आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Bandabe Article About Mohsen Makhmalbaf

लोकशाही हा परिपूर्ण पर्याय नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाची सुरुवात मखमलबाफच्या "प्रेसिडेंट’ सिनेमानं झाली. मखमलबाफला हा सिनेमा अफगाणिस्तानात सुचला. तालिबानच्या पाडावानंतर तो अफगाणिस्तानात गेला होता. तिथं एका उद‌्ध्वस्त महालात फिरताना त्याला प्रेसिडेंटचा विषय सुचला. तब्बल १२ वर्षे यावर काम सुरू होतं. मागल्या काही वर्षांत अस्वस्थ अरब देशांमुळं आपला सिनेमा योग्य मार्गावर जात असल्याची खात्री मखमलबाफला झाली. ‘प्रेसिडेंट’चं कथानक घडतं एका काल्पनिक देशात. तिथं हुकूमशाही आहे. या हुकूमशाहीत या देशात सर्व काही ठीक चाललंय. एके संध्याकाळी हा हुकूमशहा आपल्या नातवाबरोबर एक खेळ खेळायला सुरुवात करतो. एका इशार्‍यावर देशातले दिवे बंद आणि सुरू करण्याचा हा खेळ. पण तो सुरू असतानाच देशात उठाव होतो. प्रेसिडेंट तातडीनं आपलं कुटुंब परदेशी पाठवतो. नातू मात्र त्याच्याबरोबरच राहतो. आज ना उद्या या उठाव करणार्‍यांचा बीमोड होईल आणि सत्ता पुन्हा आपल्या हाती येईल, अशी प्रेसिडेंटची आशा. पण घडतं भलतंच. प्रेसिडेंट आणि त्याच्या नातवाचा जगण्याचा संघर्ष सुरू होतो.

या संघर्षात त्याचा नातू मृत्यू म्हणजे काय? हुकूमशाही म्हणजे काय? टॉर्चर किंवा हिंसाचार म्हणजे काय? असे अनेक प्रश्न आपल्या आजोबाला विचारतो. आजोबा त्याची खरीखरी उत्तरं देतो. नातवाच्या दृष्टीनं हा खेळ सुरू आहे, तर आजोबाला स्वत:बरोबर नातवालाही वाचवायचंय. हा खेळ जीवघेणा आहे. यात हुकूमशहानं केलेला हिंसाचार ठिकठिकाणी अनुभवायला मिळतो आणि या हुकूमशहाला आपण केलेल्या क्रूरतेची जाणीवही व्हायला लागते. पण सध्या तरी त्याचं एकच ध्येय आहे ते म्हणजे, कुठल्याही परिस्थितीत तग धरून राहणं. सिनेमाच्या शेवटी, नुकताच सुटका झालेला राजकीय कैद्यांचा एक ग्रुप त्यांना भेटतो. सततच्या मारहाणीमुळं या कैद्यांना नीटपणे चालताही येत नाहीए. मग हुकूमशहा स्वत:च यापैकी एकाला खांद्यावर घेतो. कारण यांच्यासोबत चालत राहिलो तर वाचू, असं त्याचं समीकरण असतं. मग या हुकूमशहाचं बिंग उकलतं का? यावर पुढचा सिनेमा आहे. सिनेमाचा शेवट लोकशाही हा हुकूमशाहीला परिपूर्ण पर्याय आहे का? या प्रश्नावर होतो. खरं तर सिनेमा जिथं संपतो, तिथंच विचारप्रक्रियेलाही सुरुवात होते...

मखमलबाफ वयाच्या सतराव्या वर्षी तुरुंगात गेला होता. एका पोलिस अधिकार्‍याला ठार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. खरं तर तो राजकीय कैदी होता. १९७९च्या इराणमधल्या इस्लामिक उठावानंतर राष्ट्राध्यक्ष खोमेनींनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका केली. मखमलबाफ जेलबाहेर आला, तोच सिनेमा बरोबर घेऊन. हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याची त्याला जाणीव झाली. पण इराणमध्ये धर्मनिरपेक्ष हुकूमशाहीची जागा नव्या धर्मांध विचारांनी घेतली. हे जास्त कट्टर होते. लोकांचं स्वातंत्र्य गेलं, धर्मनिरपेक्षता गेली आणि थोडीफार असलेली लोकशाहीही गमावली. मखमलबाफमधल्या संवेदनशील कलाकारासाठी हा धक्का होता. कारण यासाठी त्यानं आंदोलन केलं नव्हतं. हुकूमशाहीनंतर आलेली ही धार्मिक सत्ता घातक होती. इस्लामिक उठावात सामील झालेल्यांना हे अपेक्षित नव्हतं. खरं तर त्यानंतर इराण मुस्लिम राष्ट्र म्हणून जास्त कट्टर बनला. ही एक धार्मिक हुकूमशाहीच होती. एका प्रकारच्या हुकूमशाहीविरोधात लढा दिल्यानंतर तिला पर्याय म्हणून उदयास आलेली ही दुसर्‍या प्रकारातली हुकूमशाही इराणच्या एकूणच समाजावर परिणाम करू लागली. मखमलबाफमधल्या कलाकारानं याविरोधात उठाव केला. बॉयकॉट, गाब्बे, सायकलिस्ट, सलाम सिनेमा सारख्या सिनेमांमधून त्यानं सतत इराण सरकारच्या धोरणांवर टीका केली. अर्थातच, टीका सांकेतिक स्वरूपाची पण प्रभावी होती. सर्वसामान्यांना जगण्यासाठी होणारा त्रास तो दाखवत होता आणि स्वत:ही तसंच जगत होता. इराणमधल्या सेन्सॉरशिपच्या नावाखाली होणार्‍या गळचेपीला कंटाळून त्यानं काही वर्षांपूर्वी इराण सोडला. खरं तर अब्बास किओरोस्तमी आणि मखमलबाफचं इराण सोडणं, जवळपास एकाच वेळी घडलं होतं.

गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण अरब राष्ट्रे अस्वस्थ आहेत. इराकपाठोपाठ लिबिया, सिरिया आणि इजिप्तमध्ये जनआंदोलनाच्या नावाखाली उठाव झाला, सामाजिक पातळीवरची अस्वस्थता राजकीय लढ्यात परावर्तित झाली. पण पर्याय तयार झाला का? नाही. इराणमध्ये जे घडलं, तेच या राष्ट्रांमध्ये कमी-अधिक प्रमाणात घडत होतं. एक सिस्टिम कोलमडून दुसरी उभी राहत होती, पण ती परिपूर्ण पर्याय बनत नव्हती. मखमलबाफचा ‘प्रेसिडेंट’ लोकशाहीच्या विचारांवर संपतो, पण लोकशाही परिपूर्ण पर्याय नाही, यावर तो ठाम आहे. लोकशाही आली म्हणजे सर्व काही ठीक झालं, असं झालेलं नाही. माणूस म्हणून जगणं फार महत्त्वाचं आहे. त्याला जगू देणं महत्त्वाचं आहे. शेवटी माणूस आणि माणुसकी महत्त्वाची. पण लोकशाहीत असं होत नाहीए, असं तो म्हणतो.

सिनेमाच्या शेवटी पकडलेल्या हुकूमशहाला ठार मारून टाकावा, अशी जोरदार मागणी होते. पण इथं दुसरा विचार जन्माला येतो. याला मारला तर जन्माला येणारी नवीन सिस्टिम चांगली असेल, याची शाश्वती काय? इथं मखमलबाफ महात्मा गांधींचे विचार मांडतो. हिंसाचाराने फक्त हिंसाचार पसरतो. गांधींच्या या विचाराला धरून मखमलबाफ प्रेक्षकांना प्रश्न विचारतो, त्यांना अस्वस्थ करतो. लोकशाहीवर त्याला पूर्ण विश्वास नाही. भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं उदाहरण देताना तो म्हणतो की, या देशात अनेक सामाजिक समस्या आहेत. लोकशाहीत लोकांना देशाच्या व्यवस्थापनाचा अधिकार मिळतो. तसा तो भारतात खरंच मिळतोय का? अमेरिकेतली लोकशाही फक्त नावापुरती आहे. दोन मोठे पक्ष मतांसाठी एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यासाठी वाट्टेल ते करतात. पण निवडून आल्यावर मतदारांना खरंच काही अधिकार राहतो का? मग लोकशाही हुकूमशाहीला पर्याय कसा होईल, असा थेट सवालच तो करतो. म्हणूनच त्याचा ‘प्रेसिडेंट’ हा समकालीन सिनेमा वाटतो.
पुढे वाचा, मखमलबाफचं भारत कनेक्शन...

narendrabandabe@gmail.com