आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrunmayi Ranade About Dhule Enter Cast Marriage Issue

कुठून आली ही वृत्ती?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळ्यात या आठवड्याच्या सुरुवातीला एक दुर्दैवी घटना घडता घडता राहिली. जातीबाहेर विवाह केला म्हणून पोटची कन्या मरण पावल्याचं तिच्या पिताश्रींनी जाहीर केलं आणि दशक्रिया विधीसाठी गावाला आवतण दिलं. या आमंत्रणाची बातमी होऊन व्हाॅट्सअॅपवर फिरायला वेळ लागला नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांपर्यंत ती पोहोचली आणि प्रत्यक्ष असा काही विधी झाला नाही. जुन्या काळच्या चित्रपटांमध्ये अाजपासून तू मला मेलास/मेलीस किंवा मी तुला मेलो/मेले असे संवाद ऐकायला मिळत. इथे खासगीत या बापलेकीत काय संवाद झाले असतील, हे कळायला फार कल्पनाशक्ती लढवायला नको. पण जाहीर जी कृती झाली, ती धक्कादायक होती. त्यातून दिसून येतो पराकोटीचा संताप, टोकाची नकाराची भावना आणि धडा शिकवण्याची इच्छा. आईबापाच्या इच्छेविरुद्ध लग्न हा अजूनही तरुण मुलामुलींसाठी अावाक्याबाहेरचा विषय आहे. किंवा तो त्यांनी धैर्याने आवाक्यात आणला तर जिवावर बेतण्याची शक्यता अधिक. तथाकथित आॅनर किलिंग, घराण्याचा मान राखण्यासाठी केलेली हत्या, हा अशा दुर्दैवी जाहिरातींच्या पुढचा भाग असतो. धुळ्यातल्या या कुटुंबाची लेकीचा जीव घेण्यापर्यंत मजल गेली नाही, यात समाधान मानलं तरी, त्यापलीकडे जाऊन मुलीच्या मृत्यूविषयी खोटी जाहिरात देऊन त्याबद्दल आनंद व्यक्त करण्याची वृत्ती कशातून आली असेल, याचा शोध घेणं त्यापेक्षा महत्त्वाचं वाटतं.
असा शोध घेताना सर्वात आधी दिसते ते भेदभाव मानण्याची मानसिकता. मी वरचा आणि दुसरा कुणी खालचा, अशी कोणत्याही निकषांतून प्रत्यक्षात आणता येणारी उतरंड, मग ती जात, धर्म, भाषा, प्रदेश, रंग, कशावरही आधारित असेल. एकविसाव्या शतकात प्रवेश करूनही १५ वर्षं होत आली, तरी ही भेदभावाची एकोणिसाव्या शतकातली मानसिकता अजून बदललेली नाही. संपूर्ण भारतात ती कायम आहे नि अशी मतं असण्यासाठी शिक्षणाचीही अट नाही. धडधडीत निरक्षर माणूसही समभाव जपणारा असतो, तर पदव्यांची मालिका दिमाखाने मिरवणाऱ्यांमध्ये दुसऱ्याला लहान, क:पदार्थ मानण्याची वृत्ती दिसून येते. यातही काही उजेडाचे कण आहेत म्हणा, पण या कणांची मोठी मशाल होण्याची गरज आहे, हेच या घटनेतून स्पष्ट झालंय.
mrinmayee.r@dbcorp.in