आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकल्‍पित युद्धनाट्य!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९९८... जपानच्या नगानो शहरात जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांचं असं जंगी स्वागत होईल, असा त्यांनी कधीच विचार केला नव्हता. त्या दिवशी पाऊस पडत होता. ८१ वर्षांचे लुईस झॅम्परिनी याच पावसात ऑलिम्पिक टॉर्च घेऊन धावले. त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. लुईस झॅम्परिनी यांनी टॉर्च हातात घेताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
झॅम्परिनीही प्रत्येकाचं अभिवादन स्वीकारत होते. कोण होते हे लुईस झॅम्परिनी? इतिहासात त्यांची नोंद दुसऱ्या महायुद्धातले अमेरिकन युद्धकैदी म्हणून आहे. मग या युद्धकैद्याला इतकं महत्त्व मिळण्याचं कारण काय? याचं उत्तरही इतिहासाच्या पानांमध्ये मिळतं. लुईस झॅम्परिनी हे अमेरिकेतले धावपटू होते. ऑलिम्पिक धावपटू. १९३६मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सर्वात शेवटची फेरी ५६ सेकंद या विक्रमी वेळेत पार करण्याची नोंद झॅम्परिनी यांच्या नावावर आहे. त्यांनी स्पर्धा जिंकली नव्हती, पण शेवटच्या फेरीत धावताना केलेला हा विक्रम जागतिक पातळीवरचा होता. त्यांची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. यावर त्यांना फक्त टोरेन्स टोर्नाडो म्हणून ओळखलं जायचं. आता या विक्रमानं त्यांना नवीन ओळख दिली होती. खुद्द हिटलरनं त्यांचं कौतुक केलं. आता पुढची ऑलिम्पिक स्पर्धा झॅम्परिनीच्या नावावर असणार, असं बोललं जात होतं. पुढचं टार्गेट होतं जपान. टोकियोत होणारी ऑलिम्पिक स्पर्धा. यासाठी त्यांनी जोरदार सराव करायला सुरुवातही केली होती. पण तेवढ्यात दुसऱ्या महायुद्धाचं बिगुल वाजलं आणि सैन्यात भर्ती झालेले झॅम्परिनी युद्धभूमीवर पोहोचले; तेही थेट जपानमध्ये. यानंतरचं झॅम्परिनी यांचं आयुष्य अतिशय नाट्यपूर्ण आहे. हे सर्व नाट्य एकत्र करत, लॉरा हिलेनब्रान्ड यांनी त्यांची आत्मकथा लिहिली ‘अनब्रोकन-अ वर्ल्ड वॉर सेकंड-स्टोरी ऑफ सर्व्हायवल, रिसिलिन्स अँड रिडम्पशन’. या नाट्यपूर्ण आत्मकथेवर सिनेमा बनणं साहजिकच होतं. तो विडा हॉलीवूडची अभिनेत्री एन्जेलिना जोलीनं उचलला आणि २०१४मध्ये ‘अनब्रोकन’ बॉक्स ऑफिसवर धडकला.

ज्या जपानमध्ये जाऊन लुईस झॅम्परिनी ऑलिम्पिकसाठी धावण्याचं स्वप्न पाहात होते, तिथं जाऊन विमानातून बॉम्ब टाकण्याची पाळी त्यांच्यावर आली. अमेरिकेच्या बेस कॅम्पमधून विमान घेऊन उडायचं, टार्गेट ज्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी जाऊन बॉम्बवर्षाव करायचा. अनेकदा हवेतच शत्रू सैन्याचा सामना करायचा आणि त्यांच्या हल्ल्यातून स्वत:च्या विमानाला वाचवत पुन्हा बेसवर परतायचं. मग दिवसभर काय काय केलं, याचा हिशेब लावायचा. त्याची नोंद करायची. कधी फक्त बॉम्ब टाकण्यासाठी, तर कधी शत्रूच्या तावडीत अडकलेल्या आपल्या सैनिकांना परत आणण्याच्या मोहिमेत लुईस झॅम्परिनी सामील व्हायचे. या युद्धात अनेक मित्र त्यांनी गमावले. एक दिवस आपलंही असंच होणार, याची भीती त्यांच्या मनात होतीच. पण ते वीरमरण असेल, याचा अभिमानही त्यांना होता, असं त्यांनी आत्मकथेत लिहून ठेवलंय. पण आयुष्यातलं नाट्य इथं संपणारं नव्हतं.

एके दिवशी मोहिमेवर असताना लुईस झॅम्परिनी यांचं विमान भर समुद्रात पडलं. सहा जणांच्या क्रूमधले फक्त तिघे वाचले. मॅक, फिल आणि झॅम्परिनी. भर समुद्रात राफ्टवर स्वत:ला जिवंत ठेवण्याची कसरत सुरू झाली. समुद्रात शार्क माशांचं साम्राज्य होतं. अशा मोठाल्या शार्कपासून स्वत:ला वाचवण्यासाठी दिवसरात्र जागं राहणं भाग होतं. २७व्या दिवशी जपानच्या टेहळणी विमानानं त्यांना हेरलं होतं. त्यांच्यावर गोळीबारही केला होता. पण त्यातूनही ते वाचले. काही दिवसांनी मॅक वारला. त्याला समुद्रातच सोडण्यात आलं. तब्बल ४५ दिवस ते समुद्रात राफ्टवर राहिले. जेव्हा ते जपानी युद्धनौकेतल्या सैनिकांना सापडले, तेव्हा ते जवळपास बेशुद्धावस्थेत होते. संपूर्ण शरीराचा सापळा झाला होता. त्यातही जपानी सैनिकांनी त्यांना सोडलं नाही, उलट सतत त्यांचे हाल करत राहिले. दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी वाढत होता, तसतसे जपानी सैनिकांकडून त्यांचे अतोनात हाल होत होते. झॅम्परिनीसारख्या हजारो अमेरिकन आणि युरोपीय युद्धकैद्यांना टोकियोजवळच्या छावणीत ठेवण्यात आलं होतं. इथला सार्जंट मस्तुहिरो वटानबे या अमेरिकन सैनिकांना अत्यंत क्रूर वागणूक देई. त्याचा झॅम्परिनीवर विशेष राग होता. कारण, तो अॅथलिट असल्याचं त्यानं वाचलं होतं. त्याचा फोटो त्यानं पेपरमध्ये पाहिला होता. त्यामुळं त्याला जास्तीत जास्त त्रास कसा होईल, हे तो पाहायचा.

महायुद्धात आपली सरशी झालीय, हे दाखवण्यासाठी जपाननं झॅम्परिनीचा वापर केला. अमेरिकन मीडियानं ऑलिम्पिकपटू झॅम्परिनी युद्धात मारला गेल्याच्या बातम्या छापल्या होत्या. जपाननं तो आपला ताब्यात असल्याचं म्हटलं. इतकंच नव्हे, तर त्याला टोकियोतल्या रेडियो स्टेशनवर नेऊन तो जिवंत असल्याचा पुरावा जपाननं दिला. अमेरिकेला अपमानित करण्याची ही जपानची कूटनीती होती. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात अमेरिका कशा प्रकारे युद्धात पिछाडीवर जात आहे, असा कार्यक्रम करायचा होता. या बदल्यात झॅम्परिनी यांना चांगलं जेवण मिळणार होतं. चांगली वागणूक मिळण्याची हमी देण्यात आली. पण, अमेरिकेविरोधातला हा कार्यक्रम करायला त्यांनी नकार दिला. त्यांना पुन्हा छावणीत पाठवून सार्जंट वटानबेच्या तावडीत देण्यात आलं.

तब्बल अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ झॅम्परिनी जपानच्या ताब्यात होते. हिरोशिमा-नागासाकीतल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर जपाननं युद्धातून माघार घेतली. झॅम्परिनी पुन्हा अमेरिकेत परतले. जपानी छळछावणीत अतोनात हाल झाल्यानं अॅथलिट म्हणून त्यांचं करिअर कधीच मागे पडलं होतं. आता त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचारक, अशी नवी भूमिका स्वीकारली आणि अगदी शेवटपर्यंत ते हेच काम करत राहिले. शांतीदूत म्हणून जगभर फिरले. यामुळेच जेव्हा १९९८मध्ये जपान ऑलिम्पिकची घोषणा झाली, तेव्हा तिथं ऑलिम्पिक टॉर्च घेऊन धावण्याचा मोह त्यांना आवरला नाही. टोकियोत धावणं, हे त्यांचं स्वप्न होतं. ते अखेर तब्बल ६० वर्षांनी पूर्ण होत होतं. तिथं जाऊन त्यांनी सार्जंट वटानबेला भेटण्याचा प्रयत्नही केला होता. युद्ध संपल्यानंतर तो भूमिगत झाला होता. दुसऱ्या महायुद्धातल्या ४० क्रूर सेना अधिकाऱ्यांमध्ये त्याची नोंद करण्यात आली होती. एका गावात तो राहात होता. झॅम्परिनी त्या गावातही पोहोचले होते. पण वटानबेनं त्यांना भेटायला नकार दिला.

अॅन्जेलिना जोलीनं जेव्हा ‘अनब्रोकन’ सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ती ९७ वर्षांच्या झॅम्परिनी यांना जाऊन भेटली. ती कित्येक दिवस त्यांच्याबरोबर होती. युद्धकाळातल्या अनेक आठवणी त्यांनी तिला सांगितल्या. मात्र सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं.
पुढे ‘अनब्रोकन’ सिनेमावर जपाननं आक्षेप घेतला. इतिहास आणि युद्धकाळातल्या अनेक घटना सिनेमात चुकीच्या पद्धतीनं दाखवल्या गेल्यात, असं जपानचं म्हणणं होतं. ‘सोसायटी फॉर द डिससेमिनेशन ऑफ हिस्टॉरिकल फॅक्ट’नं या सिनेमावर मूल्यहीन असल्याचं लेबल लावलं. अॅन्जेलिना जोलीला यापुढे जपानमध्ये येण्यापासून मज्जाव करण्याच्या मागणीनं जोर धरला. पण याचा सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर काहीही परिणाम झाला नाही. सिनेमा ऑस्करच्या स्पर्धेत पोहोचला. उत्तम अभिनेत्री असलेल्या अॅन्जेलिना जोलीनं आपण दिग्दर्शक म्हणूनही अव्वल असल्याचं सिद्ध केलं.

narendrabandabe@gmail.com