Home | Magazine | Rasik | Mugdhad Karnik Writes About Banaras Hindu University controversy

शिकणा-या मुलींचे पिंजरातोड आंदोलन

मुग्धा कर्णिक | Update - Oct 01, 2017, 06:01 AM IST

सर्वंकष सत्तेची महत्त्वाकांक्षा राज्यकर्ते आणि त्यांची बटिक बनलेल्या व्यवस्थेला आंधळे बनवते. या आंधळेपणामुळेच जगापुढे आ

 • Mugdhad Karnik Writes About Banaras Hindu University controversy
  सर्वंकष सत्तेची महत्त्वाकांक्षा राज्यकर्ते आणि त्यांची बटिक बनलेल्या व्यवस्थेला आंधळे बनवते. या आंधळेपणामुळेच जगापुढे आपले हसे होते आहे याचे त्यांना भान राहत नाही. बनारस हिंदू विद्यापीठाच्या आडून मुलींवर धर्मकेंद्रित सरकारांचा बडगा उगारताना नेमके हेच घडते आहे...

  ए क हिंदू स्त्री वाचवली, तर शंभर गायी वाचवल्याचे पुण्य लागते म्हणून मुस्लिम मुलांच्या प्रेमात वगैरे पडलेल्या मुलींना वाचवायला निघणारे हिंदुत्ववादी आपल्याला माहीत असतीलच. पण ही हिंदू स्त्री फक्त मुस्लिमांशी लग्न करण्यापासूनच वाचवायची असते. बाकी हिंदू पुरुषांनी तिची असभ्य टवाळी, छेडछाड, आपलीच मालमत्ता समजून वाटेल तिथे हात लावणे हे प्रकार केले, तर त्यापासून तिचे रक्षण करण्यापेक्षा गायींचे रक्षण करणे, त्यांच्याबरोबर फोटो काढून घेणे, हे प्रातःस्मरणीय हिंदू राष्ट्रवादी नेत्याला महत्त्वाचे वाटते, हे आता लक्षात ठेवावे लागेल.

  बनारस हिंदू विद्यापीठात जे काही चालले आहे ते या देशाचे प्रातिनिधिक चित्र आहे. शिकायला जाणाऱ्या मुलींना त्रास देणे, त्यांची छेडछाड करणे, हा आपला हक्कच आहे असे इथल्या पितृसत्ताक, सरंजामी संस्कृतीच्या जळमटांतून बाहेर न पडलेल्या पुरुषांना वाटत असते, हे अनेक ठिकाणी दिसत आले आहे. महाराष्ट्रासारख्या तुलनेने प्रागतिक राज्यातही असले अंधारलेले काजळी कोपरे शिल्लक आहेत. मग उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा या प्रदेशांत तर पाहायलाच नको.

  पण एका नामांकित, फार मोठा इतिहास असणाऱ्या भारतीय विद्यापीठाच्या प्रांगणातही विद्यार्थिनींना सुरक्षित वाटत नाही, हे अत्यंत चिंताजनक आहे. या विद्यापीठापासून जवळच एका तरुण नर्सचा बलात्कारित देह नुकताच सापडला होता. विद्यापीठ परिसरात अभद्र छेडाछेडी चालत होतीच. त्यामुळे तेथील विद्यार्थिनींना असुरक्षित वाटत होते. त्यात संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका विद्यार्थिनीला मोटारसायकलवरून आलेल्या तिघा जणांनी छेडले, वर्तमानपत्रांत प्रकाशित बातम्यांनुसार तिच्या जीन्समध्ये या टवाळखोरांनी हात घातला. तिने आरडाओरडा केल्यावर, ते शिव्या देत पळून गेले. पण तेथून शंभर फुटांवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी साधी हालचालही केली नाही. आता ते सांगतात की, असे काही आम्ही पाहिलेच नाही.

  त्या विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर भारतीय सांस्कृतिक रिवाजानुसार तिलाच विचारण्यात आले - की इतका वेळ तू काय करत होतीस बाहेर... विद्यार्थिनींसाठी संचारबंदी पावणेआठ वाजता लागू होते. (पुरुष विद्यार्थ्यांना बाहेर असण्याची मुभा दहापर्यंत असते आणि त्यानंतरही फार बंधने नसतात). ही घटना साडेसहाच्या सुमारास झालेली असूनही विद्यार्थिनीलाच फैलावर घेण्यात आले. यानंतर बनारस हिंदू विद्यापीठातील मुलींच्या असंतोषाचा उद्रेक झाला. त्यांनी कुलगुरूंची भेट मागितली. भेटीची वेळ मिळाल्यानंतर त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यांनी निषेध करू नये म्हणून दडपण आले. तरीही या विद्यार्थिनी विद्यापीठ प्रांगणात निदर्शने करू लागल्या. यानंतर त्यांच्यावर निर्घृण लाठीमार झाला. आणि मग गेले काही दिवस, त्यांच्या संघर्षाच्या मूळ कारणाला बगल देत बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हेत्वारोप करणे सुरू केले. ‘या मुली राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मोदी इथे आले होते, या रस्त्याने जाणार होते, म्हणून त्यांच्या राजकीय संघटनांनी, हे सारे मांडले’, वगैरे घासून गुळगुळीत युक्तिवाद मांडायला सुरुवात झाली. होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना निदर्शनांत सहभागी होण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली होती. तरीही हजारो विद्यार्थिनी या प्रश्नावर एक झाल्या. आज या संघर्ष करणाऱ्या विद्यार्थिनींपैकी एक हजार विद्यार्थिनींवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. लाठीमार करणाऱ्या काहीजणांवरही गुन्हा नोंदवण्यात आला.

  वाराणसीतून लोकसभेत निवडून गेलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर वाराणसीत ते अनेकदा आले. या आंदोलनाच्या वेळीही त्यांची भेट ठरली होती, गटारवहन व्यवस्थेचे उद््घाटन त्यांच्या हस्ते व्हायचे होते आणि गौसेवा व्हायची होती (फोटो आहेतच). त्याच वेळी वाराणसीच्या विद्यार्थिनींचे आंदोलन सुरू झाले होते. कोणताही सभ्य नि कर्तव्यदक्ष अधिकारी मनुष्य अशा वेळी या प्रकरणात लक्ष घालून पुढे गेला असता वा संबंधिताना तशा सूचना देता झाला असता, पण आपल्या कार्यमग्न पंतप्रधानांना आपला वेळ या ‘बिनमहत्त्वाच्या’ प्रश्नासाठी देणे गैर वाटले. त्यांच्या नियोजकांनी त्यांचा मार्ग बदलला आणि पंतप्रधान नाकासमोर पाहात चालते झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले आदित्यनाथ तर उघड-उघड पितृसत्ताक हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते. त्यांनी मुलींकडे अद्यापही लक्ष दिलेले नव्हते. नंतर राजकीय दडपण निर्माण होऊ लागताच, त्यांचे सरकार काही करणार की, त्यांची ‘हिंदू युवा वाहिनी’ काही करणार ते पाहावे लागेल. एकीकडे या मुलींच्या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहता त्यांच्या चिंतेबद्दल प्रश्नचिन्हे उभे करणारी मुलाखत विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली आहे. आमचा कँपस कसा सुरक्षित आहे, वगैरे सांगताना या मुली राजकारण करीत आहेत, असे त्यांनी बिनदिक्कत जाहीर केले आहे. ज्यांनी ज्यांनी या लाठीमाराची, आंदोलनाची दृश्ये पाहिली आहेत, ते सारे सांगू शकतील की सततच्या छेडछाडीमुळे, आत्मसन्मान दुखावला जात असल्यामुळेच, या मुलींचा संताप उसळला होता.

  आज मुलींनी शिकावे, तर या सगळ्या कड्याकुलपांत किंवा मग स्वतःच्या जबाबदारीवर. कड्याकुलपे न जुमानली तर त्यांच्यावर कुणी हात टाकला, तर आमची जबाबदारी नाही, असे म्हणायला आपण मोकळे हा बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचाच नव्हे, तर शैक्षणिक उच्चाधिकारी असलेल्या कुलगुरूंचाही खाक्या दिसतो.

  २०१५मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी याच कडीकुलपांविरुद्ध एक आंदोलन सुरू केले होते. त्याचे नाव ‘पिंजरा तोड’ आंदोलन. गेल्या वर्षी बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थिनी त्यात सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर मुंबई, पतियाळा, रुरकी, लखनऊ, अलिगड आणि इतरही काही विद्यापीठांतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या. मुलगे आणि मुली यांच्यासाठी वेगवेगळी बंधने, संचारबंदीच्या वेगळ्या वेळा, ग्रंथालये-वाचनालये येथे बसण्यासाठी जाहीर केलेला वेळ भरपूर असतो. परंतु होस्टेलच्या वेळा पाळायच्या तर तेथे फार वेळ बसणे अशक्य असते- याविरुद्ध ‘पिंजरा तोड’ आंदोलनाने काम केले. अमकेच कपडे घाला, तमके घालू नका, असल्या ड्रेस कोडलाही त्यांनी ललकारले. होस्टेल्सची फी भरमसाट ठेवण्यालाही त्यांनी विरोध केला. पण सर्वात मुख्य म्हणजे, मुलींना अगदी कुकुल्या बाळांसारखं जपत असल्याचा आव त्यांनी मोडून काढायचा प्रयत्न केला. एकीकडे मुलींना आम्ही कसं जपतो, हे दाखवताना, अंधाऱ्या जागी दिवे न लावणं, सुरक्षा व्यवस्था कडक न ठेवणं, वाह्यातपणा करणाऱ्या मुलांवर कडक कारवाई न करणं, हे सारं सुरूच असतं. बनारस हिंदू विद्यापीठातच नव्हे तर देशभरात अनेक शाळा-कॉलेजांत हीच परिस्थिती असते. आजकाल प्रतिगामी शक्तींनी नव्याने ‘भारतीय स्त्रीवादाची’ मांडणी सुरू केली आहे. शिकण्याचे, उत्पन्न मिळवण्याचे स्वातंत्र्य घ्या, पण घरकामांची सारी जबाबदारी तुमची आणि पुरुषांनी जे स्वातंत्र्य उपभोगायचे ते उपभोगायचा तुम्ही विचारही करू नका, असे त्याचे अंतःसूत्र प्रकट होते आहे. अशा कालखंडात आपल्या स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी निर्भयपणे लढणे जगण्याइतकेच महत्त्वाचे ठरणार आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या होस्टेलच्या वॉर्डन बाई रजनी यांनी मुलींना सल्ला दिला- ‘तुम्ही मुली आहात. तुम्हाला थोडं घाबरून राहावंच लागेल. माझ्याकडे पाहा, माझं इतकं वय झालं, पण तरीही मी अजूनही कधी एकटीने बाहेर पडत नाही. तुम्हाला या गोष्टींची सवय करून घ्यायला हवी.’
  नाही करून घेणार आमच्या मुली भीतीची सवय.

  हा फरक असणारच आहे. आमच्या पिढीतल्या देशभरातल्या स्त्रिया जशा वागल्या, तशा नवीन पिढीतल्या मुली वागणार नाहीत, वागूही नये. पुरुषसत्ताक समाजात स्त्रीने घाबरून राहावं यापेक्षा भीतीची कारणं नष्ट केली जावीत, याकडे आता संघर्षाचा रोख वळणार आहे. ज्या गोष्टींमुळे पिंजरा बनतो त्या गोष्टींसकट पिंजरा तोडावा लागेल. बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या मुलींनी याला तोंड फोडलं आहे.
  - मुग्धा कर्णिक, mugdhadkarnik@gmail.com

Trending