आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाचा वैश्विक जत्रोत्सव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नित्याच्या राजकीय-सामाजिक घडामोडींपलीकडे, त्या घडामोडींतून उद््भवणाऱ्या संघर्षापलीकडे जगात खूप काही घडत असतं. इथे खोटी आश्वासनं नसतात, घोषणांचा सुकाळ नसतो, धमक्या नसतात, हिंसक संघर्ष नसतात... तर असतं एक निसर्गसौंदर्याने नटलेलं गाव, गावातली नजरा सुखावणारी रंगीबेरंगी घरं, उत्फुल्ल तरुणाई आणि या तरुणाईच्या साक्षीनं रंगणारा कार्लोवी व्हॅरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल. त्याचीच ही अविस्मरणीय गोष्ट...
 
कार्लोवी व्हॅॅरीतल्या हॉटेल थर्मलमधला ग्रँड हॉल खचाखच भरलेला. या हॉलची क्षमता दीड हजारांची. काही जणांनी तर जमिनीवरच आपली जागा राखून ठेवलेली. अनेक जण उभे. म्हणजे, सुमारे दोन हजारच्या आसपास प्रेक्षक या ग्रँड हॉलमध्ये त्या क्षणी हजर होते. निमित्त होतं, १९६५मधल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘शॉप ऑन मेन स्ट्रीट’ या झेक सिनेमाच्या ‘गाला प्रिमियर’चं. त्या वर्षी येन केदर आणि एल्मल क्लोस या दिग्दर्शक जोडीच्या या सिनेमानं झेकला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता. त्याचं डिजिटली रिस्टोरेशन केल्यानंतरचा म्हणजे तंत्राधिष्ठित पुनरुज्जीवन झाल्यानंतरचा हा भव्यदिव्य असा सोहळा होता. तो अनुभवण्यासाठी  ही प्रचंड गर्दी झाली होती. पण या गर्दीमागे आणखी एक महत्त्वाचं कारण होतं. ते म्हणजे, या सिनेमाच्या जतनीकरणाची लोकाभिमुख प्रक्रिया. झेक फिल्म फाऊंडेशन आणि द स्टेट फिल्म फंड या सरकारी संस्थांनी या सिनेमाच्या रिस्टोरेशनची जबाबदारी उचललेली होती. पण, त्यासाठी प्रचंड आर्थिक तरतूद करणंही गरजेचं होतं. त्यासाठी मग क्राऊड फंडिंगचा निर्णय घेण्यात आला. सोशल मीडियावर #vydotitulku हा हॅशटॅग सुरू करण्यात आला. या द्वारे दहा हजार झेक करोनाची मदत स्टेट फिल्म फंडमध्ये जमा करता येऊ शकत होती. या बदल्यात मदत करणाऱ्या प्रत्येकाचं नाव किंवा कंपन्यांचे लोगो डिजिटाइज सिनेमाच्या एन्ड स्क्रोल अर्थात शेवटच्या नामावलीत समाविष्ट करण्यात आले होते. शिवाय मदत म्हणून सर्वसामान्य झेक नागरिक एसएमएसद्वारे ३० झेक करोनाचं योगदान करू शकत होता. ही नामावलीच सुमारे दहा मिनिटांची होती. गाला प्रिमियरच्या गर्दीतल्या अनेकांची नावं आता या सिनेमाशी कायमची जोडली जाणार होती...
 
"द शॉप ऑन द मेन स्ट्रीट' (१९६५) या सिनेमानं झेक सिनेमाच्या न्यू वेवला अर्थात नव्या सिनेमॅटिक लाटेला ऑस्कर मिळवून उभारी दिली होती. जगभरात झेक सिनेमा पोहोचवला होता. ही वारी इथं थांबली नाही, तर त्यानंतर येरी मेन्जीलचा ‘क्लोजली वॉच्ड ट्रेन’ आणि येन स्वेरकचा ‘कोलया’ या सिनेमांनी ऑस्कर मिळवून न्यू वेव सिनेमाची व्याप्ती वाढवली होती. झेक सिनेमाने जागतिक पातळीवर आपली छाप पाडली. त्याला आज ४० वर्षांहून अधिक काळ उलटलाय. परंतु कार्लोवी व्हॅॅरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अशा सिनेमांच्या जतनीकरणाची प्रदीर्घ परंपरा आहे. "द शॉप ऑन द मेन स्ट्रीट' हा असा जतन झालेला पाचवा सिनेमा आहे. झेक प्रजासत्ताकाच्या कार्लोवी व्हॅॅरी या निसर्गरम्य गावात गेली ५२ वर्षे आंतरराष्ट्रीय सिनेमांची ही अव्याहत वारी सुरूच आहे... 
 
निसर्गाच्या कुशीत वसलेलं कार्लोवी व्हॅॅरी
प्राग एअरपोर्टहून कार्लोवी व्हॅरीकडे जाणारा रस्ता स्वर्गीय आहे. बसच्या दोन्ही बाजूला पाहिलं तर नजर टिकेल तिथंपर्यंत हिरवीगार पसरलेली मैदानी पठारं आहेत. अधेमध्ये दिसणारं सहा-सात घरांचं गाव आहे. बसच्या वेगासरशी ते झरझर मागे पडत जातात, पण घरांचे विशिष्ट रंग हे त्या हिरव्यागार रानातल्या मानवी वस्तीची जाणीव करून देतात. मध्येच कुठं तरी एखादं गॉथिक शैलीतलं चर्च दिसतं. गावाच्या मधोमध वसलेलं. हिरव्यागार रानात काही अंतरावर गवताचे ढिग दिसतात. ते ढिग उभारण्यातली स्थानिकांची कलात्मकता लपून राहात नाही. काही ठिकाणी गवताच्या मोठ्या वेटोळ्या करून, त्या अशा काही ठेवलेल्या असतात की, जणू काही तिथं पुढच्या काही क्षणांत एखादं चित्रप्रदर्शन भरणार आहे. एवढ्या मोठ्या माळरानावर एका रेषेत ठेवलेलं हे गवत एखाद्या कॅनव्हासवर चितारलेल्या लँडस्केपची आठवण करून देत असतं. यात पांढऱ्या शुभ्र ढंगाची रांग पाहणं म्हणजे एक अलौकिक अनुभव ठरत होता. हळूहळू पुढे सरकताना जी अनुभूती येत होती, ती शब्दातीत होती. कार्लोवी व्हॅॅरी गाव जवळ येत गेलं तशी वेगवेगळी रंगसंगती असलेली, सरळ रेषेतली घरं विन्सेट वॅन गॉगचं लँडस्केप अनुभवत असल्याचा भास करून देऊ लागतात.
चार घरांचे गाव चिमुकले 
पैलटेकडीकडे 
शेतमळ्यांची दाट लागली 
हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयातुनि 
अडवीतिडवी पडे 
हिरव्या कुरणामधुनी चालली 
काळ्या डोहाकडे... 
ही बालकवींची "औदुंबर' कविता इथे  साक्षात आपल्याला भेटलेली असते.
पूर्व युरोपाला शहर उभारणीचा समृद्ध इतिहास आहे. त्यात झेक प्रजासत्ताक म्हटलं की कॅसेल, कॅथलिक चर्च आणि गॉथिक शैलीतल्या इमारती आपलं सतत लक्ष वेधून घेतात. बाल्कनीतल्या छोट्या फुलझाडांच्या कुंड्यांची मांडणी, त्यातून डोकावणारी लाल, पिवळी, जर्द निळी अशी आकर्षक फुलं आणि त्यांची तेवढीच सुंदर ठेवण मन मोहवून टाकते.  
 
 तरुणांचा फिल्म फेस्टिवल
चोहोबाजूंनी हिरव्यागार टेकड्या आणि त्यात वसलेलं या निसर्गरम्य कार्लोवी व्हॅॅरी गावाच्या अगदी मधोमध फिल्म फेस्टिवलचं ठिकाण आहे. ओरे, टेपला आणि रोलावा अशा तीन नद्या कार्लोवी व्हॅॅरी गावातून वाहतात. या नद्यांच्या नागमोडी वळणाबरोबरच उभ्या   गॉथिक शैलीतल्या रंगीत इमारतींमुळे गाव अधिकच न्यारं दिसतं. हॉटेल थर्मल शेजारी फिल्म फेस्टिवलसाठी खास हॉटेल्स आणि आऊटलेट उभारलेली असतात. यात अगदी १६ वर्षाच्या मुलांपासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वच या स्टॉल्सवर बियर आणि कॉफीचा आस्वाद घेताना दिसत होते. फिल्म फेस्टिवलच्या आठ दिवसांत इथं स्थानिक बाजार फुलून जातात. म्हणूनच याला सिनेमाची जत्रा म्हणणं योग्य ठरतं. इथं गरम पाण्याची कुंड दिसतात. नळातून सतत गरम पाणी फसफसत असतं. ते खारट मिनरल असलेलं पाणी पिण्यासाठीही गर्दी होते. पर्यटक आणि स्थानिक दोघंही या गर्दीत सहभागी असतात.
 
 थर्मल हॉटेलमध्ये सिनेमा पाहायला गेलं, की प्रचंड गर्दी दिसते ती तरुण-तरुणींंची. १७ ते २५-२६ वर्षांची ही मुलं सिनेमा पाहायला आलेली असतात. अगदी शांतपणे सिनेमाच्या रांगेत उभी राहणारी ही तरुण मुलं पाहिलं, की आश्चर्य वाटतं. अनेक जण सिनेमा सुरू होण्यापूर्वी पुस्तक घेऊन वाचताना दिसतात. डिस्को, पब आणि कॅसिनो इथंही आहेत. पण फिल्म फेस्टिवलच्या गर्दीत आवडीचा सिनेमा पाहण्यासाठी तासन‌्तास रांगेत उभा राहणारा इथला स्थानिक तरुण वर्ग पाहिला, की इथं सिनेमा संस्कृती का रुजली, याचा सहज उलगडा होतो. त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी निर्लेप आहे. युरोपातल्या इतर देशांच्या मानानं झेक प्रजासत्ताकमध्ये प्रत्येक हाताला काम आहे. कुटुंबव्यवस्था अजूनही भक्कम आहे. त्यामुळे अजूनही सर्व कुटुंबाला घेऊन सिनेमा पाहायला जाणाऱ्यांची संख्या खूप असते. सर्व कुटुंबच्या कुटुंब म्हणजे अगदी आजी-आजोबांपासून छोट्या तीन-चार वर्षांच्या नातवंडांपर्यंत सर्व इथं सिनेमा पाहण्यासाठी येतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही सिनेमा संस्कृती वारसा हक्काने चालून येते. 
 
सिनेमाचं मार्केट नसलं तरी सिनेमा उद्योगातले मोठे व्यवहार इथे होतात. यंदा १२३४ सिनेमे विक्रीसाठी फेस्टिवलमध्ये आले होते. त्याच्यात अब्जावधींचे व्यवहार झाले. १ लाख ४० हजार ६७ अशी विक्रमी तिकीट विक्री झाली. हे सर्व काही थक्क करणारं आहे. याचा आढावा घेतला तर लक्षात येतं की, कार्लोवी व्हॅॅरी फिल्म फेस्टिवल जगातल्या महत्त्वाच्या फेस्टिवलमध्ये नावाजण्याचं कारण हे त्याच्या साधेपणात आहे. कान, व्हेनिस आणि काही प्रमाणात बर्लिनमध्ये जसा भपका असतो, तसा तो इथे नाही. सिनेमा आणि सिनेमाशी संबंधित सर्वच गोष्टी अगदी साधेपणानं घडतात आणि त्यातून अनेक नवनिर्मिती होते.
 
फेस्टिवलचं संचित
खरं तर कार्लोवी व्हॅरी फिल्म फेस्टिवलचं संचित प्रगल्भ झेकच्या सिनेमा संस्कृतीत आहे. इथले लोक उद्योगी आहेत. कामाच्या वेळी प्रचंड काम तेही आनंदी वातावरणात आणि नंतर संध्याकाळी मौजमस्ती, असं आल्हाददायी वातावरण इथे असतं. त्यामुळे एक ऊर्जा या ठिकाणी सतत तयार होत असते. ती प्रसारित होत असते. त्यामुळे इथे येणारा प्रत्येक जण या जागेच्या प्रेमात पडतो. प्रचंड स्थित्यंतरानंतर झेक प्रजासत्ताक हा स्वतंत्र देश १९९३ला जन्माला आला. २००४ला त्यानं युरोपियन युनियनची कास धरली. युरोपातल्या मंदीचं सावट इथंही आलंय. पण इथं प्रत्येक हाताला काम आहे. ऑटोमोबाइल इंडस्ट्री इथं रोजगार निर्मितीचा मुख्य स्रोत असली तरी शेती आणि इतर उद्योगांनी झेकची अर्थव्यवस्था खंबीर ठेवलीय. यामुळेच १०० टक्के रोजगार निर्मिती आहे. याचा सकारात्मक परिणाम इथे येणाऱ्या पाहुण्यांवर होतो. त्यामुळे प्रत्येक जण सोबत अविस्मरणीय आठवणी आणि पुन्हा इथं येण्याचं स्वप्न घेऊनच आपापल्या दिशांना परततो...
 
सिनेमाचं वेड असलेला तंबूंचा गाव
कार्लोवी व्हॅरी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलची अनेक आकर्षणं आहेत. त्यातलं खास म्हणावं असं आहे, टेन्ट व्हिलेज. स्टॅनोविच मोस्शतिश्के रोलावा असं हे ठिकाण तंबूंचं गाव म्हणून विकसित करण्यात आलं आहे. खरं तर ते एक मोठं मैदान आहे, रोलावा नदीकाठावरचं. तिथे ही विशेष व्यवस्था दरवर्षी फिल्म फेस्टिवलसाठी करण्यात येते. म्हणजे, तुम्ही इथं फक्त आपला तंबू घेऊन यायचं. पावसाचं पाणी पूर्णपणे झिरपून घेण्याची क्षमता इथल्या मातीत असल्यामुळे चिखल होत नाही. रात्री कितीही पाऊस पडला तरी सकाळी तंबूबाहेर पाण्याचा एक थेंबही दिसत नाही. त्यामुळे इथं तंबूत राहणं अनेक जण पसंत करतात. फेस्टिवल काळात ८० ते १००पेक्षा जास्त तंबू या गावात पाहायला मिळतात.
 
थोरामोठ्यांचे वास्तव्य
गरम पाण्याचे नैसर्गिक कुंड, स्पा आणि इथला हिरवागार सभोवताल यामुळे कार्लोवी व्हॅॅरी युरोपातलं सर्वात प्रसिद्ध हॉलीडे डेस्टिनेशन ठरतं. विचारवंत कार्ल मार्क्स, संगीतकार बिथोव्हेन, बाख, क्रांतिकारी मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉइड,  हॉलिवूड कलावंत रॉबर्ट रेडफोर्ड, मेरी पिकफोर्ड आदी युरोप-अमेरिकेतल्या अनेक महत्त्वाच्या लेखक-कलावंतांनी कधी ना कधी इथे वास्तव्य केलंय. त्यांच्या आठवणी जपण्यासाठी इथल्या घनदाट आणि आकर्षक मैदानांमध्ये पुतळेही उभारण्यात आलेत...
 
कार्लोवी व्हॅरीतला भारत
अभिनेत्री नर्गिसला कार्लोवी व्हॅरी फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. अनेक महत्त्वाच्या भारतीय सिनेमांचं इथे स्क्रिनिंग झालंय. हा आकडा तेवढा मोठा नसला, तरी तो नक्कीच अभिमानास्पद आहे. इथे स्पर्धेत येण्यासाठी भारतीय सिनेमाला खूप मेहनत घ्यावी लागते. ऋतूपर्णो घोषच्या ‘रेनकोट’नंतर तब्बल १३ वर्षांनी यंदा कर्मा तापका दिग्दर्शित ‘रोलांग रोड’ हा सिनेमा झळकला.
narendrabandabe@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९८२०४७००७२
बातम्या आणखी आहेत...