आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियाची थरकाप उडवणारी गोष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार ६ जून १९४४, मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मंडी इथल्या जर्मन छावणीवर हल्ला केला. एका रात्रीत आकाश, समुद्र आणि जमिनीवरून जर्मनांवर हा हल्ला करण्यात आला. त्यांना जायबंदी करण्यात आलं. दुसरं महायुद्ध याच दिवसापासून खऱ्या अर्थानं संपायला सुरुवात झाली. इतिहासात या दिवसाची नोंद ‘डी डे’ अशी आहे. याच दिवशी नॉर्मंडीतल्या छावणीत हजारो जर्मन सैनिक मारले गेले. हजारोंना अटक करण्यात आली. यापैकी एक होता, यांग क्याँगजाँग. नुसतं पाहिलं तरी समजत होतं की, तो जर्मन नव्हता. आशियाई होता. त्याची भाषा समजत नव्हती. त्यांच्या अंगावर जर्मन सैन्याचा पोशाख होता. यामुळंच त्याची ओळख ही जर्मन युद्धकैदी अशी झाली. शरणागती पत्करलेल्या हजारो जर्मन सैनिकांना युद्धकैदी बनवण्यात आलं. चेहरेपट्टी आणि उंचीमुळं यांग जपानी असल्याची नोंद झाली. त्याची भाषा समजण्यासाठी काही तज्ज्ञांना बोलावण्यात आले. तेव्हा समजलं की, यांग कोरियन होता. यांगनं जे सांगितलं, ते दुसऱ्या महायुद्धातलं भयानक सत्य होतं.
दुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागली आणि जपाननं हिटलरशी हातमिळवणी केली. खुलेआम हिटलरच्या उलट्या स्वस्तिकाला पाठिंबा दिला. तिकडे युरोपात हिटलर थैमान घालत असताना, आशियातही जपान हिटलरसारखीच नाझी प्रवृत्ती पेरत होता. आसपासच्या छोट्या देशांना त्यानं काबीज केलं. कोरिया तर जपानच्या आधीपासूनच पंजाखाली होता. त्यानंतर जपाननं चीनकडे कूच केली. या वेळी कोरियन तरुणांना जबरदस्ती हातात लाल सूर्य असलेला पांढरा झेंडा देण्यात आला. हातात बंदुका देण्यात आल्या. आता ते जापनीज सैनिक होते. जपानच्या राजाबद्दल असलेली श्रद्धा व्यक्त करणं, ही त्यांची गरज होती. युद्धात ‘जपानकडून लढा किंवा मरण पत्करा’ असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आले. युद्धाचं कुठलंही प्रशिक्षण नाही, फक्त ट्रिगर चालवायचा, समोरच्याला मारायचं, एवढंच त्यांना सांगण्यात आलं. जपानचा झेंडा आशियाभर फडकला पाहिजे, जपानच्या अधिपत्याखाली सर्व आशिया आला पाहिजे, हे एकमेव उद्दिष्ट त्यांना देण्यात आलं. यातूनच मग चीनची त्या वेळची राजधानी असलेल्या नानकिंगसहित अर्ध्याअधिक चीनवर जपाननं मजल मारली. लाखोंच्या कत्तली केल्या. या युद्धात ओढले गेलेल्या कोरियन तरुणांची कामगिरी लक्षणीय होती. अशा हजारो कोरियन तरुणांपैंकीच एक यांग होता.
जपानसाठी लढणाऱ्या यांग आणि हजारो कोरियन सैनिकांची गोष्ट फार चित्तथरारक आहे. रोज कैक मैल काबीज करत आगेकूच करत असलेल्या जपानला सोव्हिएत रशियानं रोखलं. शेकडो जपानी सैनिक रशियाच्या ताब्यात आले. त्यांचा नानापरी छळ करण्यात आला. रशियातल्या जेलमध्ये डांबण्यात आलं. अर्थात, यात यांगही होता. अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी युरोपात हिटलरची नाकेबंदी करण्यासाठी युती केली, तर रशियानं आशियात हिटलरच्या मित्रांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. युद्धकैदी झालेल्या शेकडो जपानी सैनिकांना स्टॅलिनच्या एका आदेशावरून सीमेवर हिटलरविरोधात लढाईसाठी पाठवण्यात आले. आता हे सर्व रशियाचे सैनिक होते. इथं जर्मनीच्या आधुनिक शस्त्रांसमोर रशिया कमी पडलं. हे रशियन सैनिक जर्मनीचे युद्धकैदी बनले. त्याचा वापर जर्मनीनं स्वत:साठी केला. म्हणजे, यांगसहित शेकडो कोरियन अगोदर जपानसाठी, त्यानंतर रशियासाठी आणि आता जर्मनीसाठी लढायला लागले होते.

युद्धात मोठी मनुष्यहानी होत होती. त्यामुळे जो सैनिक हाताला लागेल, त्याला बंदूक देऊन समोरच्या राष्ट्राचा सामना करण्यासाठी युद्धभूमीवर पाठवणे, असा खेळ सर्वच राष्ट्रांनी खेळला. यांगसारखे शेकडो सैनिक या खेळाचे बळी ठरले. ‘डी डे’च्या वेळचा यांगचा फोटो छापून आला, तेव्हा यांग आणि त्याच्या सोबतच्या कोरियन सैनिकांची खरी गोष्ट जगासमोर आली. त्यानंतर यांगला अगोदर ब्रिटनमधल्या जेलमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर काही वर्षांनी अमेरिकेतल्या इल्यॉनिस जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली. युद्ध संपलं, तेव्हा तो सुटला; पण त्यानंतर तो कायमचा इल्यॉनिस शहरात राहिला. पुढची सुमारे ४७ वर्षं, म्हणजे १९९२ पर्यंत तो अमेरिकेत राहिला. नाहक युद्धात ओढले गेलेल्यांची गेलेली ही कथा कोरियातल्या माय वे (२०११) या सिनेमाच्या माध्यमातून मांडली. तो आत्तापर्यंतचा कोरियातला सर्वात बिग बजेट सिनेमा. दिग्दर्शक ज्ये ग्यू कांग याला यांगच्या ‘डी डे’ वेळच्या फोटोवरून हा सिनेमा सुचला. एका फोटोवरून सिनेमा बनण्याचा हा जगाच्या इतिहासातला बहुतेक पहिला प्रसंग असावा. यांगचीच नव्हे, तर हजारो कोरियन सैनिकांची ही गोष्ट ज्ये ग्यू कांगनं आपल्या ‘माय वे’ सिनेमाच्या माध्यमातून जगासमोर मांडली. कोरियन लोकांवर जपानी सैनिकांनी केलेले अत्याचार आणि त्यानंतर संपूर्ण कोरियाला भोगाव्या लागलेल्या यांगसारख्या लाखो नागरिकांच्या व्यथा कांगनं ‘माय वे’ सिनेमातून मांडल्या.

ज्ये ग्यू कांगनं यांगच्या या फोटोवर सिनेमा बनवताना दुसऱ्या महायुद्धाच्या वेळच्या जागतिक परिस्थितीचा आढावा चांगल्या पद्धतीनं घेतलाय. या सिनेमात त्यानं यांगची गोष्ट तत्कालीन जागतिक परिस्थितीशी जोडली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी दोन ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या. ‘माय वे’चं कथानक या स्पर्धांशी जोडण्यात आलंय. या माध्यमातून जपाननं कोरियावर लादलेलं युद्ध आणि त्या युद्धात होरपळलेला सर्वसामान्य कोरियन समजण्यास मदत होते. या सिनेमातली दोन्ही मुख्य पात्रं मॅरेथॉन धावपटू आहेत. एक कोरियन अगदी यांगसारखा आणि दुसरा जपानी. पुढचा सर्व सिनेमा या दोन्ही धावपटूंची एकमेकांबरोबरची स्पर्धा, युद्धाच्या वेळी त्यांची जगण्याची धडपड आणि त्यानंतर कोरियन धावपटूनं जपानी धावपटूसाठी दिलेलं बलिदान, असा थोड्याशा फिल्मी पद्धतीनं हा सिनेमा पुढे सरकतो. पण जागतिक संदर्भ देण्याचे सर्व प्रयत्न दिग्दर्शक ज्ये ग्यू कांग यांनी केलाय.
यांगचा फोटो पाहिल्यानंतर खरं तर त्यावर डॉक्युमेंट्री बनवण्याचा ज्ये ग्यू कांगचा विचार होता. २००७ला त्यानं त्यासाठीची सर्व तयारी केली होती. सुमारे वर्षभर तो डॉक्युमेंट्रीवर काम करत होता. दुसरं महायुद्ध, जपान, कोरिया, युद्धात नाहक ओढलेले लाखो कोरियन सैनिक, त्यानंतर त्यांची झालेली हेळसांड असं या डॉक्युमेंट्रीचं स्वरूप होतं. पण जसजशी माहिती मिळत गेली, तसतशी ही डॉक्युमेंट्री सिनेमाचं रूप घेऊ लागली. यांगचा शोघ घेताना सिनेमातली दोन महत्त्वाची पात्रं सापडली आणि त्यांच्याकरवी यांगची ही स्टोरी वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न ज्ये ग्यू कांगनं केला. आशियाई देशातल्या काही महत्त्वाच्या युद्धपटांमध्ये त्याचा समावेश झालाय तो त्याचमुळं. एका फोटोवरून घडलेला हा सिनेमा कोरियाची गोष्ट सांगतो आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी झालेल्या मानवाधिकाराच्या पायमल्लीच्या थरकाप उडवणाऱ्या घटनाही नोंदवतो.
narendrabandabe@gmail.com