आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मवेड हेच क्रौर्याचे मूळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महत्त्वाकांक्षा, असुरक्षितता आणि मरणाबद्दलची
भीती यातून माणूस धर्माच्या आश्रयाला जातो. तसा तो गेला की धर्मवेड अंगात भिनायला वेळ लागत नाही. एकदा ते भिनले की, डॉ. दाभोलकरांसारख्या विवेकवाद्यांच्या हत्या होतात, सनल एडामुरुकूसारख्यांना केवळ नाइलाजास्तव दूरदेशी  परागंदा व्हावं लागतं...
 
२०१२ मध्ये मुंबईतल्या पार्ले-इर्ला भागातील वेलंकणी चर्चमधल्या क्रुसाच्या खालच्या बाजूने थेंब ठिपकत असल्याचे एका ख्रिस्तभक्त स्त्रीच्या लक्षात आले. हां हां म्हणता चमत्कार घडत असल्याची वार्ता वायुवेगाने पसरली. जिझसचे पवित्र अश्रू पिण्यासाठी लोक गर्दी करू लागले. चर्चच्या दानपेटीत भर पडू लागली. चर्चनेही ही वार्ता  वेगाने पसरवली, यामागे कदाचित त्यांचा भाबडा विश्वास असेलही-पण त्यातून पैसाही भरपूर गोळा झाला. या तथाकथित चमत्काराची शहानिशा करण्यासाठी एका टीव्ही चॅनेलने विवेकवादी विचारवंत सनल एडामुरुकू यांना विनंती केली. सनलने तेथे जाऊन नजर टाकली. थोड्या निरीक्षणानंतर त्याच्या लक्षात आलं की, क्रुसाच्या मागच्या भिंतीमागील जागेतून पलीकडल्या टॉयलेटच्या ड्रेनेजचे पाणी भिंतीत कॅपिलरी क्रियेने (सूक्ष्म केशनलिकांनी पाणी खेचण्याची क्रिया) उतरत होते. आणि क्रुसाच्या खालच्या  बाजूला ठिपकत होते. 

वेलंकणी चर्चमधला चमत्कार नाकारल्यानंतर काही काळातच सनलने ख्रिस्ती लोकांच्या आणि चर्चच्या आणखी एका चमत्कारी श्रद्धास्थानावर हल्ला चढवला होता. संतपद देण्यासाठी चमत्काराची अट पूर्ण करावी लागते, त्यामुळे मदर तेरेसांच्या चित्राच्या पदकामुळे चमत्कार होऊन मोनिका बेर्से या बंगाली अशिक्षित बाईचा ट्यूमर बरा झाला, असे पसरवले गेले होते. सनलने या प्रकरणाचा शोध घेऊन मोनिकावर व्यवस्थित वैद्यकीय उपचार होत होते आणि त्यातूनच तिचा ट्यूमर गेला होता, हे चव्हाट्यावर आणले. त्यात त्याने पुन्हा चर्चच्या चमत्कारप्रेमावर घणाघाती टीका केली होती. टीकेने संतप्त झालेल्या बिशपने कालांतराने त्याच्यावर ईशनिंदेचा कायदा वापरायचे ठरवले. क्षमा माग, नाही तर तुला तुरुंगात टाकतो. यास सनलने नकार दिला. त्यानंतर तुरुंगात जाण्याची तयारीही केली. पण भारत सरकारमध्ये काम करणाऱ्या त्याच्या एका मित्राने त्याच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले आणि तो काही दिवसांसाठी म्हणून फिनलंडमधल्या हेलसिंकीला गेला.

आजपर्यंत  कॅथलिक चर्चने त्याच्यावर आरोप ठेवून त्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दूर केलेली नाही. जिवाची भीती गेलेली नाही. सनल एडामुरुकूच्या विवेकवादी कार्याबद्दल माहीत असल्यामुळेच हेलसिंकीला (तिथे असतानाच मला गौरी लंकेश यांची हत्या झाल्याची बातमी कळली.) जायचे ठरल्यावर, सनलला भेटायचा प्रयत्न करायचे ठरवले होते.

तीन दिवसांनंतर सनलला भेटले. अर्थातच प्रथम विषय तोच निघाला. सनल म्हणाला, माझा मित्र सरकारमध्ये होता, म्हणून मला वेळीच  कळलं. अन्यथा सनलची हत्या झाली असती आणि ती अनेकांनी अनेक प्रकारे वापरून घेतली असती, यात शंकाच नाही.

कॅथलिक चर्चच्या या प्रतिगामीपणाचे भांडवल करण्यासाठी विद्यमान सरकार त्याला मदत करील का - माझा प्रश्न होता. सनल म्हणाला, ‘आपल्यासारखे लोक कुणालाच नको असतात. मी हिंदू बाबा-बुवांनाही उघडं पाडलंय, हस्तसामुद्रिक, फलज्योतिष यावरही मी टीका केली आहे - मला मदत करण्यात त्यांना काय रस असणार? पण ‘ऑर्गनायझर’ या हिंदुत्ववादी मासिकाने माझी मुलाखत जशीच्या तशी छापली हे खरंय. मी ते तशी छापतील, याची खात्रीही करून घेतली होती - आम्ही पाहा, कशी आमच्यावरची टीकाही छापतो, हे दाखवण्याची त्यांना यानिमित्ताने संधी मिळाली. पण त्या पलीकडे काहीही मदत होणार, अशी अपेक्षाच मी ठेवत नाही. भारतात आपल्याला परत येता येणार नाही, ही खूणगाठ मी बांधली आहे.’

मग सनलने त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या. सनलचे वडील जोझेफ एडामुरुकू हे विवेकवादी, निरीश्वरवादी - ख्रिस्ती धर्माचा त्याग केलेले गृहस्थ. त्याची आई जन्माने हिंदू आणि विवेकवादी. आज सनल ६३ वर्षांचा आहे. त्या काळात अशा जोडप्याला जो काय त्रास व्हायचा, तो झालाच. पण सत्याग्रह, विवेकाग्रह यामुळे सारे अधिकच खडतर बनले. सनलच्या आईने ख्रिस्ती धर्म स्वीकारावा, अशी जोझेफच्या आईवडिलांची इच्छा होती. हे दोघेही त्याला बधले नाहीत. नंतर सून गर्भवती राहिली, तेव्हा चर्चसकट आईवडील दोघांनीही तिने ख्रिस्ती धर्म स्वीकारला पाहिजे, म्हणून दबाव आणायला सुरुवात केली. ते ऐकेनात तेव्हा नऊ महिने भरलेल्या दिवसांत - असलं बिनधर्माचं बाळ आमच्या घरात जन्मू शकत नाही म्हणून- त्यांना घरातून बाहेर काढलं. पावसात चालत ते दोघे बारा किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलकडे निघाले. वाटेतच प्रसूती झाली - त्याचे तपशील महत्त्वाचे नाहीत - पण ते बाळ म्हणजेच सनल.

सनलच्या या खंबीर आईचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी झाला. ती मृत्युशय्येवर असताना तिला भेटायला यायचा सनलने प्रयत्न केला. त्याने मुंबईच्या आर्च बिशपना विचारले - मोठमोठ्या युद्धांमध्येही मानवतेच्या कारणांसाठी काही काळासाठी युद्धबंदी होते. मी आईला भेटायला येईन, त्या आठवड्यात तुम्ही न्यायालयीन कारवाई करणार नाही, असे आश्वासन हवे आहे... बाकी काहीही बदल होणार नाही. दयार्द्र जिझसच्या झगेधारी दलालांनी सांगितले की, एक क्षमायाचना कर - आम्ही सारे आरोप स्थगित ठेवू. याला अर्थातच सनलने नकार दिला, यात नवल नव्हतेच. त्याच्या मृत्युशय्येवरील आईला त्याने ही क्षमायाचनेची अट फोनवर सांगितली तेव्हा तो पुढे काही बोलण्याआधीच ती म्हणाली, तू क्षमा मागून मला भेटायला आलास तर माझे दार तुला बंद असेल...काही दिवसांतच आईचा मृत्यू झाला. करुणामयी मेरी आणि दयाळू जिझसच्या पाईकांनी माय-लेकरांची अखेरची भेट घडू दिली नाही.

सनल एडामुरुकू आता आंतरराष्ट्रीय संबंध आणि विवेकवाद या विषयांवर ‘युनेस्को’तर्फे व्याख्याने देतो. हेलसिंकीत शांतपणे जगतो. त्याची मुले आणि पत्नी भारतात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेस वा भाजप या दोन्ही पक्षांना काहीही मदत करावीशी वाटत नाही. काँग्रेसमधले अनेक ख्रिस्ती नेते सनलशी संपर्कात असतात - पण मॅडम सोनिया गांधींचे कॅथलिक चर्चशी संबंध कसे असतील - त्यांना आवडेल की नाही, वगैरे बोटचेप्या प्रश्नांमुळे कुणीही त्याचा प्रश्न धसास लावत नाही. ईशनिंदेचा कायदा हा अखेर जुनाट, कालबाह्य आहे. या कायद्यामुळे अनेक प्रगतिशील व्यक्तींना त्रास देणेच साध्य होते. तो कायदा फारसा वापरलाही जात नाही. पण या कायद्याचा आधार घ्यायचा ठरवलाच तर मात्र विचित्र प्रकारे शिक्षा होऊ शकतात आणि न्यायव्यवस्था त्यापुढे हात बांधून उभी राहते. या गोष्टीसाठी राजकीय इच्छाशक्तीच हवी. 

सनल सांगत होता, दाभोलकरांची हत्या झाली, त्याच्या चार दिवस आधी ते माझ्याशी फोनवर बोलले. मला पुण्यात यायचं निमंत्रण द्यायला. मी सांगितलं - माझ्या जिवाला धोका आहे. मी कार्यक्रमासाठी आलो, तर काही खरं नाही. तेव्हा दाभोलकर हसून म्हणाले- माझे हजार कार्यकर्ते तुझ्या रक्षणासाठी उभे करीन. पण मी नकोच म्हणालो. चारच दिवसांत दाभोलकरांना मारलं गेलं. ही परिस्थिती आहे... त्या तिघांनंतर आज या गौरी लंकेशला मारलं. विचार पटत नाहीत म्हणून विचार मांडणाऱ्यांनाच ठार मारायचं, हे भारतात रुजत चाललंय.

मला जगायचंय आणि कुठल्याही मुला-माणसांपर्यंत विवेकविचार पोहोचवायचा आहे. माझ्या देशात हे काम करायला अधिक आवडलं असतं. पण ते सध्या शक्य नाही. इथेच लिहितो, कार्यक्रम करतो, व्याख्यानं देतो, मुलांशी, तरुणांशी बोलतो. जगू देतंय हेलसिंकी...
ते धर्मगुंड म्हणाले होते, याचा एम. एफ. हुसेन करू... केला त्यांनी... सुटला माझा देश.

काळजात तुटलं हे ऐकून. या देशातील लोक अंधश्रद्धांना बळी पडू नयेत, चांगलं जीवन जगू लागावेत म्हणून आयुष्य देणारा सनल... विवेकविचारासाठी कष्ट उपसणारा सनल. परागंदा...

हिंदूंच्या धर्मवेड्यांनी त्यांच्यातल्या विवेकींना ठार केलं. इस्लामी धर्मवेडे तर करतातच. आणि आपण आता आपला रक्तरंजित क्रौर्याचा इतिहास मागे, टाकल्याच्या वल्गना करणाऱ्या ख्रिस्ती धर्मवेड्यांनी याला देशोधडीला लावलं. सारे धर्मवेड हे क्रौर्याचेच मूळ आहे. सनलसाठी देशातील काही लोकांच्या मनात, तरी हळवा कोपरा राहू देत. तिथं तो जगेल...
 
- मुग्धा कर्णिक
mugdhadkarnik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...