आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलगाम बुवा-बाबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याकडे श्रद्धा असणे, हाच एक सद््गुण समजला जातो आणि श्रद्धा नसणे हा अवगुण. देवळात जाणारा, बाबालोकांच्या पाया पडणारा राजकीय नेता अनेक भाबड्या लोकांना जवळचा वाटतो. ही नस ओळखून अनेक राजकीय नेते आपल्या असल्यानसल्या श्रद्धांचे जंगी प्रदर्शन मांडतात.

देश म्हणजे बुवा,बाबा,माँ,बापूंची बजबजपुरी झाली आहे.चाळींतून, झोपडपट्ट्यांतून भंडारे चालतात, बुवा-बापंूची आवर्तनं चालतात, त्यात स्पीकरभक्ती सारी डेसिबल बंधने झुगारून चाललेली असते. कुणीतरी घरात मोठ्ठ्याने कुठलातरी जप, नाहीतर टेप लावून ठेवलेली असते. आजुबाजूला पोरं अभ्यास करीत आहेत, कुणी वाचत आहे, कुणी झोपलं आहे वगैरे विचारच नसतो. सभोवतालचे लोक - त्यांची श्रद्धा आहे - ती कशी दुखवायची म्हणून गप सोसत राहतात. काही काळानंतर त्यांना त्याची सवय होते आणि काही योगायोग घडले, की तेही भंडाऱ्याचे नाही तरी कुठल्या तरी महाप्रसादाचे, मठाचे भक्त होऊन जातात.

मोठमोठ्या चकचकीत चारचार बेडरूम्सच्या घरांत सत्संग चालतात. गालिचांवर टेकलेली गुलछबू माणसे चरबी सांभाळत भक्तीचा घुंघारव करतात. तिकडे ग्रामीण भागांत कुठला ना कुठला स्थानिक बाबा नाहीतर धर्ममार्तंड तोडगे सांगतो, खाजगी आयुष्यांतले प्रश्न सोडवतो. त्याच्या घरात त्याच्या तीनचार बायका त्याचा धर्मसंसार सांभाळत असतात. पण, त्याच्या पायावर डोई ठेवायला जाणाऱ्यांना त्यात काहीही वावगं वाटत नाही.

जादूटोणा करणारे बाबा आणखी वेगळे. त्यांचीही बडदास्त आपल्या घरांत राखत झापडबंद लोक स्वतःवर संकटे ओढवून घेत राहतात. वेगवेगळ्या शांती करणे, ‘करण्या’ दूर करणे, घरातल्या रोगराईवर ‘बाहेरचं’ बघणे, वगैरेंसाठी हे बारीकसारीक बाबाबुवा असतात. एका मराठी सिनेदिग्दर्शिकेने वृत्तपत्रातील आपल्या स्तंभात एकदा लिहिले होते. मी बापूंची भक्त आहे. ते नेहमी चांगलेच सांगतात. वाईट शिकवण काहीच देत नाहीत. - बहुतेक ज्यांचे आईवडील चांगली शिकवण देत नाहीत, त्यांना असल्या बापूबाबांची गरज पडत असावी, अशी खूणगाठ बांधायला हरकत नाही.

कोकणात ज्यांचे लोण भरपूर पसरले होते किंवा आहे, असे परिवार, बैठकवाले, आश्रमवाले जवळून पाहिले आहेत. डोकी बाजूला ठेवून जगता यावं, आपल्या निर्णयांची जबाबदारी परस्पर कुणावर तरी जावी, असं वाटणारे आळशी लोक त्यांचे अनुयायी होतात. स्वतःला शंकराचार्य म्हणवून घेणाऱ्याचा पूर्वेतिहास तपासून पाहावा, असे कुणालाच वाटत नाही.

मग आणखी एक स्तर असतो राजकीय पुढारी, नेते, महानेते ज्यांच्या मार्फत काही फायली हलवत राहतात, त्या स्वामी लोकांचा. यांचे अनुयायी पद्धतशीरपणे भरपूर वाढलेले असतात. जुन्या काळातले धीरेंद्र ब्रह्मचारी, महेश योगी वगैरेंच्या सुपर आवृत्त्या असलेल्या चंद्रास्वामी सत्य साईबाबा, नित्यानंद, रामपाल, गुरुदेव बाबाजी, कल्की, अमृतानंदमयी, राधे माँ, श्रीश्री रविशंकर, रामदेव बाबा आणि हा डेरेवाला रामरहीम या सर्वांच्या रंगछटा थोड्याथोड्या वेगळ्या आहेत. पण अखेर त्यांचे प्रचंड संख्येतले अनुयायी, म्हणजे एक प्रकारची एकगठ्ठा मतांची सोय असते. अगदी खासगी स्वरूपाच्या प्रेम, लग्न वगैरे गोष्टींतही गुरूचा सल्ला, घेणारे लोक मतदान करताना गुरूचा आदेश न ऐकतील तरच नवल. 

हेच कारण असतं, आध्यात्मिक म्हणवणाऱ्या संपूर्णतः चंगळ्या बाबांची पाठराखण राजकीय पक्ष आणि व्यक्ती करतात. शिवाय आपल्याकडे श्रद्धा असणे, हाच एक सद््गुण समजला जातो आणि श्रद्धा नसणे हा अवगुण. देवळात जाणारा, बाबालोकांच्या पाया पडणारा राजकीय नेता अनेक भाबड्या लोकांना जवळचा वाटतो.

ही नस ओळखून अनेक राजकीय नेते आपल्या असल्यानसल्या श्रद्धांचे जंगी प्रदर्शन मांडतात. आसारामच्या मांडवात मोदी गेले, सत्यसाईबाबाच्या दरबारात सगळे काँग्रेसी जात असत, गुरुमीतबाबाच्या डेऱ्यात सगळे जात होते, यामागील कारण हेच असते. आसारामचा किंवा गुरुमीतचा बलात्कारीपणा, सत्यसाईबाबाने केलेले तरुण मुलांचे लैंगिक शोषण, माणसे गायब करणे याला, ते राजकारणी जबाबदार नसतात, पण असले काही थांबवण्यासाठीही उत्सुक नसतात.

हे सर्व सुबुद्ध समाजासाठी दुर्दैवी आहे. लोकशाही प्रक्रियेसाठी लांच्छनास्पद आहे. पण, याचे मूळ शोधायचे झाले तर? भारतीय कुटुंब-समाज रचनेतच या गोष्टीची मुळे आहेत. ज्या व्यक्ती कुटुंबातील अंध आदेशांना झुगारून विचार करूनच कृती करतात, त्याच यातून वाचतात. आणि हे प्रमाण अगदीच अल्प आहे. कोणत्याही धर्माचे लोक लहानपणापासून आपल्या मुलांना आपल्या जन्मधर्माच्या चाकोरीत लोटतात. कुणी म्हणेल तिथं डोकं ठेवायला शिकवतात, कुणी म्हणेल ते उपासतापास करायला शिकवतात, रमझानचे रोजे असोत वा एकादशा-चतुर्थ्या. घरातल्या किंवा घरी आलेल्या वयाने ज्येष्ठ अशा कुणाचाही आदर करावा, इथवर ठीक आहे. पण आदर दाखवण्यासाठी पाया पडण्याची लुच्चेगिरी जी चालते, ती डोकं बाजूला ठेवूनच करावी लागते. अशी सारी घरच्या घरं जेव्हा बाबा,बुवा,स्वामी,बापू,दादा,माँच्या बुडीत खात्यात डुबक्या मारतात, तेव्हा सर्वात मोठा आणि सहज बळी असतात, त्या त्या घरच्या तरूण स्त्रिया.

या देशात स्त्रियांच्या, अजाण बालिकांच्या हक्कांची पार वाट लागलेली आहेच. देवी देवी, साध्वी साध्वी करत, त्यांची बिनघोर विटंबना सुरू असते. प्रश्न विचारायचे नाहीत, निमूट आज्ञा पाळायच्या हे ‘वळण’ तर खास पोरीबाळींसाठी कडक असतं. मुलग्यांसाठी जितकं असेल त्यापेक्षा कित्येक पटींनी कडक असतं. स्वसंरक्षणासाठी जी सावध वृत्ती बाळगायला शिकवली जाते, त्यात जिज्ञासेला स्थान नसतं, चिकित्सेला स्थान नसतं. सर्वात महत्त्वाचं मानलं जातं, ते खाली मान घालून चालणं, डोळे मिटून जगणं आणि शहाणपणा न करणं. शिका, फिरा, पैसे कमावण्यासाठी कामं करा- पण प्रश्न विचारू नका- घरची कामं नीट करा नवऱ्या, सासऱ्याची, सासरच्यांची सेवा करा- किंवा मग बाबाबुवाची सेवा करा. त्यातच तुमचं हित आहे, हे त्यांना त्रिवार बजावलं जातं. इतक्या लहानपणापासून हे थर चढवले जातात की, मग आपल्या जीविताच्या कल्याणासाठी, हक्कांसाठी भांडणं हे कल्पनेबाहेर होत जातं, अनेक स्त्रियांच्या. हाच असतो भारतीय स्त्रीवाद किंवा भारतीय स्वातंत्र्याची कल्पना.

स्त्रिया घरचे अत्याचार सहन करतात, तसेच असल्या बाबांचेही अत्याचार सहन करतात. घरच्या काकामामांचे हिडीस स्पर्श सहन करतात, तसेच आश्रमाधिपतींचेही सहन करतात. बलात्कार हेच प्राक्तन समजणाऱ्या किती स्त्रिया आपल्या घराघरांत आहेत, तशाच असल्या भगवट आश्रमांतही आहेत. आणि दिवाळखोर साक्षी महाराजांसारखे लोक अक्कल पाजळतात की, अशा बाबांना शिक्षा म्हणजे हिंदू धर्मावर हल्ला. 

महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री असोत वा हरयाणाचे सध्याचे मुख्यमंत्री, काँग्रेसच्या अंधश्रद्ध मुख्यमंत्र्यांच्या वर कडी करत धर्मसत्तेचे गोडवे गात लोकशाहीची वाट लावत आहेत. या साऱ्या अत्याचार, भ्रष्टाचार मालिकेला थोपवण्यासाठी आपल्या कुटुंबव्यवस्थेतील अविचार प्रथम मोडून काढला पाहिजे. जी कुटुंब व्यवस्था स्त्रीला संरक्षण देऊ शकत नाही तिचे गोडवे गाताना, आपले लोक थकत नाहीत, हा मोठाच विनोद आहे. 

मी एक स्वतंत्र, विचारशील व्यक्ती म्हणून कुणाही लहान मुलामुलींना सांगेन - प्रश्न विचारा. तरुण मुलामुलींना सांगेन की केवळ आईवडील, आजी-आजोबा, काकामामा, सासू-सासरे सांगतात, म्हणून एकही गोष्ट मनाला पटल्याशिवाय करू नका. यात कुळाचार, पाया पडणे, डोक्यावरून पदर घेणे, यासारख्या बिनमहत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींपासून ते विवाह ठरवणे, शिक्षणाची दिशा ठरवणे, नोकरी करायची की नाही, ते ठरवणे या सारख्या गोष्टींचाही समावेश आहे. नाही, म्हणण्याचा हक्क बजावणे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. 

आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे, लोकशाहीतले आपले मत कुणाला द्यायचे हा निर्णय तर कुणाच्याही आदेशानुसार कधीही घेऊ नका. त्यातून हे राजकीय पाठबळवाले गुरूबाबा बेलगाम माजले आहेत. म्हणून तो निर्णय स्वतःकडेच राखून ठेवा.
 
- मुग्धा कर्णिक
mugdhadkarnik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...