आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायत्री नि वीराचा गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटाचा किंवा कुठल्याही फॉर्ममधल्या गोष्टीचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम होत असतो. चित्रपटक्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्या या लेखिकेला असा चित्रपट पाहायला आवडतोच पण करायलाही आवडणारच आहे.

चित्रपट मला माझी गोष्ट वाटली, तर आवडतो. नाही वाटली तर नाही आवडत. इतकं सोप्पंय. चित्रपट अजून चांगला कसा झाला असता असा विचार मी करत नाही. (अपवाद फक्त माझा स्वतःचा चित्रपट.) बहुतेकांप्रमाणे मी बाॅलिवूडमधले चित्रपट पाहात मोठी झाले, आणि अर्थात, बहुतेक मला नाही आवडले. जागतिक सिनेमाशी ओळख आत्ता कुठे झालीय. पण दोन चित्रपट बाणासारखे माझ्या मनाला भिडलेत. ‘शुद्ध देसी रोमान्स’ (मनीष शर्मा) आणि ‘हायवे’ (इम्तियाज अली). ते मी कधीच विसरणार नाही.

जेव्हा ‘शुद्ध देसी...’ प्रदर्शित झाला, तेव्हा माझा लोकांवर आरोप होता की, ज्यांना हा चित्रपट आवडला नाही, त्यांना तो कळलाच नाही. ‘लग्न’ आउटडेट होत चाललंय हे इतकं सहज कोण मान्य करेल? पण या महत्त्वाच्या विधानाव्यतिरिक्त त्यात खूप बारीकसारीक गोष्टी आहेत ज्या सीटच्या अगदी टोकावर बसून राहायला लावतात. पहिली गोष्ट म्हणजे गायत्री (परिणीती चोप्रा). काय सुंदर व्यक्तिरेखा आहे ती. परिणीती गुणाची अभिनेत्री आहेच, पण लिहिणाऱ्यालाही मानायला हवं. इतकी प्रामाणिक पटकथाही जोखमीची असते. तर ही गायत्री, जयपूरमध्ये एकटी राहणारी मुलगी. तिचा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे ती इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये शिकवते, आणि गोयलसाहब (ऋषी कपूर)च्या वेडिंग प्लानिंग बिझनेसमध्ये ‘नकली बाराती’ बनून लग्नांना जाते. एका लग्नातच तिला रघुराम सीताराम (सुशांतसिंग राजपूत) भेटतो, जे त्याचं स्वतःचंच लग्न असतं आणि ते प्रेमात पडतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला गायत्री म्हणजे आपणच आहोत असं वाटत राहिलं. एकाच वेळी निरागसता टिकवून ठेवणं, आणि आपल्याला कोणी उल्लू बनवू नये म्हणून काळजी घेणं यात खूप दमछाक होत असते. प्रेमात तर अजूनच वाट लागते. पण अशी तक्रार करता येत नाही. कारण समाजाप्रमाणे स्वतःला प्रशिक्षित करणं आपणच नाकारलेलं असतं. आपण कितीही स्वावलंबी व्हायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा आपल्यावर प्रेम करणारं, आदर करणारं, आपलं बोलणं ऐकणारं कोणीतरी हवंच असतं.

गायत्रीचेसुद्धा असं कोणीतरी शोधायचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असतात. एका प्रयत्नात तर तिला गर्भपातही करून घ्यावा लागतो. बऱ्याचदा जेव्हा आपल्याला वाटतं की, आता आपण पार खचून गेलोय, परत प्रेमात पडूच शकणार नाही, तेव्हाच कुठून कुणास ठाऊक पण आपल्यात हिंमत येते आणि आपण परत उडी घेतो! पावलोपावली अपेक्षाभंगाची भीती असते, पण आपण थांबून राहू शकत नाही.
याउलट हायवेमधली वीरा (आलिया भट). तिने जगाला समजावण्याचा नादच सोडून दिलाय. खड्ड्यात गेलं जग! असं म्हणून ती निघून जातेसुद्धा! सुंदर डोंगरावर सुंदर घर तयार करते. एखाद्या सुंदर गोष्टीसारखं.

मग त्या गोष्टीचा शेवट मनासारखा होत नाही, एकटेपणा येतो, पण हार खाऊन ती परत येत नाही. हायवे ‘stockholm syndrome’ या आजाराबद्दलचा चित्रपट आहे. म्हणजे काय तर, जो आपल्याला शारीरिक किंवा मानसिक त्रास त्रास देतोय अशा माणसाबद्दल प्रेम आणि आपलेपणा वाटणं. असं वाटण्याला पूर्वी घडलेले अपघात कारणीभूत असतात. वीराच्या काकाने तिच्यावर लहानपणी अनेकदा बलात्कार केलेला असतो. तिचं कुटुंबही ही गोष्ट दडपून टाकतं आणि त्याबद्दल कोणीही परत कधीच बोलत नाही. मग एकदा तिचं लग्न ठरलेलं असताना महाबीर भाटी (रणदीप हूडा) तिचं अपहरण करतो आणि खूप लांब कुठेतरी घेऊन जातो. तिथून पळून जायचं झालं तरी जाणार कुठे आणि कसं हेच तिला कळत नाही. आणि बिचारी चुपचाप परत येते. अपहरण केलेलं असूनसुद्धा महाबीर तिच्यावर बलात्कार करत नाही. उलट त्याच्याच गँगमधल्या एकाला तो कानफडावतो आणि हाकलून लावतो. मग तिला त्याच्याबरोबर सुरक्षित वाटायला लागतं, तिची गँगमधल्या सगळ्यांशी मैत्री होते, आजवर जे जे केलं नाही ते करायला लागते, हळूहळू तिला मजा यायला लागते आणि शेवटी तर ती परत जायचंच नाही असं ठरवून टाकते. मग ती आणि महाबीर एकटेच निघतात. एका डोंगरावर त्यांना एक घर मिळतं. एक दिवस ते त्या घरात राहतात पण दुसऱ्याच दिवशी पोलीस त्यांना शोधतात, आणि महाबीर मारला जातो. त्यांच्या नात्यात कुठेही सेक्स नाही.

वीरा त्याला तिच्या काकाबद्दल पण सांगते. तो तिला त्याच्या आईबद्दल सांगतो. त्यानंतर तो खूप नरमाईने वागायला लागतो. ती आपली नुसती बागडतेय आणि महाबीर तिला बघतोय. ती धडपडू नये म्हणून लक्षही ठेवून आहे. इतकं निर्मळ, निरागस काहीतरी आपल्याला कधी मिळेल का? का आपण आपलं असणं, आपलं वागणं लोकांना पटवून देत बसलोय? आपण त्यांच्या फंदात तरी का पडतोय? आपल्याला बादलीत बुचकळून काढल्यासारखं वाटायला लागतं. भान आल्यासारखं. अख्ख्या जगाचा राग यायला लागतो. या चित्रपटाचा परिणाम खूप दिवस, महिने टिकून राहिला. गायत्री आणि वीरा या दोघींनाही या लेखाच्या निमित्ताने श्रेय द्यायला मिळालं. एकीकडे आपण गायत्रीसारखे आहोत असं वाटतं तर दुसरीकडे वीरासारखं असावं असं वाटतं. दोघींचीही मला स्वतःला शोधण्याच्या प्रवासात खूप मदत होईल.

मुक्ता खरे, मुंबई
kharemukta1000@gmail.com
बातम्या आणखी आहेत...