आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथकांहुनि बाहुबली उत्कट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजनीकांत-शाहरुख-सलमान-आमिर खान आदींच्या कमाईचे विक्रम नुकत्याच प्रदर्शित ‘बाहुबली-२’ने केवळ तीन दिवसांत मोडले. कुणी याला ‘पॅन-इंडिया’अपिल असलेला 
सिनेमा म्हटले, कुणी कथा आणि तंत्रज्ञानकेंद्री सिनेमांचा नवा प्रवाह आला म्हटले. तंत्राधिष्ठित कल्पनाविस्ताराचा हा सर्वोच्च चित्रपटाविष्कार असल्याचेही प्रमाणपत्र अनेकांनी देऊन टाकले. इथे प्रश्न एवढाच आहे की, कमाई आणि व्यावसायिक स्पर्धेच्या पलीकडे जाऊन शतकानुशतके मिथकांच्या प्रभावाखाली असलेलं समाजमन ‘एक्सप्लॉइट’ करताना चित्रपटकर्त्यांनी जुनेच भ्रम पोसले आहेत, मिथक कथांचा वापर करून मानवी संबंधांतले अस्पर्श पैलू उलगडून आशयाच्याही अंगाने वैश्विक पातळीवर घेऊन जाणारी उंची आणि श्रीमंती गाठली आहे, की हा व्यावसायिक चातुर्याचाच भाग अधिक आहे?  

या व अशा अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने चित्रपटाच्या यशामागील कारणांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न...
 
मुंबईत दादरच्या  प्रिमियर थिएटरमध्ये ‘बाहुबली-२’ पाहायला गेलेल्या माझ्या मित्राला आलेला हा अनुभव... त्याच्या समोरच्या रांगेत अख्खं एक कुटुंब ‘बाहुबली’ पाहायला आलं होतं. आज्जी-आजोबांपासून पाचएक वर्षांच्या नातवांपर्यंत... १२ जणांनी संपूर्ण एक रांग बूक केली होती. ‘कटाप्पा ने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हे कुटुंब थिएटरात दाखल झालं होतं. ‘कुटुंब रंगलंय बाहुबली’त असा हा रंजक सीन होता. यात जी उत्सुकता पाच वर्षांच्या नातवाच्या डोळ्यात होती, तीच सत्तरएक वर्षांच्या आजीच्या चेहऱ्यावर दिसत होती. अख्खा सिनेमाभर हे कुटुंब आनंदाने टाळ्या वाजवत होतं. प्रभासच्या एंट्रीला आलेल्या गणपतीला तर आजीनं लांबूनच नमस्कार केला होता. दोन्ही सुनांना देवसेनेच्या साड्या आवडल्याचं दिसत होतं. देवसेनेच्या एंट्रीच्या निळ्या भरजरी साडीवर “वॉव!! काय मस्त आहे ना साडी” अशी त्यांची स्पेशल कमेन्ट आली होती. छोट्या मुलांनी हत्तीच्या सोंडेवर चढणाऱ्या अमरेंद्र बाहुबलीला पाहून टाळ्यांचा कडकडाट केला होता. त्यांनी लगेच ‘पीएस फोर’ची महती सुरू केली होती, तर तरुण मुलं सतत व्हीएफएक्सबद्दल बोलत होती. सिनेमा संपल्यावर आजोबा म्हणाले होते, हे तर आपल्या रामायण-महाभारतासारखंच आहे. गोष्ट काय फार चांगली नव्हती, पण फिल्म बघण्यासारखी आहे... सिनेमा संपला तेव्हा कुटुंबातला प्रत्येक जण आनंदी चेहऱ्यानं थिएटराबाहेर पडला होता...

हीच खरं तर बाहुबलीची खासियत आहे. बाहुबलीत कुटुंबातल्या प्रत्येकासाठी काही ना काही आहे. याचाच अर्थ अगदी चार दिवसांत ५६० कोटी रुपयांचा पल्ला गाठणारा बाहुबली हे ‘परफेक्ट फॅमिली प्रॉडक्ट’ आहे आणि टीव्हीसमोर ठिय्या मारून बसलेल्या कुटुंबाला बाहुबलीनं थिएटरपर्यंत आणलंय. प्रारंभी मूळ बाहुबलीचं थिएटरात प्रदर्शन आणि जाहिरातीतून त्याची उत्तम हवा झाली. ‘कटाप्पा ने बाहुबली को क्यो मारा’ या एका हॅशटॅगनं तर कहर केला. एकदम ‘फटा पोस्टर निकला हिरो’ टाइप प्रभासही शाहरुख, सलमानसारखा तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. गेली कित्येक वर्षे प्रभास दक्षिणेत काम करतोय, पण बाहुबलीनं त्याला आयकॉन बनवलंय. पौराणिक कथांचा संदर्भ असलेल्या सिनेमात काम करणारा एक दाक्षिणात्य हिरो ग्लोबल हिरो बनला. ही कमालही मार्केटिंगचीच आहे.

इथं आणखी गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. बाहुबलीत रंगलेलं कुटुंब हे थोड्या वेळासाठी  टेलिव्हिजन सेट सोडून थिएटरात आलं होतं. या कुटुंबाला खासकरून कुटुंबातल्या महिलांना बाहुबली आवडण्यामागची कारणं शोधली, तर एक गोष्ट लक्षात येते की, टेलिव्हिजन सिरियलमधला ‘सांस बहू आणि साजिश’चा मसाला त्यांना मोठ्या पडद्यावर भव्यदिव्य स्वरूपात पाहायला मिळाला. कटाप्पानं बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर शोधताना देवसेना आणि शिवगामी या सासू-सूनेत उडणारे खटके आणि दोन भावांचा आपसातला बेबनाव, आणि हे सर्व घडण्यासाठी आसपास असलेला मित्र परिवार. म्हणजे रोज जे टीव्हीच्या सिरीयलमध्ये पाहतो, ते नव्यानं मोठ्या पडद्यावर पाहायला मिळालं. अगदी मराठी सिरियलच्या बाबतीत जे घडतंय. ‘तुझ्यात जीव गुंतला’मधला भोळासांब राणा आणि पाठकबाईंच्या प्रेमाच्या प्लॉटनंतर सिरियलचं कथानक कसं कुटुंबाच्या चौकटीत घडायला लागलंय, तसंच बाहुबली सिनेमाचं आहे. म्हणजे तरुणींमध्ये प्रभास आणि आपल्या राणादाची क्रेझ यात समानता आहे. म्हणजे, निर्मात्यांनी दाखवलेलं व्यावसायिक चातुर्य हे की, बाहुबलीनं ‘लार्जर दॅन लाइफ’चा भव्यदिव्य फिल देताना कथानक हे टेलिव्हिजनचं ठेवलं. त्यामुळेही प्रेक्षकांचा ओढा तिकीट खिडकीवर वाढत आहे. कटाप्पा निमित्रमात्र ठरला आहे.

आणखी एक गोष्ट, जी बाहुबली पाहणाऱ्या आजोबांच्या प्रतिक्रियेत दडलेली आहे. हे सर्व रामायण-महाभारतासारखं आहे. कथानकाच्या बाबतीत तर ते खरंच आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा अर्जुन म्हणजे आपला अमरेंद्र बाहुबली; आणि भल्लाल देव म्हणजे रावण किंवा कपटी माज असलेला दुर्योधन. सिनेमाचा व्हीएफएक्स आणि कटाप्पानं प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणलं हे खरं आहे, 
 
पण इथं त्यांनी पाहिला तो राणादा, ‘जय मल्हार’मधला खंडोबा आणि ‘यह है मोहब्बतें’मधला रमन... आणि देवसेनेच्या जागी दिसली ती पाठकबाई, बानू आणि डॉक्टर इशा. म्हणूनच हे कुटुंब अडीच तास खुर्चीवर टिकून राहिलं. टाळ्या वाजवत राहिलं. यामुळेच बाहुबली हा ‘टेलिव्हिजन नॅरेटिव्ह’चं बाय-प्रॉडक्ट आहे, असंही म्हणता येतं. त्या अंगाने बाहुबलीचा अभ्यास केला, तर हे सिद्ध करता येईल. दुसरीकडे मिथकं वापरत दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी अॅन्ड्रॉइड गेम्स सब-वे सर्फर आणि टेम्पल रनसारखीच मज्जा बाहुबलीत दिली आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा, एका लेवलमधून दुसऱ्या लेवलवर जाणारा. पहिल्या भागातला ‘कटाप्पा ने बाहुबली को क्यो मारा?’ हा प्रश्न दिग्दर्शक दुसऱ्या भागात नव्या लेवलवर घेऊन आला आहे. तिथं राजामौलीनं आणखी काही गमतीजमती सांगितल्या आहेत. पहिल्या भागात वापरलेल्या कालकेयासच्या जागी पिंडारचं सैन्य उभं केलं आहे. पिंडारच्या विशाल सैन्यासमोर अमरेंद्र बाहुबलीनं मॅनेजमेन्टची क्लृप्ती वापरली आणि शिवाजी महाराजांसारखं गनिमी काव्यानं युद्ध जिंकलं आहे. बाहुबली जेव्हा आला, तेव्हा त्यामागची प्रेरणा ही ‘अमर चित्र कथा’ असल्याचं राजामौलीनं सांगितलं होतं. या अमर चित्रकथा म्हणा किंवा मग इसापनिती आणि आजीबाईची आटपाट नगरातल्या राज्याची गोष्ट म्हणा. बाहुबलीतून ही गोष्टच राजामौलीनं भव्यदिव्य पण अत्यंत तपशिलात जाऊन (‘डेव्हिल इन दी डिटेल्स’ हा संशोधनाच्या क्षेत्रातला प्रचलित वाक्प्रचार आहे. त्याचप्रमाणे राजामौलीनं कथेतल्या उत्कंठावर्धक ठरणाऱ्या प्रत्येक क्षणातलं सामर्थ्य ओळखून तपशिलाने तो पेश केला आहे.)पुन्हा सांगितली आहे. त्या जोरावर एक हजार कोटींच्या कमाईकडे आता आगेकूच केली. 

पश्चिमात्य देशांकडे जसे अन्याय-अत्याचार विरोधात लढणारे सुपर हिरो असतात, तसे ते आपल्याकडे नाहीत. पण भारतीयांकडे राम आहे, अर्जुन आहे, कृष्ण आहे, भगवान शंकर आहे, विष्णू आहे. काळानुरूप या सर्वांनी अवतार घेतले. ‘खंडोबा, ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’ची घोषणा दुमदुमली आणि गावागावांतल्या प्रत्येक मंदिरात एक नव्या रूपातला राम, नव्या रूपातला हनुमान आणि शंकर पाहायला मिळाला. विटेवर उभ्या विठ्ठलाच्या ओढीनं तर लाखो भाविक पंढरपूरची यात्रा करतात. खंडोबा आणि ज्योतिबाच्या जत्रेला अमाप गर्दी लोटली जाते. या प्रत्येकामागे एक पौराणिक कथा आहे, अवताराची. हीच बाब चाणाक्ष राजामौलीनं हेरली आणि त्याचा बाहुबली करून टाकला. यामुळे मिथकांना पौराणिक कथेचा बाज चढवून व्हीएफएक्सचा वापर करत राजामौलीनं माहेश्मतीची गोष्ट सांगितली. ती गोष्ट आता एक हजार कोटींची झाली आहे. देशातला विविध राज्यांत पडलेला दुष्काळ, दुष्काळाने त्रस्त जनता आणि खाली जाणाऱ्या विकासदराची भ्रांत बाहुबलीला नाही. तो रोजच नवीन रेकॉर्ड करत सुटलाय. पाश्चिमात्यांचा सुपरहिरो अगदीच तकलादू वाटेल, असं राम आणि अर्जुनानं प्रत्येक भारतीयावर गारूड केलंय. “राम तेरे मन में है, राम मेरे मन में है” असं म्हणत, तो त्याच्या जगण्याचा हिस्सा बनलाय. त्यामुळं आपल्या भारतीय कथानकातून ‘रामपण’ आणि रामायण-महाभारत बाजूला सारणं कठीण आहे. वाईटावर चांगुलपणाचा विजय हा भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि जगण्याचा भाग असल्यानंच बाहुबली हा जास्तीत जास्त लोकांना आवडला आहे.

कुणी म्हणतं, बाहुबली एक फॅण्टसी आहे. कुणी म्हणतं, तो फेअरीटेल अर्थात परीकथेसारखा आहे. तर कुणाला बाहुबलीत मेलोड्रामा दिसतो. फॅण्टसी, फेअरी टेल आणि मेलोड्रामा ही विशेषणं पाश्चिमात्य आहेत. या शब्दांचा गर्भितार्थ भारतीय कथानकाला एक तर लागू होत नाही आणि झालाच तर तो तेवढा प्रभावी वाटत नाही. झ्वेटन तोडोरोव या संरचनात्मक वाङ‌्मयीन समीक्षकाच्या म्हणण्यानुसार, पुस्तकात वर्णन केलेल्या घटनाक्रमांच्या नैसर्गिक आणि अलौकिक स्पष्टीकरणांमध्ये वाचक किंवा प्रेक्षकांच्या मनात संकोच निर्माण झाला की, विलक्षणाची निर्मिती होते. भारतीय पॉप्युलर सिनेमाला हा नियम लागू होत नाही, कारण प्रेक्षकाचा सत्याभास अलौकिकतेचा अनुभव घेण्यापासून रोखतो, यामुळे विलक्षण असं घडू शकत नाही. यामुळे फॅण्टास्टिक असं काही भारतीय सिनेमाच्या बाबतीत लागू पडत नाही. बाहुबलीही याला अपवाद नाही. परिणामी, एका सर्वसामान्य कथानकाला व्हीएफएक्सचा तडका देऊन टेलिव्हिजन आणि गेम्सचे सिद्धांत वापरून तयार केलेला सिनेमा म्हणून बाहुबलीकडे बघायला हरकत नाही, असं समीक्षकांचं म्हणणं आहे. त्यात वावगं असं काही नाही. रेकॉर्डचं सोडून द्या, पण बाहुबली या प्रॉडक्टनं संपूर्ण कुटुंबाला एकत्र थिएटरमध्ये आणलं, हे काय कमी आहे? हीच एक त्यातल्या त्यात जमेची बाजू मानून बाहुबलीचा आनंद घ्यायला हरकत नाही.
 
narendrabandabe@gmail.com
बातम्या आणखी आहेत...