आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nandurbar's Lokmanya Tilak Library In One Of Few Who Completed Century

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शताब्‍दी पूर्ण केलेले नंदुरबारचे लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘वाचाल तर वाचाल’ हे ग्रंथालयीन चळवळीचे ब्रीदवाक्य घेऊन नंदुरबार येथे 1883 च्या ऑगस्टला लॉर्ड रिपन लायब्ररीची स्थापना झाली. त्या वेळी ब्रिटिश अधिकारी व लोकांना अभ्यासासाठी या ग्रंथालयाचा उपयोग होत असे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये या लायब्ररीचे नामकरण ‘लोकमान्य टिळक वाचनालय’ असे झाले. 1964-65 पासून अ‍ॅड. रमणभाई शहा व प्रा. डॉ. पीतांबर सरोदे यांनी या वाचनालयाची धुरा सांभाळली. 1 जुलै 1998 ला नंदुरबार जिल्हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. त्यानंतर या वाचनालयाला जिल्हा वाचनालयाचा दर्जा मिळाला. आदिवासीबहुल भागातील लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालय सर्वार्थाने समृद्ध आहे. विविध विषयांवर 43 हजार 335 एवढी ग्रंथसंपदा असलेल्या वाचनालयाने वाचकांची ज्ञानाची भूक वाढवली. त्याचबरोबर लौकिकतेतही भर घातली. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली.
1983 ला शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. शताब्दी महोत्सवात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राचार्य राम शेवाळकर यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. डॉ. श्रीराम लागू, प्रा. इंद्रजित भालेराव, स्वातंत्र्यसेनानी नागनाथअण्णा नायकवडी, रवींद्र पिंगे, ना. धों. महानोर, उत्तम कांबळे या साहित्यिकांनी या ग्रंथालयाला भेट दिली आहे. वाचनालयाने ‘अ’ दर्जा प्राप्त केला असून या ग्रंथालयात दररोज 24 दैनिके, 60 नियतकालिके, 15 साप्ताहिके, 41 मासिके येतात. संस्थेचे 1592 वर्गणीदार आहेत. यात महिला सभासदांची संख्या 267 आहे. महिला व बालकांसाठी स्वतंत्र वाचन कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षात दररोज 80 महिला वाचनासाठी हजेरी लावतात. वाचनालयाचे स्वतंत्र महात्मा गांधी विचार प्रसार अभ्यास केंद्र असून यात महात्मा गांधी यांच्या जीवनावरील 2000 ग्रंथ उपलब्ध आहेत. 2007-08 हे वर्ष शतकोत्तर रजत जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. ही संस्था नंदुरबार जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचे केंद्र झाली आहे. 1998 पासून नंदुरबार जिल्हा ग्रंथालय संघाचे संस्थापक कार्यवाहपद प्रा. डॉ. पीतांबर सरोदे यांच्याकडे आहे. त्यांना डॉ एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथमित्र पुरस्काराने गौरवण्यात आले. वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त झाला आहे, तर शासनातर्फे राज्यातील 52 ग्रंथालयांना 5 लाखांचे अनुदान देण्यात आले होते. त्यात या वाचनालयाचा समावेश आहे.
लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. रमणलाल शहा, उज्ज्वल कुळकर्णी, निंबाजीराव बागूल, केतन शहा, हितांशू पटेल, ज्योती महंत, हरिभाऊ पाटील व प्रा.डॉ. पीतांबर सरोदे या संचालकांसह ग्रंथपाल प्रवीण पाटील, सहायक ग्रंथपाल सुदाम राजपूत, वर्षा टेंभेकर, प्रतिभा भालेराव, सुनील मराठे, मनीष त्रिवेदी आदींचे योगदान मोठे आहे.
शब्दांकन - रणजित ज्ञा. राजपूत, नंदुरबार.