आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधनातही मुलींकडे दुर्लक्षच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटिझम ही स्थिती प्रामुख्याने वर्तणुकीशी संबंधित आहे. यात मुलं समाजापासून तुटलेली राहतात. परंतु, मुली मुलग्यांपेक्षा अधिक सोशल असल्याने त्यांच्यातील लक्षणे लपून राहतात, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे. काही वेळा तर मुलींमध्ये ऑटिझमचे निदानच होत नाही, असे निरीक्षणदेखील नोंदवले गेले आहे.
भारत असो किंवा सारं जग, आपल्या दैनंदिन आयुष्याची रचना ही पुरुषांच्या दृष्टीनेच बनवली गेली आहे. या परिस्थितीत बदल होत असले तरी अनेक क्षेत्रं अशी आहेत, जिथे आता कुठे स्त्रियांच्या दृष्टीने झुंजुमुंजू होऊ लागलं आहे. मानसशास्त्राचं क्षेत्रदेखील याला अपवाद नाही. गेल्या दोन लेखांमधून मुलींमधील ऑटिझमवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल्यावर, जगभरात याबाबत काय परिस्थिती आहे, हे जाणून घेण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली. या उत्सुकतेपोटी प्रवेश केला माहितीच्या महाजालात, इंटरनेटमध्ये. ऑटिझमबाबतच्या संशोधनात आजवर मुलींना ग्राह्यच धरलं गेलं नसल्याचं शोधप्रक्रियेदरम्यान निदर्शनास आलं. ऑटिझमचं प्रमाण मुलग्यांमध्ये जास्त असतं, या कारणास्तव आजवर झालेल्या संशोधनांमध्ये केवळ मुलगेच ‘सब्जेक्ट’ म्हणून वापरले गेले आहेत. त्यामुळे मुलींच्या गरजांनुरूप संशोधन व त्यावरील उपचार याबाबत कोणीच कधीच विचार केलेला नाही. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. परंतु, ही जागरुकता नुकतीच निर्माण होऊ लागल्याने ठोस असे काही उपलब्ध नाही.

अर्थात हे सारं अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांत आता कुठे येऊ घातलं आहे. भारतात तर याचा फारसा गंधही नाही अजून. आपल्याकडे आपण आता कुठे मानसशास्त्राकडे योग्य दृष्टीने बघू लागलो आहोत. नाहीतर मानसोपचारतज्ज्ञ म्हणजे वेड्यांचे डॉक्टर, हीच ओळख आपल्याकडे रुजली होती. आता यात बदल होऊ लागल्याचे दिसते. त्यात ऑटिझमसारखा प्रकार समजणे तर फारच अवघड. या अभ्यासादरम्यान अनेक ठिकाणी शोध घेऊनदेखील मोठ्या वयाच्या ऑटिस्टिक स्त्रिया भेटू शकल्या नाहीत. त्यामुळे कितीतरी महिला उपचारांपासून वंचित असल्याचेच हे द्योतक आहे, असे वाटते.

ऑटिझम या स्थितीबद्दल जितकं जाणून घेऊ तितकं कमीच आहे. त्यामुळे याकडे स्त्री-पुरुष अशा दृष्टीने बघणं तर खूपच दूरची गोष्ट आहे, असं मत ब्रिटिश डाॅक्टर ज्युडिथ गोल्ड यांनी नोंदवलं आहे.

ऑटिझम ही मानसिक स्थिती प्रामुख्याने वर्तणुकीशी संबंधित आहे. यात मुलं समाजापासून तुटलेली राहतात. परंतु, मुली मुलग्यांपेक्षा अधिक सोशल असल्याने त्यांच्यातील लक्षणे लपून राहतात, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे. काही वेळा तर मुलींमध्ये ऑटिझमचे निदानच होत नाही, असेही एक निरीक्षण आहे. नुकतेच २०११मध्ये गोल्ड आणि अॅश्टन स्मिथ यांनी असे सांगितले की, ऑटिझमची लक्षणे मुलग्यांपेक्षा मुलींमध्ये वेगळी असू शकतात. त्यामुळे मुलींची तपासणी करताना त्यांना योग्य असे परिमाण वापरले गेले पाहिजे. नाहीतर अनेक मुली आजवर निदानापासून वंचित राहिल्या आहेत व यापुढेदेखील अशाच राहतील.
मुलांचीच परिमाणे आजवर मुलींना वापरली गेल्यामुळे, मुलींमधील वेगळी लक्षणे दुर्लक्षित राहतात, असे या विविध अभ्यासांती निष्कर्षास येत आहे. त्यामुळे आता ऑटिझमवरील अभ्यासांमध्ये मुलींचा समावेश असेल, हे पाहिले जाऊ लागले आहे. परदेशात तर फंडिग एजन्सीसुद्धा मुलींवरील अभ्यासासाठी खास अनुदान देऊ लागल्या आहेत. परंतु, या साऱ्याला नुकतीच सुरुवात झाली असल्याने मुलींमधील ऑटिझमबाबत निष्कर्ष किंवा वेगळेपण म्हणजे नक्की काय, असा खास अभ्यास कुठेही मिळाला नाही. काही छोट्या अभ्यासात निष्कर्ष काढण्यात आले आहेत, परंतु ते गोंधळात टाकणारे वाटल्याने येथे सांगत नाही.

भारतात ऑटिझम या विषयावर संशोधन झाले आहे, होत आहे; पण मुलींबाबत खास असे प्रयत्न झालेले नाहीत. बंगलोरस्थित मानसोपचारतज्ज्ञ डॉ. के. जॉन विजय सागर म्हणतात, भारतीय संशोधकांनी ऑटिझम असलेल्या मुलींवर संशोधन केलेले नाही. त्यामुळे मुलींची विशेष लक्षणे, निदान, उपचार यावर माहिती उपलब्ध नाही. आजवर जे साहित्य उपलब्ध आहे त्यात मुलींकडे फारच तुटपुंजे लक्ष दिले गेले आहे. परदेशातदेखील गेल्या काही वर्षांपासूनच या विषयावर लक्ष दिले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संशोधनात्मक अभ्यासाची नितांत गरज आहे. अशी चांगली सुरुवात उशिराने का होईना, झाली आहे. येत्या काही वर्षांत अभ्यासकांच्या हाती काही ठोस निष्कर्ष लागतील व वंचित मुलींना वेळेत आणि योग्य उपचार मिळतील, अशी अपेक्षा नक्की व्यक्त करावीशी वाटते.
ऑटिझम संशोधनातील ‘जेंडर गॅप’
- हॅन्स अॅस्पर्गर या संशोधकाने १९४४मध्ये असे मत नोंदवले होते की, मुली व स्त्रियांना ऑटिझम होत नाही. परंतु, नंतर समोर आलेल्या निरीक्षणांमुळे त्याला आपले हे मत मागे घ्यावे लागले.
- १९४३मध्ये लिओ कन्नेर या संशोधकाने एका छोट्या गटावर संशोधन केले. यात मुलग्यांची संख्या मुलींपेक्षा चौपट होती.
- १९९३मध्ये स्वीडनमध्ये एहलर व गिलबर्ग यांंनी मुलगे व मुलींमधील ऑटिझमचे प्रमाण ४:१ असते, असे निदान केले.
- २०१५मधील एका अभ्यासात हे प्रमाण आधी ३:१ होतं, असा निष्कर्ष काढला गेला. यानंतर ते अंदाजे ५:१ असे आढळून आले.

namitadeshpande@gmail.com
बातम्या आणखी आहेत...