Home »Magazine »Rasik» Naxalite And Hollywood

नक्षलवाद्यांचे हॉलीवूड कनेक्शन

दिव्य मराठी | Feb 10, 2013, 03:00 AM IST

  • नक्षलवाद्यांचे हॉलीवूड कनेक्शन

‘बिहाइंड एनिमी लाइन्स’, ‘मॅट्रिक्स’, ‘डाय हार्ड’, ‘द डेल्टा फोर्स’ आणि ‘हर्ट लॉकर’ या हॉलीवूड चित्रपटांचे आकर्षण नक्षलवादी गटांमध्ये आहे, यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. पण नक्षलवादी गटांतील काही जणांनी या चित्रपटातून शस्त्रास्त्रनिर्मितीची प्रेरणा घेतल्याचे नुकतेच छत्तीसगड पोलिसांना चौकशीदरम्यान आढळून आले आहे. वर उल्लेख केलेल्या चित्रपटांमध्ये बॉम्ब बनवण्याचे तसेच शत्रूविरुद्ध कट आखण्याचे काही प्रसंग आहेत. या कटकारस्थानाची हुबेहूब नक्कल काही नक्षलवादी गटांनी पोलिसांविरोधात केली आहे.

काही नक्षलवादी अत्याधुनिक बंदुका मिळवण्यासाठीसुद्धा प्रयत्नशील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वरील सर्व चित्रपटांमध्ये दहशतवादी संघटनांशी सरकार कोणत्या पातळीवर कसे लढत आहे यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ही सगळी व्यूहरचना नक्षलवादी संघटनांचे अनेक म्होरके आत्मसात करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एका पोलिसाला ठार मारून त्याच्या शवामध्ये काही स्फोटके लपवून ठेवली होती. ही कल्पना ‘हर्ट लॉकर’ चित्रपटातून हुबेहूब चोरण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. नक्षलवाद्यांच्या कॅम्पवर टाकलेल्या धाडीत पोलिसांना अनेक हॉलीवूड चित्रपटांच्या सीडी, डीव्हीडी आढळून आल्या. बहुतेक चित्रपट हे युद्धपट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कमांडो प्रशिक्षण, बॉम्ब निर्मिती, व्यूहरचना अशांसाठी हे चित्रपट नक्षलवाद्यांना मार्गदर्शक ठरतात, हे पाहून पोलिस चक्रावले आहेत.

पाहण्यासारख्या काही डॉक्युमेंटरी
झीरो डार्क थर्टी
- आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा शोध घेणा-या ‘झीरो डार्क थर्टी’ या चित्रपटाने अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण केलेली आहे. भारतात हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. पण अनेक असे चित्रपटरसिक आहेत, की ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर बेतलेले चित्रपट पाहणे आवडते. अशा काहींसाठी यंदाच्या सनडान्स फेस्टिवलमध्ये वाखाणलेल्या डॉक्युमेंटरी प्रदर्शित होत आहेत. ‘डर्टी वॉर’ या डॉक्युमेंटरीमध्ये ओबामा प्रशासनाने मध्य-पूर्व आशियातील संघर्ष कसा हाताळला यावर कठोर टीका आहे. शोध पत्रकार जेरेमी स्काहिल यांनी स्वत: अमेरिका फौजेच्या संयुक्त कारवाई पथकाचा एक भाग म्हणून दौरा केला. या दौ-यात त्यांना अमेरिकेच्या फौजांनी केलेले अनन्वित अत्याचार पाहायला मिळाले. ‘द वर्ल्ड अकॉर्डिंग टू डिक चेनी’ ही डॉक्युमेंटरीही अमेरिकेच्या युद्धखोर भूमिकेवर प्रकाशझोत टाकणारी आहे. अमेरिकेचे उपाध्यक्षपद आठ वर्षे भूषवलेल्या डिक चेनी यांनी बुश पितापुत्रांच्या युद्धखोर भूमिकेला नेहमीच पाठिंबा दिला. चेनी यांच्या आयुष्याचा पट या डॉक्युमेंटरीमधून लक्षात येतो. त्याचबरोबर अमेरिकेचे इराकविरोधातील युद्ध, इराणसमवेतचा संघर्ष, दहशतवादी संघटना यांची माहिती मिळते.

‘बेनहर’चा रिमेक
11 ऑस्कर पटकावलेल्या ‘बेनहर’ या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे. 1959मध्ये ‘बेनहर’ प्रदर्शित झाला होता. त्या वेळी या चित्रपटाला सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. या विक्रमाची बरोबरी नंतर ‘टायटॅनिक’ आणि नंतर ‘लॉर्ड ऑफ द रिंग-रिटर्न ऑफ द किंग’या चित्रपटांनी केली होती. पण ‘बेनहर’ या चित्रपटाने घडवलेला इतिहास हा आजही हॉलीवूडमध्ये चर्चिला जातो. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांतून धार्मिक आणि सेक्युलर अमेरिकेची दोन रूपे जगापुढे आली होती. अनेक चित्रपट समीक्षकांनी ‘बेनहर’चा रिमेक हा अमेरिकेच्या धार्मिक समजुतींना पक्के करण्याचा इरादा असल्याचे म्हटले आहे. ‘बेनहर’चा रिमेक करण्याची गरज नाही, असेही काहींचे म्हणणे आहे. काही जणांनी मात्र चित्रपटाच्या पटकथेत बदल केल्यानंतर हा चित्रपट मूळ चित्रपटापेक्षा वेगळा होऊ शकतो, असे म्हटले आहे.

Next Article

Recommended