आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nalini Article About Homosexuality, Divya Marathi

आम्ही दोघी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा जन्म मुंबईचा. घरी माझा लहान भाऊ, आई, वडील, मी आणि आजी (खरं तर ती वडलांची मावशी होती. आम्ही तिला आजी म्हणायचो.) अशी एकूण पाच जणांची फॅमिली. भाऊ दोन वर्र्षांनी लहान. घरचे वातावरण थोडे ऑर्थोडॉक्स पद्धतीचे. भाऊ लहानपणी कमी बोलायचा, पण त्याचा बाहेर खूप मोठा मित्रवर्ग होता. मला मात्र लहानपणी एक-दोनच मित्रमैत्रिणी होत्या. शाळेत माझी एक जवळची मैत्रीण होती- योगिता. ती अजूनही माझी जवळची मैत्रीण आहे. (जवळची असली तरी तिला माझ्याबद्दल माहीत नाही, की मी लेस्बियन आहे.) मला कोणाबरोबर मिक्स व्हायला आवडायचे नाही. अगदी कॉलेजपर्यंत माझा खूप छोटा ग्रुप होता. पण, लहानपणापासून वाचनाची मला खूप आवड होती. दहावीच्या आसपास विद्या बाळ, रझिया आणि आता कविता महाजन, सुमेध वडावाला, सानिया यांचे स्त्री मुक्ती संदर्भात लिहिलेले लिखाण वाचताना वाटायचे, की आपण पण असे व्हायला पाहिजे. लग्नाच्या बाबतीत, जोडप्यांनी एकमेकांना समान मानायला पाहिजे. दोघांना समान वागणूक मिळाली पाहिजे.

दहावी झाल्यावर, मला ड्रॉर्इंगसंबंधित कोणतातरी कोर्स करायचा होता. म्हणून मग मी ‘कमर्शियल आर्ट’ करायचे ठरवले. ‘रहेजा’ला प्रवेश मिळाला. मी ‘रहेजा’ला जाऊ लागल्यावर एका आठवड्याने सपनाने प्रवेश घेतला. सपनाचे माझ्याकडे कधी लक्ष गेले मला माहीत नाही; पण मला आठवते, की आम्ही त्याच वर्षी मनोरीला सहलीला गेलो होतो. तेव्हापासून या नात्याला रूप यायला लागले. मनोरीला पाऊस चालू होता. सर्व जण पावसात खेळत होते. आम्ही दोघी शेजारी बसून कोणीतरी आणलेला व्हिडिओ गेम खेळत होतो. त्या वेळेपासून आमचा ग्रुप आम्हाला चिडवायला लागला, की ‘आले हे नवरा-बायको!’ मला वाटते, तिथे मला तिच्याबद्दल काहीतरी वाटतंय, याचा अर्थ कळायची सुरुवात झाली.

पूर्ण अर्थ समजायला दोन वर्षे लागली. आमची मैत्री वाढत गेली. मला कळू लागले होते, की हे नाते मैत्रीपलीकडे आहे; पण नक्की काय, हे कळले नव्हते. तिला सोडून कोणत्याही मुलामुलींवर माझे लक्ष गेले नाही. तिसर्‍या वर्षी मी घरच्यांबरोबर सुटीत कोकणात आमच्या मूळ गावी गेले. सोबत सपनाही होती. गावी गेल्यावर एक दिवस आई काहीतरी कारणावरून म्हणाली, ‘ती बघ कशी शहाण्यासारखी वागते, नाहीतर तू.’ आणि चिडून मला चापट मारली. ते मला खूप लागले. मी रडायला आले, कारण आईने तिच्यासमोर मला मारले. त्या वेळी तिने मला जवळ घेतले. त्या वेळीही मला कळत नव्हते, की ही मला जवळ का घेते? मग मी तिला पत्र लिहिले. लिहिता लिहिता माझे मला क्लिअर होत गेले, की ती मला खूप आवडते. माझ्या आयुषात तिचे विशेष स्थान आहे. मी तिच्या प्रेमात आहे आणि तिला सोडून दुसर्‍या कोणाशीही लग्न करायचा मी विचारही करू शकत नाही. तिला ते पत्र दिले. तिने ते वाचले. तिला हे नाते क्लिअर होते आणि तिला हेच ऐकायचे होते. साहजिकच तिला खूप आनंद झाला.

कॉलेज संपल्यावर घरच्यांची चर्चा सुरू झाली, की आता हिचे लग्न लावायचे. त्या वेळी मी काहीही बोलायची नाही, पण हे पक्के होते, की मी लग्न करणार नाही. मी ऐकत नाही, हे बघितल्यावर आई मला म्हणाली, ‘लग्न कर, नाहीतर एक तू तरी या घरात राहा, नाहीतर मी या घरात राहते. दोघींपैकी एकच जण इथे राहील.’ अखेरीस आईने माझा नाद सोडला आणि आधी भावाचे लग्न लावून दिले.
ग्रॅज्युएशन झाल्यावर ‘फ्री लान्सिंग’ करू लागले. आतासुद्धा ‘फ्री-लान्सर’ म्हणूनच काम करते. आर्थिकदृष्ट्या मी स्वतंत्र आहे. घरावर विसंबून नाही; पण एवढी मिळकत नाही, की स्वत:ची खोली घेऊन आम्ही दोघी राहू. या प्रवासात आमची भांडणे झाली, पण एकमेकांना सोडायचा विचार मनातही कधी आला नाही. आम्ही दोघी गेली अठरा वर्षे एकत्र आहोत. भांडणे झाली, पण एक दुसर्‍याला सोडून द्यायचा विचार कधीही आला नाही. आता आम्हाला आधार देणार्‍या लेस्बियन मैत्रिणी आहेत. हळूहळू मी इंटरनेट वापरायला शिकले. ‘फेसबुक’वर आले. मग मला कळले, की आपली कम्युनिटी आहे. आधार गट आहेत. या दरम्यान मंगला गोडबोले यांचे ‘हे दु:ख कोणा जन्माचे’ हे पुस्तक माझ्या वाचनात आले. त्यातून मला खूप आधार मिळाला. मुख्य म्हणजे, मानसिक कुतरओढ संपली आहे. हे झालेय ते याच माझ्या मित्रमैत्रिणींमुळे. या मराठी साइट्सवर इतर अनेक चर्चेच्या विषयांव्यतिरिक्त समलैगिंकता या विषयावरही मनमोकळ्या चर्चा गेल्या दोन-तीन वर्षांत होऊ लागल्या आहेत. खूप सकारात्मक चर्चा-प्रतिसाद वाचायला मिळाले.

या विषयावरचे ‘पार्टनर’ (लेखक-बिंदुमाधव खिरे) या पुस्तकाचे परीक्षण वाचायला मिळाले. त्यावर झालेल्या चर्चेत चक्क माझ्या ‘स्ट्रेट’ मित्रमैत्रिणींकडूनच समलैंगिकतेवरच्या मराठी साहित्यातल्या इतर पुस्तकांचे संदर्भ मिळाले. माझे मित्रमैत्रिणी दुरावतील, ही भीती बरीचशी निरर्थक आहे, असे वाटू लागलंय.

जीवनाच्या या वळणावर मागे वळून पाहता, मी निवडलेल्या जोडीदाराची मला पुरेपूर साथ मिळाली... मिळते आहे... सुखातही आणि दु:खातही. भले या टप्प्यावर आम्ही लौकिकार्थाने एकत्र राहात नसू; पण माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मी, हे पक्के आहे. आणि त्याइतके दुसरे वैभव नाही. जे सर्वसामान्य जोडप्यात असते ते... प्रेम, जिव्हाळा, कधी भांडण, कधी अबोला... हे सर्व आमच्यात आहे; तरीही या नात्याचा उत्सव मात्र आमच्यासाठी नाही. कारण ही लैगिक ओळख अजून तरी समाजमान्य नाही. स्वत:च्या अस्तित्वाची ओळख अशी लपवून जगावे लागणे, तेही आप्तस्वकीयांपासून, यासारखी अत्यंत क्लेशदायक गोष्ट नाही. ती एक प्रकारची घुसमटच आहे. मला आताशा असे वाटू लागलेय, की हे लपवणे म्हणजे प्रतारणा आहे... माझी माझ्याशी आणि जे माझे स्वकीय आहेत त्यांच्याशीही. हे आता थांबवावे, सांगून टाकावे सगळे. जे माझे खरे स्वकीय आहेत, ते मला माझ्या या ओळखीसह नक्कीच स्वीकारतील. हे समजल्यावर जे भविष्यात सोबत नसतील, ते मला अनोळखी होते आणि अनोळखीच राहतील, असे समजेन!