आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ये तरकीब सिखा दे यार जुलाहे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्याच आठवड्यात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा झाला! गेल्या तीन वर्षांपासून भारतीय हातमाग उद्योगाला हातभार लावण्यासाठी हा दिवस साजरा होऊ लागलाय. त्या निमित्ताने...

मला आठवतंय तसं मी नेहमी कॉटन आणि सिल्कचे कपडेच घालत आलेय. अर्थात ते कधी ठरवून घडलं नाही. पण तेच कपडे नेहमी आवडत गेले आणि त्यामुळे वापरलेही गेले. अर्थातच सुरुवातीला हॅन्डलूम आणि पॉवरलूम वगैरे काही समजत नसे. पण पारंपरिक पद्धतीचं कापड, चांदीचे दागिने आवडू लागले आणि मी त्याकडे खेचली जाऊ लागले. मग हळूहळू याबद्दल वाचू लागले आणि जसजशी वाचेन तसतशी अवाक होऊ लागले.
 
आपल्या या विशाल देशात या हातमागावर विणलेल्या कपड्यांची किती श्रीमंती असावी त्याला काही सुमार? भारताच्या प्रत्येक राज्यात हातमागावर विणलेलं निरनिराळ्या प्रकारचं कापड मिळतं. आपल्या महाराष्ट्रात पैठणी, हिमरू, विदर्भ टसर, सोलापुरी हे हातमागावर विणलेले कपडे प्रसिद्ध आहेत. गोव्यातली कुणबी, मध्य प्रदेशच्या चंदेरी, महेश्वरी आणि कोसा, गुजराथची पाटण पटोला, कर्नाटकातल्या इलकल आणि पट्टेदा अन्चू, केरळची कसावू, आंध्रच्या पोचमपल्ली, गधवाल आणि सिद्दीपेट साड्या आणि तामिळनाडूची कांजीवरम. एकट्या ओरिसामध्येच पाहा - संबळपुरी, बोमकाई, बिचित्रपुरी, पसापल्ली, हबसापुरी, बेहरामपुरी, कोटपड, डोंगरीया, खंदुआ, वगैरे किती ते प्रकार. बंगालची जामदानी, तांत न धोनेकली, आसामची मुगा आणि इरी, मणिपूरची मोईरांग फी, आणि बिहारची भागलपुरी. कधी आॅरगॅनिक कापूस वापरून, कधी हाताने पिंजलेले सूत वापरून, कधी कृत्रिम रंग तर कधी अगदी नैसर्गिक वनस्पती म्हणजे मंजिष्ठ, पळस, डाळिंबाची साल यापासून बनवलेले रंग वापरून बनवलेले आणि हातमागावर विणलेले हे कपडे. आणि असे प्रत्येक राज्याचे! हे झालं विणीबद्दल.
 
याशिवाय कितीतरी प्रकारचे हाताने रंगविलेले किंवा ब्लॉक प्रिंट केलेले कपडे म्हणजे बांधणी, बाटिक, अजरख, बाग, दाबू, सांगानेरी, कलमकारी, मधुबनी, पट्टचित्र, जवारिया, तारापूर, गामठी लहरिया, रंगरेझ, वगैरे.
 
शिवाय हाताने केलेली कितीतरी प्रकारची कशिदाकारी : लखनवी, पारसी, आरीवर्क, फुलपत्ती, फूलकारी, कांथा, लंबानी, राबरी, टांगालिया, कर्नाटकी कशिदा!
हाताने बनलेल्या कपड्यांना एक वेगळाच पर्सनल टच  असतो. मशीनवर बनलेले कपडे झुळझुळीत असतातही. पण ते फारच आखीवरेखीव असतात. एकामागोमाग एकसारखे बनलेले हे कपडे एक्दम परफेक्ट असतात खरं तर. पण हाताने बनवलेल्या कपड्यांमध्ये मात्र काही ना काही चूक असते. आणि त्यामुळेच ते अगदी तुमच्यामाझ्यासारखे असतात. परफेक्ट माणूस असा कुणी असतो तरी का या जगात? मग अशा माणसाला इतका परफेक्ट कपडा कशाला हवा, नाही का? त्यातल्या बारीकशा चुका नजरेला पडल्या की, तो एका तुमच्यामाझ्यासारख्या चुका करणाऱ्या माणसाने बनवलेला आहे याची आपल्याला आठवण झाल्याशिवाय राहात नाही.
 
काल माझ्या हाताने रंगवलेल्या मधुबनी दुपट्ट्यावर एक भलत्याच ठिकाणी पडलेला एक रंगाचा ठिपका दिसला आणि माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं. कुणी रंगवला असेल हा दुपट्टा? स्त्री असेल की, पुरुष? स्त्रीच असेल बहुधा. भल्या पहाटे उठून तिने नवऱ्यासाठी, मुलाबाळांसाठी स्वयंपाक रांधला असेल, केरवारे केले असतील, मुलं शाळेत पाठवली असतील आणि मग चार पैसे गाठीला लागावेत म्हणून हातमाग सोसायटीत येऊन बसली असेल हा दुपट्टा रंगवायला. दमली असेल बिचारी. या दुपट्ट्यावरच्या मोराची ही रेष थोडी हलल्यासारखी वाटतेय का? या कष्टाने थरथरला असेल का तिचा हात हा मोर काढताना? आणि मग एकदम आठवलं असेल का तिला की, तिच्या चौथीतल्या मुलीला उद्या शाळेचा नवा युनिफॉर्म घेण्यासाठी पैसे लागणार आहेत! आणि त्या विवंचनेत अडकल्यामुळे तो रंगाचा ठिपका चुकीच्या ठिकाणी पडला असेल का? की भुकेने कळवळली असेल ती? कोण आहेस ग बायो तू? तुझं आणि माझं कसलं ग हे नातं? तू कष्टाने रंगवलेलया या दुपट्ट्याने मला किती जणांची कौतुकाची दाद मिळवून दिलीय आज? पण तू काय नेसलं होतंस गं? या कडाक्याच्या थंडीत अंगभर कपडा तरी मिळाला होता का गं तुला ल्यायला? आज आम्ही हातमाग दिवस साजरा केलाय खरा आणि तो आम्ही तू आणि तुझ्यासारख्या हातमाग उद्योगातल्या अनेक कष्टकरी कारागिरांना समर्पित आहे अशी शेखी मिरवतोय आम्ही. पण स्वतःच्या अंगावर कळा आलेले धुवट कपडे असताना दुसऱ्याच्या आयुष्यात असे रंग भरायला आम्हाला शिकवशील का गं?
 
आणि मी घातलेल्या खादीच्या कमीजावरची ती गाठ? विणता विणता धागा तुटला म्हणून विणकराने झटकन गाठ मारून तिथे दुसरा धागा जोडलाय. नीट पाहिल्याशिवाय दिसतसुद्धा नाही ही गाठ! तुम्हा सगळ्या विणकरांना योग्य ते मोल मिळावे म्हणून आम्ही हा हातमाग दिवस साजरा करू लागलोय खरा. आमच्या देशाच्या महान हातमाग संस्कृतीचा उत्सवही आहे हा. पण धागा तुटला तर पटकन गाठ मारून, तो सांधून, कधी तिथे काही तुटलं होतं हे कळूही न देता पुढे जायचं तुझं हे कसब आजच्या दिवशी शिकवशील का आम्हाला? आमच्या नात्यांमध्ये तुटायला लागलेले धागे सांधून घ्यायला तू आम्हाला शिकवशील का? गुलजारांनी त्यांच्या या कवितेत म्हटल्याप्रमाणे?

मुझ को भी तरकीब सिखा दे यार जुलाहे
अकसर तुझ को देखा है कि ताना बुनते
जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ
फिर से बांध के
और सिरा कोई जोड़ के उस में
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकिन
इक भी गांठ गिरह बुन्तर की
देख नहीं सकता कोई
मैनें तो एक बार बुना था एक ही रिश्ता
लेकिन उस की सारी गिराहें
साफ नजर आती हैं मेरे यार जुलाहे
मुझ को भी तरकीब सिखा दे यार जुलाहे
 
 mrudulabele@gmail.com
बातम्या आणखी आहेत...