आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापातल्या नारायणाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सुन मेरी अमिनादीदी’ गाजतंय. मुंबईचा पाव्हणा बघून पोरीचा कौतुकाने निका लावून दिला नि झाला बाप मोकळा. गावाकडून मोठ्या शहरात येऊन फशी पडलेल्या कित्येकींची ही व्यथा. कुणी संसारात रमल्याची, कुणी चंदेरी दुनियेत चमकून पैसेवाली बनल्याची स्वप्ने पाहणारी, कुणी अगदी कष्ट करून भाकरीला मोताद नाही होणार. शिवाय आज आपली विक्री केल्याने आई-बापाला तुकडा तर मिळतोय, पाठच्यांचे मार्गी लागेल, अशा जाणिवेने तांबड्या फुलांची माळ घालून वेदीवरून पावले टाकीत आलेली...

गावाकडच्याच नाही, इथल्याही तितक्याच... घरांत संवाद तुटतात, मानापमानाचे अंक रंगतात, समजावणारे कुणी भेटत नाही, पाऊल घराबाहेर पडतं, पाठचा आधार सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता हे मुलीच्या नि घरच्यांच्याही लक्षात येईपर्यंत न भरून येणारेसे नुकसान झालेले असते. सामूहिक बलात्काराच्या एखाद्या बळीचा बोलबाला होतो तिथले क्रौर्य ढळढळीत उघडे पडलेले, ते नाही दिसले असे म्हणताच येणार नसते म्हणून. लग्नाच्या बाईवर नव-या ने केलेली जबरदस्ती बलात्कार म्हणता येईल का यावर अजून एकमत व्हायचे आहे. मानसिक हातघाईतून होणारे खच्चीकरण? त्याचीही बलात्कार म्हणून नोंद घेता यावी ना. आणि ज्यांची घरेच सुरक्षित नसतात त्यांचे काय?
अतिरेकी वाटतील हे विचार. विश्वास ठेवा, जगण्यातला विश्वास गमावून बसलेल्या काही भगिनींचे दु:ख मी इथे मांडतेय, काडीचीही पदरची आरास न करता.

सकाळीच नूरीची आई नूरीला दारात ओढून बदडत होती. तिच्या बागवानी आरडाओरड्याचा अर्थ माझ्या मनात अडकून राहिलाय तो असा. ‘माझा नवरा खोटं कशाला बोलंल? तू त्याच्या उरावर बसलीस ठमके नि त्याने तुझा घास केला म्हणून नंतर रडत बसलीस? चेटके, जा तुझा भार नको माझ्यावर इथनं पुढं...’ पोरीला तशीच फरपटलेली टाकून, डोक्यावर भाजीचा टोपला घेऊन बाई बाजाराच्या मार्गाला लागलेली दिसली. पलीकडेच तिचा दारूडा नवरा बिडी फुंकत बसून राहिलेला. तो या चित्रात होता की नव्हता?

नूरजहाँ. तेरा-चौदा वर्षांची, गोरी-गोमटी. आमची मैत्रीण. समोरच्या फळ्यांमध्ये राहणारी. आम्ही दारात चौकोन आखून ठिकरी खेळायचो तेव्हा तीही यायची. कडेवर एक नि काखोटीला एक अशा दोन भावंडांसह. त्यानंतरच्या शनिवारी दुपारी भेटलो तेव्हा सांगत होती, अभी भी दुखता है देखो, क्या करने का...

ती काय दुखतंय सांगत होती ते आम्हा सुरक्षित घरातील दहा-बारा वर्षांच्या मुलींना तेव्हा कळले नसले तरी तिच्या स्वरातली वेदना अजूनही माझ्या कानात ताजी आहे. आधीच्या आठवड्यात ती खेळायला येऊच शकली नव्हती. मंगळवारी तिचा उद्ध्वस्त, रडवेला चेहरा मी पाहिलेला. हमारा बापच ऐसा निकला, असे काही तरी ती सांगायला आली होती, मी शाळेला निघाले होते तेव्हा.

तिची आई तिला कोंडून जायची, संध्याकाळी बाप नित्याप्रमाणे बाजारातून आधी निघून दारू पिऊन घरी पोहोचला तरी माय परतेपर्यंत तो दारात अशी व्यवस्था होती. हे काय असं आम्ही कधी कुणाला विचारलं नाही. फळ्यांच्या झोपडीत राहणा-या त्या समोरच्यांचे जीवन आम्हा कौलारू घरांत राहणा-या ंपेक्षा भिन्न होते हे मान्यच असल्याने नस्त्या चौकशा केल्या नाहीत कुणी. आज नूरजहाँची आठवण होण्याचे कारण कन्यामा भेटली होती. वेड्या बापाची आई बनलेली, त्याचा स्तनपानाचा हट्ट पुरवताना कदाचित त्याच्या आजारावर ते औषध होईल नि तो बरा झाल्यावर सुखाचे दिवस येतील, अशा आशेवर धीराने दिवस ढकलणारी. कोसळून रडली बिचारी. अलीकडेच तिच्या बापाने तिला कसकसे उरीपोटी कवटाळले, त्याचा पुरुषी हात तिच्या अंगांगाचा कुस्करा करीत राहिला, पुढे काय म्हणून घाबरून थंड पडत चाललेली ती, बापाचे सुटलेले भान... काही काळाने ती हुंदके देत आहे हे लक्षात येताच तो तिची समजूत घालायला. धक्कादायक गोष्ट अशी की, त्याला त्याने काय काय केले ते आठवत नव्हते, इतकेच नव्हे तर घडलेल्यात तिचाच पुढाकार होता, तिला ते हवे होते अशी त्याची धारणा... तसे नाही हे तिने त्याला समजावले तेव्हा त्याला पुन्हा उपरती. बापाचे वेड वाढतच जाणार तर आपणच मरून का जात नाही म्हणाली. कुणाही संवेदनशील व्यक्तीच्या काळजाचा वेध घेणाराच होता तिचा प्रश्न. बापाचा युक्तिवाद असा की, त्याचा हात तिच्या मांड्यांना गेला तेव्हाचा चिकट स्पर्श त्याला स्पष्ट आठवतोय तर ती त्याच्याबरोबर रत असणारच.

नूरजहाँच्या बापानेही तेव्हा हेच तारे तोडले असणार. लोकांना गुलगुलीत कहाण्यांतून वाटत आलंय हे असं होणं म्हणजे तिने राजी असणं... कुणी निसर्गाच्या या योजनेकडे दुस-या अंगाने का पाहत नाही? काही घडणारच असते तेव्हा तिच्या हाती केवळ सहन करणेच उरणार, शारीरिक वेदना कमी करण्याचा तो निसर्गाचा प्रयत्न असे का नाही? केवळ मनच नव्हे, तर शरीरसुद्धा दुखतेय हे ‘ती’चे म्हणणे मान्य करायला ‘त्या’ला नेहमीच प्रयास पडतात...

डॉ. तारा भवाळकर पोटतिडकीने बोलत होत्या, ‘राखी ही बहिणीने भावाकडे तिच्या सुरक्षेची मागितलेली भीक का? का नये ते पुरुषाने स्वत: पुढे होऊन घालून घेतलेले बंधन? तिच्याशी कृतज्ञ राहून, बये, या पृथ्वीतलावर मी तरी एक पुरुष असा आहे की ज्याच्यापासून तुला विषयभय नाही, अशी का नसावी ग्वाही त्यांत? बापाच्या ठायीही एक नर आहे नि तोही कधी... हा विचार त्यांनाही सुचला नाही कदाचित. म्हणून ही मांडणी; पण जगातले केवळ विषच दाखवले तर ती अधुरी राहील. जगामध्ये अमृतही आहे, त्याचीही गोडी तुम्हाला चाखवायला हवी.’

रानमोरे सर विद्यार्थिनींना सांगत होते, मला मुलगी नाही, तुम्ही माझ्या मुलीसारख्याच. मॅडम, शब्दांवर जाऊ नका, बापानं पोरीचं पायताण मजबूत करायचं असतं. काय टाप आहे मग कुणाची नजर वर करून बघण्याची? सरांनी त्यापुढे सांगितलेला प्रसंग त्यांच्याच शब्दांत : जम्मूला गेलो होतो. एका घरी राहिलो. सकाळी घरचे यजमान उठले, मालकिणीला उठवलं, दोघांनी आन्हिकं उरकून कन्येला उठवलं. चार-पाच वर्षांची पोर, उठून उभी राहिली तशी आईबाबांनी तिच्या पायांवर आपलं डोकं ठेवलं. यांनी तिचे आभार मानले. आजचा दिवस चांगलाच असेल, म्हणाले. मी चकित! त्यांनी खुलासा केला, ‘अहो, आमची कन्या ही आमची लक्ष्मी, सरस्वती, समृद्धी सर्व काही आहे.
सकाळी तिच्या हास्यातून तिचे आशीर्वाद घेतो आम्ही. आमचे जीवन तिने घडवले याप्रतिची आमची कृतज्ञता तिच्यापर्यंत पोहोचते. तिच्या विश्वासाला अलगद आधार मिळतो. हे तिचं व्यक्तिमत्व घडवणं आहे. आत्मसन्मान, आत्मविश्वास यांची ताकद देणं आहे.’ मला वाटलं इथे बापातला नारायण प्रकटलेला. माझे हे लेखनपुष्प त्या नारायणाला अर्पण.

ambujas@gmail.com