आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळगावची विकासकथा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उसाची गुºहाळे आणि शेतीत पिकणारा भाजीपाला यासाठी प्रसिद्ध असलेले देवनदीच्या किनार्‍यावरील मुसळगाव. कृषी संस्कृतीचा प्रभाव असलेल्या या गावात 25 वर्षांपूर्वी सिन्नरच्या औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रत्यक्षात 2005 मध्ये औद्योगिक प्रगतीच्या पाऊलखुणा गावात उमटल्या... सिन्नरपासून 6 कि. मी. अंतरावर शिर्डी मार्गावर वसलेल्या मुसळगावची शेती नेहमीच पावसावर विसंबून असलेली. मुबलक पावसाने देवनदी वाहू लागली की वर्षभर सुगी आणण्याची धमक गावकर्‍यांच्या मनगटात पुरेपूर भरलेली. चहूकडे उसाचे मळे, विहिरीवरील मोटेच्या पाण्यावर पिकणारा भाजीपाला, त्यातही टोमॅटो आणि गाजरांचे मुबलक उत्पन्न यामुळे मुसळगावची ख्याती सर्वदूर पसरलेली. मात्र एखाद्या वर्षी पाऊस रुसला की गावच्या समृद्धीला दृष्ट लागायची. लागोपाठची तीन वर्षे अवर्षण सोसावे लागल्यानंतर ग्रामस्थांचा शेतीवरील भरवसा उडाला. 1985 च्या सुमारास तत्कालीन आमदार सूर्यभान गडाख यांनी सहकारी तत्त्वावर औद्योगिक वसाहतीची मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरवले, तेव्हा शिर्डी रस्त्यावरील माळरानाची जमीन वसाहतीला देण्यासाठी मुसळगावचे ग्रामस्थ पुढे सरसावले. सिन्नर तालुक्यास औद्योगिक विकासाची दिशा दाखवण्यास पहिले योगदान मुसळगावच्या शेतकर्‍यांनीच दिले. मात्र औद्योगिक वसाहत नीटनेटकी आकाराला येण्यास दशकभराचा कालावधी गेला.
मुसळेश्वराचे प्राचीन हेमाडपंती मंदिर. त्याशेजारीच असलेली पायर्‍यांची मोठी बारव, बारवेच्या भिंतीत दगडात कोरलेली शेषशायी विष्णूची दुर्मिळ मूर्ती, गावात विविध प्रकारच्या झाडांची हिरवाई हे वैशिष्ट्य असलेल्या मुसळगावचे गावपण टिकवून विकासाचे वारे आत खेळू देण्यास सर्वांनीच सावध पावले टाकली. औद्योगिक वसाहत आकाराला येऊ लागली, तसे तेथील बांधकामांना मुरूम, डबर आदी साहित्य पुरवण्यास शेतकर्‍यांनी आरंभ केला. त्यासाठी ट्रॅक्टर, ट्रक यांसारखी साधने घेतली. आज गावात शेकडो ट्रॅक्टर, 50 हून अधिक ट्रक, जेसीबीसारखी साधने गावकरी बाळगून आहेत. बाहेरून आलेल्या कामगारांना मोठ्या संख्येने दूध व भाजीपाल्याची गरज असल्याने त्याच्या विक्रीस ग्रामस्थांना वाव मिळू लागला. किराणा दुकान, सायकल दुरुस्ती, उपाहारगृहे अशा एक ना अनेक व्यवसायांचा जम बसल्याने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गावकर्‍यांना अनेक पर्याय उपलब्ध झाले. स्थानिक तरुणांना व्यवसायाबरोबरच उद्योगक्षेत्रात रोजगार मिळू लागल्याने गावाच्या एकूणच अर्थकारणाला गती आली. परिणामी मुलांना शिकवण्याकडे नव्या पिढीचा कल वाढला. वसाहतीत असलेल्या कारखान्यांकडून कररूपाने पैसे उपलब्ध होऊ लागले. दरवर्षी सुमारे 50 लाख रुपयांचा कर मिळू लागल्याने ग्रामपंचायतीच्या तिजोरीला लक्ष्मीचा वरदहस्त लाभला. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा निधीही मिळू लागला. पावसाअभावी देवनदीचे पात्र कोरडे पडले, तरी गावात विकासाची गंगा वाहू लागली.
सर्व अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले. पेव्हर ब्लॉक बसले. ग्रामपंचायतीच्या वतीने घराघरात मोफत शौचालये बांधून देण्यात आली. एकाच वर्षी 300 घरांना मोफत शौचालये बांधून देण्याचा ग्रामपंचायतीचा उपक्रम दुर्गंधीमुक्तीच्या दिशेने घेऊन गेला. जागोजागी बसवलेल्या 50 सौर दिव्यांनी रात्रीच्या वेळी गावचे रस्ते उजळले. ग्रामस्वच्छतेच्या प्रयत्नांना गावकर्‍यांचा कृतिशील प्रतिसाद लाभू लागला. डास प्रतिबंधक फवारणी यंत्र विकत घेऊन ग्रामपंचायतीने नियमित फवारणी करून आरोग्य रक्षणासाठी पावले उचलली. समाजमंदिर, शाळा, गावातील मोडकळीस आलेली मंदिरे यांची कामे कुठे शासकीय निधी तर कुठे ग्रामस्थांच्या वर्गणीतून होऊ लागली. 3 एकरांच्या विस्तीर्ण जागेत जिल्हा परिषदेच्या शाळेची साकारलेली भव्य इमारत आणि प्रशस्त मैदानाने गावात ज्ञानमंदिर साकारले. विशेष म्हणजे या शाळेत विजेचे दिवे लागावेत यासाठी ग्रामपंचायतीने पवनचक्की उभारली आणि त्याद्वारे प्रतिदिन तयार होणार्‍या 2 किलोवॅट विजेतून शाळा उजळून निघाली.
गावाच्या औद्योगिकीकरणासाठी गावकर्‍यांनी तब्बल 1 हजाराहून अधिक एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. केंद्र शासनाने येथे राष्टÑीय बागवानी अनुसंधान केंद्राची स्थापना केली असून तेथे कांदा सीडफार्म, संशोधन, माती परीक्षण, कृषी हवामान वेधशाळा यावर काम चालते. ग्रामपंचायतीकडे सुमारे 100 एकर गायरान जमीन उपलब्ध असल्याने त्यावर विकासाचे चांगले उपक्रम राबवण्याचे दूरदर्शी प्रकल्प गावकर्‍यांच्या विचाराधीन आहेत. नदीला घाट बांधून दशक्रिया विधीचे विस्तृत स्थान, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाची इमारत अशा एक ना अनेक प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले तर चांगल्या रीतीने शेती उत्पादन आणि उद्योगक्षेत्रामुळे उपलब्ध झालेले पूरक व्यवसाय याद्वारे विकासाच्या भरारीसाठी ग्रामस्थ आतुर आहेत.
दिवस उजाडताच मंदिरातील घंटानाद आणि टाळ-मृदंगाच्या निनादात उमटणार्‍या अभंगांच्या सुरांसोबत यंत्रसामग्रीच्या घरघरीचे आवाजही ताल धरत आहेत... नव्याने बांधलेल्या विस्तीर्ण पारावर विसावणारे ग्रामस्थ शेतीत नवे वाण विकसित करण्याच्या चर्चेसोबत उद्योग-व्यवसायातील संधींच्या चाचपणीची चर्चा करत भविष्य निर्माणाचे आराखडे निश्चित करत आहेत. एकीकडे घराघरातील शेतकर्‍यांची मुले इंजिनिअरिंग, एमबीए महाविद्यालयात आपल्या करिअरची पायाभरणी करत आहेत. शेती आणि अध्यात्माशी जोडलेली नाळ कायम ठेवतानाच आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने आलेल्या विकास प्रक्रियेला मुसळगावने लक्षवेधी गती दिली आहे.
rd.deshpande@dainikbhaskargroup.com