आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्‍हाच्‍या कटाविरुद्ध त्वेषाने फुलायचंय...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाळा तालुक्यातला माझा जन्म. करमाळ्यात व जेऊर असा दोन्हीकडे मी वाढलो. करमाळ्यात सातवीपर्यंत, जेऊरला बी. ए. मराठीपर्यंत शिक्षण. आई-वडील, आम्ही चौघं भावंडं. वडील होते तोपर्यंत खडी फोडणे, दगड फोडणे, ठेकेदारी करणे, अशी कामे करायचे. माझा शिक्षणाचा प्रवास तर अडचणीचाच. माझ्या समाजाची वेदना, उपेक्षा वाळवंटातलं जिणं देणारी. अनेकदा शाळेची फी भरण्यासाठी वडिलांजवळ पैसे नसायचे. उधार-उसनवारी व्हायची. सातवी-आठवीच्या काळात तर आम्ही दोघे भाऊ एकमेकांचा गणवेश वापरीत असू. चप्पलसुद्धा आलटून-पालटून वापरीत असू. माझ्या धाकट्या भावाने चौथीनंतर शाळा सोडली; पण वडिलांना आम्ही बाकी भावंडांनी शिकावं, असं वाटायचं. ते वाट्टेल ती कामे करायचे, पण आमच्या शिक्षणात खंड पडू द्यायचे नाहीत. ते घाम गाळायचे, आम्ही शिकायचो. असंच पुढे पुढे जात राहिलो. बी. ए. झाल्यानंतर एम. ए. मराठी पुणे विद्यापीठातून, तर अहमदनगरला मास कम्युनिकेशन केलं. मास कम्युनिकेशन अपघातानेच केलं. सेट-नेट पास होत नव्हतो. त्यामुळे प्राध्यापकी करणे शक्य होत नव्हते. बी.एड.मध्ये वशिलेबाजीचे अनुभव येत होते. एक मित्र अहमदनगर कॉलेजला मास कम्युनिकेशन करून सेट पास होऊन प्राध्यापक म्हणून लागला. नवीनच विभाग असल्याने तो विद्यार्थी शोधत होता. तिथल्या अनेकांना मास कम्युनिकेशन ठाऊक नव्हतं. माझ्या मित्राने मला सांगितलं, तू हे सगळं चांगलं करतोस... मी मास कम्युनिकेशन केलं. माझ्या आयुष्याला वळण मिळालं. मी कधीच हुशार विद्यार्थी नव्हतो, पण कलाकार म्हणून बरा होतो. रामलीला करणं, गोष्टी वाचणं, ऐकणं, सांगणं, हे मला छान जमायचं. मला गणित यायचं नाही, इंग्रजी कच्चं होतं, पण यामुळेच पुढे मी सृजनाचा प्रवास निवडला. खूप सिनेमे पाहायचो, ते पाहताना प्रत्येक दृश्याचा अ‍ॅँगल अभ्यासायचो. कॅमेरा कसा हाताळला गेला असेल, याचा विचार करायचो. पुढे आकलन आणि इच्छाशक्ती या बळावर कॅमेरा हाताळायला लागलो. तसंच दिग्दर्शनाचंही. मीच लिहिलेल्या कथेला, पटकथेला मला माझ्याच नजरेतून पडद्यावर साकारायचं होतं. ते मलाच करता येणार होतं. कुठलाही सरधोपट नियम वा तंत्र मला त्यासाठी वापरायचं नव्हतं. माझं संचित मीच पडद्यावर साकारू शकतो, मग मलाच दिग्दर्शन करायला हवं. माझीच गोष्ट होती, ती कशी सांगायची हा माझा चॉइस होता, जो मी दिग्दर्शनातून तडीस नेला. मला वाटतं, मनात इच्छा-आकांक्षांची धुगधुग असली की काहीही करता येतं. आज दुर्दैवाने माझं सृजनातलं यश पाहायला शिकण्याचं बळ देणारे माझे वडील नाहीत...
उसने अनुभव घेऊन काही लिहावं, असं मला कधीच वाटलं नाही. कविता करताना मला माझ्याच जगण्याच्या त-हा, अवतीभोवतीची माझी माणसं, शब्दांमध्ये मांडणं जमायला लागलं. आधी मी रोजनिशी लिहायचो. व्यक्त होणं ही माझी गरज आहे. लोकांनी वाचलं, नाही वाचलं, यापेक्षा अभिव्यक्ती महत्त्वाची! ही अभिव्यक्तीच मला जगण्याचं बळ देत होती. गालिब, मर्ढेकर, कुसुमाग्रज, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर, दुष्यंतकुमार यांसारखे कवी माझे आवडते. ढसाळांचं बंडखोर लिखाण जसं आवडतं तसं गालिबचं अंतर्मुख करणारं लिखाण मनाला भावतं. मी त्यांना माझ्याशी रिलेट करतो. लहानपणापासून मिळतील ती पुस्तके वाचत राहिलो, माझ्याबरोबर माझ्या वडलांची तळमळ मनात साठवत राहिलो, कविता आपोआप मनात मुरत गेली. या कवींच्या कविता आवडतात म्हणून मला माझ्या कवितेत त्यांचं अनुकरण करायचं नव्हतं. कारण शेवटी पुन्हा हेच की माझ्याकडे माझंच सांगायला, मांडायला बरंच काही होतं. दत्ता हलसगीकर, नागनाथ कोत्तापल्ले यांसारख्या दिग्गजांनी कौतुक करून माझ्या कवितेला प्रोत्साहन दिलं.

मला माझी कविता हवी होती, ज्यात उन्हातान्हात रापलेलं माझं जगणं, मला मांडता येणार होतं. उपेक्षितांच्या गर्दीतून या अभिव्यक्तीमुळेच मी तरून वर आलो. ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ हा कवितासंग्रह याच ऊर्मीतून तयार झाला.
मनासारखं कवितेतून हवं तसं छंदांना, अलंकारांना छेदून लिहिताना मला जे मोकळं झाल्याचं समाधान मिळायचं, ते क्वचितच एरवी मिळालं असेल.
कविता करताना कळत्या वयात येताना स्पृश्यास्पृश्यतेविषयी, उपेक्षेविषयी, हीनतेविषयी पडणा-या अनेक प्रश्नांची न मिळालेली उत्तरे शोधायचा प्रयत्न केला. हळूहळू मी वाचायला लागलो, तसं कळत गेलं. भटक्या-विमुक्तांमधली चोरी करणारी जमात जगण्यासाठी चोरी करते, चोरीसाठी चोरी करत नाहीत. कारण त्यांना जगण्याचा दुसरा पर्यायच आपण उपलब्ध करून दिला नाही. अजूनही या समाजाचे शोषण चालू आहे, यातच चोरीचे कारण लपलेले आहे. आजही जात आपल्या डोक्यात पक्की आहे. माझी कविता ललित नाही. कवितेत विद्रोह आहे, राग आहे, ठसठसते प्रश्न आहेत.
‘या अनैतिक संस्कृतीत
नैतिक होण्याच्या हट्टापायी
का देते आहेस
एका आभाळना-या
मनस्वी विस्ताराला मूठमाती’
असा प्रश्न म्हणूनच विचारावासा वाटतो. कवितांमध्ये मी उगाचच आलंकारिकता, प्रतिमा वापरली नाही. जे काही आहे, ते थेट व्यक्त करायचं म्हणूनच माझ्या कवितेत उसने अवसान नाही. माझ्या मनात दलित आणि सवर्ण अशी विभागणी नाही, प्रवृत्तींविरुद्धचा माझा लढा आहे. माझी वृत्ती ईश्वरशरण नाही. शिवाय माझा नशिबावर विश्वास नाही. परंपरेला मी वाईट म्हणत नाही; त्यातल्या चुकीच्या, कालबाह्य बाबींना मी अयोग्य मानतो. अजूनही माझा समाज फारसा स्थिरावलेला नाही. माझ्या वडलांना माझ्या शिक्षणाची काळजी होती. त्यांना शिक्षण म्हणजे काय कळायचं नाही, पण ते नुसतं ‘शीक’ म्हणायचे. त्यांनी कुठलीही बुकं वाचली नव्हती; पण मी वाचावी असं त्यांना वाटायचं. आपलं हलाखीचं जगणं मुलांच्या वाट्याला येऊ नये, हा त्यांचा सततचा प्रयत्न असायचा. त्यांना मी कविता लिहितो, हे आवडायचं. मात्र आमच्या समाजातल्या सगळ्याच लोकांना शिक्षणाची आस्था नाही. या आस्थेच्या अभावामुळेही माझा समाज मुख्य प्रवाहापासून दूर आहे, याचं मला नेहमीच वाईट वाटत आलं आहे. सदोदित रणरणत्या उन्हाचे चटके बसलेल्या या समाजाने शिक्षणासाठी, मुख्य प्रवाहात येण्यासाठी बंड करावं, उपेक्षा झुगारावी, असं खूपदा वाटतं. माझ्यासारखा एखादा वर येतो, पण सगळेच नाही येऊ शकत. म्हणूनच तितकाच थेट प्रश्न कवितेतून करावासा वाटतो,
का तू
उन्हाच्या कटाविरुद्ध
गुलमोहरासारखं
त्वेषाने फुलत नाही?