आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाचे दलाल, माध्यमांचे स्वामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांना राजीव चंद्रशेखर हे नाव माहीतही नसेल. पण हे नाव माहीत असायला हवं. याची काही महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे, आपले ‘नेशन वॉन्ट्स टु नो’वाले ‘ओरडब गोस्वामी’ यांनी जे नवीन ‘रिपब्लिक’ नावाचे न्यूज चॅनेल काढण्याची घोषणा केली आहे, त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि त्या चॅनेलमध्ये पैसा घालणारी असामी म्हणजे, राजीव चंद्रशेखर! अपक्ष, पण एनडीएचे समर्थक खासदार म्हणून ते राज्यसभेत बसले आहेत. अपक्ष म्हणून इतका काळ कर्नाटकमध्ये वावरल्यानंतर गेल्याच वर्षी रीतसर केरळ एनडीएचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
 
राजकारणात कुठल्या व्यक्तीचं भाग्य कसं फळफळेल, हे वहिवाटेने चालणाऱ्या सामान्य माणसाला कधीही कळू शकत नाही. बरेचसे शिक्षण अमेरिकेत झालेले, अतिशय तल्लख असे हे राजीव चंद्रशेखर. यांचे भाग्य आता विविधांगाने फळफळू लागले आहे, असे लवकरच देशाला पाहायला मिळेल. मोदीप्रणीत भाजप सरकारने पाकिस्तानशी युद्ध करण्याचा ज्वर सुरुवातीच्या दिवसांत बऱ्यापैकी चढवत नेला. 
 
मग आंतरराष्ट्रीय राजकारणातील रागरंग पाहून आणि शाल, नजराण्यांची मुत्सद्देगिरी केल्यानंतर तो जरा थंडावला. पण देशातील सत्ता हाती घट्ट ठेवायची तर मुस्लिम द्वेष, पाकिस्तानशी युद्ध वगैरे तथाकथित देशभक्तीचे भजन सुरू ठेवावेच लागेल. त्यामुळे तो प्रश्न कधी ना कधी पुन्हा फसफसणारच.
 
एनडीए सरकारने संसदीय संरक्षण समितीवर राजीव चंद्रशेखर यांची नियुक्ती केली आहे. गेल्या अडीच वर्षांत सरकारी यंत्रणेतून खाजगी व्यक्तींचा फायदा होण्याची अनेक उदाहरणे घडली. त्यात आता राजीव चंद्रशेखर यांचे नाव मुख्य आहे. या अपक्ष खासदाराची ही नियुक्ती मोठी कुतूहलजनक आहे.
 
भारताला लागणाऱ्या संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात चंद्रशेखर यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांची एक कंपनी आहे, ‘ज्युपिटर कॅपिटल’. या कंपनीची गुंतवणूक आहे, ‘अॅक्सिसकेड्स’ या कंपनीमध्ये. आणि त्या कंपनीच्या इतर उद्योगातला एक उद्योग आहे, संरक्षण क्षेत्रासाठी प्रणाली तयार करण्याचा. भारताच्या संरक्षण व्यवस्थेसाठी सामग्री देण्यासाठी त्यांना प्रमाणित करण्यात आले आहे, असे त्यांच्या संस्थळावर स्पष्टच म्हटले आहे.
 
भारतीय संरक्षण सामग्रीच्या उत्पादनासाठी, एक भागीदार भारतीय असावा लागतो. तरच विदेशी कंपन्या त्याच्याशी करार करून भारताला हवी असलेली सामग्री भारतात तयार करू शकतात. त्या पद्धतीने अॅक्सिसकेड्स बाजारात विविध विदेशी कंपन्यांशी करार करून आहेच. शिवाय ती स्वतंत्रपणेही कंत्राटे घेते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात या कंपनीला संरक्षण मंत्रालयाचे एक कंत्राट मिळाल्याचे चंद्रशेखर यांनी स्वतःच घोषित केले होते.
 
आता या महोदयांचा युद्धासंबंधीचा उत्साह पाहा. पाकिस्तानच्या कुठल्याही व्यक्तीला, संस्थेला, खेळाडूला भारतात प्रवेश देऊ नये, अशी सूचना त्यांनी संसदीय समितीच्या बैठकीत केली. पाकिस्तानशी सर्व प्रकारचे आर्थिक, व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध संपवावेत, हे विधेयकच त्यांनी मांडले. 
 
इतकेच नव्हे, तर पाकिस्तानी व्यक्ती असेल असे कुठलेही विमान भारताच्या आकाशातून भारताच्या भूमीवरून उडत जाता कामा नये, अशी मौलिक सूचनाही त्यांनी केली. पाकिस्तान हे ‘दहशतवादी राष्ट्र’ म्हणून घोषित करावे, असे विधेयकही त्यांनी संसदेत रेटले होते. त्यांच्या मते, पाकिस्तानशी संबंध ठेवणे एकाच प्रकारे संभवते. संघर्षाचा संबंध! युद्धाचा संबंध!!
 
असल्या युद्धखोरीला युद्ध प्रत्यक्ष कधीच न अनुभवलेले बालिश लोक पाठिंबा देतात. त्यात प्रश्न असतो, तो भावनिक. माहिती नसल्यामुळेच आगखाऊ बोलणारे लोक अनेक असतात. पण तो भाबडेपणा म्हणून सोडून द्यायला हवा.
 
आपल्या भावना चेतवून, खेळवून त्यातून फायदा उकळणारे शस्त्रास्त्रांचे दलाल देशभक्त नसतात, तर फक्त फायदाभक्त असतात, हे त्यांच्या गावीही नसते. पण युद्धज्वर वाढवणे सोपे झाले असल्याच्या काळात पदाचा दुरुपयोग करून जनतेला युद्धासाठी प्रवृत्त करणारे राजमान्य राजश्री या देशात आहेत, याचे भान आपण ठेवायला हवे.

ज्या ज्युपिटर कॅपिटल या कंपनीची राजीव चंद्रशेखर यांनी स्थापना केली, ती कंपनी आता अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक’ या नव्या चॅनेलला भागीदार बनून, आर्थिक पाठबळ देते आहे. या कंपनीची वाटचाल कशी होणार, हे त्यांच्या एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या इमेल्सवरून स्पष्ट होते आहे.
 
साऱ्या संपादकांना, वार्ताहरांना त्यांनी कळवले की, त्यांची मते आणि त्यांची मांडणी ही मध्यम पण उजवीकडे झुकणाऱ्या विचारसरणीचीच असायला हवी. आपल्या चेअरमनच्या म्हणजे, राजीव चंद्रशेखरच्या विचारधारेशी जुळणारी मते असलेलेच लोक नोकरीवर ठेवले जावेत आणि चंद्रशेखर यांचे ‘राष्ट्रप्रेम’ आणि ‘शासन’ यांच्या कल्पनांशी सर्व पत्रकारांची चांगली ओळख करून देण्यात यावी. (मीडियात बभ्रा झाल्यानंतर हा संदेश दुसऱ्या दिवशी घाईघाईने मागेही घेण्यात आला).
 
अशा या चंद्रशेखरांच्या जोडीला कल्लोळस्वामी अर्णब आल्यानंतर युद्धज्वर तापवण्याचे प्रयत्न कसे पद्धतशीर पार पडू लागतील, ही कल्पना करायला काही फार मोठ्या कल्पनाशक्तीची गरज नाही.
 
आता प्रश्न असा आहे, ज्यांचे हितसंबंध सरळसरळ संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात गुंतलेले आहेत, अशा व्यक्तींना संसदीय संरक्षण समितीवर ठेवणे, हे केंद्रात कुणालाच कसे अयोग्य वाटत नाही?  युद्ध होण्यात स्वारस्य असलेली व्यक्ती संरक्षणाच्या संसदीय समितीवर? की हेच योग्य वाटते? राज्यकारभार हा अशाच रीतीने चालवला जाणार आहे का? 

सामान्यांनी एक लक्षात ठेवायला हवे. 
युद्ध ही एक अत्यंत घातकी घटना असते. त्यात मरणारे सैनिक सत्ताधाऱ्यांचे गणगोत नसतात. त्यातून येणाऱ्या कष्टमय दिवसांना तोंड द्यायला लागते, ते या देशातल्या राजीव चंद्रशेखर, अर्णब आणि सत्तेवर असलेल्या वाचिवीरांना नव्हे. त्यांना फायदाच मिळणार असतो. या ना त्या प्रकारे. अनाथ होणार असतात, आपली घरकुले. पंगू होणार असतात आपली- साध्यासुध्या लोकांची मुले. शत्रूचा बागुलबुवा फुगवून आपल्याला फसवणाऱ्या या युद्धाच्या कारखानदारांपासून सावध राहायला हवे.
 
अलीकडेच ‘जर्मन युद्धपाठातून’ या नावाची बर्टोल्ट ब्रेख्त या जर्मन प्रतिभावंताची कविता मी अनुवादित केली होती. त्यातील काही ओळी येथे देत आहे. शंभर वर्षे झाली तरी कवितेची हाक तशीच तीव्र आहे.
 
ज्यांच्या जेवणाच्या टेबलावर यथास्थित अन्न आहे
ते देत आहेत समाधानी राहण्याचे धडे.
सारा पैसा ज्यांच्या पायाशी जमा होणार आहे 
ते समजावत आहेत त्यागाची महती
भरपेट जेवणारे भुकेकंगालांना सांगताहेत
पुढे फार चांगले दिवस येणार आहेत सर्वांना.
देशाला पुढेपुढे नेत खाईत घेऊन चाललेले 
म्हणतात सामान्यांना- राज्य करणं भारी कठीण हो...
पुढारी जेव्हा शांततेच्या गप्पा करतात
तेव्हा सामान्य लोकांना समजतं
लवकरच युद्ध होणार.
पुढारी जेव्हा युद्धाला शिव्याशाप देतात
तेव्हा भरतीचे आदेश लिहून तयार असतात.
वरचे लोक म्हणतात-
युद्ध आणि शांतता दोन भिन्न गोष्टी आहेत.
पण त्यांची शांतता आणि त्यांचे युद्ध
जणू एक वारा आणि एक वादळ- समजून घ्यायचं
त्यांच्या शांततेतून युद्ध तरारू लागतं
आईच्या पोटी जन्मलेलं पोर 
जसं वागवतं तिचाच भयाण तोंडवळा.
त्यांच्या शांततेतून जगलंवाचलेलं जे काही
तेही ठार करून टाकतं त्यांचं युद्ध.
युद्ध जवळ येत चाललंय.
हे काही पहिलंच नव्हे.
याआधीही झाली बरीच युद्धे.
गेल्या... शेवटच्या युद्धाच्या वेळी
जितं होते आणि जेते होते
जितांमध्येही जनसामान्य होते, उपासमार झालेले
आणि जेत्यांमध्येही होते, जनसामान्य उपाशी खंगलेले.
कूच करून जाताना माहीत नसतं अनेकांना
त्यांचा शत्रूच त्यांचं नेतृत्व करीत असतो.
त्यांना आज्ञा फर्मावणारा आवाज
असतो त्यांच्या शत्रूचाच आणि-
शत्रूबद्दल बोलणारा तो माणूसच
असतो स्वतःच त्यांचा शत्रू.
हे सेनानायका, तुझा रणगाडा केवढा बलशाली आहे
जंगलं भुईसपाट करत जाईल आणि शेकडो माणसांना लोळवील
पण त्यात एकच दोष आहे
तो चालवायला माणूस लागतो
हे सेनानायका, तुझं बॉम्बर जबरदस्त आहे.
वादळवेगाने ते उड्डाण करतं, आणि हत्तीपेक्षा जड ओझं वाहून नेतं.
पण एकच दोष आहे त्यात
ते दुरुस्त करायला माणूस लागतो.
हे सेनानायका, माणूस मोठा उपयुक्त प्राणी आहे.
तो उड्डाण भरू शकतो, आणि संहार करू शकतो
पण एकच दोष आहे त्याच्यात
तो विचार करू शकतो.
 
युद्धाच्या भीषण खाईत कुणाच्या तरी वैयक्तिक नफ्याच्या महत्त्वाकांक्षांपायी आपले सैनिक, आपली माणसं लोटली जाणार नाहीत, एवढी काळजी नक्कीच घ्यायला हवी. 
 
mugdhadkarnik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...