आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्हीविरोधातला सिनेमॅटिक लढा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आफ्रिकेत असलेली फुटबॉलची प्रचंड क्रेझ आणि आफ्रिकेतील एचआयव्हीग्रस्तांचे वाढते प्रमाण, अशा दोन्ही गोष्टी नजरेसमोर ठेवून ‘आफ्रिका युनायटे’ड आणि ‘थेम्बा, अ बॉय कॉल्ड होप’ या दोन चित्रपटांची निर्मिती करण्यात आली.

२०१० फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्तानं अाफ्रिकेतली एड‌्सची समस्या जगासमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी सिनेमा माध्यमाचा परिणामकारक वापर करण्यात आला.
अाफ्रिका युनायटेड(२०१०) सिनेमा सुरूच होतो, तो डूडूपासून... १२-१३ वर्षांचा डूडू सिनेमाचा हिरो आहे. त्याची एन्ट्रीच फार मजेशीर आहे. अाफ्रिकेत फुटबॉल कसा तयार करायचा, हे डूडू पडद्यावर दाखवायला लागतो. ‘फुटबॉल तयार करायला सर्वात महत्त्वाची कुठली गोष्ट हवी, तर ती कॉन्डोम. युनायटेड नेशन ते पुरवतात. कॉन्डोममुळे एड्सचा प्रसार थांबायला मदत होते. रुनी, काका, हेन्री, रोनाल्डो, मेसी सगळेच ते वापरतात. सर्व राष्ट्राध्यक्षही वापरतात. दक्षिण आफ्रिकेच्या नेल्सन मंडेलांपासून ते थेट अमेरिकेच्या ओबामांपर्यंत सर्वच कॉन्डोम वापरतात. ‘कॉन्डोमचा वापर करा, सेफ सेक्स करा’ आणि सर्वात महत्त्वाचं, ‘प्ले सेफ एन्जॉय द गेम.’ डूडूचा हा डायलॉग संपेपर्यंत त्यानं हातातला कॉन्डोम फुगवून फुटबॉल बनवलेला असतो... २०१०ला दक्षिण आफ्रिकेत फुटबॉल विश्वचक स्पर्धा पार पडली. जगातल्या फुटबॉलप्रेमींसाठी महाकुंभमेळाच तो... याच वेळी आफ्रिका युनायटेड (२०१०) जगभरात रिलीज झाला.
आफ्रिका युनायटेड(२०१०)चं कथानक घडतं ते युगांडात... डूडू, फॅब्रिक आणि बिट्रीस या १२-१३ वर्षांच्या तिघांची ही गोष्ट आहे. फुटबॉलचे प्रचंड वेड असलेल्या या तिघांना जोहान्सबर्ग इथं जाऊन फुटबॉलची फायनल बघायचीय. त्यातूनच त्यांचा प्रवास सुरू होतो. या संपूर्ण प्रवासात अस्वस्थ युगांडाच नव्हे तर संपूर्ण आफ्रिकेची राजकीय आणि सामाजिक बाजू मांडण्यात आलीय. तिथला राजकीय संघर्ष हा नेहमीचाच. पण आफ्रिकेतली सर्वात मोठी समस्या काय असेल तर ती आहे, एड्स...
२०११मध्ये सब-सहारन आफ्रिकेतल्या एचआयव्ही आणि एड्सबाधित लोकांची एक आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. या क्षेत्रातले सुमारे २३.५ दशलक्ष लोक एचआयव्हीग्रस्त आहेत. यात लहान मुलांची संख्या ही २.३ दशलक्ष इतकी आहे. एचआयव्हीग्रस्तांच्या आकडेवारीच्या या तक्त्यात दोन महत्त्वाचे कॉलम टाकण्यात आले. पहिला म्हणजे, एचआयव्हीग्रस्त लहान मुलांची संख्या, जी प्रत्येक देशात लाखोंपासून हजारात आहे. दुसरा म्हणजे, एड्समुळे अनाथ झालेल्या मुलांची संख्या. ती तर काही सब-सहारन देशांमध्ये लाखोंमध्ये आहे. हे भयानक चित्र आहे. आफ्रिका युनायटेड(२०१०) सिनेमाचा हिरो डूडू आणि त्याचे मित्र-मैत्रिणी याच तक्त्यातल्या आकडेवारीत मोडणारे. अनाथही आणि एचआयव्हीग्रस्तही. त्यांचा सभोवताल अस्वस्थ आहे. सतत दहशतीखाली वावरणाऱ्या या मुलांसमोर करमणुकीचं एकच साधन आहे, फुटबॉल! तोही असा, युनायटेड नेशन म्हणजेच राष्ट्रसंघानं दिलेल्या कॉन्डोमचा बनलेला. रोनाल्डो, रुनी, मेसी हे या सर्वांचे हिरो.
जोहान्सबर्गपर्यंतच्या प्रवासात डूडू आणि त्याच्या मित्रांचे हेच फुटबॉल प्रेम आणि २०१० फुटबॉल वर्ल्डकप फायनल बघायला जाण्याचा त्यांचा प्रवास, या वेळी त्यांना आलेले अनुभव, युगांडातला लॉर्ड रेसिस्टंट आर्मी आणि सरकारमध्ये होणारा संघर्ष, आणि रक्तपात. हे सर्व पार करून हे मित्र जोहान्सबर्गपर्यंत कसे पोहोचतात, हीच ‘आफ्रिका युनायटेड’ची स्टोरी आहे. कमी-अधिक प्रमाणात त्याला ‘रोड मुव्ही’ म्हटले तरी चालेल; पण वाढत्या एचआयव्हीग्रस्त आफ्रिकन देशांची नेमकी स्थिती मांडायचं काम या सिनेमातून केलंय, हे विशेष...
२०१० फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्तानं आफ्रिकेतली एड‌्सची समस्या जगासमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी सिनेमा या माध्यमाचा जेवढा प्रभावी वापर करण्यात आला, तसा यापूर्वी कधीच झाला नव्हता. खरं तर आफ्रिका युनायटेड हा अशा प्रकारचा एकमेव सिनेमा नव्हता. असे अनेक सिनेमे या वेळी बनले. आफ्रिकेत काम करणाऱ्या अनेक एनजीओंनी या सिनेमांचा वापर एड‌्ससंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी केला. कम्युनिटी स्क्रिनिंगच्या माध्यमातून हे सिनेमे दाखवण्यात आले. या सिनेमांमधले कथानक जास्त करून १०-१५ वयोगटातल्या आफ्रिकन मुलांशी जोडलेले. कारण, त्यांची संख्या आफ्रिकेत जास्त आहे. या वयात एड‌्सची माहिती दिली तर कदाचित या रोगाचा प्रसार होण्यात थोडा तरी आळा बसेल, अशी त्यामागची अपेक्षा. आफ्रिकेत फुटबॉलची जबरदस्त क्रेझ आहे. या क्रेझचा वापर करत एड‌्ससहित आफ्रिकेतल्या इतर सामाजिक आणि राजकीय स्थितीचा उलगडाही करण्यात आला, हे विशेष.
‘थेम्बा, अ बॉय कॉल्ड होप’ (२०१०) हा अशा सिनेमांच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर येईल. आफ्रिका युनायटेड हा सिनेमा डूडू आणि त्याच्या मित्रांच्या जोहान्सबर्गपर्यंतच्या सफरीची गोष्ट सांगतो. पण थेम्बा यापुढे जाऊन आफ्रिकेत एड्स वाढण्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. थेम्बाही डूडू आणि त्यांच्या मित्रांसारखाच. फुटबॉलची क्रेझ असलेला. पण थोडासा वेगळाही आहे. तो फुटबॉल फक्त शौक म्हणून खेळत नाही, तर तो त्याकडे करियर म्हणून पाहतो. त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरचं खेळाडू व्हायचंय. त्यासाठी कितीही मेहनत करायची त्याची तयारी आहे. पण समस्या इथंच संपत नाहीत. थोडे जास्त पैसे कमावण्यासाठी त्याची आई शहरात जाते. तिथे एड्सची बळी ठरते. त्याच्यामुळे थेम्बालाही एचआयव्हीची बाधा होते. पण एचआयव्ही/एड्स झाला, म्हणजे आयुष्य संपलं, असं नाही होत. फुटबॉल खेळण्याचं त्याचं स्वप्न अर्धवट राहात नाही. एड्स त्याच्या आड कधीच येत नाही. औषधांमुळं काही प्रमाणात का होईना, ‘लाइफ स्पॅन’ वाढतो, असं सांगणारी ही थेम्बाची स्टोरी...
The Cinema for Peace Foundation या एनजीओने थेम्बाची स्टोरी गावागावांत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली होती. २०१०-२०११ या वर्षभरात हजारो आफ्रिकन खेड्यांमध्ये ‘थेम्बा’चे शो करण्यात आले. या स्क्रिनिंगनंतर एड्ससंदर्भात चर्चा असायची. एकट्या दक्षिण आफ्रिकेतल्या नऊ प्रांतात हा सिनेमा दाखवण्यात आला. वर्ल्डकपच्या मॅचेस होत असलेल्या केपटाऊन शहरात तर नोबल पारितोषिक विजेते आर्चबीशप देसमंड टूटू यांनी सिनेमावर प्रेझेन्टेशन दिलं. इतकंच नव्हे, तर त्याला आफ्रिकेपुरतं मर्यादित न ठेवता, जागतिक पातळीवर ही समस्या समजण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले.
जर्मनीतल्या शाळांमध्ये हा सिनेमा दाखवला गेला. ‘युथ अगेन्स्ट एड्स’ या नावाखाली थेम्बा कम्युनिटी स्क्रिनिंग कॅम्पेनची आखणी करण्यात आली होती. हे सर्व काही दक्षिण आफ्रिकेलाच नव्हे तर जगाला विळखा घालणाऱ्या एचआयव्ही/एड्स या असाध्य रोगाला रोखण्यासाठी. जागतिक पातळीवर सिनेमाचा वापर अशा प्रकारे करण्याचे हे एकमेव उदाहरण होते आणि प्रभावीही.

narendrabandabe@gmail.com