आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्हा साहित्यिक मेळावा; एक ‘सुवर्ण अानंद’ याेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सार्वजनिक वाचनालय नाशिक म्हणजेच बाेलताना सर्वजण सावाना असे सुटसुटीत म्हणतात. त्या सावानाचा जिल्हा साहित्यिक मेळावा म्हणजेच एक हवाहवासा, अापलेपणा वाटणारा कार्यक्रम, उत्सवच म्हणायला हवा. सावानाचे वय १७६ वर्षे. मेळाव्याचे वय ४९. शतकाेत्तर सुवर्णमहाेत्सव साजरा करणार अाहे, हे विशेष. अखंड ४९ वर्षे अाणि ठरावीक वेळेस असा उत्सव साजरा करणे हे नक्कीच काैतुकाचे. १९६८ सालची गाेष्ट. ज्येेष्ठ विनाेदी लेखक डाॅ. अ. वा. वर्टींच्या मनात ही कल्पना अाली. त्यांनी अापल्या साहित्यप्रेमी मित्रांना ती बाेलून दाखवली अाणि लगेच ती अमलात अाणायचे ठरले. हा शारदीय उत्सव व्हावा, सारस्वतांना प्रसन्न अशा सरस्वती देवीच्या उत्सवात म्हणजेच नवरात्रात ताे करायचे ठरले अाणि गेली ४९ वर्षे नवरात्रात येणाऱ्या पहिल्या शनिवारी, रविवारी हा मेळावा हाेत राहिला अाहे. स्थळ व दाेन दिवस यात बदल न झाल्याने सातत्य राहत गेले. (यंदा जमणार नाही, नंतर बघू असे झाले नाही)
१९६८ सालच्या सुमारास व नंतरची बरीच वर्षे नाशिकला ज्येष्ठ साहित्यिकांचा दबदबा हाेता. कुसुमाग्रज, डाॅ. वर्टी, प्रा. वसंत कानेटकर, डाॅ. चंद्रकांत वर्तक, मनाेहर शहाणे, प्रा. विमादी पटवर्धन, डाॅ. जी. अार. साळुंखे, स. ना. सूर्यवंशी, बाळासाहेब दातार, डाॅ. सुधीर फडके, बाबूराव बागूल, अशाेक टिळक, चंद्रकांत महामिने अशा कितीतरी लेखक मंडळींचा वावर हाेता.

त्या सर्वांना व इतर साहित्यप्रेमींना एकच अाणून वाङ‌्मयीन विषयावर परिसंवाद, चर्चा, मुलाखत, कविसंमेलन असा दीड दिवसाचा भरगच्च कार्यक्रम व डाॅ. अ. वा. वर्टींचे अतिशय खुमासदार, प्रसन्न, मनमाेकळे सूत्रसंचालन यामुळे या पहिल्याच मेळाव्याने साहित्यप्रेमींच्या मनाची अशी काही पकड घेतली की, ती अजूनही अाहे. डाॅ. वर्टींनी या मेळाव्याचा पायाच असा काही घातला की, त्यांच्यानंतरही सावानाच्या सर्व मंडळींनी व नाशिकच्या साहित्यप्रेमींना मेळावा उत्तमप्रकारे कसा संपन्न हाेईल याची सतत काळजी घेतली. प्रारंभी या मेळाव्याचे वैशिष्ट्य असे हाेणे की, अध्यक्षपदी नाशिकबाहेरचा पण पूर्वाश्रमीचे नाशिकचे मान्यवर साहित्यिक बाेलवायचे ठरले. असे जवळपास २७ वर्षे झाले. पुढे नाशिकबाहेरच्या नाशिककर साहित्यिकांची संख्या कमी हाेत गेली व नाशिकला वास्तव्यास असलेल्या साहित्यिकांचाही सन्मान व्हावा या हेतूने मग नाशिकच्या साहित्यिकास अध्यक्षपद देऊन उद‌्घाटक, प्रमुख पाहुणे म्हणून इतर मान्यवरांना बाेलावण्याचे ठरले. तीच परंपरा अाजही सुरू अाहे. पहिल्या वर्षी १९६८ला विमादी पटवर्धन अध्यक्ष हाेते. १९६९ला ज्येष्ठ समीक्षक प्रा. माधव मनाेहर. माधव मनाेहर त्या वर्षापासून त्यांच्या अखेरच्या वर्षापर्यंत वयाच्या ८० नंतरही मेळाव्याला येत हाेते. हा मेळावा म्हणजे माझे अानंदनिधान असेच ते म्हणायचे. मेळाव्याचे ख्यातनाम अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांची नामावली वाचूनही अापण भारावून जाताे. ती विस्तृत इथे देत नाही. पण, मेळाव्यामुळे रथी-महारथी सारस्वतांना अगदी जवळून पाहण्याचे, एेकण्याचे, त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य साहित्यप्रेमींना मिळत गेले, मिळत अाहे.

या मेळाव्याचा कविसंमेलन हा महत्त्वाचा भाग. अजूनही ७०-८० कवींचा सहभाग. चार तास चालणारे हे संमेलन. प्रत्येकाला कविता म्हणण्यासाठी कुसुमाग्रजांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. समाेर कुसुमाग्रज, डाॅ. अ. वा. वर्टी, वसंत कानेटकर असे मान्यवर बसलेत. त्यांना इतक्या जवळून कविता एेकवण्याची संधी अापल्याला मिळते ही किती अानंदाची गाेष्ट. अनेकांना हे भाग्य अनेक वर्षे लाभले अाणि तात्यासाहेब म्हणजे कुसुमाग्रज अनेक जाहीर कार्यक्रमांना जात असत. पण कुठेही त्यांनी जाहीरपणे कविता म्हटल्याचे मला अाठवत नाही. ताे अानंद, ताे दुर्मिळ याेग या मेळाव्यात यायचा. तात्यांच्या अनेक कविता तात्यांच्याच ताेडून एेकण्याचे भाग्य या मेळाव्याने अनेकांना दिले. अनेक अलाैलिक, अमाैलिक क्षण या साहित्यिक मेळाव्याने दिले. या मेळाव्याने नाशिकचे सांस्कृतिक व साहित्यिक वातावरण संपन्न केले अाहे. या मेळाव्याने नाशिकबाहेर गेलेल्या अनेक मान्यवरांची नाळ पुन्हा नाशिकशी जाेडली गेली.

नरेश महाजन
बातम्या आणखी आहेत...