आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Namrata Bhingarde, Magazine, Rasik, Samrudha Gharaneshai

समृद्ध घराणेशाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संगीत क्षेत्रात ‘घराणे’शाहीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रीय गायकी असो किंवा वादन, अमूक एका घराण्यातल्या कलाकाराला कलावर्तुळात विशिष्ट स्थान असते. मात्र लावणीसोबत जोडल्याने ढोलकीच्या वाट्याला नेहमीच अवहेलना येत असतानाही दोन घराणी जन्माला आली... ती म्हणजे, घोटकर घराणे आणि चव्हाण घराणे!
टाण टाण टाण... ढोलकीच्या पहिल्याच तोड्याने हळूहळू पडदा बाजूला सरकतो आणि ढोलकीवर नजाकतीने पडलेल्या हाताला प्रेक्षक टाळ्या आणि शिट्यांची सलामी देतात. 75 वर्षांच्या वृद्ध ढोलकीपटूचा हात चाटीवर अशा शिताफीने पडतो की ऐकणा प्रत्येकाचे पाय आपोआप ठेका धरायला लागतात. पहिला मुखडा वाजवून ते हात थांबतात आणि त्यांच्याच शेजारी बसलेल्या पोरसवदा वयाच्या ढोलकीपटूचा हात सरसावतो. वयाच्या मानाने हा बेटा ढोलकीला चांगलेच कोळून प्यायला आहे, हे एव्हाना रसिकांच्या लक्षात येते आणि टाळ्यांचा एकच कडकडाट होतो. वृद्ध ढोलकीपटू जुने जुने तोडे वाजवू लागतात आणि जराही न डगमगता तो तरुण नव्या तोड्यांनी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा फडशा पाडत असतो. शिट्या, टाळ्या, उडवले जाणारे फेटे आणि ठेका धरणारे पाय यांच्या जल्लोषात अनुभव आणि नावीन्य यांच्यातली ही ऐतिहासिक जुगलबंदी करणारी गुरु-शिष्याची आणि बाप-लेकाची जोडी म्हणजे पांडुरंग घोटकर आणि कृष्णा मुसळे. ‘वाह! बाप से बेटा सवाई’ अशीच प्रतिक्रिया त्या दिवशी सर्व प्रेक्षकांच्या तोंडून बाहेर पडते.
‘लावणी गायिका’ म्हणून नुकत्याच नावारूपाला आलेल्या सुलोचनाबाई चव्हाण नवी लोकप्रिय लावणी गात होत्या. एरवी तोंडात पानाचा विडा घेतलेल्या, डोक्यावरून पदर घेतलेल्या, खड्या आवाजात लयबद्ध हरकती घेणा सुलोचनाबार्इंवरून नजर हटत नाही. मात्र आज एका बाजूला बसलेल्या 13-14 वर्षांच्या पोराच्या ढोलकीवादनातली जादू प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत होती. सुलोचनाबार्इंच्या प्रत्येक हरकतीबरोबर बारीकसारीक तपशिलांसह ढोलकीला बोलते करणा त्या मुलाचे नाव होते विजय चव्हाण. एकमेकांच्या कलेची पुरती जाण असलेली ही मायलेकराची जोडी पुढे अनेक कार्यक्रमांतून दिसू लागली. ‘चव्हाण’ घराण्यात गाता गळा आणि ढोलकीच्या रूपाने जादुई बोटे असे नवेच घराणे जन्म घेत होते.
कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय शिक्षण न घेतलेली, परंतु कलेवर निष्ठा असलेली ही दोन घराणी. भारतीय संगीत क्षेत्रात ‘घराणे’शाहीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रीय गायकी असो किंवा वादन, अमूक एका घराण्यातल्या कलाकाराला कलावर्तुळात विशिष्ट स्थान असते.
लावणीसोबत जोडल्याने ढोलकीच्या वाट्याला नेहमीच अवहेलना आली. मी काही उस्ताद अल्लारखाँ नाही की तू झाकीर हुसेन नाहीस, पण ढोलकीला ‘घराणे’ देण्याचे भाग्य मात्र माझ्या आणि तुझ्या भाळी लिहिले आहे. तेव्हा ढोलकी हे वाद्य प्रतिष्ठित वाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसेल अशीच कामगिरी कर. त्या दिवशी ‘तयार’ झालेल्या आपल्या लेकराला पांडुरंग घोटकर यांनी गुरुमंत्र दिला आणि इथून सुरू झाले ढोलकीवादनातले ‘घोटकर’ घराणे. महाराष्ट्राच्या गावखेड्यात पोटासाठी कला आणि कलेवर पोट अशा समाजातून ‘फीनिक्स’ भरारी घेत गोंधळी समाजातल्या पांडुरंग घोटकर यांच्या ढोलकीचा नाद तमाशाच्या फडापासून ते सिनेसृष्टीपर्यंत सगळीकडे घुमला. तर अपघाताने लावणी गायकीकडे वळलेल्या सुलोचनाबाई चव्हाण यांच्या आवाजाने लावणीला नवा साज चढला. ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या गाण्यात अप्रतिम ढोलकीच्या ठेक्यावर नाचवून रेखालाही दमवले त्याच पांडुरंग घोटकर यांनी लक्ष्मीबाई कौलापूरकर, मधू कांबीकर, छाया माया खुटेगावकर, रेश्मा परितेकर अशा पट्टीच्या नृत्यांगनांनाही पारंगत केले. पांडुरंग घोटकर आणि सुलोचनाबाई चव्हाण ‘लावणी’ परंपरेतून आलेली ही दोन्ही गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वे. महाराष्ट्रातल्या दोन घराण्यांचे उगमस्थान. असे म्हणतात, की मोठ्या वृक्षाच्या छायेत लहान रोपटे तग धरू शकत नाही. मात्र पांडुरंग घोटकर आणि सुलोचनाबाई चव्हाण हे मोठाले वृक्ष होते म्हणूनच आम्ही ‘मोठे’ झालो, ही जाणीव कृष्णा मुसळे आणि विजय चव्हाण यांच्या बोलण्यातून जाणवत असते.
‘विजू आमचा वेगळीच ढोलकी वाजवतो. त्याचे ढोलकीचे कौशल्य त्यानेच धडपड करत मिळवले आहे’, असे सांगणा सुलोचनाबाईंच्या डोळ्यांत विजय चव्हाणांविषयीचे कौतुक दाटून येते. सुलोचनाबाई लावणी गातात तेव्हा अतिशय ठेहरावसह आणि प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारत गात असतात. त्यामुळे एकाच वेळी त्यांच्या ओठांच्या हालचाली टिपत ढोलकीची साथ देणा विजय चव्हाण यांच्या कौशल्याचे कौतुक तुम्ही आम्ही काय करणार? त्याचप्रमाणे लहानपणापासून बाबांच्या मांडीला मांडी लावून तमाशाचे प्रयोग करणारे कृष्णा मुसळे हे तर लाइव्ह परफॉर्मन्सचे उस्ताद! ‘संगीतबारी’सारख्या कलेच्या फॅक्टरीत तयार झालेले कृष्णा मुसळे हे तर एकाच वेळी गाणा बाईच्या ओठांकडे आणि नृत्यांगनेच्या पावलांकडे लक्ष ठेवून अचूक ताल धरतात. नाचता नाचता बाईने उडी मारली की त्याच्यासोबतच ढोलकीवरही उडता ठेका वाजतो. विशेष म्हणजे, हे सगळे कोरिओग्राफ नसते. रंगमंचावरील देवाणघेवाणीतूनच ढोलकीचा हा ‘बार’ तयार होतो. परंपरेने हाती दिलेले संबळ वाद्य सोडून ढोलकीच्या शाईने नशीब लिहिलेले वडील पांडुरंग घोटकर आणि कोल्हाटी समाजातली फडावर गाणारी आई आशाबाई मुसळे यांच्या कलासक्त आयुष्यावर पोसलेला पिंड म्हणून कृष्णा मुसळे यांच्यावर ‘वेगळे’ संस्कार करण्याची पाळी आलीच नाही. ‘बाबांच्या ढोलकीची ख्याती इतकी की लक्ष्मीकांत-प्यारेलालसारखे संगीतकार सणसवाडीपर्यंत बाबांसाठी निरोप पाठवायचे. मुंबईतले आमचे तमाशाचे थिएटर बंद पडण्याच्या अवस्थेत असतानाच संगीतबारीत परत न जाता वेगळे काहीतरी करण्याची इच्छा होती. लहानपणापासून बाबांचे निरीक्षण करत शिकलो, तरी ढोलकीचे बोल स्वत: लिहिले आणि रात्रंदिवस संगीताच्या भाषेचा अभ्यास केला.’ कृष्णा मुसळे जुन्या आठवणात हरवले.
विजय चव्हाण आणि कृष्णा मुसळे. दोघेही ढोलकीवादक, मात्र प्रत्येकाच्या ढोलकीचा बाज वेगळा. एक सतत नावीन्याच्या शोधात, तर दुसरा पारंपरिकतेचा उपासक. एक कोल्हापूरचा रांगडा गडी, तर दुसरा बीडच्या आणि सणसवाडीच्या वातावरणातील शालीनतेचा, लाज-बुज स्वभावाचा. दोघांमध्ये इतके फरक असले तरी बरेचसे साम्यही आहे. ढोलकीविषयी प्रचंड आत्मीयता आणि आत्मविश्वास हा दोघांनाही जोडणारा दुवा. परंपरेची कास धरून संगीत क्षेत्रात होणा उलथापालथींवर दोघांचेही बारीक लक्ष असते. म्हणूनच विजय चव्हाण अनेक वाद्यांसोबत ढोलकीच्या फ्यूजनचे प्रयोग तर करतातच, शिवाय तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासोबत जुगलबंदीही सादर करतात. दुसरीकडे कृष्णा मुसळे यांच्या वादनातील चमत्कार ओळखून आशा भोसले यांनी स्वत:हून त्यांना वाद्यवृंदात सामील केले. मेहनत करण्याची प्रचंड ताकद असलेले, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले हे दोन्ही ढोलकीपटू तितकेच नम्र आणि साध्या राहणीचे आहेत. दोघांच्याही घरातल्या एकाही भिंतीवर ट्रॉफीजचे जाळे नाही की दिखाव्यासाठी सेलिब्रिटीजबरोबर फोटो नाही. दोघांचीही पाठ अभिमानाने आणि कौतुकाने झाकीर हुसेन यांनी थोपटली आहे, हेच त्यांच्यासाठी इनाम.
‘सारेगमप’सारख्या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रकाशात आलेले कृष्णा मुसळे यांची ढोलकी आणि अनेक कार्यक्रम गाजवणारी विजय चव्हाण यांची ढोलकी एकत्र ऐकण्याचा सुवर्णमध्य गाठला तो ‘नटरंग’ चित्रपटाने. ‘नटरंग’मधील ढोलकीने अवघ्या महाराष्ट्राला नाचवले, परंतु तालाची जादू करणारी ढोलकीवरील ही बोटे कायम प्रसिद्धिपराङ्मुख राहिली. रिअ‍ॅलिटी शोजमुळे तसेच अनेक कार्यक्रमांमधील लाइव्ह परफॉर्मन्समुळे हे दोन्ही चेहरे प्रकाशात आले खरे, मात्र टेलिव्हिजन स्क्रीनवर गाणा गायिकेला एक्स्प्रेशन्स देत वाजवणारे ढोलकीवादकच या ‘गॅलरी गेम’मुळे सतत प्रकाशझोतात राहिले. त्याच वेळी खरे वादक मात्र केवळ कला सादर करून मिळणा आनंदात डुंबण्यात धन्यता मानत होते.
ढोलकी म्हणजे केवळ लावणीतली, असा (गैर)समज महाराष्ट्रात पसरलेला आहे. मात्र घर आया मेरा परदेसी, तेजाब यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तसेच अनेक शास्त्रीय संगीतातही ढोलकीच्या ठेक्याची कमाल दिसली आहे. केवळ लावणीच्या सुरुवातीचा कडक तुकडा वाजतो तीच ढोलकी, हे चित्र बदलण्याचा प्रयत्न ही नवी घराणी करताना दिसतात. ढोलकी शिकण्यासाठी कोणतेही शास्त्र उपलब्ध नाही. मुळात ढोलकीचे ‘बोल’ आपणहून तयार करण्यासाठी पांडुरंग घोटकर, कृष्णा मुसळे आणि विजय चव्हाण या तिघांनाही आधी तबला शिकावा लागला. मात्र बदलत्या काळानुसार ढोलकीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या दोघांनीही कंबर कसली आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या माध्यमातून कृष्णा मुसळे आणि विजय चव्हाण ढोलकीचे धडे गिरवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. तालवाद्यात कुणी काही नवे प्रयोग करत असेल तर हे दोघे आवर्जून त्याला उपस्थित राहतात. भक्तिसंगीतात, लोकसंगीतात तसेच आता वेस्टर्न म्युझिकमध्येही छाप उमटवणा ढोलकीचे शिलेदार म्हणून आता ‘घोटकर’ आणि ‘चव्हाण’ घराणे यांचा उल्लेख केला जाईल. ढोलकीप्रमाणे तबला हेदेखील साथसंगत करण्याचे वाद्य. मात्र अनेक उस्तादांमुळे आज तबला सोलोच्या ऑ डिओ सीडीजना मागणी असते. तसेच लाइव्ह कार्यक्रमांना गर्दी असते. परंतु आजपर्यंत ढोलकीचा सोलो कार्यक्रम झाल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा हा ढोलकीचा ठेकाही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. विजय चव्हाण आणि कृष्णा मुसळे हे त्याच प्रवाहातील दोन प्रमुख नेतृत्व होऊ शकतात, हे मात्र नक्की!