आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलातली ‘तिसरी घंटा’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आता कुठे जाशील माझ्या तावडीतून? हा हा हा... तुझे हे तारुण्य आज माझ्या मालकीचे आहे.’ (आर्त किंकाळी देत) ‘वाचवा... कुणी तरी वाचवा मला.’ (लालसी हसत) ‘किंचाळ... हवे तितके किंचाळ, इथे कोणी नाही तुला वाचवायला.’ खलनायकाचे दुष्ट हात नायिकेची साडी फेडण्यासाठी पुढे येऊ लागतात. तिच्या स्त्रीत्वावर, तिच्या आत्मसन्मानावर हल्ला होणार; एवढ्यात कुठूनसा नायक येतो आणि त्या दुष्ट खलनायकाच्या पोटात चाकू खुपसतो... कडकडून टाळ्यांच्या प्रतिसादात आवाज उमटत राहतो, ‘वन्समोअर! वन्समोअर!!

रंगमंचावर चाललेला हा प्रसंग प्रेक्षकांना इतका आवडतो की, रंगमंचावरच्या कलावंतांना चाकू खुपसण्याचा प्रसंग पुन्हा घ्यावा लागतो. मग थोड्या वेळापूर्वी चाकू खुपसून प्रसंगापुरता मरण पावलेला खलनायक आणि आकांत मांडणारी नायिका पुन्हा मनापासून तोच प्रसंग उभा करण्यासाठी सज्ज होतात. पार्श्वसंगीताची रिळे पुन्हा उलटी फिरतात आणि संवादांना सुरुवात होते. ‘आता कुठे जाशील माझ्या तावडीतून? हा हा हा...’

कोणतीही कला प्रेक्षकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शहरी भागांत नाटक किंवा सिनेमा सुरू असताना प्रेक्षक हातचे राखून नाराजी व्यक्त करतात वा दाद देतात. मात्र, रंगलेल्या नाटकात व्यत्यय आणून उत्स्फूर्तपणे दाद देण्याचे एकमेव उदाहरण आपल्याला दिसते, ते विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीत! चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे चार आदिवासीबहुल जिल्हे एरवी रक्तरंजित नक्षलवादी कारवाया, कुपोषण तसेच अन्याय-अत्याचारांच्या कहाण्यांमुळे आपले लक्ष वेधून घेतात. मात्र, याच जिल्ह्यांमध्ये प्रेक्षकांवर सत्ता गाजवणारी आणि प्रेक्षकांची सत्ता मिरवणारी झाडीपट्टी रंगभूमी बहरली आहे, हे उपरोक्त प्रसंगातून कळते.

प्रेक्षकांची लाडकी झाडीपट्टी
नागपूरपासून सलग पाच ते सहा तासांच्या प्रवासानंतर शहरी खुणा पुसत जातात आणि जंगल- झाडांची हद्द सुरू होते. हीच ‘झाडीपट्टी’ची कर्मभूमी! चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमधील अगदी आतील गावापर्यंत मुंबई-पुण्याच्या व्यावसायिक नाटकांचा रंगमंच न पोहोचल्याने जंगलात तात्पुरता रंगमंच उभारून होणारी नाटके म्हणून ‘झाडी’ आणि ही परंपरा केवळ या चार जिल्ह्यांच्या पट्ट्यांतच अधिक लोकप्रिय असल्याने ‘पट्टी’; अशी ती ‘झाडीपट्टी’ सव्वाशे वर्षांचा इतिहास सांगते. गंमत म्हणजे, इथल्या रंगभूमीला ‘प्रेस’ हा शब्द वापरण्याची प्रथा आहे. दिवाळी ते मार्च झाडीपट्टीचा सिझन असतो. सकाळी शंकरपट म्हणजेच बैलांच्या शर्यती व रात्री झाडीपट्टीतील नाटके असा भरगच्च कार्यक्रम असतो. शंकरपटाच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरात पाहुण्यांचा पूर येतो. अशा वेळी रात्री 12.30 पासून पहाटेपर्यंत चालणारी झाडीपट्टीची नाटके पाहुण्यांच्या रात्रीच्या मुक्कामाची सोय करतात. दुसर्‍या दिवशी पहाटे पाहुणे आपापल्या गावी परतेपर्यंत टक्क जागेच असतात. झाडीपट्टीतील नाटके पाहण्यासाठी तुडुंब होणारी गर्दी आणि झाकलेला तंबू यांमुळे विदर्भातील हाडे गोठवणार्‍या थंडीपासूनही रक्षण होते, तसेच प्रेक्षकांचे मनोरंजनही!

तोंड वेंगाडून ‘फ्री पासेस’ न मागता 70 रुपयांपर्यंतची तिकिटे विकत घेऊन नाटकाला आलेल्या झाडीपट्टीतल्या स्थानिक प्रेक्षकांचे नाट्यवेड जितके अनोखे, तितकीच त्यांची दाद देण्याची तºहाही निराळी. एखाद्या नटाचा अभिनय नाही आवडला, तर सरळ उठून ‘अरे, तू गाणं चांगला म्हणतोस. अभिनय नको, फक्त गाणं म्हण.’ असा आग्रही हट्टदेखील इथले प्रेक्षक धरतात आणि म्हणूनच चाकू खुपसण्याचा प्रसंगाला ‘वन्समोअर’ मिळू शकतो. झाडीपट्टीतला कलाकारही इतका प्रेक्षकाभिमुख असतो की, तो तत्काळ अभिनय थांबवून गाण्याला सुरुवात करतो.

झाडीपट्टीतील हे कलाकार म्हणजे तरी कोण असतात? अनेक जण शाळेत मराठी विषयाचे प्राध्यापक असतात, कुणी सुतार असतो, कुणी भजनी मंडळात असतो. त्याचा गाता गळा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरतो. कुणी चक्क व्यवसायाने टेलर असतो, तर कुणी केशकर्तनात पारंगत! एरवी उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या व्यवसायांत असलेली ही मंडळी नट म्हणून एकत्र येतात आणि एक दर्जेदार नाटक उभे करतात. झाडीपट्टीतील नाटकांच्या पोस्टरवरील एकही नट शहरी नजरेला ओळखीचा नसतो. मात्र, ते कलाकार म्हणून कुठेही कमी पडत नाहीत. झाडीपट्टीचा अमिताभ बच्चन, झाडीपट्टीचा दादा कोंडके तसेच झाडीपट्टीची बहिणाबाई अशा अनेक उपाधी इथल्या प्रेक्षकांनीच आपल्या आवडत्या कलाकारांना दिलेल्या असतात...

जंगलात असलेल्या एखाद्या गावात नाटक असल्याने गावकरी तात्पुरता रंगमंच उभारतात. 20Ÿ20चा छोटेखानी रंगमंच कधी झोपडी होतो, कधी फ्लॅट, तर कधी चक्क महाल! पडदे लावणे, गुंडाळणे, एखादे टेबल, खुर्च्या एवढेच बॅकस्टेजचे सामान असते. मोकळ्या आवारात खड्डा खणून तिथे प्रेक्षकांना बसण्याची सोय केली जाते. झाडीपट्टीचे सगळ्यात अचंबित करणारे वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण तीन अंकी नाटक स्टेजच्या मधोमध लटकवलेल्या एकुलत्या एका माइकच्या जोरावर रंगते. नाटकात काम करणारे कलाकार आळीपाळीने माइकच्या समोर येऊन आपापले संवाद म्हणतात. अद्ययावत साऊंड सिस्टिमला सरावलेल्या शहरी प्रेक्षकांसाठी हे दृश्य अनुभवणे फारच गमतीशीर असते. स्टेजच्या पुढ्यात संगीत देणारी दोन-तीन टाळकी आणि पुढे सगळे प्रेक्षकच प्रेक्षक, असा रंगतो प्रयोग. प्रेक्षक तरी किती? अलीकडे शहरांतल्या नाट्यगृहात नजरेस पडतो, तसा शे-दोनशे हा आकडा इथे कुणी गृहीत धरूच शकत नाही. झाडीपट्टीत येणारा प्रेक्षक हजारोंच्या संख्येत असतो. प्रत्येकाचे पै-पाहुणे मिळून 4 ते 5 हजार प्रेक्षक प्रत्येक नाटकाला निश्चितपणे लाभतात!

नाट्यसंगीतच हवे
सलग पाच ते सहा तास प्रवास करून कलाकारांसह मजल - दरमजल करत आम्ही एकदाचे आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या राजूर या गावातल्या आदिवासी पाड्यावर पोहोचलो. याच गावात आज रात्री नाटक ठेवण्यात आल्याने गाव माणसांनी फुलून गेला होता.

सर्व गावच्या गावच स्नेहसंमेलन असल्याप्रमाणे उत्साहाने सळसळत होते. गावभर लावलेल्या पताकांनी आणि झगमग करणार्‍या दिव्यांनी एक वेगळाच उत्साह वातावरणात भरून राहिला होता. गावातल्या प्राथमिक शाळेच्या आवारात मोठा शामियाना भासावा, अशा तंबूत नाटकांतील नटमंडळीसह माझे स्वागत करण्यात आले आणि इतक्यात कानावर नाट्यसंगीताचे सूर पडले. झाडीपट्टीत कोणतेही नाटक ठेवलेले असो, नाटक असलेल्या दिवशी गावात दिवसभर नाट्यसंगीत सुरू असते! आंध्र प्रदेशच्या सीमेवरील वेगळी बोलीभाषा असलेल्या गावकर्‍यांना मराठी नाट्यसंगीत कसे काय आवडते, असा आश्चर्यचकित करणारा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही...

झाडीपट्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक असे ‘सबकुछ स्थानिक’ असले तरी नाटके मात्र मुंबई-पुण्याच्या नाटककारांचीच असतात. संगीत सौभद्र, संगीत शारदा, एकच प्याला, अश्रूंची झाली फुले, मोरूची मावशी, लावणी भुलली अभंगाला, सिंहाचा छावा, लग्नाची बेडी अशा एकसेएक नाटकांच्या जाहिराती गावातल्या मुख्य चौकावर झळकलेल्या दिसतात. ही नाटके आजही तितक्याच उत्सुकतेने आणि समरसतेने झाडीपट्टीत केली आणि पाहिली जातात. गेल्या शतकभरापासून आजवर दर्जेदार नाटके अनेकदा झाडीपट्टीत होत राहिल्याने ही नाटके स्थानिक प्रेक्षकांनी इतक्यांदा पाहिलेली असतात, की त्यांना त्यातील गाणीच नाही तर संवादही तोंडपाठ झालेले असतात.

झाडीपट्टीचा व्यवसाय
आपले आवडते नाटक आपल्या गावी नेण्यासाठी ‘वडसा’ हे मुख्य केंद्र आहे. तिथे सर्व लोकप्रिय नाटकांचे स्टॉल्स लागतात. वडसा येथून चारही जिल्ह्यांत जवळपास सहा तासांचा प्रवास करत कलाकार नाटक असलेल्या गावापर्यंत जातात. रात्रभर नाटक करतात आणि पहाटे पुन्हा आपल्या गावी परततात. ‘लोकल’ कलाकारांनी एकत्रितपणे केलेली हौशी नाटके म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी, हे खरे असले तरी या हौसेला व्यवसायाचा परीसस्पर्श झाल्याने झाडीपट्टीतील एखादे उत्तम नाटक एका प्रयोगाचा किमान चार लाखापर्यंत गल्ला कमवते. गाडीखर्च, कलाकारांचे मानधन असे 40-45 हजारापर्यंत जाते, परंतु गावी आणलेले नाटक 4 ते 5 हजार प्रेक्षकसंख्येमुळे लाखोंची कमाई करून देते. वर्षभरातील झाडीपट्टीची उलाढाल सुमारे 25 कोटी रुपयांपर्यंत जाते. स्त्रिया आणि लहान मुलांसाठी 30 रुपये, खुर्चीसाठी 70 रुपये, ओट्यासाठी 40 रुपये, खाली बसण्यासाठी 15 रुपये असा प्रेक्षकांना परवडणारा तिकीट दर असल्याने फुकट पासेस मागणारे प्रेक्षक इथे आढळत नाहीत. आज झाडीपट्टी हा पाच पहिन्यांत कमाई करून देणारा एक चांगला व्यवसाय म्हणून बहरला आहे. या व्यवसायाने गावोगावी मुंबई-पुण्यात होणारी नाटके तर पोहोचवलीच, मात्र प्रामुख्याने प्रेक्षकांना या नाटकांची गोडी लावण्याचे काम केले आहे.

झाडीपट्टी ठरते उजवी
शहरी भागात होणार्‍या व्यावसायिक नाट्यचळवळीकडे या क्षेत्रातील सर्वांचे लक्ष असते. मात्र चळवळ म्हणून नव्हे तर केवळ मनोरंजन म्हणून अस्तित्वात असलेली झाडीपट्टी रंगभूमी प्रस्थापित रंगभूमीपेक्षा उजवी ठरते. मनोरंजनाची साधने वाढली म्हणून नाटकाला प्रेक्षक येत नाहीत आणि नाटक करण्याचा व्यवसाय बुडती बोट आहे, असा ओरडा प्रस्थापित नाटकवाले करताना आढळतात. मात्र हीच मनोरंजनाची साधने गावोगावी उपलब्ध असतानाही केवळ प्रेक्षकांच्या नाट्यवेडावर झाडीपट्टी बहरली आहे. प्रस्थापित कलाकार नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका अशा सगळ्या दगडांवर पाय ठेवत सुविधा मिळत नसल्याचा कांगावा करतात, मात्र झाडीपट्टीतील कलाकार कित्येक तास प्रवास करून तितक्याच ऊर्जेसह नाटक पार पाडतात.केवळ कला जगणारी मंडळी झाडीपट्टीत दिसतात. झाडीपट्टीतील प्रेक्षक कलाकारांचा चेहरा नाही तर दाखवल्या जाणार्‍या नाटकाचा दर्जा पाहतात. हल्ली मुंबई, पुणे, नागपूरकडच्या मोहन जोशी, कुलदीप पवार अशा सिनेकलावंतांना नाटकात आणण्याची फॅशन जोरात आहे. झाडीपट्टीतील आणखी एक आश्चर्य म्हणजे, इथे होणार्‍या अनेक नाटकांच्या तालमी होत नाहीत. युद्धभूमीवर नाटक पेलण्यासाठी ‘प्रॉम्टर्स’ची फळीच्या फळी स्टेजच्या दोन्ही बाजूंना सज्ज असते. कलाकार फक्त आपापली भूमिका समजावून घेतात, वाक्यांसाठी प्रॉम्टर्स आहेतच! आधी केवळ पौराणिक, सामाजिक किंवा ऐतिहासिक लिहून ठेवलेली नाटके होत असत, मात्र हल्ली झाडीपट्टीतल्या प्रेक्षकांप्रमाणेच स्थानिक लेखक तयार झाले आहेत. लेखक तयार होणे हे जितके उपयुक्त तितकेच घातकही ठरत आहे, याचे जिवंत उदाहरण आज झाडीपट्टी रंगभूमीच्या नावाखाली खपवली जाणारी नाटके पाहिली की लक्षात येते. तरीही, आपल्या अनेक आश्चर्यांना जपत झाडीपट्टी आजही विदर्भाची आणि पर्यायाने महाराष्ट्राची खरीखुरी दौलत ठरते...