आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिकी विश्वाचे चित्रवृत्त!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका आणि युरोपात युद्धभूमीवर लढणारे अनेक सैनिक लिहिते झाले आहेत. युद्धभूमीवरच्या सैनिकांची डायरी म्हणून हे साहित्य ओळखलं जातंय. आणि अलीकडच्या काळात त्यावर सिनेमेही बनतायत, हे विशेष. म्हणजे पुस्तक बेस्ट सेलर आणि सिनेमा सुपरहीट, असा नवा फॉर्म्युला या सैनिकांच्या डायरींनी दिलाय.

ताया केलीचं जेवढं कौतुक करावं, तेवढं कमी आहे. इराक युद्ध गाजवणाऱ्या ख्रिस्तोफर केली या अमेरिकन सील कमांडरची ती बायको. पण फक्त हीच एकमेव ओळख नाहीए. १६०हून अधिक इराकी दहशतवाद्यांना ठार करण्याचा पराक्रम ख्रिस्तोफर उर्फ ख्रिस्त केलीनं केला होता. इराक युद्धानंतर तो जेव्हा परत मायदेशी आला, तेव्हा त्याच्यावर शौर्यपदकांचा वर्षावच झाला. अमेरिकेत मानाचे समजले जाणारे दोन सिल्व्हर स्टार मेडल, पाच कॉर्प कॉमेन्डेशन मेडल्स आणि मरिन कॉर्प्स अचीवमेन्ट मेडल्स, अशा अनेक मेडल्सनं त्याचा सैनिकी पोशाख भरून निघाला. पुढे वर्षभरातच इराक युद्धातल्या आपल्या अनुभवाबद्दल त्यानं पुस्तक लिहिलं, ‘अमेरिकन स्नायपर’! स्कॉट मॅक्वेन आणि जिम डिप्लीस हे त्याचे दोन युद्धातले सहकारी पुस्तकाचे को-ऑथर. ‘अमेरिकन स्नायपर-ऑटोबायोग्राफी ऑफ मोस्ट लिथल स्नायपर इन युएस मिलिटरी हिस्ट्री’ अशी टॅगलाइन असलेलं हे पुस्तक काही दिवसांमध्येच अमेरिकन बेस्ट सेलर बनलं. या पुस्तकात इराक युद्धातली अमेरिकन सैनिकांची शौर्यगाथा तर आहेच; पण युद्धाचे नाहक बळी ठरलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या हालअपेष्टांवरही प्रकाश पडलाय. यामुळे व्हिएतनाम युद्धातून अनेक गोष्टी शिकलेले अमेरिकन राज्यकर्ते आणि नागरिकांनी या पुस्तकाला डोक्यावर घेतलं नसतं, तरच आश्चर्य.

अर्थात, हे पुस्तक अमेरिकन बाजू मांडत होतंच; पण त्याबरोबर युद्धाची पाशवी बाजूही अप्रत्यक्षरीत्या समोर आणत होतं, हे विशेष. युद्धातून परतल्यावर हे पुस्तक लिहिताना आणि त्यानंतर त्यावर क्लिंट इस्टवूडसारखा लिजेंडरी दिग्दर्शक सिनेमा बनवताना ताया केली ही ख्रिस्तच्या सोबत होती. ख्रिस्तच्या पुस्तकावरचा हा सिनेमा जागतिक पातळीवर गाजणार, याबद्दल शंकाच नव्हती. ‘अमेरिकन स्नायपर’ विक्रीचे अनेक विक्रम मोडत असताना त्यावर बनणाऱ्या सिनेमाबद्दल लोकांची उत्सुकता वाढत जात होती. केली या सिनेमाच्या स्क्रिनप्लेवर काम करत होती. नेमका त्याच वेळी २ फेब्रवारी २०१३ला ख्रिस्तचा खून झाला. टेक्सासमध्ये इडी रे रुथ या २५ वर्षीय मरिन कॉर्पनं ख्रिस्त आणि कॅड लिटल फिल्ड या त्याच्या सहकाऱ्याला गोळ्या घातल्या. शूटींग रेंजमध्येच ही घटना घडली. मुख्य म्हणजे, इडी रे रुथ ख्रिस्तबरोबर इराकमध्ये तैनात होता. युद्धानंतरच्या मानसिक तणावातून तो जात होता. त्यावरच्या उपचाराचा भाग म्हणून ख्रिस्त आणि कॅड या दोघांनीच त्याला इथं आणलं होतं. अख्ख्या जगासाठी ही घटना धक्कादायक होती. तारा केलीचं भावविश्वच उद‌्ध्वस्त करून टाकणारी. पण ती त्यातूनही सावरली. तायानं पुस्तक लिहिलं, ‘अमेरिकन वाईफ ए मेमॉर ऑफ लव, सर्विस, फेथ अँड रिन्यूवल’. अमेरिकेतले सैन्य जगभरात आपल्या देशाचा झेंडा फडकवत असताना त्यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था असते, ते कोणत्या मन:स्थितीतून जातात, प्रचंड मानसिक दहशतीतून परतलेल्या सैनिकांशी जुळवून घेताना त्यांच्या कुटुंबीयांना कुठल्या दिव्यातून जावं लागतं, अशा सर्व विषयांना तिनं आपल्या या ‘अमेरिकन वाईफ’ पुस्तकात हात घातलाय. पण ताया फक्त इथेच थांबली नाही. अमेरिकन सैनिकांच्या विधवांना, त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि योग्य वागणूक मिळावी, यासाठी ती झटत राहिली. ख्रिस्तच्या जाण्याचं दु:ख तिनं या सर्व कामातून विसरण्याचा प्रयत्न केला. ती आता युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या असंख्य कुटुंबीयांची वकील बनलीय. त्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यासाठी तिनं मोहीम सुरू केलीय. दरम्यान ‘अमेरिकन स्नायपर’ सिनेमानं बेस्ट फिल्मसहित ऑस्करची सहा नामांकनं मिळवली आणि त्यापैकी बेस्ट अचिव्हमेन्ट इन साऊंड एडिटिंगचं अकादमी अवाॅर्डही पटकवलं. हे सर्व पाहायला ख्रिस्त केली नव्हता. पण तायानं ख्रिस्तचा लढा कायम ठेवलाय. आता तिनं Chris Kyle Frog Foundation ही संस्था सुरू केलीय. अमेरिकन वाईफ आणि ख्रिस्त केली फ्रॉग फाऊंडेशनच्या कामावरही सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे.

अमेरिका आणि युरोपात युद्धभूमीवर लढणारे अनेक सैनिक लिहिते झाले आहेत. युद्धभूमीवरच्या सैनिकांची डायरी म्हणून हे साहित्य ओळखलं जातंय. आणि अलीकडच्या काळात त्यावर सिनेमेही बनतायत, हे विशेष. म्हणजे पुस्तक बेस्ट सेलर आणि सिनेमा सुपरहीट, असा नवा फॉर्म्युला या सैनिकांच्या डायरींनी दिलाय.

‘अमेरिकन स्नायपर’ आणि ताया केलीबद्दल सांगताना आणखी एका सिनेमाचा उल्लेख इथं करणं गरजेचं आहे. सिनेमाचं नाव आहे, ‘कजाकी’(२०१४). अफगाणिस्तानातल्या हेलमंड आणि अर्गंदाब खोऱ्यात हेमलंड नदीवर हे कजाकी धरण आहे. या धरणाजवळ तैनात असलेल्या ब्रिटिश सैनिक तुकडीवरचा हा सिनेमा. धरणाजवळ झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात मार्क राईट हा २७ वर्षांचा ब्रिटिश सैनिक मारला गेला. तालिबानींना हुसकावून लावल्यानंतर ब्रिटिश आर्मीची पॅरा बॅटल ग्रुपची थर्ड बटालियन इथं तैनात होती. मार्क राईट हा याच तुकडीचा भाग होता.

धरणाजवळ गस्त घालताना भूसुरुगांचा स्फोट होऊन मार्क जबरदस्त जखमी झाला. त्याचा एक पायच शरीरापासून वेगळा झाला. त्याला वाचवण्यासाठी इतर सैनिक आले खरे, पण तेही भूसुरुंगाच्या जाळ्यात अडकले. त्यातून बाहेर पडण्यासाठी या सैनिकांनी केलेले प्रयत्न म्हणजे ‘कजाकी’ (२०१४) हा सिनेमा.
सोव्हिएत आर्मी आणि अफगाणिस्तानातले मुजाहिदीन यांच्यात १९७९ ते १९८९ असा सुमारे नऊ वर्षे संघर्ष सुरू होता. यातूनच सोव्हिएत सैन्यानं ही भूसुरुंगांची पेरणी केली होती, ज्याचा मार्क शिकार बनला. ‘कजाकी’ सिनेमा मार्क आणि त्याच्या सैनिक मित्रांची यशोगाथा सांगतोच, शिवाय युद्ध आणि यादवींमुळं उद‌्ध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानाची बाजूही तितकीच प्रभावीपणे मांडतो. वीरगती आलेल्या मार्क राईटला ब्रिटनमधलं उच्च समजलं जाणारं जॉर्ज क्रॉस मेडल(मरणोत्तर) मिळालं. २००६मध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेवर एक कमिशन नेमण्यात आलं होतं. ब्रिटनमधल्या ‘गार्डियन’ या वृत्तपत्रानं या कमिशनसंदर्भातल्या प्रत्येक बातमीला प्रसिद्धी दिली. सलग दोन वर्षे. २००८मध्ये जेव्हा या कमिशनचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला, तेव्हा ब्रिटन सैन्यदलातल्या अनेक छुप्या गोष्टी बाहेर आल्या. योग्य तयारीचा अभाव आणि विंच हेलिकॉप्टरसारख्या साधनांचा वापर न झाल्यानं ही घटना घडली होती, अशी माहिती पुढे आली. ‘कजाकी’ सिनेमामुळं ब्रिटनची युद्धनीती आणि सैनिकांसंदर्भातल्या विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. अगदी अलीकडे पार पडलेल्या ब्रिटनमधल्या निवडणुकीच्या वेळीही यावर चर्चा झाली. इंग्लंडमधील ऑस्कर समजला जाणाऱ्या ब्रिटिश अकादमी अवाॅर्डसाठी ‘कजाकी’चं नामांकन झालं. ‘अमेरिकन स्नायपर’ आणि ‘कजाकी’ हे दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या देशांतले आहेत. पण, या देशांसाठी जगातल्या कुठल्याही देशात जाऊन युद्ध करणाऱ्या सैनिकांची आयुष्यं समान खडतर आहेत. सैनिक मग तो जगातल्या कुठल्याही देशातल्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात असो, त्याचा आतला आणि बाहेरचा संघर्ष सतत सुरू असतो. युद्धभूमीवरून जरी तो परत आला तरी हा संघर्ष त्याचा पाठलाग सोडत नाही, हे या दोन्ही सिनेमांतून समोर येतं. यामुळंच जागतिक पातळीवर बाहेरून अगदी गौरवास्पद वाटणाऱ्या सैनिकी जीवनाची दुसरी खरी बाजू जगाला समजते. असे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा लढा जागतिक पातळीवर नेणाऱ्या ताया केलीसारख्या वीरपत्नींचं कौतुक वाटतं, ते त्यामुळेच.
(narendrabandabe@gmail.com)