आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrunal Deshpande Article About Modern Women Celebrating Makar Sankrant

'मॉल'मुलींना पडते पारंपरिकतेची भूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संक्रांत म्हटली की एखाद्या कृष्णधवल मराठी चित्रपटातल्या हलव्याचे दागिने घालून, काळीभोर नऊवार नेसून नटून-थटून मिरवत जाणा-या कुमारिका, सुवासिनी आठवल्यावाचून राहत नाहीत. एरवी जीन्स-टॉपमध्ये वावरत हातात टॅबच्या आकाराएवढा मोबाइल घेऊन ‘यू नो’सारखी मॉड भाषा वापरणा-या आधुनिक तरुणी संक्रांतीला मात्र पारंपरिक पद्धतीच्या बटव्यात मोबाइल लपवत साडीचा पदर सांभाळत ‘ब्लॅक ब्यूटी’ म्हणून मिरवतात. पूर्वी घराघरात हौसेने होणारा हलवाच आता कोणी करत नाही, मग हलव्याचे दागिने तर दूरच राहिले. पण तरीही काळी चंद्रकळा आणि त्यावर खुलून दिसणारे हलव्याचे दागिने घालून फोटो काढून घ्यायची ओढ काही कमी नाही झालेली. त्यामुळेच परंपरेने चालत आलेला हा सण कमर्शियल बनतो तो या दागिन्यांच्या बिझनेसमुळे.
‘25 वर्षांपासून हा उद्योग सांभाळत आहोत. आमच्या दोन पिढ्या या उद्योगात काम करतायत,’ हलव्यासाठीचा हत्ती बनवता बनवता वृषाली शौचे सांगत होत्या. नाशिकमधील दहीपुलावरील पगडबंद लेन परिसरात राहणा-या वृषाली यांनी या वेळी अशाच मॉडर्न मुलींसाठी हलव्याचा लॅपटॉप तयार केला आहे. हलव्याच्या दागिन्यांचा उद्योग उभा करता येऊ शकतो हा जुन्या काळी बायकांनी विचारही केला नसेल; पण आता ठिकठिकाणी ‘येथे संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने भाड्याने मिळतील, हत्ती भाड्याने मिळेल’ अशा पाट्या दिसतात. अगदी मुंबई-पुण्यातही. आत्मकेंद्रित आणि धावपळीच्या जीवनशैलीचा हा परिणाम असला तरी कित्येकांना निर्मितिक्षम उद्योजकता देणारा हा व्यवसाय आहे, असं वृषाली यांना वाटतं.
हलव्याच्या दागिन्यांमधील पारंपरिकता जपता जपता हलव्याच्या लॅपटॉपपर्यंत वृषाली पोहोचल्या आहेत, इतकेच नाही तर हा उद्योग त्या संकेतस्थळाद्वाराही चालवतात. व्हर्च्युअल वा हायटेक झालेल्या या उद्योगात विविध प्रकारचे हार, नक्षत्रहार, चंद्रहार, चिंचपेटी, तोडे, बांगड्या, तन्मणी, लफ्फा, पाटल्या, बांगड्या, वाकी, नथ इथपर्यंत सर्व दागिने त्या बनवतात.
संक्रांतीला लेक/सूनबाई दागिन्यांनी मढते तसाच मुलगा/जावईदेखील. त्यामुळे पुरुषांसाठीही हलव्याचे दागिने त्या बनवतात. नारळ, मोबाइल, घड्याळ, पेन, अंगठी तर आहेच.
जावयासाठीचे वाण मुलीच्या घरी गजांतलक्ष्मी नांदावी म्हणून हत्तीवरून देण्यासाठी त्या हत्ती सजवतात. या हत्तीवर 5 प्रकारचे हलवे आणि मोदकाच्या आकारातील गूळ असे हे वाण यंदाच्या संक्रांतीत त्या देणार आहेत.
टीव्हीवरील मालिकांचा तरुण मुलींवर प्रभाव असतो. तू तिथे मी, राधा ही बावरी, होणार सून मी या घरची यांसारख्या मालिकांमधले जान्हवीचे मंगळसूत्र असो वा आणखी कुठले दागिने, नव्याने लग्न झालेल्या तरुण मुलींना असे दागिने घालायचा मोह झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे वृषाली यांनी मालिकांमधल्या दागिन्यांचीही स्टाइल आत्मसात केली आहे.
काळ बदलला अशी ओरड करीत आजकालच्या पोरींकडे बघत आमच्या काळी असं नव्हतं म्हणणा-या मागच्या पिढीला अशा सणांच्या दिवशी मात्र तरुण पोरी आ वासायला लावतात. कारण घराघरातला हा पारंपरिक नॉस्टॅल्जिया तरुण मुलींना साद घालत असतो. संक्रांतीच्या दिवशी नटून थटून गल्ल्यांमध्ये लाज-या नजरेनं फिरण्याच्या मोहाला असे हलव्याचे दागिने त्यामुळे आपसूकच भुरळ पाडतात.
हवामान, थंडी, महिना, नववर्ष या सगळ्याचा मेळ ऋतुचक्राचा समतोल साधत आपले सण घालत असतात. अलीकडे थंडीच्या वेळी थंडी, उन्हाळ्याच्या वेळी उन्हाळा हे निसर्गचक्र मोडलेले असले तरी त्या त्या ऋतूत तो तो शृंगार करण्याचा अट्टहास मात्र मुली सोडत नाहीत आणि त्यातूनच इमिटेशन ज्वेलरी, हलव्याचे दागिने, साड्यांना कुंदनसारखे डिझाइन्स लावणे यासारखे लघुउद्योग उभे राहतात. पूर्वापार चालत आलेला शृंगाराचा
छंद या लघुउद्योगांना आजन्म पुरणार आहे, याची यामुळेच वृषालीसारख्या उद्योजिकांना खात्री वाटते.
आपल्याकडे 31 डिसेंबर म्हणजे थर्टी फर्स्टला तरुणाई डीजेच्या तालावर पेस्ट्रीज, प्रसंगी शॅम्पेन उडवत थिरकते. मात्र हीच तरुणाई संक्रांतीला अत्यंत पारंपरिक होते. हलव्याच्या दागिन्यांसारख्या नॉस्टॅल्जिक गोष्टींची हीच तर कमाल आहे. आपण उत्सवी आहोत आणि ‘अपने रंग हैं हजार’ ही संकल्पनाच अशा सणांमधून अधोरेखित होत असते.
संक्रांत झाली की गूळ-कडुनिंबाचा कडूगोडपणा घेऊन गुढीपाडवा येतो. नववर्षाची गुढी उभारल्यानंतर रंगपंचमी, होळीसारखे सण येतात. मॉडर्न म्हणवणा-या मुली या सगळ्याच रंगांमध्ये रंगतात आणि तेव्हा वाटतं, कोण म्हणतं आम्ही फक्त मॉड आहोत?
मॉड विथ ट्रॅडिशन, मग ती एका दिवसापुरती दिसत का असेना, मन तर या उत्सवी रंगांनीच व्यापलं आहे ना...