आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूक 'हिटलर' इज बॅक !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष २०११...स्थळ बर्लिन... जर्मनीची राजधानी... नाझी आर्मी ड्रेस घालून एक जण रस्त्यावर आलाय... वय झालं असलं, तरी चालण्यात एक रग आहे. तशी ती बोलण्यातही आहे... होय, तो परत आलाय... अडॉल्फ हिटलर! दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी खरं तर हिटलरनं आत्महत्या केली नाही, तर तो इतकी वर्षं बंकरमध्ये होता. लपलेला... जगापासून दूर... ६७ वर्षं बंकर हेच त्याचं जग होतं. बाहेर काय चाललंय, त्याला माहीत नाही...
अजूनही युद्ध सुरू आहे, असं त्याला वाटतंय. तो बंकरमधून अचानक बाहेर आला आहे, मात्र आता त्याला इतरत्र बंकर सापडत नाहीए... बाहेर विमानांचा, तोफगोळ्यांचा आवाज नाही. दिसताहेत फक्त उंचच उंच काचेच्या इमारती... हे सर्व असं कुणी बदललं?... मला कुणी का नाही विचारलं? असा विचार करत असताना, त्याला रस्त्यावर खेळणारी मुलं भेटतात... या वेषात पाहून त्यातला एक जण हिटलरला विचारतो, ‘यू ऑल राइट बॉस?’ यानं आपल्याला ‘फ्युरर’ का म्हटलं नाही? असं हिटलरच्या मनात येतं. त्याचा रागही येतो, पण तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. समोरच्या न्यूजपेपर स्टँडकडे त्याचं लक्ष जातं. तिथं टर्किश न्यूजपेपर विकले जाताहेत, हे त्याला असह्य होतंय. शहरभर फिरणारा हा असा हिटलर न्यूज चॅनलच्या काही प्रोड्यूसर्सच्या तावडीत सापडतो. त्याचा पेहराव, त्याची भाषा पाहून ते खुश होतात. त्याला आपल्या विनोदी कार्यक्रमात आणतात. हा हिटलर तिथं ज्यूंविरोधात भाषण ठोकतो. अगदी पूर्वीसारखाच. त्याच तावात. एकदम सिरीयसली. पण आजूबाजूचे हसताहेत. मग त्याचा हा विनोदी कार्यक्रम रोजच सुरू होतो. त्या चॅनलचा टीआरपी उंचावतो. हिटलर पुन्हा स्टार बनतो! पण स्टँडप कॉमेडियन म्हणून! अगदी आपल्या ‘कॉमेडी नाईट’वाल्या कपिल शर्मासारखा! टिमूर वेर्मेसचं ‘लूक हु इज बॅक’ पुस्तक वाचताना हसून हसून जीव जायची पाळी येते.

टेलिव्हिजन स्टार झालेला हा हिटलर जर्मनीतल्या आजच्या राजकारणावर बोलतो. सर्वसामान्य जनतेला राजकारणाचा कसा वीट आलाय, हे पोटतिडकीनं सांगतो. हेच खरं तर खूप हसवणारं आहे. मूळ जर्मन भाषेत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकावर जर्मनांनी अक्षरश: उड्या मारल्या. ते बेस्टसेलर ठरलं. एकट्या जर्मन भाषेत पुस्तकाच्या सुमारे २० लाख प्रती विकल्या गेल्या. इंग्रजी भाषांतराला वेळ लागला खरा; पण जेव्हा मार्च २०१५ला ४०हून अधिक देशांमधल्या बुक स्टॉल्सवर ते पोहोचलं, तेव्हा विक्रीचे विक्रम मोडीत निघाले. आता या पुस्तकावर सिनेमा येतोय. Er ist wieder da (२०१५) ‘लूक हू इज बॅक’चं हे जर्मन नाव आहे. ऑलिवर मॅस्युकी हा अगदी नवा अभिनेता हिटलरची भूमिका करतोय. तो दिसतोही हिटलरसारखा, अगदी सेम टू सेम! डेविड वेंड्ट सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. ऑक्टोबर २०१५ला ‘लूक हू इज बॅक’ रिलीज होईल. बेस्टसेलर पुस्तकातला कॉमेडियन हिटलर पाहण्यासाठी जगभरात गर्दी होईल.

हिटलरनं इतिहास घडवला. घडवला म्हणण्यापेक्षा, जगाचा इतिहास बदलला. सिनेमा हे हिटलरचं आवडतं माध्यम होतं. नाझी काळात त्यानं प्रपोगांडा, म्हणजे स्वत:च्या विचारांची भलामण करणारा सिनेमा बनवला. आपण जे करतोय तेच कसं योग्य आहे, हे जगाला दाखवून देण्यासाठी ‘ट्रम्प ऑफ दी विल’ नावाची सिरीजच बनवली. लेनी रिफेन्स्ता या दिग्दर्शकानं नाझींच्या या प्रपोगांडा फिल्म्स भव्यदिव्य केल्या. एरियल शूटिंगपासून थेट लष्करी ट्रेनिंग ते युद्धांचं खरं फुटेज सिनेमात वापरलं गेलं. म्हणून हे सिनेमे पाहताना अंगावर येतात. याचाच फायदा हिटलरनं घेतला. हिटलरनेच नाझी राजवटीसाठी लोकांचं मत आपल्या बाजूनं वळवलं. सिनेमाचा वापर राजकारणासाठी वापरण्याची ही पहिलीच वेळ होती. सोविएतमध्ये असा प्रयोग झाला होता. पण हिटलरनं तो यशस्वी करून दाखवला. जगाला नाझींकडे असं सिनेमॅटिक पद्धतीनं बघायला शिकवलं. हिटलरवर बनलेला चार्ली चॅप्लिनचा ‘द डिक्टेटर’ (१९४०) भन्नाट आहे. चार्लीनं साकारलेला हिटलर आजही जगभरच्या प्रेक्षकांना हसवतोय. Er ist wieder da (२०१५) ती जागा घेईल, अशी चर्चा सध्या जागतिक सिनेवर्तुळात आहे.

दुसर्‍या महायुद्धानंतर हिटलरवर असंख्य कथा-कादंबर्‍या लििहल्या गेल्यात. तो मिथ बनलाय... रॉबर्ट हारीस या बीबीसीच्या पत्रकारानं हिटलरवर अनेक कादंबर्‍या लििहल्या. त्यातल्या फादरलॅन्ड आणि सेलिंग हिटलर– द स्टोरी ऑफ हिटर डायरीज या दोन कादंबर्‍या चांगल्याच गाजल्या. फादरलँड १९९२मध्ये बेस्ट सेलर ठरली. दुसरं महायुद्ध हिटलरनं जिंकलंय. १९६४ला हिटलर ७५ वर्षांचा झालाय. झेवियर मार्च या डिटेक्टिव्हला बर्लिन शहरापासून काही अंतरावर असलेल्या तलावात एक मृतदेह दिसतो. तो नक्की कुणाचा आहे, हे शोधण्याचा तो प्रयत्न करतो. यात त्याला साथ मिळते, ती अमेरिकन पत्रकाराची. आता जसजसं या प्रकरणाचं पेपरमध्ये रिपोर्टिंग होतं तसतसं गेस्तापो म्हणजे, नाझी सिक्रेट सैनिक या दोघांच्या मागे लागतात. यातूनच कादंबरीत संघर्ष आणि रंजन घडत जाते. १९९४ ला ‘फायदरलँड’ या नावानेच या कादंबरीवर सिनेमा बनला होता.

‘सेलिंग हिटलर– द स्टोरी ऑफ हिटर डायरीज’ ही कादंबरीही तेवढीच रोमहर्षक आहे. कादंबरीचं कथानक १९८१मध्ये घडतं. ‘स्टर्न’ या जर्मन मॅगझीनचा वॉर करस्पाँडंट ग्रेड हेडमनला हिटलरची पर्सनल डायरी मिळते. साहजिकच या डायरीला जागतिक महत्त्व आहे. मग ग्रेड आणि मॅगझीनमधला त्याचा साथीदार ही डायरी विकण्याचा प्रयत्न करतात. अनेक जण या डायरीसाठी लाखो डॉलर्सची बोली लावतात. हिटलरनं आपल्या पर्सनल डायरीत काय लिहून ठेवलंय? दुसर्‍या महायुद्धात जगावर राज्य करण्याचं स्वप्न बाळगणारा हा माणूस नक्की काय विचार करत होता? या डायरीत सिक्रेट कोड तर नव्हता? त्या कोडची उकल तर नव्हती? अशा असंख्य प्रश्नांचा थ्रील कादंबरीत अनुभवायला मिळतो. १९९१मध्ये ब्रिटनमधल्या ITV चॅनलनं पाच भागांत कादंबरीवरची टेलिव्हिजन सिरीज चालवली. एलेस्टर रेडनं या मिनी सिरीजचं दिग्दर्शन केलं होतं. या दोन्ही फिल्म्सनंतर सुमारे ३० वर्षांनी हिटलरवर बनत असलेला Er ist wieder da (२०१५) म्हणजे ‘लूक हू इज बॅक’ हा बिग बजेट सिनेमा आहे. नव्या कॉमेडी हिटलरचा जगाकडे आणि जगाच्या राजकारणाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन कादंबरीतून दाखवण्यात आलाय. तसाच तो सिनेमातही असेल, असा दावा सिनेमाचे निर्माते कॉन्स्टँटिन फिल्मकडून करण्यात येतोय. सिनेमाबद्दलची उत्सुकता जगभरात लागून राहिलेय, ती त्यामुळेच.

नरेंद्र बंडबे
narendrabandabe@gmail.com
बातम्या आणखी आहेत...