आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Babdabe Article On Criminal Jack Merison

निव्वळ थरारक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी त्याला चोहोबाजूंनी घेरून शरण यायला सांगितलं, पण त्यानं पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात तो मारला गेला. त्याच्या गाडीतून खूप हत्यारं आणि रोकड सापडली आहे...'

फ्रान्समधला कुख्यात गुंड जॅक मेसरीनच्या एन्काउंटरची बातमीही अशीच लिहिण्यात आली होती. २ नोव्हेंबर १९७९ला पॅरिसपासून काही अंतरावर असलेल्या शहरात भर दिवसा त्याचा एन्काउंटर झाला. जिथं त्याला मारला, त्या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. जॅक मेसरीन अशा एन्काउंटरमध्ये मारला जाईल, यावर कोणाचाच विश्वास नव्हता. जो माणूस ३० सेकंदांत काऊंटडाऊन लावून बँक लुटू शकतो, तेवढ्याच वेळात एखाद्या क्लबमध्ये अंदाधुंद फायरिंग करून पसार होऊ शकतो. जो लोकांचे अपहरण करतो. घरफोड्या त्यानं किती केल्या, याची तर गणती करणंही शक्य नाही.
ज्यानं कॅनडातल्या सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या जेलमधून पलायन केलं, फक्त तेवढ्यावरच थांबला नाही, तर पुन्हा येऊन त्या जेलवर त्याने हल्ला केला. असा जिगरी, डॅशिंग गुन्हेगार सहजासहजी पोलिसांच्या हाती लागणं शक्य नव्हतं. त्यामुळं पोलिसांनी टीव्ही चॅनल्सवर केलेल्या या एन्काउंटरच्या दाव्यावर लोकांचा विश्वास बसला नाही.

जॅक मेसरीन फ्रान्समध्ये पब्लिक एनिमी नंबर १ म्हणजे लोकांचा नंबर एकचा शत्रू, म्हणून कुख्यात होता. तो कधी आपल्या मित्रांसोबत येईल, घरफोडी करेल, याचा नेम नसे. दिसायला उंचपुरा आणि रांगडा. केसांची स्टाइल नेहमी बदलती, त्यामुळं एकदा पाहिलं तर लक्षात राहीलच असं नाही. अगदी सेकंदाच्या गतीनं लूट करायची आणि पसार व्हायचं, ही त्याची कार्यशैली. बँका, श्रीमंत घरं, क्लब हे त्याचे टार्गेट. त्याचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळंच की काय, फ्रान्सचे त्या वेळचे पंतप्रधान वॅलेरी इस्टॅन्ग यांनी जॅकच्या एन्काउंटरबद्दल पोलिसांचं अभिनंदन केलं. पब्लिक एनिमी नंबर १ मारला गेल्याची घोषणा केली. एखादा गुंड मारला गेल्यावर थेट पंतप्रधानांनी पोलिसांचं कौतुक करण्याची ही जगातली बहुधा पहिलीच घटना होती. एका सर्वसाधारण घरातला बिघडलेला मुलगा ते पब्लिक एनिमी नंबर १ होण्याचा त्याचा प्रवास, यावर सिनेमा बनला नसता तर नवलच.
‘मेसरीन–डेथ इन्स्टिंक्ट’ आणि ‘मेसरीन -पब्लिक एनिमी नंबर १’ हे २००८मध्ये रिलीज झालेले दोन्ही सिनेमे जॅकचा गुन्हेगारी प्रवास टिपतात. नेव्हीतल्या अल्पकाळाच्या सर्व्हिसपासून ते त्याच्या एन्काउंटरपर्यंतचा सुमारे २० ते २५ वर्षांचा कालखंड दाखवतात. जीन फ्रान्सिस रिचेट दिग्दर्शित या दोन्ही सिनेमांना पॅरिस आणि आसपासच्या परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. तो मेसरीनचा इलाका होता. पण फ्रान्सपेक्षाही कॅनडामध्ये दोन्ही सिनेमे तुफान चालले.
कॅनडामध्ये जॅक मेसरीन मिथ बनला होता. त्याच्या अपहरणाच्या आणि दरोड्यांच्या बातम्या चौकाचौकांत चर्चेचा विषय बनल्या होत्या. बदलत्या वेशभूषेमुळं इथं त्याला ‘मॅन विथ थाउजंड फेस’ म्हणून ओळखलं जात होतं.

जॅक लहानपणापासून ‘प्रॉब्लेम चाइल्ड’ होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तो लहानाचा मोठा झाला. जर्मन सैन्याकडून आसपासच्या गावकऱ्यांच्या कत्तली होताना त्याने पाहिल्या होत्या. याचा बराचसा मानसिक परिणाम त्याच्यावर झाला होता. तो हिंसक झाला होता. त्यानं आपल्या प्रिन्सिपॉलवर हल्ला केला होता. त्याला एक नव्हे, अनेक शाळांतून काढण्यात आलं होतं. पुढे तो इतका मोठा गुंड कसा झाला, त्याची हिंसक मानसिकता वाढत कशी गेली, हे सिनेमात चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलंय. नेव्हीच्या नोकरीतून परत आलेला जॅक आता बेरोजगार आहे. त्याला टवाळखोर, भुरटे चोर मित्र भेटलेत. त्यांच्याबरोबर रात्र-रात्रभर क्लबमध्ये मज्जा करणं, चोऱ्या करणं हे सर्व आता नेहमीचं झालंय. आपला मुलगा वाईट मार्गाला लागलाय, याची कल्पना त्याच्या आईला आलीय.
ती त्याला चांगल्या माणसाचं कर्तव्य काय, ते समजावून सांगते. आपल्याला ही कर्तव्यं बजावायची नाहीत, असं बेफिकीर उत्तर तो आईला देतो. वडिलांवर जर्मन सैन्याला मदत केल्याचा आरोप करतो. तसं करून तुम्ही चांगल्या माणसांसारखं वागलात, असं तुम्हाला वाटत असेल, तर मी त्यापेक्षा चांगला वागण्याचा प्रयत्न करतोय, असं सांगून थेट घराबाहेर पडतो.
घराबाहेर पडलेला जॅक गुन्हेगारीत जास्तीत जास्त अडकत चाललाय. हे सर्व करत असताना त्याची तीन लग्नं झाली. ती त्याच वेगानं तुटली. गुन्हेगारी हाच आपला पेशा आणि पॅशन असल्यासारखा तो जगतो. या प्रवासात जो बरोबर आला, त्याच्यासाठी त्यानं जान हाजिर केली; पण जो आडवा आला त्याला कायमचा आडवा केला, असा विकृतीकडे जाणारा जॅक प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा करतो. कॅनडाच्या तुरुंगातून जॅकनं काढलेला पळ, हा त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण. हा सर्वात सुरक्षित तुरुंग समजला जायचा. पण काही दिवसांतच त्यानं या जेलचं सुरक्षा कवच भेदलं. तो अगदी नाट्यमयरीत्या तिथून पळाला. पण तो त्यावर थांबला नाही, तर तो पुन्हा आला तयारीनिशी. ज्यांनी आपल्याला पळायला मदत केली, त्यांना बाहेर काढण्यासाठी! त्याने तुरुंगावर हल्ला केला. जखमी अवस्थेत पळून गेला. या हल्ल्यानंतर कॅनडा आणि फ्रान्स अशा दोन्ही देशांमध्ये त्याचा दबदबा वाढत गेला.
चोरी आणि दरोडे टाकण्याच्या त्याच्या अनोख्या पद्धतीमुळं तो त्या वेळच्या तरुणांमध्ये ‘रॉबिनहूड म्हणून फेमस बनला. कधीतरी पेपरमध्ये छापून आलेल्या त्याच्या हेअरस्टाइल फॉलो करण्यात येऊ लागल्या. त्याच्यासारखे बंदूकधारी स्टाइलबाज फोटो काढण्यात येऊ लागले. कॅनडातल्या कोर्टातून जजच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून पळून जाण्याचा त्याचा पराक्रम जॅकला हीरो बनवून गेला. तसं पळून जाणं, खरं तर अशक्य होतं; पण तो जॅक होता. त्याच्यात प्रचंड इच्छाशक्ती आणि पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी काहीही करण्याची तयारी होती.
हे सर्व होत असताना जॅक चोरी आणि अपहरणाचे नवनवीन प्रयोग करत होता. अखेर फ्रान्सला कित्येक दिवसांच्या मेहनतीनंतर त्याचा पत्ता लागला. २० ते ४० जणांच्या पोलिसांची टीम त्याला शोधत होती. तो सापडला. त्या दिवशी त्याच्यासोबत त्याची साथीदार सिल्विया होती. एका सिग्नलजवळ पोलिसांनी त्याला गाठलं. त्याला काही करण्याची संधीच दिली नाही.
अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. जॅक जागीच ठार झाला. गोळीबारात सिल्वियाचा एक डोळा आणि हात गेला. ‘पब्लिक एनिमी नंबर १’ मारला गेला. आता लूट आणि दरोड्यांपासून फ्रान्समधल्या लोकांची सुटका झाली, असं पोलिसांनी जाहीर केलं. जॅक संपला, पण त्याच्या गोष्टी संपल्या नाहीत. जीन फ्रान्सिस रिचेट दिग्दर्शित दोन्ही सिनेमांनी आणि विन्सेट कॅसेलच्या अप्रतिम अभिनयानं जॅकला पुन्हा जिवंत केलं. आजही त्याच्या बँक लुटण्याच्या, अपहरणाच्या गोष्टी चवीचवीने रंगवून सांगितल्या जातात. एनिमी मारला गेला असला, तरी तो या गोष्टींच्या माध्यमातून अजूनही फ्रान्स आणि कॅनडाच्या पॉप कल्चरचा भाग बनून राहिलाय, अगदी कायमचा...

narendrabandabe@gmail.com