आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावलीपणाचा दुर्लक्षित 'आपधर्म'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्यातील पूर्वीच्या अक्राणी महाल आणि सध्याच्या धडगाव तालुक्यातील ‘रावलापाणी’ येथे आदिवासी सत्याग्रहींवर ब्रिटिशांनी केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक शहीद झाले होते. 2 मार्च 1943 हाच तो दिवस. ‘रावलापाणी’ संग्रामस्थळी त्या वेळचे जंगल नष्ट झाले असले तरी अंदाधुंद गोळीबाराच्या ‘निशाण्या’ तेथील कातळावर आजही इतिहासाच्या स्मृतींना उजाळा देतात.
देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल तळोदे तालुक्यात 1930 नंतरच्या काळात स्वत: भिल्ल असलेले संत गुला महाराज यांनी समाजबांधवांसाठी उभी केलेली आत्मसन्मानाची चळवळ बाळसे धरू लागली होती. दारूबंदी, आत्मशुद्धी, आत्मसन्मान व कौटुंबिक स्थैर्य ही या चळवळीची मुख्य उद्दिष्टे होती. ‘आपधर्मा’च्या स्थापनेतून आत्मसन्मानाचा विचार रुजू लागला होता. अशातच 1937 च्या फैजपूर काँग्रेसला उपस्थिती लावण्यासाठी संत गुला महाराज मोरवडहून पायी गेले. मात्र प्रस्थापितांच्या वर्चस्वामुळे संत गुला महाराजांना काँग्रेसकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस चळवळीकडे न वळता ‘आपधर्म’ चळवळ मोठी करण्याच्या कार्यास त्यांनी वाहून घेतले. यास मिळू लागलेला प्रतिसाद इंग्रज सरकार व प्रस्थापितांच्या डोळ्यांत खुपू लागला. दुर्दैवाने 19 जुलै 1938 ला संत गुला महाराजांना देवाज्ञा झाली. संपूर्ण समाजात दारूबंदीचे त्यांनी पाहिलेले स्वप्न अधुरे राहिले.
त्यांच्या मृत्यूनंतर आपधर्माच्या चळवळीचे दृश्य स्वरूप वृद्धिंगत होत होते. संत गुला महाराज यांचे कनिष्ठ बंधू रामदास महाराज यांच्याकडे या चळवळीचे नेतृत्व आले. चळवळीचा ओघ आटत नाही हे पाहून इंग्रजांनी नोव्हेंबर 1941 मध्ये आरती चळवळीवर बंदी घातली. मोरवडला बंदूकधारी शिपाई ठेवण्यात आले. जो आरतीला जाईल, त्याला एक वर्षाची शिक्षा व संत गुला महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणास बंदुकीच्या गोळीचा प्रसाद, अशी अफवा सर्वदूर पसरवण्यात प्रस्थापित यशस्वी झाले होते. दुसरीकडे दारूबंदीमुळे दारू व्यवसाय बुडायला लागला. प्रस्थापितांनी पिणारे-न पिणारे, खाणारे-न खाणारे अशी भांडणे लावली. यातून निर्माण झालेल्या लुटुपुटुच्या घटनांमधून कायदा- सुव्यवस्था बिघडल्याचा कांगावा करत त्यास संत रामदास महाराज यांना जबाबदार धरले गेले. 4 मे 1942 रोजी हद्दपार करण्याचा हुकूम तत्कालीन ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर बजावला.
हद्दपारीच्या काळात रामदास महाराज मोरवडहून मध्य हिंदुस्थानातील राजघाट (चिखलदरा) येथे गेले. याच काळात देशात ‘चले जाव’ चळवळ जोरात होती. तत्कालीन धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी रामदास महाराजांना पत्र लिहून हद्दपारीची मुदत संपण्याची वाट न पाहता इंग्रजांच्या विरोधातील संघर्षात सामील होण्याचे आवाहन केले. नानासाहेब ठकार स्वत: रामदास महाराजांना विनंती करण्यास राजघाटला गेले. या सर्वांचा परिपाक म्हणून रामदास महाराज नर्मदा नदी पार करून जिल्ह्यात परत यायला निघाले. वाटेत त्यांच्याबरोबर त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सामील होऊ लागले. बघता बघता हजारो आदिवासींचा ‘कारवाँ’ तयार झाला. यात स्त्रियांचाही सहभाग मोठा होता. महाराज गावोगावी समाजबांधवांशी बोलत होते. ‘आपधर्म’ समजावून सांगत होते. 1 मार्च 1943 ला ‘अक्राणी महल’ या किल्ल्यावरून निघालेला हा ‘कारवाँ’ रावलापाणीजवळच्या निझरा नाल्यात पोहोचला.
महाराज परतत असल्याबाबतची खबर वरिष्ठांना आधीच कळवण्यात आली होती. सरकार त्यांच्या वाटचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. सर्वात आधी ‘बोरद’ गाव लुटले जाईल, अशी खोटी अफवा पसरवण्यात आली. परिसरात अविश्वासाचे व भीतीचे वातावरण झाले. 1 मार्च 1943 ला ‘बन’ या गावी 1 पलटण इंग्रज सैनिक पोहोचवले गेले. सैनिकांनी रात्रीतून पायी जाऊन रामदास महाराजांच्या जथ्याला नाल्याच्या दोन्ही बाजूंनी घेरले. 2 मार्चला सूर्योदयापूर्वी अचानक दोन्ही बाजूंनी नि:शस्त्र जमावावर बेछूट गोळीबार केला गेला. हे ठिकाण एवढे विचित्र आहे की येथून पुढे वा मागे जाण्यास तातडीचा मार्ग उपलब्ध नाही. महाराजांना गोळी लागू नये म्हणून त्यांच्या अनुयायांनी त्यांना ढालीसारखे संरक्षण दिले. या एकतर्फी संघर्षात 15 जणांना जागेवरच हौतात्म्य प्राप्त झाले, 28 जखमी झाले. प्राचार्य जी. बी. शहा यांच्या ‘धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान’ या पुस्तकात हे नमूद करण्यात आले आहे. जनार्दन वळवी (हे त्या काळी तळोद्याला इयत्ता सातवीत शिकत होते) यांनी दोन बैलगाड्या भरून लाकडे रचावीत तसे मृतदेह रचून आणल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे. जवळपास 40 मृतदेह तळोदे येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते, असे ते म्हणतात. डॉ. जी. बी. शहांनी रावलपाणी हत्याकांडाची तुलना जनरल डायरने केलेल्या जालियनवाला हत्याकांडाशी केली आहे. एकाच ठिकाणी एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोक गोळीबारात धारातीर्थी पडले होते. आज त्या ठिकाणी बोरीचे झाड नाही, निझरा नाल्यात पूर्वीइतके पाणी नाही, जंगल नामशेष झालेले दिसत असले तरी इंग्रजांनी केलेल्या बेछूट गोळीबाराच्या खाणाखुणा या इतिहासाची साक्ष देत आहेत. पक्क्या दगडात घुसलेल्या गोळ्यांच्या खुणा अजूनही स्पष्ट दिसताहेत. आजही या घटनास्थळाला भेट दिली की डोळे पाणावतात. मस्तक नत होते. नंदुरबार जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळातल्या दोन गोळीबारांपैकी नंदुरबारच्या घटनेत हुतात्मा शिरीषकुमारसह 5 बालकांना हौतात्म्य पत्करावे लागले. तेथे आज हुतात्मा स्मारक उभे आहे. मात्र रावलापाणीचे स्मारक अद्याप अस्तित्वात आलेले नाही. मुळात तेथे स्मारक होणे ही केवळ स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देणे नव्हे, तर या निमित्ताने आदिवासींच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाची माहिती ज्ञात होईल, ‘आप की जय’ चळवळीचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचेल.
आजही 2 मार्चला दरवर्षी मोरवडचे आपधर्मी न चुकता रावलापाणीच्या संग्रामस्थळी जाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. नंदुरबार जिल्ह्याने निर्मितीच्या 15 व्या वर्षात पदार्पण केले आहे. विकासाची बीजे येथे आता अंकुरायला लागली आहेत. त्यातच प्रशासनाच्या वतीने रावलापाणीला हुतात्मा स्मारक म्हणून दर्जा मिळण्यासाठी केलेल्या हालचाली म्हणजे, 15 व्या वर्षात पदार्पण केलेल्या नंदुरबार जिल्ह्याला शासनाने दिलेली नवीन ऐतिहासिक ओळख ठरणार आहे.