आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाठमोऱ्या बेन किंग्जलीचं डोकं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीजींच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या सर रिचर्ड अॅटनबरो यांच्या सुवर्ण स्वप्नाबद्दलच्या बातम्या मी लहानपणी शाळेत असताना ऐकल्या होत्या. हा प्रकल्प जाहीर करण्याच्या उद्देशानं ते मुद्दाम भारतात एका चित्रपट महोत्सवासाठी येणार असल्याची बातमी पण मी वर्तमानपत्रात वाचल्याचं आठवतं. त्या काळी प्रमुख भूमिका सर अॅलेक गिनेस करणार, अशी चर्चा होती. पण ती नुसतीच एक वदंता ठरली. त्या नंतरच्या काळात अनेक मातब्बर नटश्रेष्ठींची नावं पुढे आली - टॉम कोर्टने, डॉनल्ड प्लेसन्स, अँटनी हॉपकिन्स, ब्रायन ब्लेसेड, जॉन हर्ट आणि मग जेव्हा ‘आक्रोश’ नव्यानं प्रदर्शित झाला, तेव्हा ती परमपावन भूमिका करायला भारतीय नटाची निवड होणार, अशी बातमी उसळली. अशा नटाच्या शोधासाठी सर रिचर्ड हे लवकरच भारतात पधारणार आहेत, अशीही बातमी होती. माझा अँटीना जोरजोरात कंपन पावू लागला. मला बऱ्यापैकी वाव आहे, असं मला मनातून वाटलं. जेव्हा प्रथमच ही बातमी कानी पडली होती, तेव्हा (१९६४चा सुमार असावा) ही भूमिका करण्याची शक्यतासुद्धा डोक्यात आली नव्हती. कशी येणार? तेव्हा मी साला अवघा चौदा वर्षांचा होतो. त्या काळात मला झोरो करण्यात रस होता, गांधी नाही. पण आता तिशीच्या उंबरठ्यावर ही शक्यता नक्कीच आकर्षक वाटली. त्यांच्या वाढत्या वयाचा आलेख मी समर्थपणे दाखवू शकेन, असा मला आत्मविश्वास होता.

रंगमंचावर अनेकदा हा हातखंडा प्रयोग नव्हता का मी करून दाखवला? पण हॉलीवूडच्या एका भव्य चरित्रपटात खुद्द चरित्रनायकाचीच व्यक्तिरेखा सादर करण्याची कल्पना अशक्यप्राय वाटण्यासारखीच होती. पण खोल कुठेतरी माझ्या तर्कशक्तीनं मला सांगितलं की, त्यात असाध्य असं काहीच नाही. कोणत्या युरोपीय नटाला गांधींची खास शरीरबोली जमणार होती? असाही काहीसा शिष्टपणाचा विचार मनात डोकावला आणि खुद्द भारतामध्येही असे फारच मोजके सिद्धहस्त नट होते, ज्यांना त्यांच्यासारखं दिसणं हे दूरन्वयानेदेखील शक्य होणार नव्हतं. निसर्गानं मला किरकोळ बांधा बहाल केला होता. आणि शिवाय गमतीशीर चेहरा! त्याच्यामागचं निश्चित हेच कारण असावं! जर कुणी भारतीय नट असायचा असेल, तर तो मीच होतो, हे निःसंशय!

डावाचे पत्ते शिताफीनं आधीच लावून ठेवलेले आहेत, असा मला संशयसुद्धा आला नाही. सर रिचर्डना मी भेटलो. अतिशय मिठ्ठास आणि मनमोकळा माणूस! त्यांनी नुकताच ‘आक्रोश’ पाहिला होता आणि माझ्या कामाबद्दल ते भरभरून चांगलं चांगलं बोलले. मला सतत ‘माइस्ट्रो’ (कलामहर्षी) म्हणून संबोधत राहिले. ‘द अँग्री सायलन्स’ आणि ‘गन्स अॅट बटासी’ या त्यांच्या कमी प्रसिद्ध सिनेमांमधल्या भूमिका मला खूप आवडल्याचं मीही त्यांना सांगितलं. पण त्यांना त्यांचा विसर पडल्यागत वाटलं आणि त्या स्तुतीबद्दल ते उदासीनच वाटले. पण आमचं एकूण छान सूत जमलं आणि आपण परत भेटलं पाहिजे, असं ते म्हणाले. मुंबईमधला प्रत्येक दुसरा नट, अॅटनबरो राहात होते त्या ताज हॉटेलच्या वाऱ्या करू लागला. त्यांची भेट होईल, या आशेने. आम्ही मात्र परत एकदा भेटलो. स्क्रीन टेस्टसाठी मी लंडनला जायला तयार आहे का, असं त्यांनी मला विचारलं. पुढच्या एका सिनेमासाठी मी दाढी वाढवत होतो, ती मी घाईघाईनं छाटून टाकली. मिशा मात्र राखल्या. मग अलीकडेच बनवलेला सूट परिधान करून मी आयुष्यात प्रथमच विलायतेला जायला निघालो. स्मिता पाटील, भक्ती बर्वे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या समवेत एक्झिक्युटिव्ह क्लासनं मी लंडनला रवाना झालो. त्या तिघी कस्तुरबाच्या भूमिकेसाठी चाचणी द्यायला निघाल्या होत्या. खास नोंदणीक्रमांक RA1 आणि RA2 मिळालेल्या दोन रोल्स रॉइस गाड्या आमची वाट पाहात होत्या. मोठ्या दिमाखात आम्ही ऑक्सफर्ड स्ट्रीटला गेलो आणि तिथे टी. व्ही. सेट असलेल्या खोल्यांमधून स्थानापन्न झालो. नंतर वज्राघाताप्रमाणे आमच्यावर कोसळणार असलेल्या बिलाची तेव्हा कल्पना आली नाही. रत्नाला मी टेलिफोन केला, तेव्हा तिनं सांगितलं की, माझी निवड निश्चित झाली, असं सगळ्या भारतीय वृत्तपत्रांमधून छापून आलं आहे. त्या सुंदर उन्हाळी दिवशी आभाळातल्या ढगांप्रमाणे मी तरंगत निघालो आणि ऑक्सफर्ड स्ट्रीटवर मोठ्या ऐटीत फिरलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी शेपर्टन स्टुडिओजमध्ये एका बोळात पहिलं काय दृश्य मला दिसलं असेल, तर पाठमोऱ्या बेन किंग्सलीचं डोकं. माझं काळीज एकदम खचूनच गेलं. आमची ओळख करून दिली, तेव्हा त्यानं वळून पाहिलं आणि मग तर माझं काळीज पार रसातळाला गेलं. हा गृहस्थ आताच इतका थेट गांधींप्रमाणे दिसत होता की, मी त्याची बरोबरी करणं शक्यच नव्हतं. ‘दुसरा कुठलाच नट हे साम्य साधू शकणार नाही,’ या माझ्या आढ्यतेखोरपणाच्या भ्रामक समजुतीला पार सुरुंग लागला. माझ्या डोळ्यांसमोरच तो उभा होता. थेट गांधी! दुसरा एक उमेदवार, टेनिस खेळाडूप्रमाणे पुष्ट पोटऱ्या असलेला जॉन हर्ट हाही आला होता. मी नंतर असं अनुमान बांधलं की, बेनची निवड केव्हाच झाली असणार. रोहिणीची पण. आम्हां सगळ्यांचा चाचणी सोहळा ही निव्वळ धूळफेक होती. माझी निवड झाल्याची खोटी बातमी भारतीय वृत्तपत्रांना फोडण्याची क्लृप्ती, हेही एक थोतांडच होतं. सरळसरळ गोऱ्या नटाची निवड केली असती, तर प्रचंड ओरडा झाला असता. तो मुळातच खुडून काढण्यासाठी ही जबरदस्त योजना होती आणि नट अर्थातच गोरा असायला हवा होता. कारण ऑस्करची शर्यत बहुधा सुरू झाली असणार. शूटिंगचा मुहूर्त होण्याच्यासुद्धा आधीच.
बातम्या आणखी आहेत...