माझ्या अनुभवातील सगळ्या / माझ्या अनुभवातील सगळ्या बायकांचे गुण आर्चीत -नागराज मंजुळे

May 12,2016 01:24:00 PM IST
मला पूर्वीपासून वाटत आलंय की, हिंदी किंवा मराठी चित्रपटसृष्टीतल्या मुली आणि बायका वीक असतात. निर्बुद्ध असतात, बाहुलीसारख्या येतात, नाचतात. स्लिम ट्रिम असतात, विचित्र कपडे घालतात. त्या जिवंत माणूस वाटत नाहीत. पण ‘सैराट’मधली आर्ची स्ट्राँग आहे, तिच्यात माझ्या अनुभवातल्या सगळ्या बायकांचे गुण मिळून आले आहेत. तरीही मला वाटतं की, तिने आणखी एक पाऊल पुढे जायला हवं.

स्त्री ही फार उन्नत जमात आहे. वीकनेस असला की, मोठ्या आवाजात ओरडायची प्रवृत्ती असते. पुरुष हा वीकनेस लपवायला तारस्वरात बोलत राहिला आहे, अनेक वर्षांपासनं, धर्मग्रंथातनं वगैरे. मला ते आता जास्तच जाणवायला लागलंय. स्वत:च्या चुका दिसू लागल्यात. मी माणूस म्हणून उन्नत होतोय आताआता. मीपण नालायकपणा केलाय खूप, पुरुष म्हणून सवयीने अजूनही कधी होत राहतो. जातीचा जसा गंड असतो तसा पुरुष म्हणूनही असतो. मला आश्चर्य वाटतं, स्त्री प्रदीर्घ काळात, अस्तित्वाची कुठेही दखल घेतली जात नसताना, इच्छांना, स्वप्नांना वाव न मिळताना, नेहमी वस्त्ू म्हणून, पुरुषाच्या हातातलं एक साधन म्हणून जगत राहिली आणि जगवत राहिली.
हे वाटत तर होतंच आधीपासून. मग, फिल्म करतोय म्हणून हे बोलायला पाहिजे असं वाटलं. वाटतं की, स्त्रियांनी कविता करायची झाली तरी किती प्रश्न. कारण ज्या भाषेत व्यक्त व्हायचं ती भाषाच पुरुषांनी बनवलेली आहे. शब्द तिथेच दगा द्यायला लागतात.

आर्ची माझ्या फिल्मची ‘हिरो’ आहे. परशा एक इंटरेस्टिंग मुलगा आहे, सोबर, छान आहे. शांत, समंजस, प्रेमळ मुलगा आहे. असे मुलगे नेहमी दिसत नाहीत भोवताली. कारण त्यांच्यावरही पुरुषत्व लादलं जातं. रडतोस काय बायकांसारखा, वगैरे. सैराटमध्ये शिफ्ट आहे. मुलगी असायला हवी तसा मुलगा आहे, मुलगा हवा तशी मुलगी.

प्रत्यक्ष जीवनात खूप मुली मी इतक्या छान, कष्टाळू, स्ट्राँग, क्षमतांनी परिपूर्ण पाहिल्या आहेत; पण सतत नाकारलं गेल्याने न्यूनगंड येतोच ना. दलित-सवर्ण, हिंदू-मुस्लिम हे वातावरण चिंतेचं आहेच, पण सगळ्यात चिंतेचे आहेत स्त्री-पुरुष वाद. स्त्री जागी झाली तर व्यवस्था उलथून पडेल. नीट होईल. स्वच्छ होईल. सगळी महायुद्धं नालायक पुरुषांनी केली आणि स्त्रीचं नाव घेतलंं. सीतेमुळे रामायण, द्रौपदीमुळे महाभारत, हेलनमुळे ट्राॅय. हा सगळा नालायकपणा पुरुषांनी केला. आज कोणतंही घर असं नाही जिथे स्त्रीचं शोषण नाही. तिथे जातीचा फरक नाही. प्रत्येक घरात शोषित स्त्री आहे. म्हणून स्त्रिया जाग्या व्हायला पाहिजेत. दलित किंवा वंचित जागे होतील तेव्हा होतील. स्त्री अर्धा भाग आहे, तिनं जागं व्हावं, जशी आर्ची जागी झालीय. मला वाटायचं, अशी मुलगी का नाही राव आयुष्यात आपल्या. अार्ची नावाच्या ज्या मुलीच्या मी प्रेमात होतो, ती कधी मला का नाही बोलत काही, असं वाटायचं. मला ही इतकी आवडतेय. तिलाही कळत असेल माझं प्रेम आहे. तिनं बोलावं. व्यवस्था मला नाही बोलू देत काही कारणानं. पण तू किती गप्प बसणार. कदाचित तिच्या मनातही असेल, पण ती ते सांगणार कधी?

हे खतरनाक आहे की, बायकांच्या मनातलं येतच नाही बाहेर. काय त्यांनी दडवलंय आत त्याचा शोध घेतला, ते बाहेर यायला पाहिजे. माझी आई, आत्या, मैत्रिणी... त्यांनी दडवलेला मोठा ऐवज आहे. तो बाहेर आला तर कोणाला सहन नाही होणार. भारतात तर असा ऐवज नक्कीच आहे. स्त्रियांच्या स्वप्नांची स्मशानं कधीतरी उजागर व्हायला हवीत. मला असा अनुभव आलाय की, ज्या मुली सुंदर आहेत, त्या काहीच करत नाहीत. त्यांच्याशी बोलताना १० मिनिटांत कंटाळा येतो. संवाद साधता येत नाही. सौंदर्य असण्यात आहे, दिसण्यात नाही. ज्या साध्या आहेत, त्या कष्ट करतायत, कारण सौंदर्याच्या बाजारात त्यांना स्थान नाही.

आर्ची रुढार्थाने सुंदर नाही, गोरीही नाही; पण ती सशक्त आहे, ती तिचं मन बोलून दाखवते. प्रत्यक्षातल्या मुली, बायका असं बोलायला कधी लागतील, त्याची मी वाट पाहतोय.

नागराज मंजुळे, पुणे
[email protected]
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, ‘सैराट’मधील स्ट्राँग आर्चीचे देखणे फोटो.....
X