Home »Magazine »Rasik» My Home My City

माझे गाव... माझे घर...

दिनकर गांगल | Jan 07, 2012, 21:43 PM IST

  • माझे गाव... माझे घर...

काही मोहक संकल्पना आयुष्यातून उडूनच चालल्या आहेत की काय असे वाटते. घर ही त्यातलीच एक कल्पना. आपले, गावाकडचे घर! हा विचारच किती आकर्षक वाटतो ना? परंतु गाव... मूळ गाव हेच नाहीसे होऊ पाहत आहे. मूळ गाव म्हणजे फार तर जन्मगाव. म्हणजेच ज्या गावी जन्म झाला ते गाव. पण लगेच पुढचा प्रश्न येतो आईचा, वडलांचा जन्म झाला, ती गावे? परंपरेने, पितृसत्ताक पद्धतीमुळे वडलांचे, आजोबांचे, एकत्र कुटुंबाचे म्हणजेच घराण्याचे गाव ते आपले मूळ गाव. भले घराण्याचा इतिहास, वंशविस्तार नोंदला गेलेला नसेल, परंतु घराण्याचा अभिमान? तो वंशपरंपरागत, पिढ्यान्पिढ्या कसा जोपासला गेला असेल? त्यामधूनच तर घराची, मूळ गावाची कल्पना रुजली गेली!
एकत्र कुटुंबांची, घराण्यांची, त्यांच्या वाड्यांची व मोठमोठ्या घरांची शतक-दोन शतकांची कहाणी आहे. मात्र गेल्या शतकाच्या मध्यानंतर कुटुंबे छोटी होऊ लागली, मध्यमवर्गाचा उदय झाला. त्या चौकोनी कुटुंबामधील कर्ता पुरुष स्वप्न पाही ते घर बांधण्याचे. त्यासाठी तो आयुष्यभराची पुंजी साठवत असे. आयुष्याचे ध्येयच ते! मग त्या घराचे नाव ‘मातृवात्सल्य’, ‘पितृकृपा’पासून ‘अपघात’पर्यंत तºहतºहेने व कल्पकतेने ठेवले जाई. ते घर ही घराण्याची निशाणी होई आणि पुत्रपौत्रांची सोय- त्यांना वारसा... असे अनेक हेतू त्या घरबांधणीमागे असत. बंगला सहसा गावाबाहेर होई. कारण तेथे विस्ताराला जागा असे. त्यांना बंगले म्हणत. तो शब्द इंग्रज येथे आल्यानंतर मराठी भाषेत रूढ झाला असे मानले जात असे. पण औरंगाबादचे संशोधक-समीक्षक ब्रह्मानंद देशपांडे यांनी ते सप्रमाण खोडून काढले आणि त्या शब्दाचा वंकद्वार - बंगद्वार - बंगदा - बंगला असा अपभ्रंशक्रम मांडला. तो मुद्दा वेगळा. मुख्य गोष्ट अशी की, आपले आपण घर बांधणे यामध्ये माणसाच्या जीवनाची इतिकर्तव्यता झाली. आमच्या एका मित्राला सिगारेट ओढण्याचा नाद होता. वयाची पन्नाशी आली तेव्हा तो म्हणे की, सिगारेट वेळीच सुटली असती तर तेवढ्या पैशात स्वत:चे घर बांधून झाले असते. तो शेवटपर्यंत सिगारेट ओढण्यातून आयुष्यभर मिळालेला आनंद आणि घर बांधून लाभणारी आयुष्याची सार्थकता यांमधील तरतम करू शकला नाही! घर ही अशी जिवाभावाची कल्पना भारतात किंवा थोड्या व्यापकतेने बोलायचे तर आशियात अनुभवायला मिळते. पाश्चिमात्य जगात अथवा आफ्रिका खंडात घराबरोबर असा भाव जोडला गेलेला आढळत नाही. मिनार पिंपळे या समाज कार्यकर्त्याने त्याचा आंतरराष्ट्राीय ‘हॅबिटॅट’ कॉन्फरन्समधील अनुभव सांगितला होता. तो म्हणाला की आमच्या परिषदेत आफ्रिका-अमेरिका खंडांतील लोकांना ‘घरकुल’ ही संकल्पनाच कळेना. आपल्याकडे घर म्हटले की सभोवतीचा निसर्ग, समोरचे अंगण, तुळशी वृंदावन - भले, फ्लॅटमध्ये तुळस डालडाच्या डब्यात रोवलेली असेल, या सा-या गोष्टी घराचा भाग म्हणून येतात, परंतु पाश्चिमात्यांना घर म्हणजे राहण्याची जागा! एक सोडायची आणि दुसरी घ्यायची! आठवणी असतात, पण जीव गुंतत नाही. पिंपळे यांनी पुढे सांगितले की, संकल्पनेच्या पातळीवरच असा फरक असल्याने त्या कॉन्फरन्समध्ये समझोता होऊ शकला नाही व सहा महिन्यांनी पुन्हा भेटायचे ठरले! भारतातही वाडा, घर, बंगला यांची ओढ कमी होऊ लागली आहे. ‘सेकंड होम’चा प्रसार ब-यापैकी झाला आहे, पण तो परवडणा-यांसाठी. त्यात पुन्हा गोम अशी की ‘सेकंड होम’च्यादेखील वसाहती असतात. त्यामुळे तेथे मिळतात ती साच्यात बांधलेली घरे. दहा-पंधरा-वीस गुंठ्यांपासूनचे प्लॉट. तुम्हाला हवे तसे घर बांधा असा नुसता नारा. पण त्या आडजागी जाऊन वेगळ्या पद्धतीने घर बांधणे ग्राहकाला शक्य होत नाही. मग तो त्या विकासकाला सांगतो की, घर बांधून दे. त्याचा साचा तयार असतोच.
एका विकासकाच्या पदरी असलेला आर्किटेक्ट सांगत होता की, आमचा पेशा हा कलेचा आद्य प्रकार मानला जातो. परंतु आमच्या निर्मितीच्या संवेदनेला आव्हान वाटेल असे कामच आता येत नाही. नवीन कल्पनारम्य वास्तू बांधायला कोणी काढतच नाही. आमची कामे मुख्यत: असतात ती पालिकांच्या परवानग्या मिळवण्याची व प्रमाणपत्रे देण्याची. बाकी मोठमोठ्या वसाहतींमधील इमारतींचे नमुने ठरलेलेच असतात. सिमेंट ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपूर्वी आणले आणि घराचा, बांधकामाचा नकाशाच बदलून गेला. बांधकामाच्या पक्केपणाला नवा अर्थ प्राप्त झाला. नागपूरच्या वास्तुतज्ज्ञाने या संबंधात फार मोठे निरीक्षण नोंदवून ठेवले आहे. तो म्हणतो, की माती-चुन्यामधील घरे बांधण्यामधील आनंद वेगळाच होता. ते या नव्या रचनेत शक्य नाही. नव्या निकषांनुसार माती-चुन्याचे घर कच्चे मानले जाते व त्यामुळे त्या बांधकामासाठी बँका कर्ज देत नाहीत. स्वाभाविकच तसे बांधकाम करण्यासाठी गिºहाइके पुढे येत नाहीत. त्या आर्किटेक्टचा त्यापुढील सवाल फार मार्मिक आहे. तो विचारतो की, ब्रिटिशांनी सिमेंट आणले, त्यामुळे सिमेंट काँक्रीटची घरे तयार होऊ लागली. त्यांना पक्की घरे म्हणू लागले, पण त्यांचे आयुष्य तीस वर्षांचे गृहीत धरतात. उलट, आपल्याकडचे वाडे तीनतीनशे वर्षे जुने आहेत, ते कच्चे बांधकाम म्हणायचे का? आणि ताजमहाल? तो कुठे सिमेंट काँक्रीटमध्ये बांधला गेला आहे? तोही कच्चाच समजायचा? बांधकामाचे पक्केपण बाजूलाच राहू द्या.
जगात पक्के, कायम काहीच नाही. ही जाणीवच नवी आहे. ना संकेत, ना मूल्ये, ना जीवनपद्धत... परिवर्तन अथवा बदल हीच फक्त मानवी संस्कृतीमधील कायम टिकून राहिलेली गोष्ट आहे. त्या परिवर्तनाचा गाभा आहे विकासाचा. त्या विकासक्रमात एकेका काळातील एकेक गोष्ट जोडली जाते, संस्कृतीच्या अंगभूत होऊन जाते. पृथ्वीगोलावर गेल्या दोन-पाच हजार वर्षांत स्थानिक संस्कृती विकसित होत गेल्या. पण गेल्या पन्नास वर्षांतील प्रगतीने जग हेच खेडे झाले, म्हणजे ‘स्थानिक’ बनले. त्यामुळे माझे गाव, माझे घर याला फारसा अर्थ उरला नाही. पुण्याची विद्येचे माहेरघर अशी ख्याती एकेकाळी होती, ती भरभक्कम शिक्षणसंस्थांमुळे व त्याहून अधिक तेथील तºहेवाईक व बुद्धिमान व्यक्तींमुळे. इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार काही विचार मनात आला की उठायचे आणि जिमखान्यावर य. न. केळकरांकडे जायचे व तेथे खल करत बसायचे. पुण्यातले सारे विद्वान दीड-दोन किलोमीटरच्या अंतरावर राहायचे. त्याआधारे पुण्याचे वैशिष्ट्य सा-या महाराष्ट्राभर पसरले. अशी काही ना काही खासियत प्रत्येक लहानमोठ्या गावाची असे. त्यामुळे त्या गावाबाबत आकर्षण तयार होई, त्याचा मोह वाटू लागे.
नव्या जमान्यात जशी एक छाप घरे झाली, तशीच एक छाप गावे. त्यात आकर्षण वाटावे असे काही उरले नाही. सगळीकडे सारखा ‘शो’, सारखे ‘ग्लॅमर’. माणूस, वस्तू, जागा काहीही असो, वैशिष्ट्य असेल तरच वेड लागते. जागतिकीकरणात आपले वैशिष्ट्य हरवू नये यासाठी काही करता येईल?

Next Article

Recommended