसांना दिलेली दाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमीप्रमाणे लेख देण्याची तारीख जवळ आली. मी लिहायला बसले आणि लक्षात आले, की अरे, हा तर डिसेंबर! म्हणजे आपल्या समारोपाची वेळ आली!मला असं अजिबात वाटलं नव्हतं, की कधी काळी मी लेखणी हातात धरेन. लेखन हा माझा प्रांतच नाही असंच मला अजूनही वाटतं. पण अचानकच एके दिवशी मृण्मयीने ही संधी अलगद माझ्यापुढे पेश केली आणि मी लिहायला लागले. एक-एक महिना करता करता चक्क दोन वर्षं नेमाने आपल्या भेटीला येत राहिले. दोन वर्षांचा हा प्रवास माझ्यासाठी अगदी आनंददायक राहिला आहे.

माझ्या कामाच्या स्वरूपामुळे गेल्या २०-२२ वर्षांत शेकडो अनुभव माझ्या पोतडीत जमा झाले. काही जिवाला चटका लावणारे, काही मनात खोलवर रुतून बसणारे, काही मनातून पुसून टाकायचा प्रयत्न करूनही न पुसले जाणारे, तर काही तान्ह्या बाळाच्या हास्याइतकेच निर्व्याज आणि शुद्ध! एक मात्र खरं, या अनुभवांनीच माझं आयुष्य समृद्ध बनवलं. माझ्या आयुष्यातल्या उत्तम शिक्षकाची भूमिका या अनुभवांनीही बरीच निभावली आहे.

स्वत:ला सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणवणारी माणसं किती हीन पातळीवर उतरू शकतात, हे मला पाहायला मिळालं आहे आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीत ज्यांच्यावर आपलं पांढरपेशी मन चटकन विश्वास ठेवणार नाही अशांना नसलेल्या नात्यांचीही बूज राखताना पाहिलं आहे. मनात उसळी मारून वर आलेला देवीचा अनुभवही याच पठडीतला! देवी मूळची नेपाळची. फसवून मुंबईत वेश्याव्यवसायात ढकलली गेलेली! तिथेच काही वेश्या आणि त्यांच्या मुलांना इंग्रजी शिकवायला येणा-या फिलिपशी तिची गाठ पडली. हा व्यवसाय सोडून लग्न करायचा विचार त्याने बोलून दाखवला आणि ती दचकलीच. पण शेवटी प्लॅन ठरला आणि एक दिवस ती पळाली. ठरलेल्या स्टेशनवर त्याची वाट पाहत राहिली; पण तो पोहोचलाच नाही. तिथल्याच एका बूटपॉलिशवाल्या मुलाने तिला दीदी म्हणत घरी नेलं. त्याच्याच मदतीने दोन दिवसांनी फिलिपचा पत्ता लागला. दोघांनी लग्न केलं. शेवट गोड झाला असं वाटत असतानाच देवी जबरदस्त आजारी पडली. निदान झालं एड्सचं! पण फिलिपला ही लागण झाली नव्हती. पुढचं दीड वर्ष फिलिपनी तिची मनोभावे सेवा केली. त्याने तिला ख्रिश्चन होण्याविषयी सुचवले. तीही खुशीने तयार झाली. काही दिवसांतच देवी गेली. ख्रिश्चन पद्धतीने फिलिपने सर्व गोष्टी मनोभावे केल्या. "So what if she couldn't live in dignity, at least she could die in dignity. that was all i could give her.' फिलिपचे हे शब्द आजही विसरू शकलेले नाही. चिखलात कमळ उगवावं असे अनुभव! जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास दृढ करणारे! या चांगुलपणावर माझा अतोनात विश्वास आहे. याच विश्वासाच्या जोरावर मी आदिवासी पाड्यापासून रेड लाइट एरियापर्यंत भटकले. त्यांच्याच मदतीने माझ्या इच्छित स्थळी पोहोचले, पण त्या विश्वासाला तडा जाईल असा अनुभव आजतागायत आला नाही. त्यांच्या काहीशा विचित्र आणि गंमतीशीर आदरातिथ्याचा अनुभव वेळोवेळी घेतला. एकदा माझ्या एका अशिलाबरोबर होम व्हिजिटला गेले होते फॉकलंड रोडला. आमच्या येण्यामुळे गोंधळून गेलेल्या घरमालकाने मेहमाननवाजी म्हणून सिगारेट बाजूला ठेवून मला पान देऊ केले होते. माझ्या अशिलाने त्याला तत्काळ खास भाषेत झापले आणि पटकन चहाची ऑर्डर दिली. माझ्या चेह-यावरचे हसू पाहून मग त्यांचेही ओशाळलेले चेहरे निवळले.

एकदा कुलाब्याच्या रस्त्यावर उभं राहून एका गर्दुल्ल्याशी बोलत असताना अचानक लांबून एक माणूस काठी उगारून धावत यायला लागला. हा गर्द विकणारा तर नसेल? क्षणार्धात मनात विचार आला, तोपर्यंत तो आमच्यापर्यंत पोहोचला आणि जो आमच्याशी बोलत होता त्याला हातातल्या काठीचे २-४ तडाखे दिले. आम्हाला उभंच ठेवून बोलत राहण्याचा प्रमाद त्याने केला होता. मग ताबडतोब हालचाल झाली. २-३ लोकांनी मिळून एका आंब्याच्या रिकाम्या खोक्यावर कागद पसरून मला आग्रहाने त्यावर बसायला लावले, लगेच एक थंडगार पेप्सी माझ्या हातात आला. मग तो वाटून घेत माझ्याभोवती बसून त्यांनी निवांत गप्पा सुरू केल्या! या सगळ्या नाट्याला अर्थात रस्त्यावरचे येणारे जाणारे भरपूर प्रेक्षक आम्हाला लाभले!

या सगळ्या अनुभवातून मी एक शिकले. कोणताही माणूस पूर्ण चांगला, पूर्ण वाईट नसतो. तोपर्यंत माझ्या बाळबोध, मध्यमवर्गीय मनाला चांगले आणि वाईट, काळे आणि पांढरे असेच बघायची सवय होती, पण या क्षेत्रात आल्यावर पाहिले, की प्रत्येक माणसात काळ्या पांढ-या रंगाची सरमिसळ असते. एक हळवा कोपरा असतो. त्याला जर आपण स्पर्श करू शकलो तर तो माणूस निश्चितच बदलतो. तोही सकारात्मक पद्धतीने!

कामामुळे अनेक सिस्टिम्स/यंत्रणांबरोबर काम करायचाही अनुभव मिळाला. आरोग्यसेवा, पोलिस यंत्रणा, इ.‌इ. प्रत्येक यंत्रणा इतकी अवाढव्य आहे, की त्यांच्याकडून काम करून घेताना सामान्य माणूस थकून जातो. ही प्रत्येक यंत्रणा आपल्याच गतीने, आपल्याच नादात फिरत असते. कधीकधी इथले नियम ज्यांच्यासाठी यंत्रणा आहे त्या माणसांपेक्षाही मोठे होतात आणि ते बदलणे महाकर्मकठीण होऊन बसते. अर्थात प्रत्येक यंत्रणेत काही संवेदनशील, कृतिशील माणसे आहेतच. अशी माणसे शोधून त्यांच्या मदतीने मार्ग काढावा लागतो. ‌या प्रक्रियेत कधी कधी थकून जायला होतं, पण तुमच्यापुढे बसलेली माणसंच तुम्हाला बळ देतात. कित्येकदा मला लोक विचारतात, की सतत आयुष्याची नकारात्मक बाजू बघून माझ्यावर परिणाम होत नाही का? होतो! निश्चितच होतो! पण माझ्या बाबतीत तरी तो नकारात्मक नाही होत. उलट मी किती नशीबवान आहे हे मला जाणवतं. गरिबी, हिंसा, अत्याचार हे फारसे माझ्या वाट्याला आले नाहीत याबद्दल मला कृतज्ञता वाटते आणि क्षुल्लक, बारीकसारीक गोष्टींवरून त्रागा करणा-या, कुरकुरणा-या मनाला मीच खडसावते. उगाचच रडगाणं गायची मुभा मी स्वतःला अज्जिबात देत नाही. आज माझ्यासमोर येणा-या हिंसाग्रस्त बायका ज्या तडफेने आणि जिद्दीने परिस्थितीशी लढा देतात ते बघून मला स्तिमित व्हायला होतं.

मी केलेलं लिखाण हे एक प्रकारे परिस्थितीशी झुंजणा-या या सर्व माणसांना दिलेली दाद आहे. लिखाणाच्या या पूर्ण प्रवासात मला अनेक ई-मेल्स आले. त्यापैकी काहींनी त्यांच्या वैयक्तिक समस्या माझ्याजवळ व्यक्त केल्या. काहींना ई-मेलच्या माध्यमातूनच मी मदत करायचा प्रयत्न केला, तर काहींशी नियमित आणि अगदी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. ज्यांनी त्यांच्या वैयक्तिक समस्या मांडल्या त्यांना माझ्याकडून मी शब्द देऊ इच्छिते, की त्यांची ओळख कधीच उघड केली जाणार नाही आणि त्यांच्या माहितीचा माझ्याकडून चुकूनही गैरवापर होणार नाही. त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला याबद्दल मी त्यांची अतिशय ऋणी आहे.
आणि काय लिहू? आपल्या उत्तेजनाने लेखणी हातात धरलीच अहे. कदाचित पुन्हा आपल्याशी संवाद साधावासा वाटला तर तिचंच बोट धरून कधी तरी आपल्या भेटीला नक्की येईन!