आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझे जिव्हाळनाते...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होम मिनिस्टर या कार्यक्रमाने नऊ वर्षांचा टप्पा पार केला. 13 सप्टेंबर 2004 ला महाराष्ट्राच्या घराघरात ‘दार उघड बये दार’ ही आरोळी झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली गेली आणि 10 वर्षांपूर्वी हे विश्वासाचं दार मला खुलं झालं. अत्यंत खेळीमेळीत या प्रवासाला सुरुवात झाली. गावागावातल्या ज्या स्त्रीला घराबाहेर दुसरं जग विशेष माहीत नव्हतं, घरातल्या माणसांशिवाय तिचा फारसा कुणाशी संबंध नव्हता, तिला आपलं मन मोकळं करणारा जिवाभावाचा ‘भावोजी’ सापडला तो या कार्यक्रमाच्या रूपानं! घरातल्या गृहिणीला बोलतं करण्यासाठी तिच्या अंतरंगात डोकावण्यासाठी तिच्या माहेरइतकंच अत्यंत विश्वासाचं माणूस म्हणून मला निवडलं गेलं आणि महाराष्ट्रातल्या वहिनींशी माझं एक अजोड नातं जोडलं गेलं.


‘‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढुनि खेळ खेळूया नवा’’ म्हणत नात्यांचे विविध रंग उलगडण्याचा खेळ या कार्यक्रमातून सुरू झाला. याच खेळाच्या माध्यमातून प्रत्येक घरातल्या गृहिणीला तिच्या रोजच्या प्रापंचिक ताणतणावातून क्षणभर बाहेर काढून तिच्या स्वतंत्र विश्वात एक फेरफटका मारण्याची संधी या कार्यक्रमाने दिली. सुरुवातीला काय चेष्टा चालवलीय.... किंवा थट्टामस्करीचा कार्यक्रम म्हणून नाकंही मुरडली गेली. परंतु सर्वसामान्य गृहिणीला बोलतं करायला मला तिचा मस्क-या भावोजीच होणं गरजेचं होतं. कुणाची चेष्टा करणं हा कधीच हेतू नव्हता तर प्रत्येक घरात पाहुणा म्हणून जाताना त्या घरातल्या मंडळींचं अवघडलेपण दूर करणं हाच हेतू होता. हळूहळू माणसं खुलत गेली... भावोजी ओळखीचा झाला, नव्हे आपला झाला... आता तर घरातल्या समस्यांवर तोडगा काढायलाही हक्काने मला फोन लावले जातात. हा अधिकार, हा विश्वास केवळ ‘होम मिनिस्टर’ ने दिला. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली मानाची पैठणी ही आधी केवळ श्रीमंत घरातल्याच स्त्रीची मक्तेदारी होती. सर्वसामान्य स्त्रीला या पैठणीचा मान दिला तो ‘होम मिनिस्टर’ने. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्‍ट्राच्या कलेचं प्रतीक असलेली ही जरतारी पैठणी मिळवण्याचा ध्यास प्रत्येक स्त्रीला लागला... पैठणीसारखेच नात्यांची घट्ट वीण गुंफत तितकेच विलक्षण मनोहारी जरतारी नक्षीकाम करत प्रत्येक गृहिणीला तिचा मान मिळवून देण्याचा प्रयत्न ‘होम मिनिस्टर’ने आजवर केला. लालबागच्या चाळीतून सुरू झालेला ‘होम मिनिस्टर’चा हा नऊ वर्षांचा प्रवास. या प्रवासात नात्यांचे अनेक रंग दिसले. महाराष्ट्राच्या विविधरंगी संस्कृतीची ओळख झाली. अनेक परंपरा जवळून पाहता आल्या.
आधी ‘दार उघड बये दार’ म्हणत मी प्रत्येक वहिनीच्या घरात दाखल झालो, पण आता मी ज्या गावात येणार आहे हे कळताच त्या अख्ख्या गावाची दारं माइयासाठी उघडली जातात. हा विश्वास, हे प्रेम मिळवण्यासाठी माइया आईवडलांची काहीतरी विशेष पुण्याई असणार त्यामुळेच प्रत्येक वहिनीचा लाडका भावोजी होण्याचं भाग्य मला मिळालं.... महाराष्‍ट्रातल्या प्रत्येक आईचा लाडका मुलगा मला होता आलं..! ‘होम मिनिस्टर’ने अनेकांची हरवलेली नाती पुन्हा गवसली... भाऊबंदकी झालेले दोन भाऊ पुन्हा एकत्र आले... अनेक वर्षे अबोला धरून असलेल्या भाऊबहिणीचा समेट झाला... तब्बल एका तपाने त्यांची भाऊबीज झाली. विखुरलेल्या बहिणींना एकत्र आणलं... घराला दुरावलेला मुलगा आईवडलांना परत सापडला.... या सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाची दिवाळी साजरी झाली. याहून वेगळी मोठी कमाई काय असू शकते? महाराष्ट्राचे सर्वच जिल्हे, अनेक तालुके आणि जवळजवळ प्रत्येक गाव असा हा ‘होम मिनिस्टर’चा प्रवास अखंड सुरू आहे. या नऊ वर्षांच्या प्रवासानं खूप माया मला दिली, अलोट प्रेम दिले, असंख्य थरथरत्या हातांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली, आणि अवघ्या महाराष्ट्राचा बुलंद आधार मिळाला. विविध वयोगटांतल्या सर्वसामान्य गृहिणींचा सन्मान या कार्यक्रमात झाला. तसेच समाजातील वेगवेगळ्या स्तरातल्या आणि विविध पातळ्यांवर काम करणा-या कर्तृत्वशालिनींचा गौरव करणारा स्त्री जागरही या कार्यक्रमात झाला. प्रत्येक स्त्रीचा गौरव हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता. त्या प्रामाणिक हेतूने सुरू झालेला हा प्रवास म्हणूनच आता प्रत्येक स्त्रीलाच नव्हे तर प्रत्येक मराठी घराला आपला अभिमान वाटत आहे...