आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अराजकीय भूमिकांचे बोटचेपेपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण चर्चा करतानाही जपूनजपून चर्चा करू लागलो आहोत हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या विरोधी राजकीय मतांमुळे आपण कुणाच्या तरी मर्जीतून उतरू, घरात वाद होतील, शेजारी सगळे विरोधी मताचे आहेत, उगीच प्रॉब्लेम नको... किती सहजपणे मात खातो आपण. मग अनेकदा याला गोंडस नाव दिले जाते, कुणालाही न दुखावणारे तटस्थ आणि समतोल. खरं म्हणजे हा असतो बोटचेपेपणा...

गेल्या आठवड्यात अमेरिकेतल्या व्हर्जिनिया राज्यातल्या शार्लोट्स्व्हलमध्ये एक जबरदस्त दंगल झाली. एका स्त्रीचा त्यात मृत्यू झाला आणि तिथे उतरू पाहणारे एक हेलिकॉप्टर भलतीकडे आदळून त्यातले दोघे पोलिस जवानही मृत्यू पावले. काय कारण होते या दंगलीचे?
 
अमेरिकेतील नागरी युद्धातील एक व्यक्तिमत्त्व, काळ्यांची गुलामी टिकावी म्हणून उत्तरेकडच्या राज्यांशी संघर्ष करणाऱ्या दक्षिणेकडच्या राज्यांचा - कॉन्फेडरेट्सचा नेता रॉबर्ट ली याचा पुतळा शहरातून काढून टाकावा म्हणून या वर्षी हालचाली सुरू झाल्या. वर्णद्वेषी मानसिकतेला मोठाच धक्का होता हा. ऑक्सिडेशनने हिरवा पडलेला हा प्रचंड असा ब्रॉन्झमध्ये ओतलेला रॉबर्ट लीचा घोड्यावर बसलेला पुतळा लवकरच काढून टाकला जाणार होता. गोऱ्या वर्णवर्चस्ववाद्यांनी या प्रकरणाला नव्या ट्रम्पी वातावरणातील एक सुसंधी म्हणून पाहिले आणि तिथे आंदोलन करण्याचा घाट घातला. पण वर्णद्वेषी विचारांना, वर्णवर्चस्ववादी विचारांना विरोध करणारे अनेक लोक शार्लोट्सव्हिलेमध्ये आहेत. त्या शनिवारी नाझी स्वस्तिकं, गोऱ्या कातडीच्या श्रेष्ठत्वाचे झेंडे फडकावत जेव्हा निओनाझी, माजीकूक्लक्सवाले जमले तेव्हा कडेच्या पदपथांवर त्यांच्या निषेधाचे फलक फडकावत त्यांच्या दुपटीने त्यांचा विरोध करणारे नागरिक जमले. आमच्या राज्यात नाझीवाद नको, गुलामीचे पुरस्कर्ते इथे नकोत, अशा स्पष्ट घोषणा दिल्या जाऊ लागल्या. भडकलेल्या गोऱ्या वंशवाद्यांपैकी एकाने विरोधी आंदोलकांवर गाडी घातली. त्यात जखमी झालेल्या महिलेचे निधन झाले आणि मग दंगा उसळला. वीसेक लोक जखमी झाले.
 
या दंग्याचे आणि त्यामागील कारणांचे वृत्त अमेरिकाभर पसरले. आणि वर्णवर्चस्ववाद, उजवा अतिरेक या प्रश्नांवर अमेरिकन्स बोलू लागले. अखेर गुळमुळीत निषेध करताना उजव्या अतिरेकाबद्दल काहीही बोलायचे टाळणाऱ्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला दोन दिवसांनंतर स्पष्ट शब्दांत वंशवादाचा उल्लेख करून निषेध करणे भाग पडले.

कौतुकाची बाब आहे की किती झटकन वंशद्वेषी लोकांचा विरोध करायला सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरले. कुठल्याही पक्षाची वाट न पाहाता ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ या बॅनरसोबत अनेक नागरिक उतरले. आणि त्यांनी बोटचेपेपणा न करता नाझी वृत्तीला समोरासमोर भिडून विरोध करण्याचे धैर्य दाखवले. सत्तेत बसलेल्या लोकांची सहानुभूती वर्चस्ववाद्यांना आहे हे माहीत असूनही अमेरिकन सर्वसमावेशक मूल्यांच्या रक्षणासाठी म्हणून हे लोक रस्त्यावर आले आणि त्यातील एका स्त्रीने प्राणही गमावले...
 
यात कुणीही असे म्हणाले नाही की, आपण राजकारणात पडता कामा नये. हा एक रोग आपल्या भारतीय समाजात फार मोठा आहे. आपण शक्यतो अराजकीय प्रतिमा तयार करायच्या प्रयत्नात असतो. आपण तटस्थ आणि समतोल आहोत हेे दाखवण्याचा आटापिटा करताना अनेक बुद्धीवंत दिसतात.
सामान्य माणसे तर आपल्याला काय करायचे आहे ही एकच भूमिका घेऊन जगतात. आपण कशाला राजकारणात पडा हा एक सततचा प्रश्न असतो. हीच भारतीय जनता आपापल्या ठिकाणी राजकारणावर तावातावाने चर्चा करते, जशी सिनेमा, क्रिकेट, गाणी, टीव्हीवरचे कार्यक्रम यावर चर्चा केली जाते तशीच ही एक चर्चा असते. जसे आपण कितीही चर्चा केल्याने या सगळ्या कार्यक्रमांत फरक काहीच पडत नाही केवळ त्यांचा टीआरपी वाढतो तसेच राजकारणावरील चर्चेचे असते. त्याने फरक काहीच पडत नाही. पाच वर्षांतून किंवा कधी थोडी लवकर उगवणाऱ्या निवडणुकीतच जो काही फरक पडायचा तो पडेल बाकी इतर वेळी चर्चेव्यतिरिक्त आपण काहीही ठोस करायचे नाही हा जणू भारतीय समाजजीवनाचा संकेत बनला आहे. बुद्धिवंत आणि सामान्य बुद्धीचे लोक यांत फारच कमी वेळा फरक दिसून येतो.
 
पुरस्कारपरतीची घटना, जेएनयूमधील विद्यार्थी शिक्षकांचा लढा, अलिकडचा विज्ञान मोर्चा या काही ठोस कृतीच्या घटना वगळता आपले समाजविश्व स्वतःभोवतीच गरगरत ठप्प असते असे वाटते. चर्चा करतानाही आपण जपूनजपून चर्चा करू लागलो आहोत हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या विरोधी राजकीय मतांमुळे आपण कुणाच्यातरी मर्जीतून उतरू, घरात वाद होतील, शेजारी सगळे विरोधी मताचे आहेत, उगीच प्रॉब्लेम नको - किती सहजपणे मात खातो आपण. आणि मग अनेकदा याला गोंडस नाव दिले जाते - कुणालाही न दुखवणारे तटस्थ आणि समतोल म्हणवून घ्यायचं. खरं म्हणजे हा असतो बोटचेपेपणा.
 
यात अनेक गोष्टींचे दाखले देता येतील. वेळी-अवेळी आवाज करणारे, कचरा टाकणारे यांच्या विरोधात शांतताप्रेमी, स्वच्छताप्रेमी जोरदार आवाज उठवत नाहीत. तक्रारी करत नाहीत. ‘आपण काय करणार - आपण आपल्यापुरतं नागरिकशास्त्र पाळतो ना - झालं तर मग.’
अलीकडेच ताजा असलेला विषय - ट्रोलिंग. ट्रोलिंग करणाऱ्यांना जरब बसेल असे कुणीही बोलत नाही. तिथल्या तिथे शाब्दिक हल्ला चढवत नाहीत. राजकीय ट्रोलिंग करणारे अनेक आहेत, त्यांना जसे त्यांच्या पक्षाचे नेते काहीही बोलत नाहीत, तसेच इतर सामान्य वाचकही काहीही बोलत नाहीत. ‘आपण काय करणार - त्यांचं राजकारण आहे ते.’
काहीतरी साधी कृती करायची गरज असते. या प्रवृत्ती समाजात राजमान्यता मिळवून माजू नयेत यासाठी आपले अस्तित्व दाखवण्याची गरज असते. पण आपल्या अराजकीय रहाण्याच्या, तटस्थ रहाण्याच्या हौसेला मर्यादा नाही. त्याचं मोल आपण कधी ना कधीतरी चुकवणार असतोच. व्यक्ती म्हणून नव्हे तर अधोवाही समाज म्हणून.
 
अराजकीय किंवा तटस्थ भूमिका अशी नसतेच. आंतरराष्ट्रीय राजकारणातही तटस्थ म्हणून वागवल्या जाणाऱ्या भूमिकेला बाजू जाहीर करणं भाग पडल्याचा इतिहास आहे. व्यक्तिगत, सामाजिक जीवन आणि राजकीय भूमिका या एकमेकांत घट्ट विणलेल्या असतातच. एखाद्या प्रश्नाची माहिती नसणे, किंवा त्यात रस नसणे ही वेगळी गोष्ट आहे. पण माहिती घेत असताना भूमिका न घेणे हे अशक्य असते. अराजकीय असण्याचा एकच खरा अर्थ संभवतो की तुम्ही भूमिका घेणं हेतुतः टाळता आहात. भूमिका घेणे टाळायचे असेल तर तसं स्पष्ट म्हणण्याचा प्रामाणिकपणा दाखवावा की मला अमक्यातमक्यांना दुखवायचे नाही, किंवा मला माझी माहिती वाढवायची आहे, तोवर मी भूमिका मांडणार नाही. पण मी अराजकीय आहे, समतोल आहे आणि तटस्थ आहे हे म्हणणे असत्याचाच एक भाग आहे.
 
आपल्या समाजात जे काही होते ते आजकाल माहितीच्या परिस्फोटानंतर सहजपणे कळत राहते. प्रत्येक वेळी काही ना काही प्रतिक्रिया उमटतेच मनात. तिच्यासंबंधाने काहीतरी मंथन करायला हवे. व्यक्त व्हायला हवे आणि आवश्यक तेथे भूमिकाही घ्यायला हवी. आवश्यक तिथे विरोध करणे, आवश्यक तेथे ठाम बाजू घेणे ही सुबुद्ध समाजाची गरज आहे. आपल्यावर काही आघात झाला तरी बेहत्तर, पण सत्याची, न्यायाची बाजू मांडायला आम्ही रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहाणार नाही हा शार्लोट्सव्हलच्या नागरिकांचा, मृत्यू पावलेल्या हीथर या अमेरिकन महिलेचा संदेश आहे. असेच नागरिक सुबुद्ध आणि न्यायप्रिय समाजाची पुनर्स्थापना करू शकतील. भारतात ही वेळ आली आहे. आपापले कोष टाकून थोडे सामाजिक जीवनात क्रियाशील झाले पाहिजे. केवळ उत्सवात भाग घेणे, नाचणे, थर लावून हंड्या फोडणे म्हणजे सामाजिक क्रियाशीलता नव्हे. बहुसंख्येच्याही आणि अल्पसंख्येच्याही वेडेविद्रेपणाला विरोध करणे ही तर सर्वात गंभीर जबाबदारी असते सुबुद्धांची.

नाहीतर अन्याय्य, गलिच्छ अशी अनेक विपरिते आपल्या समाजात ठाण मांडून कधी बसू लागतील कळणार नाही. स्थित्यंतरे होतात. लंबकाचे झोके होत रहातात. पण म्हणून जे जे होईल ते ते पाहावे म्हणून गप्प बसणार असलो तर आपली सामाजिक अवनती निश्चित आहे.
 
mugdhadkarnik@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...