आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Bandbe Artice About Two Days One Night Film

आशेचा पट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्समध्ये १८४८मध्ये राज्यक्रांती झाली. यामागचं सर्वात मोठं कारण होतं बेरोजगारी. याच वेळी लुईस ब्लांक यांनी राइट टु वर्क ही संकल्पना मांडली आणि आधीच आर्थिक तंगीत असलेल्या फ्रान्समधल्या बेरोजगारांनी ती उचलून धरली. राज्यक्रांतीची मशालही पेटली. त्यानं पुढे जगाचा इतिहास बदलला. औद्योगिकीकरणामुळं १८४५ पर्यंत प्रचंड रोजगार निर्मिती झाली. पण त्यानंतर टेक्स्टाइल इंडस्ट्री कोलमडली, शेती उद्योगही बुडीत खात्यात गेला. त्यामुळं लाखो बेरोजगार रस्त्यावर आले. त्यापूर्वी मालमत्ता हे राजकीय आणि नागरी अधिकार मिळण्याचं मानक होतं. यात मतदानाचा अधिकारही अंतर्भूत होता. म्हणजे ज्याच्याकडे मालमत्ता - मग ती चल असो की अचल - त्याला हे सर्व अधिकार मिळत. पण मालमत्ता सर्वांकडे नव्हती. अशा वेळी जगण्याचा अधिकार सर्वांना आहे, असा विचार पुढे आला. मग जगायला काय हवं तर काम. काम असेल तर माणूस स्वत:च्या गरजेपुरतं कमवेल, असा विचार पुढे आला. पुढे जागतिक मानवी हक्क अधिकारांची घोषणा करण्यात आली आणि ‘राइट टु वर्क’ हा मूलभूत हक्क बनला. १६ डिसेंबर १९४९ला तशी घोषणा करण्यात आली. प्रत्येकाला त्याच्या आवडीचा रोजगार करण्याचा मूलभूत अधिकार आहे, अशी ही घोषणा होती.

१८४८मध्येच कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी ‘कम्युनिस्ट मेनिफेस्टो’ मांडला. यातून देशाच्या मालमत्तेवर सर्वांचा समान अधिकार, अशी संकल्पना पुढे आली. गरीब आणि श्रीमंत असा भेद यामुळं मिटणार होता. ही फ्रान्स राज्यक्रांतीला चालना देणारी घटना होती. खरं तर या वेळी अख्खा युरोप अस्वस्थ होता. त्यानंतर आलेल्या जागतिक मंदीतूनही जग बाहेर पडलं. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धानंतर बेरोजगारीची सर्वात मोठी लाट आली ती २००५-२००६च्या दरम्यान. रिसेशनच्या नावाखाली बेरोजगारांची संख्या वाढत गेली. ‘ले ऑफ’, ‘डाऊन सायजिंग’ हे शब्द रोज पेपरांचे मथळे भरू लागले. बेरोजगारी आणि स्थलांतरामुळे युरोपात नव्या माफियानं तोंड वर काढलं. युरोपातली ही बेरोजगारीची स्थिती तिथल्या सिनेदिग्दर्शकांनी सिनेमातून योग्य टिपली आणि ती प्रभावीपणे मांडलीसुद्धा.

...एके दिवशी ऑफिसमधून फोन येतो. तुम्हाला यापुढे नोकरीवर ठेवता येणार नाही, असा थेट आदेशवजा फतवाच सुनावला जातो. मग मीच का? या प्रश्नाला ‘असेसमेंट ऑफ वर्क’ अशा नावाखाली बेरोजगारीचं पॅकेज दिलं जातं. मग त्या कामगारानं किती वर्षं आणि किती चांगलं काम केलंय, हे गृहीत धरलं जात नाही. मॅनेजमेंटच्या दृष्टीनं हेड काउंट महत्त्वाचा असतो. २० लोकांचं काम १० लोकांकडून होतंय, मग उगाच कंपनीचं बजेट कशाला वाढवा, यातूनच ‘डाऊन सायजिंग’ हा शब्द अगदी परवलीचा होतो.

‘टू डेज वन नाइट’(२०१४) या सिनेमात ही गोष्ट फार प्रभावीपणे दाखवण्यात आलीय. या सिनेमातली हिरॉइन सांड्रा अशाच डाऊन सायजिंगची पीडित आहे. आधीच डिप्रेशनग्रस्त असलेली सांड्रा या ‘डाऊन सायजिंग’च्या फोननं कोसळते. घरची परिस्थिती तशी बेताचीच. नवरा एका हॉटेलमध्ये वेटर आहे. दोन शाळेत जाणारी मुलं आहेत. सांड्रा एका प्रोडक्शन युनिटमध्ये काम करते. ती धरून १७ लोक तिथं काम करताहेत. डिप्रेशनमुळं तिनं काही दिवसांची सुटी घेतलीय. ती संपण्यापूर्वीच हा डाऊन सायजिंगचा फोन आलाय. मीच का? हा प्रश्न विचारणार्‍या सांड्राला जे उत्तर मिळतं, ते फार धक्कादायक असतं. मॅनेजमेंटला कामगारांना बोनस द्यायचा आहे. त्यासाठी कुठल्या तरी एका कामगाराला कमी करणं भाग आहे. अशा परिस्थितीत आधीच घरी असलेल्या सांड्रालाच का कायमचं घरी बसवू नये, असा विचार मॅनेजमेंटनं पक्का केलाय. जर नोकरी हवी असेल तर इतरांना बोनस घेण्यापासून परावृत्त करण्याची जबाबदारी सांड्रावरच टाकण्यात आलीय. त्यासाठी तिच्याकडे आहेत ते फक्त दोन दिवस आणि एक रात्र. म्हणजे एक वीकएंड... टू डेज वन नाइट... आपल्या सहकार्‍यांना बोनस न घेण्याची विनंती करणारी सांड्रा युरोपातल्याच नव्हे, तर अख्ख्या जगातल्या डाऊनसाइज झालेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतेय... नोकरी गेल्यानंतर ती वाचवण्याची धडपड करणार्‍या सांड्राला साहजिक प्रश्न पडतो, इतरांना बोनस न घेण्यासाठी विनवणी करताना आपण भिकारी वाटणार नाही ना? हा प्रश्नच अस्वस्थ करणारा आहे आणि तिची तगमगही. सांड्राला तिच्या नवर्‍याची साथ आहे. तो तिला त्या सर्वांकडे घेऊन जातोय. नोकरी गेलीच तर काय करायचं, याची आकडेमोडही सुरू झालीय.

१६ पैकी फक्त ९ जरी सांड्राच्या बाजूने आले तरी नोकरी वाचणार आणि सर्व काही ठीक होणार, असा आशावाद तो तिला देतो. हा आशावादच सिनेमाचा खरा गाभा आहे. सिनेमाच्या शेवटी वोटिंग होतं. टाय होतं. सांड्राच्या बाजूनं आठ आणि बोनस घेणारे आठ अशी मतांची विभागणी होते. मॅनेजमेंट सांड्राला काही महिन्यांनी नोकरीची हमी देतं. पण त्याबद्दलचा पर्याय विचित्र असतो. काँट्रॅक्टवर काम करणार्‍या एका कामगाराला मुदतवाढ न देता सांड्राला नोकरी मिळू शकते, असा हा पर्याय असतो. पण तो काही सांड्राला पटत नाही. ती बाहेर येते. नवर्‍याला फोन करते आणि घडलेला प्रकार सांगते. मी घरी येतेय, नव्यानं नोकरी शोधायला सुरुवात करेन, असं म्हणते. याच वेळी आपण चांगली फाइट दिली, असं म्हणत एकाकी समोरच्या रस्त्यावरून चालू लागते. सिनेमा संपतो.

खरं तर ही फक्त एका सांड्राची गोष्ट नाही. ती तिचा रोजगार काढून घेणार्‍या मॅनेजमेंटचीही आहे. बोनस घेण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत. वाढत्या महागाईमुळे जगणं कठीण झालंय. आणि अशा वेळी १००० युरोचा बोनस मिळत असेल तर त्याचं काय करायचं, याची आखणी सर्वांनी आधीच केलीय. असं असताना सांड्राच्या परिस्थितीकडे मानवी दृष्टिकोनातून पाहताना आपल्या आयुष्याचं गणितही त्यांना सोडवायचं आहे. दोन्ही महायुद्धांनंतर बेरोजगारीनं थैमान घातलं होतं. पण आता महायुद्ध झालेलं नाही. काही अस्वस्थ देश सोडले तर जगात शांतता आहे. युरोपात तर बर्‍यापैकी आहे. पण तरीही युरोप अस्वस्थ आहे. अख्ख्या युरोपात ११ टक्के लोक बेरोजगार आहेत. त्यात बेरोजगार असलेल्या युवकांची संख्या २६ टक्के आहे. म्हणजे प्रत्येक घरात एक किंवा दोन बेरोजगार आहेत. जे नोकरी करताहेत त्यांच्यावर कायम डाऊन सायजिंगची तलवार लटकलेली आहे. मग ‘राइट टु वर्क’ या मूलभूत अधिकाराचं काय? नोकरी गेली की जगायचं कसं? ती वाचवण्यासाठी भिकार्‍यासारखं इतरांची विनवणी करत बसायचं का? की आज मी जात्यात आहे, उद्या तुम्ही या फेर्‍यात याल, असं दाखवून देण्याची ही प्रक्रिया आहे? ‘टू डेज वन नाइट’मध्ये ही परिस्थिती कुठलाही बटबटीतपणा न आणता दाखवण्यात आलीय. कथानक अगदी सरळ रेषेत जाणारं.

सुरुवातीला भेटलेल्या तिघांकडून नकार आल्यानंतर अस्वस्थ झालेल्या सांड्राची चौथ्या सहकार्‍याकडून तिच्या बाजूनं उभा राहण्याचा दिलासा मिळाल्यानंतर सर्व बॉडी लँग्वेज बदलते. जसजसा सिनेमा पुढं जातो, त्यात उतार-चढाव येतात. सर्व काही धूसर होत असताना पुन्हा नव्यानं सुरू करण्याचा आत्मविश्वास सांड्राला या प्रवासात मिळतो. आज जरी वाईट असला तरी उद्या चांगला करण्याचा आशावाद ‘टू डेज वन नाइट’मध्ये आहे. उद्याच्या आशेवरच जगातला प्रत्येक जण जगतोय. उद्या हायपोथेटिकल म्हणजेच आभासी आहे. पण हा आभासच आशावादाला जन्म देतोय. म्हणूनच अस्वस्थ बेरोजगार युरोपात अजूनही आत्महत्यांचं प्रमाण कमी आहे. सामाजिक घडी बदलतेय. तो जगण्याचा भाग आहे.
narendrabandabe@gmail.com