रुग्णालयात आयोजित वरिष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय शिबिराची सांगता होत आली होती. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बोलत होते. महानगरपालिकेने खास वरिष्ठ नागरिकांना उत्तम आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मंजूर केलेल्या नवीन धोरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आनंदाने जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आहे आणि म्हणून जमतील तेवढे आनंदाचे क्षण आपण वेचले पाहिजेत. समोर बसलेले श्रोते संमतिदर्शक मान डोलवत होते. मी नकळतच मनाने शिबिरातून बाहेर पडले. आनंदाचे क्षण वेचायला ते थोडेतरी वाट्याला तर आले पहिजेत, माझ्या मनात विचार आला. काल याच वेळेला माझ्यासमोर बसलेली सखुबाई आणि ताडताड बोलणारी तिची मुलगी आली. ‘ताई, मी विधवा, मी स्वत: घरकाम करून आईला सांभाळते. माझी तरी कुठली ऐपत? पण हिला चालवत नाही म्हणून टॅक्सीने घेऊन आले. आम्हाला तिच्या नया पैशाची अपेक्षा नाही, पण या वयात हिला थोडेतरी सुख मिळायला नको? हिला पण इतके दिवस मुलाचाच पुळका होता, आम्हाला कध्धी विचारले नाही. आता? त्यानेच ही हालत केली न?’ भडाभडा बोलणार्या सखुबाईच्या मुलीच्या चेहर्यावर आईविषयी काळजी दिसत होती. सखुबाईला बोलतं केल्यावर तिच्या तोंडून तिची हकीकत कळली ती अशी :
तिने आणि तिच्या नवर्याने काबाडकष्ट करून मुलांना वाढवले. मुलींची लग्नं करून दिली. एकुलता एक मुलगा, वंशाचा दिवा म्हणून मुलाचे भरपूर लाड केले. स्वत:चं छोटंसं घर घेतलं आणि मुलाच्या नावावरही एक खोली घेतली. मुलाचं लग्न करून दिलं. आधी मुलगा त्याच्या नावाने घेतलेल्या खोलीत राहत होता. नंतर त्याची नोकरी सुटली. संसाराचा खर्च भागवायचा म्हणून आईबाबांच्या घरात विनंती करून राहायला आला आणि त्याचं घर भाड्याने दिलं. भाडं अर्थातच तोच घ्यायचा. हळूहळू त्याने आणि बायकोने रंग दाखवायला सुरुवात केली. उद्धटपणे बोलणं, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना वागू न देणं असं करता करता मजल शिवीगाळ, मारहाण करण्यापर्यंत गेली. गोड बोलून ऐकेना म्हणून मारहाण करून धमकावून आईकडचं सगळं सोनं काढून घेतलं. मुलींना हे कळलं तेव्हा त्यांनी भावाला अडवायचा खूप प्रयत्न केला. भावाने त्यांनाही मारहाण केली. सखुबाई आणि तिच्या नवर्याचे हाल अजूनच वाढले. आईवर तर त्याचा विशेष राग होता. असंही घर वडिलांच्या नावावर होतं, सखुबाईचं सोनं आधीच घेऊन झालं होतं. वयानुसार काम करायलाही तिचा काही उपयोग नव्हता. त्यामुळे सुनेने आणि मुलाने तिला घराबाहेर काढायचा चंगच बांधला. शिवीगाळ, मारहाण करून तिला घराबाहेर काढलं. नाइलाजाने अखेर ती मुलीकडे गेली.
आपल्या नवर्याच्या घरातून तो समोर असताना आपल्याला हाकलून दिले हा अपमान तिच्या जिव्हारी लागला. ती आजारी पडली. मुलींनी सगळी काळजी घेतली. आता सखुबाईचं मन तिला आणखीनच खाऊ लागलं. इतके दिवस आपण मुलाला झुकतं माप दिलं हे तिच्या मनाला डाचू लागलं. म्हातारा त्यांच्या तावडीत एकटा आहे, आजारी आहे या विचाराने त्याच्याकडेही मन ओढ घेऊ लागलं. सखुबाई आपल्या नवर्याला भेटायला मुलाकडे गेली. पण मुलगाच काय, अगदी नातवंडंही तिला घरात घुसू देईनात. 3-4 वेळा प्रयत्न करूनही जेव्हा मारहाण सहन करावी लागली तेव्हा पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी मुलाला बोलावून दम दिला आणि त्याला तंबी देऊन पाठवून दिले. घरी आल्यावर मुलाने आजारी बापाला मारहाण केली. हे कळल्यावर सखुबाई आणखीनच खचली. दोन दोन घरं नवर्याने घेऊनही आज सखुबाई बेघर होती आणि तिचा म्हातारा नवरा अगतिक.
आपल्या कायद्यानुसार वयस्कर आईवडिलांना सांभाळायची जबाबदारी कर्त्या मुलावर असते. त्यानुसार नवीन घरेलू हिंसाचाराच्या कायद्याअंतर्गत सखुबाई मुलाविरुद्ध दावा लावून पोटगी आणि तिच्यासाठी व नवर्यासाठी सुरक्षा आदेश तसेच निवासाचा आदेश मिळवू शकली असती. आमच्या केंद्रातर्फे तशी मदत तिला उपलब्ध होतीच. पण त्यासाठी तिला वारंवार आमच्या केंद्रात व पुढे कोर्टात हजार राहावे लागणार होते. तिला प्रवास शक्य नसल्यामुळे रिक्षा-टॅक्सीचा खर्च लागणार होता, जो मुलीसाठी भारीच होता. सखुबाईचा नवरा मुलाकडे होता, त्यामुळे केससाठी जो वेळ लागेल त्या काळात मुलगा आपल्या नवर्याचे काय करेल ही धास्ती होती. कोर्ट आणि त्याच्या एकूण प्रक्रियेविषयीच एक प्रकारची भीती मनात होती. त्यामुळे सखुबाई चटकन निर्णय घेईना, घेतला तर त्यावर ठाम राहीना. तिला शेल्टरचा पर्यायही सुचवून पाहिला. पण स्वत:चं घर असताना वृद्धाश्रमात का राहावं, असा तिचा सवाल होता. ताई, आज आम्ही तिथे राहिलो तर पुढे-मागे मुलींना हिस्सा देता येईल आणि आम्हीच गेलो तर तो मुलींना काहीच देणार नाही. सखुबाई आता मुलींना हिस्सा देऊन भरपाई करू पाहत होती.
बर्याच प्रयत्नांनंतर सखुबाई अखेर संरक्षण अधिकार्याकडे जाऊन डीआयआर (डोमेस्टिक इन्सिडंट रिपोर्ट) भरायला तयार झाली आहे. तेसुद्धा त्याचं ऑफिस मुलीच्या घराजवळ आहे म्हणून! समुपदेशकानेदेखील ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणार्या संस्थेची मदत घेतली. त्यांच्या ओळखीच्या त्या विभागातील पोलिसांनी सहकार्य करण्याचे कबूल केले आणि त्यानुसार ते अधूनमधून स्वत: भेट देऊन सखुबाईच्या नवर्याची चौकशी करून येतात. पोलिसांच्या भेटीच्या दबावामुळे का होईना, सध्या तिचा मुलगा तिच्या नवर्याला त्रास देत नाही. परंतु या समस्येवरचा हा कायमस्वरूपी तोडगा नव्हताच! वैयक्तिक ओळखीवर मिळालेलं पोलिसांचं सहकार्य किती काळ चालू राहणार होतं? आज कितीतरी ज्येष्ठ नागरिक अशा विविध समस्या सहन करत असतात. भौतिक गरजांपासून वंचित होण्याबरोबरच आपल्या जवळच्या माणसांची अशी वागणूक त्यांना मानसिकदृष्ट्या पार कोलमडून टाकते. आयुष्याच्या अखेरीस शरीर साथ देत नसतं, पैशाचं पाठबळही कमी असतं. कायद्यांची, धोरणांची माहिती नसते, किंवा जरी ती असली तरी तिचा लाभ घेण्यासाठी ते त्या यंत्रणेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा अवस्थेतील वृद्धांना आधार कोणाचा? कितीही कायदे आले, धोरणे आखली तरीही त्यांचा लाभ सगळ्यांना मिळेल अशा प्रकारे ती राबवण्यासाठी एका सक्षम यंत्रणेची गरज आहे. सध्या कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघांना काही अधिकार देऊन पोलिस व ते परस्पर सहकार्याने काम करून अशा वृद्धांना मदत व मार्गदर्शन करू शकतील. तसेच समवयस्क माणसांच्या संपर्काने अशा वृद्धांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल.
mrudulasawant13@gmail.com