आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीतिभ्रष्टांचा सुमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात साधीसुधी कामं करण्यासाठी चिरीमिरी द्यावी लागते आणि महाप्रचंड व्यवहारांसाठी कोटीकोटींचे ‘किकबॅक्स’ मिळतात. यापेक्षाही मोठी शोकांतिका म्हणजे, आपल्या देशातील बुद्धिवंतांनी सत्याचा मूलगामी विचार करणे नाकारले आहे. 
 
प्रश्न आहे, कोणत्याही सत्याला भिडण्यासाठी आपण किती वैचारिक तयारी दाखवतो हा. त्या सत्याला केवळ माध्यमांतून लखलखत्या चर्चा, संघर्ष समित्यांचे राजकारण, वेगळ्या वाटेने चालत असल्याचे भांडवल करून भिडता येते, असे नाही. आणि असत्य केवळ पैसा, एखादे कंत्राट मिळणे, एखादे पद मिळणे, निवडणुकीत विजय मिळून राज्य करण्याच्या बारा वाटा उघडणे, अशा केवळ द्रव्यगामी कामांपुरतेही मर्यादित नसते.

भ्रष्टाचाराची व्याख्या आपण फार वरवरची आणि उथळ करून ठेवली आहे. पैसे खाणे किंवा अधिक पैसा कमावण्यासाठी मधल्या दुव्याला पैसे खाऊ घालणे किंवा दुसऱ्याचा अधिकार असलेले द्रव्य-मालमत्ता स्वतःच्या खिशात घालणे किंवा स्वतःच्या वाट्याचे द्रव्य काही प्रमाणात मिळवण्यासाठी त्यातला थोडा वाटा दुसऱ्याला चिडचिडत का होईना देणे म्हणजे भ्रष्ट आचरण, अशी व्याख्या सर्वसामान्यपणे केली जाते. परंतु आपली लायकी नसल्यामुळे जगण्याच्या ज्या काही सुविधा आपल्याला कमावता येणार नाहीत, त्या मिळवण्यासाठी खोटेपणा करणे म्हणजे भ्रष्टाचार, अशी थोडी व्यापक व्याख्या करता येते.

भ्रष्ट आचाराचा आरंभ भ्रष्ट विचारांतून होतो, हेसुद्धा सामान्यतः मान्य केलं जातं. पण विचारांच्या भ्रष्टतेची व्यापकता पैशाच्या व्यवहारांच्या पलीकडे पोहोचते, हे मान्य केले जात नाही. वैचारिक क्षमता असलेल्या बुद्धिवंतांनी आपल्या जीवनशैलीला धक्का लागेल, असे सत्य नाकारून, तत्त्वे आणि विचार बाजूला सारून तथाकथित व्यवहारी विचार करून जगत राहणे, ही सर्वात मोठी नीतिभ्रष्टता आहे, हे मान्य केलं जात नाही.

त्या त्या मानवी संस्कृतीच्या टप्प्यांवर बुद्धिवंतांचे विचार, हे संपूर्ण मानवी क्षमतेचे मर्मस्थान असते. त्यांचे विचार भ्रष्ट किंवा अशक्त झाल्यास मानवी क्षमताच विदीर्ण होते. मग तो अक्षम, अकार्यक्षमांचा समाज लायकी नसताना सुखसमृद्धीची जीवनशैली मिळवण्यासाठी भ्रष्टाचाराच्या वाटांचा राजमार्ग मळवू लागतो.

आपल्या देशात साधीसुधी कामं करण्यासाठी चिरीमिरी द्यावी लागते आणि महाप्रचंड व्यवहारांसाठी कोटीकोटींचे ‘किकबॅक्स’ मिळतात, याने हळहळणाऱ्या सर्वांनी यापेक्षाही मोठी शोकांतिका काय आहे, त्याकडे लक्ष द्यावे. ते म्हणजे, आपल्या देशातील बुद्धिवंतांनी सत्याचा मूलगामी विचार करणे नाकारले आहे. असत्याला आव्हान देण्याची आपली क्षमता ते विसरले आहेत, त्यांच्या वैचारिक क्षमतेचे विरणे देशाच्या चारित्र्याला विदीर्ण करीत आहे.

हे सारं सुरू कुठे होतं. कुणी म्हणतात, सत्ता भ्रष्ट करते. सर्वंकष सत्ता सर्वंकष भ्रष्टाचार माजवते. पण यालाच पायबंद बसावा, म्हणून मानवी इतिहासात समाजव्यवस्थांनी नियम आणि राजव्यवस्थांनी कायदे करायला सुरुवात केली. नीतीविषयक प्रगल्भता वाढवण्याचे काम तत्त्वज्ञांनी करायला घेतले. नीतिमत्ता, नीतिभ्रष्टता, सदाचरण, दुराचरण याची मूलतत्त्वे तपासण्याचे, पुन्हा घडवण्याचे कामही होत राहिले. नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञान विकसित होण्यामागचा मूळ हेतूच तर तो होता. जेव्हा जेव्हा तत्त्वज्ञांनी आणि नीतिवेत्त्यांनी सत्तेपुढे पड खाल्ली किंवा आपली भूमिका बजावताना तत्त्वांना मुरड घातली, तेव्हा तेव्हा समाजप्रवाहाला नीतिभ्रष्टतेचे वळण मिळाले.

आज आम्ही आमच्या विद्यापीठांतून, शाळाशाळांतून पाठ्यपुस्तकांच्या पानांतून सुमार नीतिमूल्यांची फोलपटं देतो आहोत. आम्ही स्वतःला शिक्षणव्यवस्थेतील चक्रांमधले दाते बनवून घेतलंय आणि फिरतोय गरगरा बटण चालू असेतोवर. स्वतःला बुद्धिवंतांच्या पंक्तीत बसवून घ्यायला आम्हाला आधार असतो, तो फक्त उपाधीचा किंवा नावानंतर उमटणाऱ्या बाराखडीच्या भेळेचा. मौखिक पाठांतरित ज्ञानाच्या मर्यादा पुस्तकांच्या छपाईनंतर ओलांडल्या गेल्या. पण आता पुस्तकी ज्ञान ही फार विचलित करणारी संज्ञा निर्माण झाली, कारण पुस्तकांवरून केवळ काही वेचक ज्ञानाचे चमचे भरवणारी पाठ्यपुस्तके शिक्षणाचा मापदंड ठरू लागली. आता तर विशिष्ट पदवीनंतर विशिष्ट पदव्युत्तर आणि विशिष्ट पदव्युत्तर शिक्षणानंतर डॉक्टरेट, अशी चळत रूढ झाल्यानंतर पाठ्यपुस्तकांचेही धड ज्ञान नसलेले लोक विद्वानांच्या पंक्तीत येऊन बसू लागले आहेत. डायजेस्टच्या मदतीने अनेक जण फर्स्ट क्लासही मिळवू लागले आहेत आणि कुणाकुणाच्या गरजांचा आधार घेऊन थिसीस लिहून देणारी दुकाने, थिसीस मान्य करून घेणारी केंद्रे विद्यापीठांमधून निर्माण झाल्यावर अनेक विद्यावाचस्पती पाइपातून घरंगळले आहेत.
आता या परिघाबाहेर केवळ जिज्ञासेपोटी मिळवल्या जाणाऱ्या ज्ञानाचे आणि माहितीचे चित्र कसे आहे? इंटरनेटमुळे कुणीही कमावलेले ज्ञान सर्वदूर पोहोचणे शक्य झाले. ज्ञानक्षेत्रातील ही प्रचंड मोठी क्रांती होती. टेलिव्हिजनचा शोध १९२०मध्ये बाजारात आणला गेला. तेव्हापासून टेलिव्हिजनमधून करमणुकीबरोबरच ज्ञान आणि माहितीचा प्रसारही सुरू झाला. १९५०मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर्स विकसित झाले. १९६०मध्ये इंटरनेटचा लष्करासाठी विकास आणि वापर सुरू झाला. १९८०-८१मध्ये इंटरनेट सर्वसामान्यांच्या वापरासाठी, विद्यापीठांसाठी उपलब्ध झाले. १९९०मध्ये नेट कनेक्टिविटी मिळण्याची सुरुवात झाली आणि नव्या सहस्रकाच्या सुरुवातीला इंटरनेट कनेक्टिविटी ही आवश्यक बनू लागली. आता ती गृहीत धरली जाते. ज्ञान आणि संपर्क यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाने माणसाच्या बुद्धीला, वैचारिक क्षमतेला उपलब्ध करून दिलेले समर्थ साधन.
पण जसे अन्न मिळवण्यासाठी प्रथम निर्माण झालेली शस्त्रसाधने नंतर हिंसाचार-विनाशासाठीही माणसाने वापरली, तसेच आता या ज्ञान मिळवण्याच्या साधनांचे होऊ लागले आहे.

इंटरनेटद्वारे ज्या सुविधा निर्माण झाल्या त्यांपैकी अनेक सुविधा आज ज्ञानप्रसाराऐवजी अज्ञानप्रसार करताना दिसतात. इमेल, वेबसाइट्सबरोबरच सध्या सोशल मीडियातील फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअॅप साधनांच्या वापरातून तर ज्ञानाऐवजी अज्ञानाला निष्ठा वाहिल्या जाताना दिसत आहेत. सुलभ संपर्कातून जग एकवटण्याऐवजी दुहीचे निरोपच अधिक पोहोचत आहेत. वैज्ञानिकतेशी, त्यात अंतर्भूत असलेल्या विवेकविचाराशी कवडीचा संबंध नसलेले कट्टर धार्मिक गट, कट्टर वर्णद्वेषी गट, कट्टर राजकीय भूमिका असलेले गट ही साधने वापरून साऱ्या हेतूंनाच सुरुंग लावत आहेत. सोशल मीडियावरून हिंसाचाराचा संदेश पोहोचवणे, कारस्थाने करणे, खोट्याचे खरे आणि खऱ्याचे खोटे करणे सोपे झाले आहे. साऱ्या जगाला दुराचाराच्या तोंडी देणारे वेगवेगळ्या गटांचे ट्रोल्स आणि अतिरेकी यांच्यासाठी ही साधने अगदी सहजप्राप्य बनली आहेत. त्याच वेळी एखाद्या गटासाठी, भूभागासाठी सोशल मीडियाचा किंवा इंटरनेटचा वापर शासकीय पातळीवर थांबवून, किंवा लोकांना विविध कारणांनी त्यापासून वंचित ठेवून जुलमी सत्ताधारी स्वतःसाठी सोयीची परिस्थितीही निर्माण करू शकतात; जसे आज जगातील मागास सरकारांच्या भागात केले जाते.

याचीच आणखी एक बाजू अशी की, याच परिवर्तनातून भरभरून करमणूक देणारी माध्यमे निर्माण झाली. मागास राजकारणी, प्रतिगामी धर्मकारणी यांच्या फासात येणारी जनता सोडून कशाचेच काही न वाटणारा एक फार मोठा वर्ग तयार झाला. 
कोण मिळवणार ज्ञान, कोण वाचणार, कोण काहीतरी गुंतागुंतीच्या प्रश्नांत लक्ष घालणार, कोण डोक्याला ताप करून देणार...

सर्वसामान्य घराघरांत या विधीनिषेधशून्य, विवेकशून्य आणि अगदीच सुमार अशा मनोरंजनाच्या साधनांनी ठाण मांडले. वाचनसंस्कृती वाढवणारे किंडल किती घरात असतील, आणि टीव्हीचे एकाहून अधिक सेट्स किती घरांत असतील, अभ्यास करायला हवा.
मुलांच्या अभ्यासाच्या वेळेलाही टीव्हीचा आवाज कमी न करणाऱ्या आईवडिलांनी, आजीआजोबांनी भरलेली घरे किती आहेत, पाहायला हवे. 
मठ्ठपणाची परमावधी असलेल्या मालिका पाहिल्या नाहीत तर आपले प्राण जातील की काय, असे वाटणारी एक वयोवृद्ध पिढी अनेक घरांतून मानाच्या स्थानावर आपतः असते. त्यांना दुखवायचे नाही, म्हणून त्यांची मुले त्यांचे टीव्ही पाहणे सुरू ठेवतात. मग नातवंडे आजी-आजोबांच्या सोबतीने पुन्हा तीच गचाळ करमणूक पाहून डोकी भरून घेतात. त्यांना या सुमार मनोरंजनाच्या समुद्रात चहुकडे पाणी आहे पण पिण्याला थेंबही नाही, हे कळत नाही, हे या देशात नक्कीच दिसते आहे. चकचकीत घरे, भांडणारी माणसे यांच्या मालिका पाहणाऱ्या लोकांच्या मनातील नीतिमूल्यांच्या व्याख्या विरविरीत होत जात चालल्या आहेत. तंत्रज्ञानातून इफेक्ट्स वापरून केलेल्या चमत्कारांच्या पौराणिक मालिका पाहून, त्यांच्या डोक्यातील अविवेकाच्या श्रद्धा घट्ट होत चालल्या आहेत. ही वयोवृद्ध, मानाने श्रेष्ठ माणसे बेजबाबदारपणे वागत आहेत, हे त्यांना कोणीही धारिष्ट्य दाखवून सांगत नाही, ही मोठीच शोकांतिका आहे.

अवैचारिक मनोरंजनाला, डोक्याला ताप नको, या भावनेला सोकावलेली मुले कोणत्याही मुद्द्याचा, घटनेचा, प्रणालीचा गांभीर्याने विचार करूच शकत नाहीत, असा त्यांच्या मेंदूंचा साचाच बनून जातो. फार थोडी मुले या सगळ्या भेंडोळ्यातून सुटतात आणि काहीतरी वेगळं करू लागतात. ही विचार करणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस कमीकमी होत चालली आहे. आणि याची चिंता या घरांना वाटत नसेल, तर देशाचे कठीण दिसत आहे.

संपर्काचे हे तंत्रज्ञान आपली बौद्धिक प्रगती, उत्क्रांती करण्याऐवजी बुद्धीची क्षमता अधोगतीला नेत चालले असेल, तर त्यात दोष त्या तंत्रज्ञानाचा नाही, त्याचा गैरवापर करणाऱ्या माणसांचा होता, याची इतिहासात नोंद होणे अपरिहार्य आहे.
 
mugdhadkarnik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...