आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युझियमच्या देशा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेकोस्लोव्हाकियातील लोक जसे नाटकवेडे आहेत, तसे ते संग्रहालय वेडेही आहेत. या वस्तुसंग्रहालयांची मोजदाद करणे जवळजवळ अशक्य आहे. आणि संग्रहालये तरी कशाकशाची म्हणून असावीत? बोहेमियन कलाकृतींची, काचेच्या आभूषणांची, शिल्पांची, गॉथिक-बरोक-रोकोको शैलीच्या वास्तुशिल्पांची, नव्या जुन्या चित्रकलेची, ज्यातून चेक व स्लोव्हॅक लोकसंस्कृतीची वाटचाल प्रतिबिंबित झाली आहे अशा लोककलांची, प्राचीन हस्तलिखितांची, रेल्वे इंजिन्सच्या मॉडेल्सची, ज्यू संस्कृतीचे किंवा रोमांच्या (जिप्सींच्या) भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणा-या वस्तूंची, इतकेच नव्हे तर रत्नजडित राजमुकुटांची... आणि मुलांनीच तयार केलेल्या कळसूत्री बाहुल्यांचीसुद्धा! कोणताही विषय या संग्रहालयांना निषिद्ध नसावा, असे ही संग्रहालये पाहून वाटू लागते. जगात कुठेतरी केवळ फुलपाखरांचे एखादे संग्रहालय असू शकेल, याची तुम्ही कल्पना तरी करू शकाल काय? असो.

केवळ ‘प्राहा’च्या पूर्वीच्या चेकोस्लोव्हाकियाची व सध्याच्या चेकची राजधानी प्रागमधील संग्रहालयांचीच मोजदाद करता करता तुम्ही थकून जाल नि तुमची दमछाक होईल!

हाउस ऑफ एक्झिबिशन्स, नॅशनल गॅलरी, राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, जेविश स्टेट म्युझियम, हाउस ऑफ चेकोस्लोव्हॅक चिल्ड्रेनपर्यंतची ही सारी संग्रहालये केवळ एकट्या प्राहात आहेत. मग या शिवाय ‘तात्रा’ या हिमशिखरांच्या प्रदेशातली, स्लोव्हाकियातली आणि गावोगावची कितीतरी संग्रहालये आहेत, ती वेगळीच. विविध उद्योगांनी गजबजलेल्या ब्रोनो या शहरात तर एक कायमचे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनच थाटले आहे.

तुम्ही म्हणाल की या एवढ्याशा देशाने या संग्रहालयांसाठी एवढ्या वास्तू तरी कशा उभारल्या बुवा? ही सारी संग्रहालये तुम्ही पाहिली की एक गोष्ट तुमच्या चटकन लक्षात येईल; ती म्हणजे, या मंडळींनी जुन्या ऐतिहासिक वास्तंूचा मोठा कलात्मक उपयोग करून घेतला आहे. एकेकाळचे मोठमोठे प्रासाद, राजवाडे, संरजामदारांचे वाडे आणि प्रार्थना मंदिरे यांचा अत्यंत विधायक उपयोग या संग्रहालयांसाठी केला आहे. या राजवाड्यांना, प्रासादांना तसे म्हटले तर आजच्या चेक लोकांच्या जीवनात काहीही स्थान उरले नाही, तरीही राजेरजवाड्यांच्या या देखण्या ‘कॅसल्स’चे रूपांतर मात्र देखण्या संग्रहालयात झाले आहे. मग तो प्रागमधला ‘प्राहा कॅसल’ असो नाही तर दूरवरचा स्टॅव्होस्का निकोक्ता येथील राजवाडा असो. चेकोस्लोव्हाकियात कितीतरी देखणी प्रार्थना मंदिरे, चर्चेस आणि सिनेगॉग्जस आहेत. यातल्या काही चर्चेस व सिनेगॉग्जचा प्रार्थनेसाठी उपयोग केला जातो. विवाहांसाठी केला जातो.

एका रोमन कॅथलिक चर्चमध्ये झालेल्या कुणातरी दुस-याच्या ‘देखण्या’ विवाह समारंभाला मीही उपस्थित होतो. आपल्याकडील विवाह समारंभांना मी जेव्हा उपस्थित असतो, त्या वेळी चेकोस्लोव्हाकियातील त्या विवाह समारंभांचे आगळेपण मला अजून आठवते. ज्या चर्चेसचा किंवा सिनेगॉग्जचा प्रार्थना मंदिर म्हणून उपयोग करता येत नाही, त्यांचेही रूपांतर चेक लोकांनी संग्रहालयांमध्ये करून टाकले आहे. त्यामुळे त्यांना आजही सांस्कृतिक महत्त्व आहे. ज्युईश स्टेट म्युझियम हे याचे एक विख्यात उदाहरण. ज्यूंच्या संस्कृतीचे सम्यक दर्शन घडवणारे हे जगातले एकमेव संग्रहालय आहे, असे या संग्रहालयाचे संचालक डॉ. विल्यम बेंडा यांचे म्हणणे आहे. एका प्रचंड ज्यू प्रार्थना मंदिरात- सिनेगॉगमध्ये हे संग्रहालय थाटले आहे. आजच्या रशियन राजवटीत चेकोस्लोव्हाकियात सामील झालेल्या ‘पूर्वाश्रमीच्या’ बोहेमिया आणि मोरालिया या देशांत ज्यूंची वस्ती कित्येक शतकांपासून होती. ज्यू संस्कृतीचे कितीतरी संस्कार या संग्रहालयाने आपल्या उराशी जतन करून ठेवले आहेत. ज्युईश टाऊन हॉलवरचे हिब्रू घड्याळ, (हिब्रू क्लॉक) आजही आपल्याला त्या इतिहास काळाचे स्मरण करून देते. ‘गॉथिक’,‘रोकोको’,‘बरोक’ वास्तुशिल्पांचेही दर्शन या जेविश स्टेट म्युझियमच्या या सिनेगॉगमध्ये आपोआपच घडते. चौदाव्या शतकातील काही प्रार्थनाचित्रे जशी मानवाच्या भक्तिभावनेची आर्तता प्रकट करतात, त्याचप्रमाणे अठराव्या शतकातील उत्पातांच्या चित्रांतून त्याचे कौर्यही ओसंडत असते. ज्यूंच्या लोककलेचे कितीतरी उत्कृष्ट नमुने या संग्रहालयात जतन करून ठेवले आहेत. आणि या संग्रहालयात असलेला एक विभाग मात्र आपला श्वास रोखून घ्यायला लावतो; तो म्हणजे तिथं जतन करून ठेवलेली स्मशानभूमी. या स्मशानभूमीत कितीतरी शिळा आहेत. त्यावर ज्यूंच्या भाषेतील कितीतरी लेख आहेत आणि त्या लेखांच्या आवतीभोवती कितीतरी चित्रे कोरली आहेत. ती चित्रे त्या शिळांच्या खाली पुरलेल्या जिवांच्या व्यथा-कथा आपल्याला सांगून जातात.

प्राहाच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयातल्या काचेच्या कलाकृतींचे सौंदर्य ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या संवेदनेच्या पातळीवरचे आहे. ही कला बोहेमियात एकेकाळी चौदा-पंधराव्या शतकात फार विकसित झाली होती. मद्याच्या चषक व जार्सची ही दालने मदिरा आणि मदिराक्षीच्या कैफाने धुंदफुंद झाली आहेत. ती स्वत:च धुंदफुंद झाली आहेत असे नाही, तर इतरांनाही मदहोश, बेधुंद करण्याचे सामर्थ्य त्यात आहे हे केवळ चषक पाहूनच तुम्हाला जाणवेल. यातील काही चषकांवरील युवतींची केशभूषा, वेषभूषा आणि त्यांचे अलंकार पाहून का कुणास ठाऊक अजिंठा-वेरूळची आठवण मनात तरळून जाते. या सातासमिंदरापल्याड असलेल्या देशात अजिंठा- वेरूळच्या खाणाखुणा कशा? हे कोडे मात्र मनोमन उलगडत नाही. हे नाते जोडता जोडताच आपण या दालनाबाहेर पडतो.

प्राहाच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाने आणखी एका गोष्टीकडे माझे मन वेधले होते आणि तिथे असतानाही माझी मराठी अस्मिता जागी झाली. सतराव्या शतकात गोव्याला आलेल्या एका ख्रिस्ती मिशन-याने कॅरेल प्रिकिलने लिहिलेल्या कोकणी व्याकरणाचे एक दुर्मीळ हस्तलिखित या संग्रहालयात जतन करून ठेवले होते. ते पाहून माझे मराठी मन या चेक लोकांच्या संग्रहालय वेड्या ध्यासाबद्दल व प्रवृत्तीबद्दल कृतज्ञतेने भरून आले होते. आजही या संग्रहालयाचे अल्बम्स जेव्हा मी चाळत बसतो, तेव्हा या कोकणी व्याकरणाच्या संपादनाचे माझे काम अजूनही रेंगाळले आहे, याची मनाला खंत लागून राहते. या उत्तरायणात तर ते होणारच नाही, ही अस्वस्थ जाणीवही मनात सलत राहते. या राष्ट्रीय संग्रहालयातला कला विभाग तर आनंदाचा एक मोठा ठेवाच आहे. त्यातील बालकांनीच तयार केलेल्या कळसूत्री बाहुल्यांचे दालन पाहताना वेळेचे कसे ते भान उरतच नाही.

प्राहाच्या संग्रहालयाचे किती म्हणून वर्णन करावे? त्यातले एक संग्रहालय संत व्हीट्स कॅथेड्रल येथील संग्रहालय आहे. ते तर केवळ विविध प्रकारच्या रत्नजडित राजमुकुटांनीच खच्चून भरले आहे. यातील सतराव्या शतकातील फ्रेडरिक या सम्राटाचा राजमुकुट अत्यंत देखणा, लोभसवाणा आहे.

स्लोव्हाकियाची राजधानी ब्राटिस्लाव्हातील जिप्सी संस्कृतीचे जतन करून ठेवणारे रोमानी संग्रहालय आजही माझ्या मनात घर करून बसले आहे. कारण हे जिप्सी भारतीय आहेत. त्यातले काही लौहारी म्हणजे, लोहार आहेत आणि त्यांनी भारतातल्या विळ्या-कोयत्यासारख्या तयार केलेल्या वस्तूही या संग्रहालयात जतन करून ठेवल्या आहेत. एका संग्रहालयात तर एक नांगर आणि एक चरखाही मी पाहिला.

भारताने काळाबरोबर आपली संस्कृती कशी जतन ठेवली, हे सांगताना मार्टिनच्या या संग्रहालयात झालेल्या भाषणात आपल्या सणावारांचा उल्लेख मी केला होता. मकर संक्रांतीचा उल्लेख करून मी त्यातल्या स्रेहभावाचा निर्देश करून तिळगुळ घ्या, गोड बोला म्हणण्याचा गोडवा व त्यामागील सौहार्दाची भावना उकलून दाखवली होती. माझे आभार मानताना त्या वस्तुसंग्रहालयाच्या संचालिका एलिना त्रिलिओव्हा यांनी स्लोव्हॅक नॅशनल म्युझियमचा अल्बम मला भेट म्हणून दिला होता. त्याच्या पहिल्याच पानावर माझे नाव लिहिले होते, आणि त्या खाली स्लोव्हॅक लिपीत लिहिले होते ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’