आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खमकी सत्य रक्षणकर्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘एडेलमन’ या एजन्सीने जगभरातील लोकांचा माध्यमांवरचा विश्वास उडत चालल्याचे दर्शवणारा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालाचा हवाला देऊन पगारी प्रचार करणारे बेभान झाले. इतके की, या झुंडीविरुद्ध ‘ब्र’ काढायला पत्रकार घाबरू लागलेत. पण त्यातही नेहा दीक्षितने विश्वासार्हता टिकवून विरोधाचा आवाज शाबूत ठेवलाय... स्वातंत्र्यसेनानी चमेलीदेवी जैन यांच्या नावे स्त्री पत्रकारांना दिला जाणारा पुरस्कार या वर्षी नेहा दीक्षित यांना देण्यात आला. पुरस्काराचे कारण होते एक शोधवृत्तांत...
 
एडेलमन ‘ट्रस्ट बॅरोमीटर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एजन्सीने जगभरातील माध्यमांवरचा सामान्य लोकांचा विश्वास उडत चालला आहे, असे दर्शवणारा सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगभर लोकांना माध्यमे ही श्रीमंतांच्या, राजकारण्यांच्या हातातील बाहुली बनून केवळ नफेखोरी करणाऱ्या कंपन्यांसारखी वागतात, असे वाटते. यात भारतातील माध्यमांचाही समावेश आहे.

गंमत अशी की, चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने अशीच अविश्वासार्ह आणि पगारी प्रचार करणारी काही नवी ऑनलाईन नेटकर माध्यमे या अहवालाचा हवाला देऊन अनेक भारतीय माध्यमे कशी देशाला बदनाम करतात, असहिष्णुतेचा बागुलबुवा उभा करतात म्हणून ती अविश्वसनीय आहेत, अशी बोंब ठोकू लागली आहेत. सरकारच्या विरुद्ध बोलणाऱ्या पत्रकारांना प्रेस्टिट्यूट (माध्यमांतील वेश्या) असे संबोधणे, आपल्या बाजूने वळवण्यासाठी पोटार्थी पत्रकारांना उत्तेजनपर लालूच देणे, वगैरे गोष्टी सरसहा घडत आहेत. इतके की, या झुंडीच्या विरुद्ध ‘ब्र’ही काढायला अनेक पत्रकार घाबरू लागले आहेत. तरीही अनेक जण आपला कणा टिकवून आहेत. सत्याची चाड टिकवून आहेत. अन्यायाच्या विरुद्ध लिहीत, बोलत आहेत. विश्वासार्हता जी काही टिकून राहते, ती याच विरोधाचा आवाज शाबूत ठेवणाऱ्या पत्रकारांमुळे.
स्वातंत्र्यसेनानी चमेलीदेवी जैन यांच्या नावे स्त्री पत्रकारांना दिला जाणारा फार मोठ्या प्रतिष्ठेचा पुरस्कार या वर्षी ‘आउटलुक’मध्ये काम करणाऱ्या पत्रकार नेहा दीक्षित यांना देण्यात आला. या पुरस्काराचे कारण होते गेल्या वर्षीचा एक शोधवृत्तांत. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांनी ‘आउटलुक’ या मासिकात एक शोधवृत्तांत प्रसिद्ध केला. ‘ऑपरेशन बेबीलिफ्ट’ असे त्या लेखाचे शीर्षक होते. आसाम, प. बंगालमधील काही दारिद्र्यग्रस्त आदिवासी वस्तीच्या भागांतून लहान मुलींना शिक्षणासाठी म्हणून आईवडिलांपासून दूर करून दूर गुजरात, पंजाब अशा राज्यांत पाठवले गेले. वर्ष होऊन गेले तरीही त्यांच्या आईवडिलांशी त्यांचा कोणताही संपर्क नाही. या मुली नेताना कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यांना कुठे ठेवले आहे, याचा काहीही पत्ता नाही. नेहा दीक्षितने अशा प्रकारे नेलेल्या एकतीस मुलींचा पाठपुरावा केला. तीन महिने ती या भागात फिरत होती, त्या मुलींच्या आईवडिलांना भेटत होती. त्या मुलींना पाठवण्यासाठी दुवे म्हणून काम केलेल्या संघविचाराच्या अधीन झालेल्या स्थानिकांनाही भेटत होती. हे सारे लोक रास्वसंघाच्या सेवाकार्य करणाऱ्या संघटकांच्या प्रभावाखाली आलेले लोक होते. आदिवासींना आदिवासी न म्हणता ‘वनवासी’ म्हणण्याची लबाडी करणारे संघजन त्यांच्यासाठी गेली तीसेक वर्षे सेवाकार्य करत आहेत. त्यामुळे प्रभाव तर आहेच. आदिवासी संस्कृती ही मूळ हिंदू संस्कृतीच आहे - कुठल्याही तत्त्वाची पूजा म्हणजे हिंदू धर्मच असतो, हे त्यांचे लाडके तत्त्वज्ञान तिथे प्रसारित केले गेले. त्यांचे मूळ देवतार्चन अलगद काढून, तिथे रामकृष्ण आणि शिव यांची रोपणी झाली. आर्थिक मदतीची लालूच, सन्मानाची लालूच यातून ते सहज साध्य होऊ शकले. या सेवाकार्याचा डंका नेहमीच पिटला जाताना आपल्याला वेळोवेळी ऐकू येतो. आणि काही ठिकाणी खरोखरच सालसपणे काम चालत असेलही. त्यामागील हेतू संघटित हिंदू धर्माचा प्रसार करणे, हाच असला तरीही अगदीच नाडलेल्याला मदतीचा हात कोणत्याही हेतूने मिळाला, तरी तो उपयोगीच असतो. पण या परगण्यांमध्ये मात्र कुणाचे तरी पाऊल घसरले.

लोकांना फसवून, अंधारात ठेवून त्यांची मुले कुठेही पाठवणे आणि त्यांचा संपर्क होऊ न देणे, याला साध्या भाषेत ‘अपहरण’ म्हणतात. आणि ही अपहरणे संघाच्या सेवाभावी हातापायांनी केली, हे सत्य नेहा दीक्षित यांनी खुलासेवार मांडले. या लेखाविरुद्ध बोलणाऱ्या संघाच्या किंवा भाजपच्या लोकांनी या मुलींना नेमके कसले शिक्षण देऊन नेमके काय घडवले जाणार आहे? त्या या देशात की परदेशात कुठे आहेत? याची उत्तरे दिली नाहीत. संघाचं काम किती छान आहे, किती गोड आहे, किती मस्त आहे, असल्या वर्णनांपलीकडे या मुलींचा ठावठिकाणा शोधण्यात त्यांची मदत झाली नाही. केंद्रात त्यांचे सरकार असूनही किंवा असल्यामुळेच या तक्रारींना काहीही प्रतिसाद मिळाला नाही. संघाचे काम चांगलेच असते, अशी अंधश्रद्धा बाळगणाऱ्या लाखो स्वयंसेवक आणि राष्ट्रसेविकांना या प्रकरणी काही सत्य असेल तर, अशी शंकाही सतावत नाही, हे दुःखद आहे. नेहा दीक्षितचा अहवाल कित्येक तपशील देतो. छायाचित्रांसह खरी माणसे दाखवतो. तरीही छे ते सगळं संघविरोधकांचं कुभांड आहे, अशी शहामृगी भूमिका सज्जन घेत आहेत. आणि मग दुर्वर्तनी ट्रोल तर काय त्यासाठीच पगार घेतात... हे सारे मांडल्यानंतर नेहा दीक्षितला गलिच्छ भाषेत बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या. ती हिंदूविरोधी, देशद्रोही आहे, हा लाडका आरोप तर सतत होतोच आहे. गुवाहाटी न्यायालयात ती आदिवासी समाजात दुही फैलावते, असा आरोप करून तिच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात भाजपचे काही सदस्य सक्रिय झाले. ‘बेटी बचाओ’चे ‘बेटी उठाओ’ कसे झाले? या मुलींचे अपहरण झाले, का त्या खरोखरच कुठे गायब झाल्या असतील, हे महत्त्वाचे प्रश्न कुणालाही पडले नाहीत? मुख्य मुद्दा काय ठरला, तर नेहा दीक्षितने हे कोणत्या हेतूने लिहिलं? ती देशद्रोही आहे का?

गेली दहा वर्षे नेहा दीक्षितने मुलांच्या व्यापारासंबंधी, शोषणासंबंधी शोधपत्रकारिता केली. २०१०मध्ये मदरशांत चालणारे शोषण, २०११मध्ये सारांदाच्या जंगलात चाललेले शोषण तिने उघडकीस आणले. पण तिच्यावर कधीही हेत्वारोप झाले नाहीत. पण नव्या मनूच्या नव्या युगातले ट्रोलशिपाई हेत्वारोपांशिवाय काहीही बोलतच नसतात. प्रकाशक, संपादक सर्वांवर हेत्वारोप झाले. आणखीही काही हात पिरगळण्याच्या क्लृप्त्या वापरल्या गेल्या असतील. कारण नंतर तिचा लेख स्वीकारून छापणाऱ्या कृष्णा प्रसाद या संपादकाला ‘आउटलुक’च्या प्रकाशकांनी कोणतेही कारण न देता काढून टाकले. मग इतर माध्यमांनी चर्चा सुरू केली, ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची. ज्या अन्यायग्रस्तांवर वृत्तांत होता, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुणीही शब्द वेचले नाहीत. गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमधून जुही चौधरी या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षबाईंना अटक झाली. विजयन आणि रुपा गांगुली (पहिल्या महाभारत सीरीयलमध्ये द्रौपदी म्हणून दिसलेली) यांनीही या रॅकेटला मदत केल्याचे पुढे येत आहे. आता हा बंगालच्या देशद्रोही तृणमूल सरकारने रचलेला डाव आहे वगैरे भजन सुरू झालेच आहे. पण गेल्या जुलैनंतर हे प्रकरण आता उघड होणे, म्हणजे नेहा दीक्षितच्या शोधवृत्तांताला सशक्त दुजोरा मिळाल्यासारखे झाले आहे.

मुद्दा असा आहे, की असे काम करणारी आणि गरिबातल्या गरिबांची व्यथा मांडणारी माणसंही भारतीय पत्रकारितेत आहेत. माओवादी ठरवून छळ करून मग आत्मसमर्पणाचे नाटक उभे करून पुरस्कार, पदोन्नतीसाठी माणसांच्या जिवांशी खेळ करणारे पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध लिहिणारे अनेक पत्रकार आहेत. निर्भयपणे त्यांना कायद्याची मदत करणारी माणसे आहेत. त्यांना सतत धमक्या येतात. पण आजकाल या धमक्यांचे रंग जरा जास्तच भडक, बटबटीत झालेले दिसतात.

नेहा दीक्षित म्हणतात : “ऑनलाइन ट्रोल्सच्या हल्ल्यापासून कोणतीच स्त्री पत्रकार, कलाकार किंवा लेखिका वाचत नाही. या पूर्वी मी खाप पंचायतींच्या विरुद्ध लिहिलं, तेव्हा काही व्यासपीठांवरून मला काळनिळं होईपर्यंत कसं बदडावं, याची आखणी केली जात होती. मी उत्तर भारतातील वधूंच्या व्यापारावर लिहिलं, तेव्हा माझ्या गुह्यांगात काटेरी दांडकी, किंवा धारदार धातूची पट्टी घालून माझ्यावर बलात्कार केला जाईल, असं वर्णन करण्यात आलं. ‘लव जिहाद’बद्दल मी लिहिलं, तेव्हा मी ‘लष्करेतोयबा’वाली आहे, असं सांगितलं गेलं. मी हिंदुत्ववादी राष्ट्रवादाबद्दल लिहिलं, तेव्हा मला ‘राहुल गांधीची रखेल’ म्हटलं गेलं. गलिच्छ लैंगिक मजकूर, लिंगाची चित्रे माझ्या इनबॉक्समध्ये अनेकदा येतात. एखादा काटेकोर सत्यमांडणी केलेला वृत्तांत दिल्यानंतर जर हा असला प्रतिसाद मिळणार असेल, तर कुणाही वार्ताहराला ते खच्ची करणारं ठरतं. यामुळे घाबरलेले अनेक पत्रकार गप्पच राहणं पसंत करतील.”
ही भीती खरी आहे. कोणत्याही मुद्द्यांवर विरोधी लिहिणाऱ्या अनेक पत्रकारांना त्यांच्या मुलीचं बरंवाईट करण्यात येईल, अशा धमक्या आल्या आहेत. अलीकडेच स्वाती चतुर्वेदी यांनी लिहिलेल्या पुस्तकातील सत्यशोधानंतर तिच्यावरही ट्रोलधाड पडलीच होती. तरीही सत्य समोर आणण्याचे काम तिने पार पाडले. पण अनेक पत्रकार गप्प बसून ‘संसारामधी ऐस आपुल्या उगाच भटकत फिरू नको’, हीच वहिवाट रुळवतील, हे शक्य आहे. सोशल मीडियामध्ये जसे ट्रोल्स घुसलेले आहेत, तसेच पत्रकारितेतही आहेत. पत्रकारिता हे क्षेत्र ज्ञानाचे आणि विचारांचे क्षेत्र आहे. सत्यरक्षणाचे क्षेत्र आहे. त्यात शिरलेले, हाती गलिच्छ धमक्यांचा सोटा घेतलेले झोंड, ही मोठी चिंताजनक गोष्ट ठरणार आहे. पत्रकार नामोहरम झाले, तर मग जाहिरातींसाठी माध्यम कंपनी चालवणारे शेठीये- जे आधीच सरकारपक्षाकडे लीन आहेत - त्यांचीच पत्रकारिता चालेल. सत्याचे वार्तांकन झाकोळणारे भयाचे हे वातावरण प्रयत्नपूर्वक दूर करायला हवे.
 
mugdhadkarnik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...