"व्हाइटशॅडो’ नावाचा टांझानियातला
सिनेमा या भागात घडत असलेल्या चित्रविचित्र बदलांना टिपतो. ते बदल दाखवत
असताना सिनेमातला कॅमेरा स्थिर राहात नाही, तो सतत हलतोय.
ही तिथली जीवनशैलीच आहे. सर्व काही अस्थिर, अस्वस्थ. ही अस्वस्थता आदिम काळापासूनची आहे. पण मग अंतही असाच असेल का?
टांझानिया, केनिया, युगांडा या देशांची नावं घेतली तरी आठवतात, ती आदिमानवासारखी चेहरेपट्टी असलेली काळीकभिन्न माणसं आणि त्यांचा अस्वस्थ सभोवताल. यातले असंख्य लोक अजूनही जंगलात राहतात, आदिवासींसारखेच. धनुष्यबाण आणि भाला हातात घेऊन शिकारीवर जातात. शिकार हाती लागली तर पाड्यात जल्लोश होतो. रंगवलेल्या चेहऱ्यांनी शेकोटीभोवती नाचत हा शिकारीचा उत्सव साजरा करतात. बाहेरच्या आधुनिक जगाशी यांचा काहीही संबंध नाही. हे झालं जंगलात राहणाऱ्या कृष्णवर्णीय आदिवासींचं जगणं; पण इथलेच काही थोडे प्रगत झाले, त्यांनी जंगल सोडलं, शहरांकडे स्थलातंरित झाले. शहरात आता तंबूसारख्या दिसणाऱ्या राहुट्यांचं आणि झोपड्यांचं साम्राज्य आहे. झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांचं जगणं हे जंगलापेक्षाही भयानक. जंगलात शिकारीची सोय आहे, पण शहरात तसं नाही. इथं जगणं आणखी कठीण आहे. आधुनिक आणि प्रगत बनण्याची ही प्रक्रिया आफ्रिकेत इतक्या कासवगतीनं सुरू आहे की, खरंच हे या जगात राहतात का, याबद्दल शंका वाटेल. अस्वस्थ आफ्रिकेतल्या अशा काही शहरांमध्ये झोपड्यांचं जंगल आहे. मग बाहेरच्या जगाचे कुठलेही नियम त्यांना लागू पडत नाहीत. जग अंतराळात सफर करत आहे, अशा वेळी अाफ्रिकेत सगळा अंधार आहे. इथली माणसंही काळी आणि त्यांच्या सावल्याही. पण ‘व्हाइट शॅडो’(२०१३) नावाचा टांझानियातला सिनेमा या भागात घडत असलेल्या चित्रविचित्र बदलांना टिपतो. ते बदल दाखवत असताना सिनेमातला कॅमेरा स्थिर राहात नाही, तो सतत हलतोय. ही तिथली जीवनशैलीच आहे. सर्व काही अस्थिर, अस्वस्थ. ही अस्वस्थता आदिम काळापासूनची आहे. पण मग अंतही असाच असेल का? इथल्या लोकांची स्वप्नं काय असतील? त्यांच्या दृष्टीनं यश म्हणजे काय? जिथं रोज जगण्यासाठी
आपल्यासारख्या माणसाला ठार करून खाण्याची पद्धत काही वर्षांपूर्वी होती, अजूनही आहे थोड्याफार प्रमाणात; अशा देशांमधल्या लोकांचे विचार काय असतील? त्यांच्या दृष्टीनं अच्छे दिन काय असू शकतात? ‘व्हाइट शॅडो’(२०१३) सिनेमात याच विचारांचा पाठलाग आहे.
टांझानियातलं हे जगणं फार अस्वस्थ करणारं आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला नेहमी या भागातल्या लोकांचं जगणं किती अस्थिर आहे, हे वारंवार सांगायचे. आता हळूहळू त्यांची प्रगती होतेय, असा आशावाद त्यांनी दिला होता. आफ्रिकन लोकांची प्रगती जर होत असेल तर मग अजूनपर्यंत या खंडाच्या अगदी अंतर्गत भागात राहणारा आफ्रिकन माणूस तेवढाच हिंसक का आहे? या सर्व गोष्टींचे चित्रण ‘व्हाइट शॅडो’ पाहणाऱ्याला अस्वस्थ करून टाकते. इतकं अस्वस्थ वाटतं की, सिनेमा का पाहिला, असा प्रश्न मनात उभा राहतो. पण सिनेमाच्या शेवटी जो आशावाद दिग्दर्शक नोएझ डेश यांनी दिलाय, तो खरंच माणुसकीकडे जाणारा आहे.
टोळीयुद्धानं ग्रासलेला हा भाग तेवढा मागे राहिलेला नाही. त्यांच्याकडे बंदुका आल्यात. त्याचा वापर फक्त प्राण्यांच्या शिकारीसाठी नाही, तर एकमेकांची शिकार करण्यासाठी जास्त होतोय. ‘व्हाइट शॅडो’चा हिरो पांढरा आहे. पांढरा म्हणजे अल्बिनोग्रस्त. त्याचे दोन भाऊही तसेच. अल्बिनोग्रस्त वडिलांच्या हत्येपासून सिनेमाची सुरुवात होते. त्या अगोदर अलियास आपलं स्वप्न बोलून दाखवतोय. पांढऱ्या शुभ्र वाटेवर जाण्याचं. पांढऱ्या ढगांमध्ये उडण्याचं. तिथून सारं जग बघण्याचं. हे स्वप्न पूर्ण होतं ना होतं तोच, त्याच्या वडिलांना मारलं जातं. मग आई त्याला काकांबरोबर शहरात पाठवते. आपल्या पाडातून जाताना आई त्याला दोन गोष्टी सांगते. एक म्हणजे, शहरात जिवंत राहा आणि दुसरं म्हणजे, कंडोम वापर; तसेच एड्सच्या आहारी जाऊ नकोस. इथून शहरातल्या त्याच्या जगण्याच्या संघर्षाला सुरुवात होते आणि मिचमिच्या डोळ्यांनी जग बघायलाही. या प्रवासात महत्त्वाचं असतं, स्वत:चं माणूसपण टिकवणं. अस्वस्थ सभोवताल आणि चित्रविचित्र अनुभवांमुळं अलियासचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय. त्याची स्वप्नं या अनुभवांमध्ये धूसर झाली आहेत. अाफ्रिकेतल्या आतल्या भागात काय सुरू आहे, हे अलियासच्या प्रवासात प्रेक्षकांना समजतं. तो एका दृष्टीनं प्रेक्षकांचाही प्रवास असतो. जेवढा अलियासला अस्वस्थ करणारा, तेवढाच प्रेक्षकांनाही. इतका अस्वस्थ करणारा सिनेमा पुढे पाहावा की नाही, असं मनात येऊन जातं.
आफ्रिकेत ख्रिस्ती धर्म खूप आधीच पोहोचलाय; पण तो अजूनही पसरवला जातोय आणि त्यासोबत इंग्रजीही. राहुट्यांच्या जंगलात सर्वात चांगली आणि स्वच्छ जागा म्हणजे चर्च! हातात बायबल आणि सफेद रंगाचा ओवर कोट घातलेले पाद्री आसपासच्या झोपड्यांच्या जंगलात फिरून तिथले जास्तीत जास्त लोक ख्रिस्ती धर्माकडे कसे येतील, यासाठी दिवसरात्र प्रयत्न करताना दिसतात. सिनेमात ही बाब प्रकर्षानं दाखवण्यात आलीय. ‘व्हाइट शॅडो’चा हाही एक अर्थ लावता येईल. हीच खरी ‘व्हाइड शॅडो’ आहे. या व्हाइट शॅडोनं काळ्या अाफ्रिकेला व्यापून टाकलंय. मिशनरी म्हणून आलेले हे गोरे लोक पोटभर जेवण आणि सुरक्षेचं आश्वासन देऊन या लोकांना आपलंसं करतात. जसे हे मिशनरी आहेत, तसेच त्यांच्या अतिरेकाचे विरोधकही आहेत. त्यांतही नेहमी संघर्ष होत असतो. ख्रिस्ती धर्माप्रमाणे इथं इंग्रजी भाषाही अशी पद्धतशीरपणे पसरवली जातेय. सिनेमात एक सीन आहे, जिथं अलियासची मैत्रीण त्याला विचारते, तुला इंग्रजीतला जिजस ख्राइस्ट माहितेय का? तो ‘होय’ म्हणतो. मग ती म्हणते, त्याच्यासोबत मला आणखी एक इंग्रजी शब्द येतो, फक! सिनेमात एक सीन आहे, जिथं ओबामाच्या पडद्यामागे उभा राहिलेल्या पांढऱ्या अलियासला त्याची काळी मैत्रीण परत जायला सांगते. तू आमच्यातला नाहीस; परत जा, हे तिचं सांगणं फार सांकेतिक आहे. खरं तर कुठल्या समाजाची घडी बसवण्यासाठी धर्माची गरज नाही, हेच दिग्दर्शकाचं म्हणणं. इराणचा दिग्दर्शक मोहसीन मखमलबाफ सांगतो, तसा त्यांना जास्त माणूस बनवणं गरजेचं आहे.
(narendrabandabe@gmail.com)